Friday, October 19, 2012

गोइंग "फ़ॉर गुड" - अर्थातच पुन्हा एकदा स्वदेस !!


!! "ओये मेरे देश, मेरी मीट्टी, मेरे राज.... मैं आ गया"!! अनुपमखेर चा DDLJ मधला हाच डायलॉग जरा वेगळ्या ढंगात म्हणत ८ वर्षांननंतर अमेरिकेला राम राम ठोकून "फॉर गुड" मायदेशी परत आलेल्या गिरीशने बॅग खाली ठेवत आपले हात आकाशात पसरले...  !!  

मागोमाग काहीशी नाईलाजाने पण अर्धांगिनी श्वेता, आणि त्याची मुलगी जिया सुद्धा आपापल्या बॅगा घेऊन पुढे आले. WELCOME BACK TO INDIA असा बोर्ड हातात घेऊन ट्रॅव्हल कंपनीची गाडी आणि ड्रायव्हर तयारच होता -आणि बंगलोर विमानतळ ते नव्यानेच घेतलेला आलिशान फ्लॅट हा प्रवास लगेचच सुरू झाला...

रस्त्यावरून धावणाऱ्या AC गाडीच्या काचा खाली घेऊन  गिरीश ने बाहेर नजर टाकली, मेडिकल्स, मिठाईची दुकाने,  पानटपऱ्या, बँका आणि हॉटेल्स मागे पडत असताना गेल्या ७-८ वर्षांचा काळ  गिरीशच्या मनात फेर धरून नाचू लागला..

२२ व्या वर्षीच एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी,  मेहनत आणि बुद्धिमत्तेसोबत नशिबाची  जोड मिळाल्याने वर्षभरात प्रमोशन आणि त्यामध्ये कंपनीकडून ३ वर्षांसाठी ऑनसाईट रिलोकेशन ची ऑफर, मग तिथे देखील कलागुणांमुळे ३ वर्षांचे कॉन्ट्रॅक्ट कधी पर्मनंट झाले ते समजलेच नाही,  दरवर्षी भारत वारी व्हायची, पण चवथे वर्ष विशेष होते -- कारण ह्यावेळी त्याने श्वेताला देखील लग्न करून सोबत नेले होते, पुढे २ वर्षांनी एक कन्यारत्नप्राप्तीच्या आनंदाने  गिरीश आणि श्वेता हरखून गेले!!   

पण मग आज गेली ७-८ वर्षे अमेरिकेत राहून परत भारतात का? -

आई वडिलांना आपली गरज आहे --वयानुसार त्यांनाही आराम आणि आपल्या लोकांची सोबत हवीशी वाटते ?

मुलगी मोठी होऊ लागलीये -- कितीही झाले तरी संस्कार हे उसने मागून आणता येत नाहीत -- ?

नातेवाइकांनी  ->"काय ग्रीन कार्ड मिळाले असेलच, ऍप्लाय करा ना, मिळेल तुमची ओळख चांगली असेल तिथे, मेले आमच्या विशू ला व्हिसासाठीही इतके अडवतात" - असे प्रश्न करून डोकं पिकवलंय ?

अमेरिकेत देखील खूप काही फार चांगले दिवस नाहीत ?

एक ना अनेक कारणे!! 

ग्रीन कार्ड मिळणे अवघड नव्हते हे नक्की-- भारतात यायच्या आधीच्या सेंडऑफ पार्टीत जॉन पेरेस्टो हा ऑफिसमधला बॉस गिरीशसोबत रात्रभर दारू पीत होता, तो म्हणाला, "की गेल्या ४ वर्षात तुझ्यासारखा टॅलेंटेट, विश्वासू आणि स्मार्ट माणूस दुसरा कोणी मिळाला नाही. तुझ्यामुळे कंपनीला, मला आणि पर्यायाने पूर्ण युनिट ला अनेक फायदे झालेत.  तू इथेच राहा.  तुझे ग्रीन कार्ड चे काम आरामात होईल, वेरिफिकेशन साठी माझेही ओळखीचे लोक अनेक आहेत. दुसरा जॉब हवा असेल तर मी रेफरन्स मिळवून देतो पण... " 

बॉस ला अर्धवट तोडून गिरीशने ठामपणे सांगितले, "बॉस, धन्यवाद तुम्ही खूप करताय माझ्यासाठी, पण माझा निर्णय पक्का आहे...I've planned to go for GOOD now...  " 

बॉस म्हणाला -  "ठीक आहे, I'm loosing out a GEM.... पण परत कधी यावेसे वाटले तर मात्र मला आठवणीने फोन कर, आणि हा ग्रीन कार्ड चा फॉर्म कायम जवळ ठेव, म्हणजे ह्याकडे पाहून तू कधीतरी परत येऊन आमच्या कंपनीला रुजू होशील अशी आशा वाटते"

अनेक खड्यांमधून गाडी गेल्यामुळे त्याची तंद्री तुटली, त्याने मागे वळून पाहिले तर जिया श्वेताच्या मांडीवर झोपून गेली होती, आणि श्वेतादेखील झोपेला आली होती!   सिग्नल क्रॉस होतो न होतो तोच हवालदाराने गाडी बाजूला घ्यायला सांगितली, ड्रायव्हर बाहेर उतरून काहीतरी बोलला आणि त्याने शंभराची नोट पोलिसाच्या हातात टेकवली आणि परत निघाला,

गिरीशला फार वाईट वाटले,  अनेक वर्षात अमेरिकेत ह्या एवढ्या लहान  स्तरावर लाचलुचपतीचा उद्योग पाहायला मिळाला नव्हता -त्याबाबत विचारल्यावर समजले की गाडीचे  पी.यू.सी. (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) मुदतबाह्य झाले होते, आणि  विमा देखील भरलेला नव्हता म्हणे.
नव्या कोऱ्या इमारतीच्या भल्यामोठ्या दारातच भालदार-चोपदारांनी सलाम केला.  फ्लॅट तर आलिशान होता,  आई वडील १ला मजला आणि गिरीशसाठी ७वा मजला. एका बाजूला संपूर्ण काचेची भिंत होती, तिथून निम्म्या शहराचा नजारा दिसत होता  एका बाजूला उंच इमारती दुसरीकडे डोंगर, पण डोंगराच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत वाढलेल्या झोपडपट्ट्या आणि पत्र्याची घरे!

पडदा ओढून त्याने टीव्ही लावला,  पहिलीच बातमी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची पाहून गिरीशने आवाज वाढवला.

LiveNews चॅनलने गेल्या ५ वर्षातल्या नोंदी, स्टॅटिस्टिक्स मांडले होते. इलेक्शन च्या काळात होणारी भाषणे, नामांतराचे, आरक्षणाचे राजकारण, वाढती महागाई, वाढती लोकसंख्या, अपुऱ्या सोयी-सुविधा, सरकारी कामातला पारदर्शकतेचा अभाव इ. सगळे ठासून भरलेला मसालेदार बातम्यांचा कार्यक्रम बघताना ३ तास गेले. त्यानंतर मात्र त्याने वैतागून टीव्ही बंद केला.

जिया प्रवासाने दमल्यामुळे तिला थोडी कणकण देखील होती. श्वेता ने झोप झाल्यावर कॉफी केली.  (श्वेताला भारतात परतण्याची फार इच्छा नव्हतीच, तिने तर ग्रीन कार्डसाठीची माहिती लग्नानंतर लगेचच घेतली होती. केवळ इमोशनली गिरीशच्या बोलण्याने ती येण्यास तयार झाली)
 कॉफी ती पिता पिता त्याने महिन्याभराचा कार्यक्रम आखला - जिया ची शाळेची ऍडमिशन, मेडिकल इमर्जन्सीसाठी पैसे/पॉलिसी (तिकडे अमेरिकेत फुकट आहे ही सुविधा), सोसायटीच्या मिटींग्स, ऑफिस चे रूटीन, सेव्हिंग्सचे प्लॅन, इ. इ.

तेवढ्यात दारावरची बेल वाजली, सोसायटीची नोटीस आली होती, आजूबाजूच्या ३-४ मंडळांची गणपती/दहीहंडी वगैरेची एकत्रित वर्गणी सोसायटीच्या वतीने भरली जाणार होती आणि त्यासाठी १००० + ५०० रु. ची नोट खर्च होणार होती.   (ह्यांना वर्गण्या मिळाल्या नाहीत तर काचा फोडतात, रस्ते खोदतात, फोनच्या वायर्स कापतात... काय विचारू नका.... त्याला खरं तर खंडण्याच म्हणायला पाहिजे... ) 

भारतातून बाहेर जाताना ह्याच सगळ्या गोष्टींचा विचार करून  गिरीश अमेरिकेकडे निघाला होता, इथले नेते जनतेला फायदा करून देण्यापेक्षा स्वतःच्या तुंबड्या भरण्यात लागलेले असतात, कायदा सुव्यवस्था फक्त नावाला शिल्लक असते, मूठभर गुंडांमुळे समाजकारण आणि राजकारण दोन्ही बरबटले आहे, त्याहूनही जास्त म्हणजे लोकांची मेंटँलीटी - अर्थातच वैचारिक पातळी इतकी खालावली आहे की प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी ह्यांच्यासारख्या गोष्टी फक्त ५% लोक पाळतात बाकीचे सगळे हापापाचा माल गपापा करतात...!

पहिल्याच आठवड्यात जियाच्या शाळेच्या ऍडमिशनसाठी गिरीश आणि श्वेताचे ५ इंटर्व्हू झाले, त्यामध्ये शाळा व्यवस्थापक आनंदाने ऍडमिशनला तयार झाले फक्त १. ५ लाखाच्या, १ लाख आणि ९० हजाराच्या देणगीच्या मागणीनंतर....!!

महिन्याभराने जिया ला शाळेत सोडताना गिरीशच्या गाडीसमोर एक मोटरसायकलवाला मुलगा आडवा आला, ब्रेक दाबला नसता तर नक्कीच ऍक्सिडेंट झाला असता. सिग्नल दोघांनी पाळला नव्हता पण, मर्सिडिजमधून खाली उतरून शिव्या देत गिरीशने त्या मोटरसायकलवाल्याला एक टप्पल मारलेली पाहून आजू बाजूला गर्दी जमली,  

गिरीश जोरात ओरडला, "ड्रायव्हरने ब्रेक दाबला नसता तर गेला असतास ढगात! " - म्हणून परत गाडीत जाऊन बसला, ड्रायव्हर देखील खूश झाला की आपला बॉस आपल्यासाठी कसा मस्त भांडतो लोकांशी, परंतु गाडीत बसताना गिरीशला जाणवले की आपणदेखील नकळत  वाहतुकीचे नियम तोडण्याला प्रवृत्त झालो आणि गाडीत जिया असताना आपले हे कृत्य बरोबर नव्हे, पण वेळ निघून गेली होती!

रात्री श्वेताने सांगितले की जिया तिला म्हणाली "व्हाय डॅड इस ऍक्टींग वियर्ड? Our Driver hit a guy on bike आणि सॉरी म्हणायच्या ऐवजी डॅड नि त्यालाच टप्पल मारली. तो किती घाबरला होता, आणि DAD ABUSED him as well, in PUBLIC loudly  शी, How can he be so downmarket!! " हे ऐकून पुढचा आठवडाभर  गिरीश आपल्या मुलीशी नजर मिळवू शकला नाही, -- आपल्या सुजाण सुज्ञ बापाची  IMAGE क्षणात धुळीला मिळाल्यासारखे वाटले...

एकदा असेच संध्याकाळी  गिरीशने जिया सोबत टीव्ही गेम खेळत असतानाच फोनवरून पिझ्झा मागवला, जियासाठी खास चिकन+चीज, श्वेता साठी व्हेज सुप्रीम आणि स्वतःसाठी मसाला बार्बेक्यू!   दारावरची बेल वाजली, कामवाल्याबाईंनी गिरीशने वर काढून ठेवलेले पैसे दिले आणि ऑर्डर घेतली. हॉल झाडून घेतला,  जिया-गिरीशला हाक मारली आणि त्या निघून गेल्या.  

 सर्वांसोबत तो गरम गरम पिझ्झा खाताना जिया सहज बोलून गेली " डॅड, मला इथे नाही आवडत  , इथे लोक खूप संकुचित मनोवृत्तीचे लोक आहेत, माझ्या शाळेत सारख्या वस्तू चोरीला जातात, रस्त्यावर रोज भांडणं होत असतात,  वाहतूक कोंडीने खूप कंटाळा येतो, आपण परत जाऊया ना US ला ?" - इतके दिवस पिझ्झा खायची सवय असूनही आज पहिल्यांदाच गिरीशला त्याचा चटका बसला.

ते संपलेले बॉक्सेस कचरापेटीत टाकताना वर चिकटवलेले बील पाहून तर तो अजूनच विचारात पडला.  "माझ्या एका वेळच्या पिझ्झ्याचे पैसे म्हणजे माझ्या कामवालीचा एक महिन्याचा पगार आहे? आणि हे पाहूनही तिने तिच्या मनातले भाव आम्हाला समजू दिले नाहीत? तिला ते तेवढे पैसे देऊन फक्त ३ पिझ्झ्याचे बॉक्स घेताना काय वाटले असावे?

गिरीशचे डोके परत जड झाले. जियाचे बोलणे, टीव्हीवरचे बातम्यांचे प्रक्षेपण, आजूबाजूला चाललेली राजकारणाची चिखलफेक, भर चौकात त्याने मारलेली टप्पल आणि तेव्हा जियाचे त्याला दंश करणारे डोळे, मंडळांच्या नावाखाली गुंडागर्दी... गरिबीचा शाप लाभलेली नोकर मंडळी, पिझ्झा चे बील आणि कामवालीचा पगार...  सगळे सगळे... 

श्वेताने त्याची द्विधा मन:स्थिती ओळखली, 

जिया झोपल्यावर तिने पुन्हा २ कप कॉफी केली आणि बाल्कनीत बसलेल्या गिरीशजवळ येऊन बसली... काय विचार करतोयस? आपण इथे का आलो असंच ना? मी आधीच म्हणत होते, की आई-बाबांनाच तिकडे नेऊ, फक्त एवढं ऐक ना माझं... सगळं पुन्हा सुरळीत होईल... जे काही खर्च झाले ते आपल्या अक्कलखाती पडले असे समजू... तिथे मी डे-केअर सुरू करेन म्हणाले होते, तो प्लॅन पण पुढे नेऊ म्हणजे वर्षभरात पुन्हा सगळे जैसे थे होईल... इथे सोयी सुविधा नाहीतच पण आपल्या टॅक्स चे पैसे कसे वापरले जातात ते कळायलाही मार्ग नाही!   वर्षभरात जे कमावतोय काय माहीत की उद्या एका हॉस्पिटलवारीत सगळे सोडावे लागेल?  सगळा विचार पुन्हा एकदा कर ना रे... मला माहीतीये तू आत्ता Confused आहेस पण उद्या सकाळी पुन्हा विचार कर, अजूनही सगळे आपल्या हातात आहे...Its just 6 months we came back!!

गिरीशचे डोके जड झाले होते, श्वेताचे बोलणे ऐकता ऐकता समोरच्या ड्रॉवरमधला हातात घेतलेला एक कागद पार चुरगाळला गेला होता, त्याने मोबाईल, पाकीट उचलले, घराची किल्ली आणि तो क्रश झालेलाकागद मुठीत कोंबून ,वॉक करून येतो असे म्हणून बाहेर पडला.... 

तासभर चालून डोके शांत झाल्यासारखे वाटल्यावर उलटपावली माघारी फिरला, रात्रीचे १२ वाजून गेले होते, श्वेताचा SMS आला होता की "आम्ही झोपतोय, तू आलास की फोन कर! "

सोसायटीच्या आवारात पाऊल ठेवतो न ठेवतो... एवढ्यात त्याचा फोन वाजला.! "Hello Girish.....John Here, तुला आनंदाची बातमी देतो, कंपनीने आज १५ वर्षे पूर्णं केली आहेत आणि आपल्याला २ नवीन प्रोजेक्ट्स पण मिळाली, त्यातले एक कोणते माहीत आहे? -- तू काम करत होतास ते, US AIRLINES SYSTEMs चे! क्लायंट म्हणतोय, प्रोजेक्ट डिझाइन मधलाच एफिशियंट स्टाफ त्यांना डिझायनिंगसाठी हवा आहे....I Would like to take opportunity on behalf of company -- तुला पुन्हा एकदा ऑफर देण्यासाठी - for the post of Production Manager Research & Testing आणि ह्यावेळी तुझा पगार मागच्यापेक्षा ३५% टक्के जास्त असेल, विचार करत बसू नकोस, बॅग आवरायला घे....   I hope you will join us back again.!

-- "येस बॉस... I will come... "असे बोलून द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या गिरीशने फोन ठेवला.



अमेरिकेतली फक्त श्रीमंती नाही तर तिथे एक सबळ समाजव्यवस्था, परस्परविश्वास, GrassRoot लेव्हल वर दिसणाऱ्या डेव्हलपमेंट्स आणि भरलेल्या टॅक्स चा सुयोग्य वापर होताना दिसतो, भारतात वेगळे काही असेल तर फक्त संस्कार !!  आणि सध्याच्या पिढीत सुद्धा उपग्रहवाहीन्यांवरून घराघरात जाणारे चॅनल्स तेच सगळे पसरवत आहेत जी आपली संस्कृती नाही पण जे दिसते आहे त्याचा प्रचंड पगडा आहे, ज्याला कंटाळून तिकडून इकडे आलो,  इथे तर तेच करण्यात लोक धन्यता मानायला लागलेत.परदेशी ताकद, विदेशी षडयंत्र म्हणजे वेगळे काही नाही... फक्त दहशतवादच नव्हे तर हे चॅनल्स आणि परकीयाचे अनुकरण एक दिवस आपली संस्कृती फाटक्या कपड्यात भरून भारताच्याच  वेशीवर टांगण्यात सफल होतील आणि भारत देखील युरोप, अमेरिकेप्रमाणेच रंग ढंग पकडेल ही अनामिक भीती गिरीशला वाटली....! ! (कदाचित परिस्थिती बदलेल देखिल ज्याचा आपण विचार करून येथे परत आलो होतो परंतु त्याला अजून काही वर्षे लागतील हेनिश्चित !)

आणि त्या नादात हाताची मूठ अजूनच वळली गेली-- काहीतरी जाणवले म्हणून त्याने मूठ उघडून पाहिले...

मगाशी घरातून निघताना घेतलेला कागद त्याने हलकेच उलगडला, मागच्या बाजूला बारीक अक्षरातल्या Terms & Conditions  आणि पुढच्या बाजूला ग्रीन कार्ड ऍप्लिकेशन फॉर्म!!

तोच फॉर्म जो बॉस ने जाताना दिला होता आणि आता त्याच्याच आधारे गिरीश आता परत जाऊन पुन्हा स्वतःची नवीन किंबहुना जी आधी होती तशी जीवनपद्धती बनवणार होता! त्याने ऑफरलेटरची प्रिंट काढून घेतली, आणि सगळा दिवस आई-बाबांना समजावण्यात गेली परंतु अखेरीस  त्याच्या बुद्धिवादी मनाने सर्वांना त्याच्याबाजुने विचार करण्यास भाग पाडले.  आधी  गिरीश आणि कुटुंब जाणार आणि महिन्याभराने आई-बाबा येतील असे ठरले.

बॅग पॅक झाल्या. जिया, श्वेताने आईबाबांना नमस्कार केला,  गिरीशने ओव्हरकोट चढवला आणि बाहेर पडला...
ड्रायव्हरने पुन्हा विमानतळावर सोडले, ह्यावेळी त्याच्या हातातल्या बोर्ड वरची पाटी वेगळी होती --"HAPPY JOURNEY...ENJOY YOUR FLIGHT"!!

सिक्युरिटी चेक पास झाल्यावर त्याने जिया, श्वेताचा चेहरा पाहिला - त्याला तो थोडा जास्त आनंदी वाटला.. ओव्हरकोटच्या खिशातला चुरगाळलेला ग्रीनकार्डचा ऍप्लिकेशन फॉर्म पुन्हा पुन्हा वाचत त्या आलिशान वेटिंग लाउंजमध्ये गिरीश विमानाच्या बोर्डींगच्या घोषणेची वाट पाहत तो स्वतःशी पुटपुटला -- This Time I am going back for good...!


(IMAGES taken from google search)

-
आशुतोष दीक्षित.
=======================================

"लेखकाचे मनोगत"

नमस्कार वाचकहो, ह्या लेखाची प्रेरणा म्हणजे माझा प्रिय मित्र स्वप्नील राऊत, आणि तो भारतात आल्यावर त्याच्यासोबत होणाऱ्या वैचारिक, सामजिक, आर्थिक, राजकिय आणि वैयक्तिक गप्पा  !  

लेख पूर्णं झाल्यावर सहज मनात विचार आला -> "खरंच गिरीश कायम चा अमेरिकेला परत गेला असेल..? काय त्याला आपल्या मातृभूमी, जन्मभूमीचा एकदा हि विचार आला नसेल...?? ज्या मातीत वाढला, खेळला, मोठा झाला त्या मातीचा अभिमान असा सहज निघून गेला असेल.."?? कदाचित गेला हि असेल किंवा नसेलसुधा, पण ह्या मागची कारणं हि तशीच आहेत मित्रांनो.

आपल्या कुटुंबाला एक चांगले आयुष्य आणि सुविधा मिळाव्या असा विचार करणाऱ्याला आपण पूर्णपणे चुकीचं नाही म्हणू शकत -Coz, Family comes First !!  

पण गिरीश सारख्या असंख्य सुशिक्षित मंडळींनी जर असाच विचार केला तर काय आदर्श राहील पुढच्या पिढी समोर? काय अशिक्षित राजकारणी लोकांच्या हातात देश देऊन असाच निघून जायचं? आज कदाचित गिरीशच्या कुटुंबाला एक चांगला आयुष्य मिळेलही, पण भारतातल्या असंख्य कुटुंबाचं काय? जे स्वप्नातही परदेशात जायचा विचार करू शकत नाहीत.

आजच्या पिढी ने जर पुढाकार घेऊन चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवला नाही, आपल्या पासून चांगल्या गोष्टींची सुरुवात केली नाही तर आपली येणारी पुढची पिढी अंधारात असेल ह्यात शंका नाही. 
 -
आशुतोष स. दीक्षित.
९८२३३५४४७८

Tuesday, September 4, 2012

वेताळ पंचविशीचे दुसरे वर्ष !

२७ वा वाढदिवस -- आता असे वाटते की गेल्या ५-१० वर्षाचा काळ एकदम ५-१० मिनीटात संपला असावा !
वेताळ पंचविशीची सुरुवात दणक्यात झालीच होती, - मागील वर्षी वेताळाच्या प्रतीक्षेत १ वजा झाले...आणि ह्या वर्षी अजून एक परंतु ह्या वर्षीपासून माझी अर्धांगिनी देखील माझ्यासोबत असणार आहे , नुसतचं लग्नं झालं म्हणण्यापेक्षा, ह्याच वर्षी ११ फेब्रुवारी रोजी आमचा विवाहसोहळा संपन्न झाला, असे म्हणालो तर जरा भारदस्त वाटते नाही का....

असो, २७शीचा वाढदिवस बायकोसोबत करेन असे काही ठरवले नव्हते, परंतु सगळ्या गोष्टी आपसुक जुळून आल्या - जब जब जो जो होना है... तब तब सो सो होता है !


बायकोच्या पायगुणाने आम्ही कॅनडा प्रवास करून आलो, प्रवासाचा TEMPO जातो न जातो तोच आमचा वाढदिवस आणि त्याचे सेलिब्रेशन संपत नाही तोवर बायकोचा वाढदिवस.... त्यामुळे हे ३-४ महीने माझा एकदम हॅपी सिंग झाला होता.


Finally getting back to work......slowly, हळू हळू जनजीवन पुर्वपदावर !!

ह्या वेताळ पंचवीशीकडे वाटचाल करताना खूप ध्येयं, आकांक्षा, जबबदाऱ्या, आणि अपेक्षा असणार आहेत, माझ्या माझ्याकडूनच आणि इतरांकडून देखील....

वेताळाच्या प्रतीक्षेत पुढची पावले आता जोडीनेच टाकेन, उरलेली २३ वर्षे बघू काय काय फळे देतात... !

Tuesday, July 17, 2012

यु कॅनडू (इट)!! (भाग-३)

ट्रिंग.....ट्रिंग....ट्रिंग.... कोणास ठाऊक कसा... पण सिनेमात गेला ससा..."


गाण्याने माझी झोप चाळवली, गेली अनेक वर्षे पुण्यात असताना पहाटे ६ च्या गजराची रिंगटोन म्हणजे हेच गाणे आहे , मोबाईल मधला टाईमझोन अजूनही पुणेच दाखवत होता त्यामुळे कॅनडाचे घड्याळ पाहिले तर संध्याकाळचे साडे आठ वाजले होते.....!! तब्बल ७ तास झोप कशी लागली ते कळले देखील नाही...खिडकीचे पडदे सरकवून पाहिले तर असे वाटले की सकाळच आहे.... भरपूर लाइट्स होते रस्त्यावर... आकाशात पाहिले तर... चम चम करत अनेक रंगी दिवे जवळ जवळ येत होते...मी नकळतच गुणगुणलो..."लख लख चंदेरी... ताऱ्यांची सारी दुनिया... " आणि तेवढ्यात ते रंगीत दिवे लावलेले विमान हॉटेलच्या डोक्यावरून लँडिंगसाठी विमानतळावर गेले.... विमानतळ ह्या हॉटेलपासून सरळ रेषेत अवघे ५-६ किलोमीटर असावे...

विमान हे माझ्या लहानपणापासून आकर्षणाचा विषय ठरलेले होते, कागदी विमानाचे पंख डोक्याला घासून, नाहीतर मग शेपटीला शंख फुंकतात तशी हवा फुंकून, किंवा मग अगदी २ऱ्या मजल्यावरच्या गॅलरीत जाऊन तिथून ते विमान खाली सोडायचे.....कोणाचे विमान जास्तीत जास्त वेळ हवेत तरंगते, आणि किती गिरक्या घेऊन जमिनीवर येते ह्यामध्ये असलेली शर्यत आठवली....

विमानाचा आवाज ऐकून धावत पळत बाहेर येणारी पावले, प्रखर सूर्यालादेखील आव्हान देऊन आकाशात विमानाच्या दिशेने रोखले जाणारे डोळे, विमान दिसल्यावर ते मित्रांना कसे पटकन दिसेल ह्यासाठी दिल्या गेलेल्या टिप्स ! .....सगळं.. ‌ सगळं आठवलं.....

वाढत्या वयानुसार माणसाची प्रतिसाद देण्याची पद्धत बदलते असे म्हणतात... पण शेवटी दिल तो बच्चा है जी ! इथे दर ४ मिनिटांतून एक विमान जाताना पाहिले...आणि पुढचे ३ तास फक्त विमाने पाहत, मोजत खिडकीत बसलो होतो.... व्वा ! काय मजा आली.... आत्ता इथे माझे लहानपणीचे मित्र पाहिजे होते....किती धमाल केली असती !!
रात्रीच्या जेवणात घरून आणलेले रेडीमेड खाणे होतेच.. खव्याच्या पोळीसोबत चितळ्यांचे तूप.. वाह लाईफ हो तो ऐसी.... !! रात्रभर खिडकीचा पडदा मी लोटलाच नाही....आपोआप गुंगी येऊन डोळे मिटेपर्यंत आकाशात पाहत पडून राहिलो

सकाळी उठून ऑफिसला जाताना मस्त हॉटेलचा दमदार ब्रेकफास्ट, त्यांचे सगळे ब्रेड चे पदार्थ, सूप, सॅलड, सगळे ट्राय करून झाले... शटल सर्विस मुळे येणे जाणे सुकर होणार होते....
गाडी निघाली आणि चकाचक रस्ते, काचांच्या बिल्डिंग्स, हिरवेगार लॉन पाहून मन प्रसन्न होत होते, कॅनडाला पिण्याच्या पाण्याची कमी नाही, एक तर जगातील २ नंबरची सर्वात मोठी जमीन, आणि तेवढेच पाणी.. (गोड पाण्याच्या नद्या) आणि बर्फ !! इथल्या सोयी सुविधा पाहून वाटले --- सोयी जास्त आणि माणसे कमी !!
ऑफिस पण एकदम चकाचक -भारतात असते तसेच... इथे सर्वजण आपापल्या कामात असतात, एरवी खूप खूप प्रेमाने बोलले असते देखील पण साधारणतः ७-८ वर्षापूर्वी भारताचा एक प्रगतिपथावारी विकसनशील देश असल्याचा प्रत्यय जगाला आला आणि सगळे उद्योग त्यांचे भारतातील एकत्रीकरण वाढवण्याचा प्रयत्न करू लागले... त्यांच्या मनाने स्वस्त कामगार, आणि त्या हिशेबात मिळणारी चांगल्या दर्जाची सेवा, भारताची USP झाली.....आणि त्यामुळे आपल्याकडे रोजगार वाढले आणि त्यांचे कमी होऊ लागले... ह्याचा सल त्यांच्या बोलण्यात कुठेतरी खोलवर जाणवतोच... अर्थात सगळेच लोक असे उघड उघड बोलत नाहीत पण तरी ते बोलण्याच्या ओघात कधीतरी व्यक्त होऊन जाते.... अर्थात त्यांना त्याचे जास्त काही वाटत नाही कारण आज भारत आहे, उद्या चीन असेल, परवा जपान असेल... जोपर्यंत ग्लोबल लँग्वेज इंग्लिश आहे तोपर्यंत तरी सर्व उद्योग Cheap Labour आणि Fair Quality च्या ऍडजस्ट्मेंट्स करत राहणार.... आज ते म्हणत आहेत, उद्या कदाचित आपण म्हणू... !

विकसित देशांतला दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे इथे टॅक्स मजबूत असतो, कायदा संपूर्ण सर्वलोकी सर्वमान्य असून सगळीकडे सारखा दिसून येतो, देशाची तिजोरी भरलेली राहते कारण त्यांचे सरकार त्या हिशेबात सगळी वसुली चालू ठेवतात.. आपल्याकडे धान्यापासून दारू बनवत आहेत, देशी दारूपासून सरकारी कमाई करत आहेत -- इथे हे लोक कॅसिनो चालवतात... ! अमाप पैसा सरकारी खात्यात जातो....जिंकणाऱ्या एखादं दोघांना ५००० पैकी ५०० वाटायला सरकारलाही काही तकतक नसते !

आम्ही ऑफिसमध्ये गप्पा मारत मारत सगळे एकत्र जेवायला जाताना, माझ्या बॉसने (कॅनडियन आहे) ऐकले... तो म्हणाला GUYS...तुम्ही इंग्रजीत का बोलत आहात ? तुम्ही सगळे भारतीय आहात ना... मग १२-१५ लोक एकत्र बसून इंग्लिश मध्ये का बोलताय ? भारताची नॅशनल लँग्वेज हिंदी आहे ना ? मग हिंदीत का नाही बोलत ? I'm surprised....!!


मग त्याला जेव्हा सांगितले की मी मराठी आहे, काही लोक दिल्ली आणि काश्मिरी आहेत, आणि बाकीचे साऊथ इंडियन आहेत त्यांना हिंदी कळत नाही... ते फक्त तमिळ, तेलगू, कानडी, आणि इंग्रजीत बोलतात.. !! माझा बॉस चक्रावून माझ्याकडे म-भ च्या शिव्या देत असल्याप्रमाणे पाहत होता.. तो म्हणाला ---> "यू गाईस आर क्रेझी, यू शुड नो युवर नॅशनल लँग्वेज...ऑर एल्स डू नॉट डिक्लेर इट ऍस नॅशनल लँग्वेज !!" आणि एक POOR INDIAN CHAPS असा लुक देऊन निघून गेला... !


राज ठाकरे मराठीसाठी गळा सुकवताना पाहून मलाही चेव चढतो, पण वस्तुस्थिती अशी आहे मित्रांनो की माझ्या ह्या बॉस ने एका वाक्यात सगळ्या भारतीयांच्या तोंडात शेण घातले आहे ! विविधतेत एकता म्हणतो ते कसे का असेना, पण सर्वांना देशातील निदान एक कॉमन भाषा यायलाच पाहिजे - बोलता, ऐकता, आणि लिहितासुद्धा !! देशव्यापी चळवळ करून निदान काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत एकच भाषा कंपल्सरी केली गेली पाहिजे... कोणतीही करा, सद्य स्थितीत हिंदी ला तसे करणे सर्वात सोपे आहे कारण हिंदी बऱ्याचं ठिकाणी चालते, पण दक्षिण भारताला पाठीवर हंटर मारून सुधारायची वेळ आली आहे असे मला वाटले, त्या त्या भागात ती ती भाषा बोलाच.... त्याला मनाई नाही, पण एक भाषा सर्वमान्य ठेवून त्यामध्ये बोलता येऊ नये ? ही सरकारसाठी शरमेची बाब आहे !

भारताचा जगाबाहेरचा चेहरा न्याहाळत महिनाभर हे असे अनेक अनुभव घेतले,....बॉस म्हणत होता तुमच्याकडे माणसाला दवाखान्यात जायचे पैसे नसतील तर ? त्याने मरावे का तसेच ? हेल्थकेअर हे सरकारच्या अगेंडा वर पाहिजे ! मी त्याला म्हणालो "तुमच्या अख्ख्या कॅनडाची लोकसंख्या आणि आमची फक्त मुख्य शहरांतील लोकसंख्या पहा, आणि मग बोला...४ महिने पावसावर चालणारी शेती, इंग्रजांनी लुटून नेलेली संपत्ती आणि सुबत्तता, तेल आणि आंतरराष्ट्रीय करारासाठी आमच्यावर लादलेले व्याज, त्यातून सोमालीया, जपान,इंडोनेशिया वगैरे ला घरात दाणा कमी असून कर्ज काढून मदत पोचवणारे आमचे मूर्ख सरकार, भ्रष्टाचारात माखलेले नेते, आमच्या टॅक्सचे पैसे जनहितासाठी सोडून अतिरेक्यांना पोसण्यासाठी वापरणाऱ्या बेअक्कल कायदाऱ्यंत्रणा.. ..हे सगळे पाहता आम्ही तरीही चांगले मॅनेज करतो आहोत... .... आमच्याकडे काही गोष्टींत नाईलाज आहे, निदान तुमच्या देशासारख्या पाण्याच्या बाटल्या विकत किंवा घरून घेऊन तरी निघावे लागत नाही आम्हाला.... सरकार निदान पिण्याचे पाणी तरी देते आम्हाला सार्वजनिक नळांवर.... (तुम्ही एवढा पाणीसाठा असून जे करू शकत नाही... टेक्निकल प्रॉब्लेम वगळता देखिल बरेच काही करता आले असते ) पण समजा तुमच्या देशासारखी जल आणि स्थल संपदा लाभली असती तर कदाचित परिस्थिती अजून चांगली असती..."

ह्या २९ दिवसात किमान २९ नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या...वपुंच्या ओळी खऱ्या ठरल्या "घरटं सोडून गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ समजतं नाही" ! मी तिथे काय आणि इथे काय ह्या परिस्थितीच्या आरशात स्वतःला चांगले २९ दिवस न्याहाळले, आणि चांगले ते घ्यावे, वाईट ते टाकोनी द्यावे... ह्या हिशेबाने खूप काही शिकलोय....आणि घरट्याची उब समजल्यामुळे ते सर्व आचरणात आणेनच, शंका नसावी....


आपली आई-बायको-आजी-काकू-ताई-वहिनी-मामी-मावशी-आत्या सगळा स्त्रीसमाज किती काम करतो ते नव्याने समोर आले, घरातील एवढी कामं करून बाहेर नोकरीदेखील सांभाळणाऱ्या आणि संसाराला सर्वतोपरी हातभार लावणाऱ्या सर्व स्त्री समाजाला माझा साष्टांग नमस्कार... ! खरंच खूप करता तुम्ही... !


मी आईला ह्या आधीदेखील मदत करायचोच, आता बायकोलाही करतो -- माझे एवढेच मतं होते, की स्त्रिया जर पैसा कमावून तुम्हाला अर्थार्जनात मदत करत असतील तर तुम्हीदेखील त्यांना संसारातील बाकी कामांना तेवढीच साथ देणे आवश्यक आहे.... इथे पैशाची किंमत समजते, प्रत्येक छोट्या गोष्टीला जेव्हा डॉलर्स द्यावे लागतात आणि त्या विकत घेतल्यानंतर ह्या नवीन खरेदीपेक्षा चांगली पर्यायी व्यवस्था फक्त थोड्या उलटा-पालटीने आपल्याकडे आधीच उपलभ्द होती असे जाणवते तेव्हा "आपण पैसा खर्च करून शहाणपण विकत घेतो"  ही म्हण पटते... !!

सकाळी ६.०० ला उठून देखील माझे मला आवरायला वेळ लागायचा, त्यात डब्याला पोळी करायची घाई, मग ती पोळी कधी कधी जळायची...कधी अर्धी कच्चीच...कपडे इस्त्री करायला वेळ पुरायचा नाही... दाढी कधी केली..तर कधी नाही.... इथे एक बरं आहे - तुमचे काम जोपर्यंत उत्तम चालू आहे तोपर्यंत तुमच्या बाह्यरूपाला इथे जास्त किंमत कोणीही देत नाही, आपल्यासारखं...तू टाय का लावून आला नाही, फॉर्मल्स का घातले नाही, बूट पॉलिश का नाही, चप्पल का ? बूट का नाही... बरं हे सगळं मुलांनाच लागू... मुलींचे आजकालचे ऑफिसला घालायचे कपडे पाहिले तर आम्हालाच लाज वाटते कधी कधी..... !


हे असले बाष्कळ प्रश्न विचारायला परदेशात लोकांना वेळच नसतो.... त्यांचे प्रश्न वेगळेच -- ! काम झाले का ? उशीर तर होत नाहीये ना ? माझी काही मदत लागणार आहे की तुम्हाला जमेल ? -मी आहे तोपर्यंत काहीही काम द्या... एकदा घरी गेलो की फोन करायचा नाही... ! प्रत्येकाची प्रायव्हसी महत्त्वाची आहे... काम चालूच राहते... पण वर्क-लाईफ बॅलन्स महत्त्वाचा आहे हे खुद्द डायरेक्टर सांगतो... आणी ह्या ओव्हरऑल दृष्टिकोनामुळे तर कमालीचा खूश झालो मी.... आणि इथे मला पहिल्यांदा वाटले की आपल्याकडे काय फालतूपणा असतो ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा...

असो,

चांगले वाईट शिकवणारे अनुभव घेत, आज २९ दिवस झाले -- हॉटेलचे बिल भरून सगळी डॉक्युमेंट्स रीतसर फाइल केली...रिटर्न तिकिटाची प्रिंटाऊट काढली, विमानतळावर नेण्यासाठी येणाऱ्या शटल ला फोन केला आणि घराची ओढ अजूनच तीव्र झाली -- माझी आई, माझे बाबा, माझी बायको, माझी आजी, माझी ताई, माझी भाची.... सगळे लोक जे मला माझे वाटतात...गेले २९ दिवस माझी वाट पाहत होते... त्यांना भेटायचा दिवस आला.... !

त्या चमचमणाऱ्या दिव्यांच्या सोबत मला भारतात, महाराष्ट्रात, पुण्यात परत नेणाऱ्या विमानाचे पंखे फिरू लागले, सिट बेल्ट आवळण्याची सूचना खाली, समोरच्या टीव्हीवर परतीच्या प्रवासाचा नकाशा दिसू लागला... वेगाने पुढे जात जात.... विमान आकाशात झेपावले... जमीन खोल खोल जाताना पाहून आणि माझ्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले --- "गणपती बाप्पा मोरया !! --- कॅनडा वासियांनो, आम्ही जातो आमुच्या गावा.... आमचा राम राम घ्यावा" !!




--
आशुतोष दीक्षित.

Saturday, July 14, 2012

यु कॅनडू (इट)!! (भाग-२)

१२० रु समोसा आणि १४० रु ब्रेड सँडविच.... ! ?? जवळ जवळ बेशुद्ध होण्याची वेळ आली होती माझ्यावर.... !!


विमानाची वाट पाहत त्या आलिशान लाउंजमधल्या चकचकीत फरश्या, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जर्स, स्वच्छतागृह,टापटीप कपड्यातले अटेंडंटस, फुकट इंटरनेट सेवा, ह्या सगळ्याचा खर्च कसा कमावतात ते चटकन ध्यानी आले..... आणि माझ्या सदाशिवपेठी मनाने आतून ओरडून सांगितले - विमानप्रवास महाग म्हणून हे सगळे महाग... असे नव्हे, तर हे सगळे महाग म्हणून विमान प्रवास मध्यमवर्गाच्या आवाक्याबाहेरचा !!
सुचेता कडेठाणकर ताई एका लेखात म्हणाल्या होत्या, -> "आय ऍम द चोझन वन. " आज आपण घातलेल्या "तंत्रा" च्या टी-शर्टवरची कॅच लाईन एकदम मान वर काढून आपल्याकडे वाकुल्या दाखवत बघू लागल्यासारखं वाटलं ! - अगदी त्याचा प्रत्यय आला, आणि एवढ्या पॅसेंजर्स मध्ये बसून सुद्धा माझे मला अगदी निरागस आणि प्रतिक्षिप्त म्हणतात तसे हसू आले...

आणि मग त्यामागोमाग ह्या गर्दीत जरी मिसळलेला असलो तरी, "ह्यांच्यासारखा मी होणार नाही.... वाण नाही... आणि गुण तर नकोच.. . भले लोक कंजूस म्हणोत, की मुर्ख म्हणोत... बावळट म्हणोत की Boaring म्हणोत... पण उगीच हे असलं मोठेपणाचं आणि टेंभा मिरवण्याचं ओझं खांद्यावर वागवण्याच्या नादात दोन दोनशे रुपयांच्या चकचकीत उभट ग्लासमधील कॉफी पिता पिता अगदी पातळ प्लॅस्टिक लावलेले आणि सजवलेले सँडविच खाऊन आपल्या खिशाचे वजन कमी करून घेणे जमायचे नाही !!
आणि तसेही अश्या माणसाला शुद्ध मराठीत "माजोरडा" किंवा "अंमळ आगाऊच" म्हणतात...
माझ्या अंतर्मनातला प्रभाकर पणशीकर जागा होऊन ओरडला.... "वर वर कितीही कपडे, भाषा, काम, वागणूक जरी तुम्हाला तशी दिसत असल्याचा तुमचा समज असला.... तरी... तो मी नव्हेच !! !!"

विमान लागल्याची घोषणा झाली आणि मी टर्मिनल २ए पासून पुढे निघालो, विमानात बसताना आधी लहान मुले आणि फॅमिली, मग वयोवृद्ध आणि मग बाकीचे ह्या कार्यप्रणालीचे कौतुक वाटले... आणि क्षणभरात गरवारे कॉलेजमध्ये असताना डेक्कन वरून कर्वेनगर ला चिंचा बोरे विकायला जाणाऱ्या म्हातारीची आठवण आली..एकदा मी बस मधून जात असताना ति आणि ड्रायव्हर दात ओठ खाऊन सभ्य शिव्या देत होते एकमेकांना.....ड्रायव्हरने गाडी पुढे दामटली होती आणि म्हातारी गर्दीत चढू शकली नाही पण तिची टोपली मात्र आत गेली होती... असो,

इथे विमानातल्या अडचणीच्या सिट, अगदीच मुंबईय्या स्टाइलने (इंच इंच लढवू... ) बांधलेले बाथरूम्स, पाहिल्यावर मला आपण रेल्वे, बस, रिक्षाच्यामध्ये राजेशाही थाटांत राहतो असे वाटू लागले....इतके दिवस ते देखिल कंजस्टेड वाटायचे


विमानात पाहिजे तेवढी चॉकलेट्स घेता येतात वगैरे जुन्या सिनेमा मध्ये दाखवलेले किंवा ऐकलेले अगदी खोटे असते... अस कोणी चॉकलेट्स चा वगैरे घेऊन फिरत नाही.. ! (किंवा मग माझं नशीब आणि मी )

विमानात प्रत्येकाला लिमिटेड स्नॅक्स, वाइन, ज्यूस, वगैरे मिळते, मुंबई ते पॅरिस हा प्रवास पटकन संपल्यासारखा वाटला, इथून जाताना बरेच आपले देशी चेहरे दिसत होते, पॅरिस वरून कॅनडाला जाताना मात्र अनेकविध लोक दिसले.... वेगळ्या रंगात...वेगळ्या ढंगात....!
टॅटू वगैरे पद्धतीने काहींनी मुद्दाम रंगरंगोटी केली होती, तर काहींना निसर्गानेच 'रंग पक्का आहे' ही पाटी अडकवून पाठवले होते... पॅरिस चे भलेमोठे विमानतळ पाहण्यासाठी दिवस कमी पडेल... मला तर फक्त तासभर होता त्यामुळे जास्त उडाणटप्पूपणा न करता माझे टर्मिनस गाठले आणि फुकट च्या सिमकार्डावरून घरी सुखरूप असल्याची पोच दिली,

फ्रेंच भाषेचा प्रचंड अंमल जाणवला, स्वाभिमान आणि काही अंशी कडवेपणादेखील, आपल्याकडे दक्षिणेकडे गेलो की काहिस तसच जाणवतं..

पॅरिसहून कॅनडा ला येतानाचे विमान जरा आधी पेक्षा बरे होते, त्या विमानात अनेक फ्रेंच दिसले, भेटले, आणि आमचे सांकेतिक संभाषण सुरू झाले... (त्या सगळ्यांना इंग्रजी येते अस नाही, आणि त्यांना त्याची गरजही वाटत नाही... ) विमान कॅनडाच्या धावपट्टीवर उतरले.. आणि सर्वांनी टाळ्या वाजवून वैमानिकाचे आभार आणि अभिनंदन प्रकट केले....

"त्यात काय" !! --- "त्यासाठीच तर तो पगार घेतोय" !! किंवा रिक्षांत बसल्यावर फक्त मीटरकडे पाहणारे लोक असतात तसे विमांप्रवास संपेस्तोवर पाकिटातले पैसे मोजण्याच्या मी आपल्या पुणेरी म्हणा ....इंडियन म्हणा.... जे असेल, त्या मेंटॅलीटीचा क्षणात त्याग करून ताबडतोब टाळ्या वाजवणाऱ्यांत सामील झालो....!!

खूप छान वाटले, कारण विमान कैक हजार फुटांवरून जाताना समजा काही कमी जास्त झाले तर ती इजा कोणाकडे किती पैसे आहेत किंवा बँकबॅलन्स आहे त्यावर अवलंबून नसतेच... तिथे अधांतरी असताना 'सब प्यादे एक जात' !! आणि त्या परिस्थितीतून पुन्हा अतिशय सुखरूपपणे वस्तुस्थितीत आणणाऱ्या वैमानिकाचे असे कौतुक झाले तर तो देखील नक्कीच अधिक जोमाने आणि जबाबदारीने काम करेल.... ह्या वेळी विमानातून बाहेर पडताना गुड बाय...बॉन जुने(गुड डे) म्हणणारा सगळा केबिन-कृ मला जास्तच अदबशीर वाटला... Cheers to the policy of ==> Give Respect - Take Respect !!


विमानतळावरून इमिग्रेशन साठी गेलो, शक्य तेवढे मनमोकळे, साधे राहण्याचा प्रयत्न करा, फुकट मिजास कवडीची देखील नको... हे तत्त्व पाळल्यामुळे अजिबात त्रास न होता फक्त २ प्रश्नांची उत्तरे देऊन मी लगेच सटकलो त्यातून दुसऱ्या प्रश्नात मी स्वतः शाकाहारी आहे हे सांगितल्यावर तर त्या ऑफिसर ला विचारण्यासारखे काही राहिलेच नाही असे तिने दर्शवले... बॅगेज सेक्शन मधून बॅग उचलली.. पाहतो तर ह्या बदमाशांनी दुसऱ्या बाजूचे बॅग चे हँडल पण तोडून टाकले होते.... घ्या... आता पुढचा संपूर्ण प्रवास फक्त बॅग ओढण्यासाठीच्या दांडीच्या आधारे करावा लागणार......विचार करत बाहेरचा रस्ता गाठू लागलो...

इथे विमानतळावरून निघताना तुम्हाला शहराची माहिती देणारी पुस्तके मिळतात (फुकट) -( कारण, महाबळेश्वर दर्शन, लोणार ची कथा, कोंकण कसे पाहाल, मध्यप्रदेश ची सहल वगैरे अशी पुस्तके आपण विकत घेतो नेहमी कुठे गेलो की... !!)

तर, ती CITY GUIDEs घेऊन बाहेर पडलो, हॉटेलची शटल आलेली होतीच, त्यामध्ये बसलो आणि आलिशान हॉटेल मध्ये दाखल झालो... चकचकीत दिवाणखाने आणि फायरप्लेस पाहून पुन्हा आठवणी जाग्या झाल्या...( मालाडचा म्हातारा.. म्हाताऱ्याची बायको.. शेकोटीला आले...!!) - रूम ची किल्ली घेतली, सामान आत ठेवून बाथटब मध्ये गरम पाणी भरून तासभर डुंबलो त्यामुळे १८ तास प्रवासाचा शारीरिक आखड थोडा कमी झाला, घरून सोबत आणलेले दाण्याच्या कुटाचे लाडू, पुरणपोळी,बाकरवडी आणि हॉटेल च्या वेलकम किट मधले हॉट चॉकलेट पिऊन आता मी मस्त झोपणार आहे,

अरे हो -- दाराजवळ "Recharging - do not distrub" अशी पाटी पाहिली होती, ति बाहेरून अडकवून येतो म्हणजे माझा थकवा घालवण्याचा रामबाण उपाय करता येईल -> ....खाल्ल्यावर झोपणे आणी भूक लागल्यावर उठणे  !!


-आता महिनाभर आमच्या चॅनलवर एकच पिक्चर --- "परदेस" !


--
आशुतोष दीक्षित

Friday, June 22, 2012

यु कॅनडू (इट) !!

तू कॅनडा ला जाणार आहेस.... ( हो!! माझ्या तोंडून अनवधानाने लगेच उद्गार बाहेर पडला.... )



विचारत नाहीये मी, सांगतोय.... उद्या मेल मिळेल तुला, Follow the instructions आणि लवकरात लवकर सगळी डॉक्युमेंट्स Ready Thev..... you have just 3 days !! इति. आमचा बॉस !

ह्याला म्हणतात Dynamic Industry !! आज ची बात... उद्या चा भरवसा नाही.... करणार काय -... "कशासाठी -- पोटासाठी -- खंडाळ्याच्या -- घाटासाठी " च्या तालावर आम्ही तयारी करायला सज्ज झालो.... !!

अगदी काल.... कालच, पुण्यातून पालख्या उठल्या आणि आम्ही (पेपर मधल्या फोटो चे) दर्शन घेऊन तृप्त झालो... गेल्या काही दिवसांत पालखीसाठी येणाऱ्यांचा ओघ कमी झालेला अगदी स्पष्ट दिसत होता... पालखी सोहळ्यात कसे ३ भागात हरिजनांचे वर्गीकरण होते की नाही, हौशे, नौशे , गौशे... तसंच फॉरेन ट्रीप चे पण !


हौशे - म्हणजे हौसेने येणारे (उगीच परदेशवाऱ्या करत सुटायचं... पैसे जास्त असतात हो.. दुसरं काय !

नौशे - म्हणजे नवस फेडण्यासाठी येणारे (इथे नवस बोलल्यामुळे आलेले की अपत्याला नोकरी लागू दे परदेशी मग मी अमुक तमुक करेन... आणि मग ते अपत्य परदेशी येतं !!)
गौशे - ह्यांना कशात काही नसत... फक्त आपल्याला काही 'घावतय' का.... एवढा एकच विचार... मग काडेपेटी असो वा इतर काही.... (आता फॉरेन ट्रीप च्या बाबतीत मी कदाचित ह्या पंथात येतो... ! कारण कामं झालं की, लोकं नायगरा, आयफेल टॉवर, पिसा चा मनोरा, वगैरे ला जाण्याचे बेत आखत असले तरी इथे येऊनही मला मात्र मी घरी काय नेणार हाच प्रश्न पडतो... )

माझे ३-४ मित्र आणि माझी एक मैत्रीण म्हणाली -- >" कसा रे तू असा ? अगदीच व्यवहारी आणि बिनासौंदर्यदृष्टीचा ? " लोकं खास तिकिटे काढून जातात... तुला चान्स मिळाला आहे एवढा, राहा-खायचा खर्च कंपनी करणार तर मग तू का एवढा कंजूसपणा करतोस.... थोडा खर्च करावा माणसाने स्वतःवर ! " --->
खरंच की ? अशी संधी पुन्हा मिळेल की नाही ह्याची गॅरेंटी नाही, आणि स्वतः कमावत आहोत तर स्वतःवर खर्च करण्यासाठी काय हरकत आहे ना ? थोडं सौंदर्यवादी झालो तर बिघडलं कुठे ?

सौंदर्यप्रेमी नाही, मूर्ख आहेस तू... एकवेळ तू स्वतः हा विचार केला असतास तर ठीक होते... पण वाईट ह्याचे वाटते की तू लोकांच्या विचाराने प्रेरित होऊन हे सगळे बरळतो आहेस... ! मूर्खा नेहमी स्वतःचा तर विचार केला आहेस तू !! एवढी ही अक्कल नाही की काय तुला ? कालपर्यंत ठीक होतास... आज काय नाटकं चालू झाले ? माझे दुसरे मन आतून जोरात ओरडले... आणि तो आर्त स्वर ऐकून मी फ्लॅशबॅक मध्ये गेलो...



दर रविवारी डॉमिनोजचा सिंपल चीज पिझ्झा, महिन्यातून एकदा हॉटेलिंग, कॉलेजमध्ये असताना मोठ्या बहिणीची मरेस्तोवर वापरलेली जुनी स्कूटी ! आणि त्यानंतर घेतलेली पहिली स्पेंडर ! आणि मग आर्थिक सुबत्तेनंतरची सुझुकी ! लगोलग फक्त इमर्जन्सी साठी का होईना पण घेतलेली मारुतीकार ! बिग-बझार/विशाल/जस्ट कॅजुअल्स वगैरे मोठे ट्रेंडसेटर्स आणि त्यांच्या भल्यामोठ्या डिस्काउंट्स ने भारावून जाऊन एक ऐवजी घेतलेले ३-३ जीन्स आणि ४-४ शर्टस ! ३०० रुपयांपेक्षा एक पैसा जास्त न देता घेत आलेले बूट, पहिल्यांदा मनासारखा पगार कमावायला लागल्यावर आधी ते बदलावेसे वाटले - आणि तेव्हा जे घेतले ते २४०० रु चे बूट ! (अजूनही वापरतोय ३ वर्षे झाली -मस्त आहेत !) बॉडी मसाज करणारी ओ२ स्पा, फोर फाउंटन स्पा, वगैरे मुळे तर ३ महिन्याचा ठकवा एकदम निघून जातोय हे समजल्यावर त्यासाठी लागणारे ९०० रु. किरकोळ वाटू लागले.... इ. इ. इ.



माझ्या बुद्धीवादी आणि व्यवहारी मनाने मला एकदम जमिनीवर आणले... हे सगळे काय लोकासाठी केले होते ? स्वतःसाठीच तर केले ना ? जन्माला आल्यापासून मी जे काही केले ते माझ्यासाठीच केले... संत संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्रात जन्माला आल्यामुळे जे काही थोडेफार लोकांसाठी केले असेल ते केवळ ह्या मातीचा गुणधर्म म्हणून सहज विसरता येण्यासारखे आहे ! परंतु आपण स्वतःसाठी काही केले नाही, म्हणून आता एन्जॉय करू असे मला वाटणे हा खरंच स्वार्थीपणा आहे, नुसता स्वार्थीपणा नव्हे तर निगरगट्टपणा आणि अप्पलपोटेपणाचे मिश्रण आहे !

पहिले मनं'च योग्य होते (म्हणजे... ह्या बाकीच्या लोकांच्या विचाराने दुसरा विचार करण्याचा आधीचे !!) जे आधी ठरवले होते तेच बरोबर होते....आणि तसेच वागले तर स्वतःला पटणारा आणि रुचणारा निर्णय घेता येईल.... जगाला उत्तरे देण्याची पर्वा २६ वर्षात कधी केली नाही मग आता काय मोठंसं -- असो विषयांतर झाले जरा,

तर, आम्ही निघालो कॅनडाच्या वाटेवर.... कंपनीच्या कामासाठी !

"ऑन-साईट" हा शिक्का बसणे किती महत्त्वाचे आहे हे शिक्का बसल्यावरच समजते... खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात... वगैरे वगैरे पट्टी पढवून ऑफिसकलिग्स ने आम्हाला गुडबाय केले... मुंबई ते पॅरिस आणि पॅरिस ते कॅनडा असे विमान होते... !

मुंबईला जाताना खंडाळ्याजवळ खूप ट्रॅफिक जॅम होते...पाऊस पडत होता... जवळ जवळ ३० मिनिटे ट्रॅफिक मध्ये अडकून हळू हळू क्लिअर होताना पाहिले तर समोरच एक स्कॉर्पियो चा चुराडा झाला होता, शेजारच्या ट्रॅक मधून अतिवेगाने डिव्हाईडर तोडून गाडी ह्या बाजूला येऊन आदळली होती... मी कॅमेरा घेऊनच बसलो होतो -- बसल्याजागुनच फोटो काढला... आणि पुढच्या २ मिनिटात गाडी तिथून अगदी जवळून गेली आणि माझे हातच गार पडले.... काढलेला फोटो बॅक करून पुन्हा झूम करून पाहिला -- गाडीच्या बाहेर ड्रायव्हरच बॉडी पडलेली होती, पावसात भिजत होती, कपडे अंगावर नव्हते, बहुदा गाडीतून ओढून काढावे लागले होते.... खूप वाईट वाटले... प्रत्येकाचे कोणीतरी असते... वाट बघणारे, त्याची काय अवस्था झाली असेल....

प्लीज, सर्व वाचकांना विनंती आहे - गाडी हे एक मशीन आहे... माणसाचा भरवसा देता येत नाही, तर मशीनचा काय देणार? कितीही भारी ब्रेक असले तरी मनाचा ब्रेक -- उत्तम ब्रेक ! वेगाला आवर घाला... थोडा उशीर झाला तरी चालेल.. घरी जास्त वाट पाहावी लागेल... पण त्यासाठी आपण त्यांना कायमची वाट पाहण्यापासून तरी आवरू शकतो ना !

असो....... जन पळ भर म्हणतील हाय - हाय ! खरे ठरवत आम्ही पुढील प्रवासाला लागलो, मुंबईत पोहोचल्यावर विमानतळाकडे जाताना बरेच खड्डे, सिग्नल्स, ट्रॅफिक आणि सैरावैरा धावणारे माणसांचे अडथळे ड्रायव्हरने बखुबी पार केले आणि ४.५ तास आधी विमानतळावर पोहोचवले !

आता २ तास तरी टाईमपास करणे भाग होते.. . आत जाण्याच्या प्रयत्नात एक सुरक्षारक्षकाने स्वतःचे ज्ञान मला वाटले की विमानाच्या फक्त ३ तास आधी यायचे वगैरे.... मी म्हणालो मी बसतो इथेच किंवा फिरतो.. तुमची वेळ झाली की मला आत सोडा.... !


पण माझा हा शालीनपणा पाहून की काय तो म्हणाला - "अभी कहा घुमोगे... जाव अंदर, अगली बार याद रखना... ! " (अगली बार कोण येतंय मरायला.... आम्ही काय रोज अप-डाउन करणार थोडीच ! )

आत गेल्यावर चांगलाच फरक जाणवला ... फुल AC, कमी गर्दी, हाउसकीपींग स्टाफ दिमतीला.. अरे वाह... ! आणि ह्यामागचे गुपित सिक्युरिटी चेक होऊन टर्मिनल समोर उभे राहिल्यावर जाणवले ! समोसा ७५ रु, वडापाव ९०/- आणि इडली (२) ९५ रुपये किमतीला विकत असतील तर मग त्या हिशेबात फॅसिलिटीस कमीच म्हणायच्या की !! ( अरे चोरांनो!!)

सध्या तरी विमानाची प्रतीक्षा करत लाउंज मध्ये बसलो आहे...बघू विमान कधी उडतंय... आणि पुढे काय काय होतंय... !




-
आशुतोष दीक्षित.



Friday, June 8, 2012

तो मी नव्हेच !!

तो मी नव्हेच !!


 "काय दुष्टपणा आहे हा ? माझ्यासमोरून आत्ताच्या आत्ता ४ गाडीवाले सिग्नल तोडून गेले, मलाच बरे पकडता आणि सिग्नल पिवळा होत होत लाल होईपर्यंत मी आले पण होते पुढे.... माझी चूक की तुमच्या अंगावर गाडी घालून पुढे न जाता तुम्हाला सहकार्य करून गाडी बाजूला घेतली.. एवढ्या लोकांमधून मीच का......" ??
"...मीच का ??"...सिग्नलला बस थांबलेली असताना मला हे उद्गार ऐकू आले. एक बाई तावातावाने बोलत होत्या,


आधीच दुपारचे ऊन भाजून काढत होते, त्यात हे लुटारू उगीच लायसन्स दाखवा, पियुसी दाखवा करत संध्याकाळच्या पार्टीची सोय करताना पाहून मी बसमध्ये होतो तो खाली उतरलो, माझ्याकडे कायम एक रुलबुक आणि कंपाउंडींग फी ची प्रिंट आऊट असते, ती त्या बाईंच्या हातात शांतपणे ठेवली आणि म्हणालो, " मॅडम - ह्यानुसार तुम्हाला दंडाची योग्य रक्कम कळेल, तुमची चूक होती की नव्हती ते मी सांगत नाही पण १०० रु दंड असूनही ४००-५०० काहीही मागितले जातात... आणी मग आपण गयावया केली की त्याचे २०० होतात... म्हणजे खाया पिया कुछ नही आणि लाचारी दिखाया सौ आना ! मला फक्त ती परिस्थिती येऊ नये असे वाटते... तुम्ही काय... मी काय....कोणावरही...!" -


ह्या एका वाक्यामुळे त्या बाई एकदम शांत झाल्या, प्रिंट आऊट उघडली आणि ती पाहत त्यांनी पर्स ला हात घातला, आणि माझ्याकडे त्रासिक नजरेने पाहणाऱ्या टोळभैरवाकडे पावतीची विचारणा केली -- त्याची चरफड पाहून मला वाटले तो देखिल नक्की मनात म्हणाला असेल ".... माझ्यासोबतच का ? " !!


बाकी वेगळ्या लाख गोष्टी असोत, पण ह्या एक प्रश्न मला अत्यंत जवळचा वाटतो....हा शब्द कदाचित माझ्याबाबतीत अतिपरिचित आहे, आणि म्हणूनच मला त्याचे महत्त्व पण जास्त वाटते.... अनेकदा असे होते की आपल्यासोबतची एखादी वाईट घटना घडते --की एवढं सगळं करून सुद्धा माझ्या वाट्याला चिंचोके... किंवा दुसऱ्यासाठीची चांगली बातमी कुठेतरी मनाला बोच लावून जाते...अर्थात पॉझिटिवली.. की मी सुद्धा हे सगळे करतो... तरी मला हे का मिळत नाही ? !


ह्याला जळफळाट मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही, नक्कीच नाही ! माझे इंग्रजीतले एक आवडते वाक्य आहे -Everybody needs affection & attention -- ! हां आता सारखेच बोटे मोडणाऱ्यांच्या बाबतीत "स्वभावाला औषध नाही" हेच खरं.. पण बहुतांश लोक संधीच्या शोधार्थ असतात... जे जे चांगले त्यासी करावेसे आपुले, ह्या हिशेबाने प्रत्येकजण जीव तोडून मेहनत घेत असतो.... पण काहींना फळे लवकर मिळतात तर काहींना गीतासार वाचल्याचा अनुभव मिळतो... (कर्म करते रहो.. )


मी का नाही ? - ह्या प्रश्नाला अंत नाहीच.... पगारवाढ असो, प्रमोशन असो, लकी ड्रॉ असो, सगळीकडे हाच प्रश्न उभा राहतो -- ह्यावर माझा एक कायमचा उपाय म्हणजे 'भगवान के घर देर है अंधेर नही' ह्या उक्तीवर विश्वास ठेवणे !


प्रत्येकाची वेळ येते, इंग्रजी म्हणीप्रमाणे "Every dog has his day"... त्यामुळे प्रत्येकाला कधी ना कधी हा प्रश्न विचारावासा वाटतो, आणि कधी कधी आपल्यामुळे लोकांना हा प्रश्न पडतो. "आतले आणि बाहेरचे" कधी आपण आत तर कधी बाहेर... पण त्याशिवाय मजा नाही...


थोडक्यात काय, तर मेहनतीची जोड दिली तरी परिस्थिती आणि नशीब जेव्हा बदलायचे तेव्हाच बदलते, तोपर्यंत आम्ही राज कपूर चे गाणे गुणगुणत राहू -"या गर्दिश मे हूं आसमान का तारा हूं....".... !!



--



आशुतोष दीक्षित.



Thursday, May 3, 2012

आपण रांगेत आहात, कृपया प्रतीक्षा करा

"लिमिटेड ऑफर... लिमिटेड ऑफर... " ह्या कर्कश आरोळीमुळे माझ्यासारखेच माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या मनातले भाव मला त्यांच्या त्रासिक चेहऱ्यावर लगेच टिपता आले...! कपाळावरच्या आठ्या उलगडवताना एकच गोष्ट प्रकर्षाने लक्षात येत होती ती म्हणजे ह्या रंगीत भिंती, स्वच्छ पुसलेल्या टाइल्स, मंद एअर फ्रेशनर आणि सोबतीला एअरकंडीशनर च्या थंडगार वातावरणाचा फरक सोडल्यास आजकालच्या मॉल मध्ये आणि मंडई किंवा मार्केटयार्ड मध्ये बहुतेक सारेच साम्य आहे.

लहानपणापासून स्वस्त आणि मस्त गोष्टी हव्या असतील तर मंडई/मार्केटयार्ड किंवा मग रविवारात... हे समीकरणं पक्कं मनात बसलं होतं... हळू हळू जनरेशन बदलत गेली... आणि आम्ही मोठे होईपर्यंत आमच्या डोक्यातल्या मंडईची जागा स्पेन्सर्स/मोअर अश्या मॉल्सने घेतली, रविवाराची जागा बिग-बझार आणि डीमार्ट नामक कंपन्यांनी आधीच बळकावलेली होती, आणि ह्या सर्व उपलब्ध पर्यायांमध्ये भर पडली ते रिलायंस, वॉलमार्ट असल्या मोठ्या उद्योगांच्या उडी मुळे...!!

स्वतःहून मॉल ची पायरी कधी चढलो मला नक्की आठवत नाही की.. परंतु त्या भव्य दिव्य इमारतीत घुसण्याची हिंमत होण्यासाठी खिशात किमान १००० रुपये तरी असले पाहिजेत असं तो लवाजमा पाहिल्यावर खूपं आधीपासून वाटत होत... कॉलेजमध्ये गेल्यावर त्यातल्या त्यात उच्चभ्रू मित्र-मंडळींनी आम्हाला एकदा सोबत येण्याचे आमंत्रण दिले होते आणि आम्ही ती संधी साधली....

मित्रांसोबत फिरताना जाणवले की ह्या एका इमारतीतच सगळे काही असते, पाश्चात्त्य संस्कृतीचा चांगला भाग घ्यावा, त्यातले हे सुपरमार्केट असे मित्रांनी ज्ञानवर्धन केले.. आणि खरंच की - खालच्या मजल्यावर सगळे खाद्यपदार्थ, पहिल्या मजल्यावर कपडे, दुसऱ्या मजल्यावर गृहोपयोगी वस्तू, आणि तिसऱ्या मजल्यावर गिफ्ट आर्टिकल्स आणि बाकी बरेच काही...

गेल्या ४-५ वर्षांत 'मॉल' संस्कृतीत खूपच मोठा बदल घडून आला आहे... आधी मॉल मध्ये मदतीला लोक पुढे येऊन सहकार्य करायचे, मग हळू हळू -- "तुम्ही तुमचे पहा... आवडेल ते घ्या... जेवढे दिसते तेवढेच असते! तुम्ही सुज्ञ आहात आणि आम्ही बिझी आहोत" -- अश्या वागणुकीतून लोकं आपापली खरेदी करताना दिसू लागले, अजून काही दिवस गेले आणि पुन्हा जुने दिवस आले पण, थोड्याश्या फरकाने... आता मॉल अटेंडंट फ्री असायचे पण ते एकत्र टोळक्याने गप्पा मारत असायचे... "तुम्हाला काही अडलं तर विचारा, सांगतो... " ही मुजोरी आजकाल तर सर्वोच्च पातळीवर गेली आहे, - आजकाल हे सगळं तर चालूच आहे पण जोडीला मार्केटिंगचे प्रभावी हत्यार जोरदार उगारले जाते.

तुम्हाला अमुक पाहिजे ना? आमच्याकडून घ्या... आम्ही तमुक फ्री देतो! आमच्या मॉल ची वैशिष्ट्ये म्हणजे, आम्ही सगळी कार्डस स्वीकारतो - संपूर्ण इमारत एअरकंडिशनड - लिफ्ट - एक्सचेंज ऑफर - १० बिल काउंटर्स - वगैरे वगैरे....

आजकाल तर काही काही मॉल मध्ये लक्ष्मीरोडवर पथारीवाले बसून ओरडतात तसेच पण युनिफॉर्मवाले अटेंडंट इथे हातात माइक, गळ्यात कर्णा बांधून जोरजोरात ओरडतात... कधी रिन-सर्फ-टाईड विकतात, तर कधी बासमती तांदूळ, तेल, आटा'ची घोषणा करतात..

इथली अजून एक मजा म्हणजे ह्या ऑफर्स इतक्या आकर्षक वेष्टनात असतात की आपण एक घ्यायला जातो आणि ४ घेऊन परत येतो... अख्खी इमारत फिरणे आणि मग आपल्याला हवे ते घेणे, जे नको पण कधीतरी लागू शकेल आणि स्वस्त आहे म्हणून घेऊन ठेवणे.. आणि जे लगेच नाही पण पुढच्या आठवड्यात लागणारच आहे, मग ऑफर नसेल त्यामुळे आत्ताच घ्यावे असे सर्वसाधारण लोकांचे ताळेबंद चालतात!

आता ह्या असल्या आमिषांना आम्ही बळी पडतो खरे, नेहमीच चांगल्या ऑफर असतात असे नाही, पण कधीतरी एखादी 'डिल' चांगली मिळूनही जाते... परंतु सर्वात कंटाळवाणा भाग म्हणजे बिलींग काउंटर वर आपले बिल होईपर्यंत १० लोकांच्या मागे रांगेत उभे राहणे...!!

आपण कोणाला फोन केला आणि तो दुसऱ्या कॉल वर बिझी असेल तर - "आपण रांगेत आहात, कृपया प्रतीक्षा करा" अशी टेप यायची -तसलाच फील येतो.. म्हणजे ह्या मॉल मध्ये खरेदी करायला २ तास आणि बिलिंग साठी १. ५ तास अश्या हिशोबानेच येथे जावे :)

सार्वजनिक टॉयलेट्स, दवाखान्यातला आपला येणारा नंबर, पाण्याच्या टँकरची लाइन , ATM Transaction आणि कोणतीही बिले भरतानाच्या वेळी कायम मनात येणारा प्रश्न "आपल्या पुढचा माणूस एवढा काय वेळ खातोय? " ह्या वेळी देखील अंतर्मनातून बाहेर डोकावतोच...!!

तुम्ही कितीही प्रेमाने वागलात, आणि हसून पुढे आलात तरीही बिलिंग काउंटरवरचा माणूस मख्ख चेहऱ्याने तुमच्याकडे पाहत राहतो... बिलं चे पैसे सांगून, - " २, ५ रु. सुट्टे असतील तर बघा, कॅरीबॅग पायजे का? -२ रु एक्ष्ट्रा पडतील" हि स्टॅंडर्ड पाठ केलेली ओळ म्हणतो... आणि उरलेल्या सुट्ट्या पैशांच्या ऐवजी एक्लेअर्स, मेलोडी अशी चॉकलेट्स आपल्या हातावर ठेवते.... कहर म्हणजे आपण ती चॉकलेट्स स्वीकारली आहेत का नाही ह्याची दखलही न घेता तो तुम्हाला दुर्लक्षित समाजाच्या यादीत टाकून पुन्हा त्याच वैतागाने समोरच्या भाऊगर्दीला हाळी देतो... "सामान वर काढून ठेवा... मेंबरशिप कार्ड असलं तर आधी सांगा... इ. इ.

हे असे सगळे अनुभव घेऊन रांगत रांगत का होईना आणि अखेरीस त्या 'रांगेतून आपण बाहेर पडतो'..... हातातले वजन वाढवून आणि पाकिटाचे कमी करून!!

शाळा संपली, कॉलेज संपलं, नोकरी चालू झाली... पण रांग काही सुटत नाही !! -- इथे वपुंच्या 'एकबोटेंची पोरं/बदली' गोष्टीतल्या वाक्याचा प्रत्यय आला... " गाव बदललं तरी नशीब बदलतं नाही "!! आणि ह्याबरोबरच बिलाचा आकडा, बदलती परिस्थिती, आणि एकंदरीत सगळीकडचे बदलते वातावरण पाहून चंद्रशेखर गोखल्यांची चारोळी एकदम अंतर्मुख करते -->

घर शोधताना गाव हरवावं
तसं झालंय माझं
मी अधांतरी, आणि माझ्यावर
  या अंतराळाचं ओझं....



--
आशुतोष दीक्षित.

Wednesday, March 21, 2012

डुक्कर !!

डुक्कर !!

हा शब्द बाहेर पडला की काय आठवतं ?

गावाबाहेरचा उकिरडा ? - शहरातली तुडुंब वाहणारी कचरापेटी ? - डझनभर पिले आणि त्यांच्या आईसोबतची वरात ? - वराह अवतार? - शोले मधला गब्बर ? म्युन्सिपल्टी वाल्यांची धावपळ?- --- काय काय नाही आठवतं ... पण मला सर्वात आधी काही डोक्यात येत असेल तर ते म्हणजे - एक विशेषण (मूर्ख/नालायक/त्रासदायक/तापदायक व्यक्तीचे !)


हा लेख लिहिण्याचा विचार मनात आला तोदेखील ह्याच स्पेशल कारणामुळे ! डुक्कर हा शब्द किती सहजपणे वापरला जातो ना? ---

कंपनीत आपल्या टीम मधल्या माणसांपैकी कोणी ऑनसाईट जाऊन आला आणि त्याने चॉकलेट्स आणून डेस्क वर ठेवली की ती घेण्यासाठी झुंबड उडते.. त्यात शेवटच्या माणसाला अगदी चवीपुरते एक'च चॉकलेट मिळते तेव्हा तो/ती म्हणते - कसले डुक्कर आहात यार तुम्ही.. ! :)

आजकालच्या कॉर्पोरेट जगात ५ दिवस काम केल्यावर २ दिवस मिळणाऱ्या सुट्टीमध्ये त्या पाच दिवसांचे कपडे धुणे, रूम आवरणे, घरची कामे, बाहेरची कामे करून काही तास शिल्लक राहतात, त्यामध्ये समजा आपण दुपारी किंवा सकाळीच टी. व्ही पाहत लोळत पडले असू तर घरातून हमखास एक आवाज येतो - "अरे डुकरासारखा लोळतोयस नुसता...ऊठ जरा काही अजून कामं कर... !

एवढेच काय, रमेश सिप्पींच्चा ब्लॉकबस्टर शोले आठवतोय का ? त्यामधले गब्बरसिंगदेखील आपल्या पराभूत गुंडांना म्हणतो - "सुवर के बच्चों" !! (आता मला सांगा हे असले राकट, दांडगट गुंड 'डुकराच्या' पिलांची उपमा घेण्याच्या लायकीचे आहेत का ? --- डुकराचे पिलू तर किती क्युट असते.. (असे माझे नाही आमच्या कॉलेजमधल्या स्नेहाचे मत होते !) )

वराह अवतारात विष्णूने देखील डुकराचे रूप घेतलेले आहे, त्याबाबतची आख्यायिका आणि कारणीमिमांसा सर्वश्रुत आहेच, मध्यंतरी पोगो वर दशावतार हा अनिमेटेड चित्रपट पाहताना विष्णूच्या सर्वचं रूपांचे दर्शन झाले आणि हात आपोआप जोडले गेले...

एकंदरीतच लहानपणापासून ज्या प्राण्याची किळस वाटते.. पाल, सरडा, अळी, झुरळ, इ. अश्या प्राण्यांपैकी फक्त डुकराचे नाव एकमेकांना उपाधी म्हणून दिले जाते... कोणी असे म्हणताना पाहिले नाही की "अरे झुरळा, नीट चाल..." पण "अरे ए डुक्कर" हे वाक्य अनेकदा हमखास ऐकायला मिळते... !!

एवढेच काय, लायनकिंग च्या "हकुना-मटाटा" मध्ये टिमोन आणि पुम्बा असतात-- तो पुम्बा म्हणजे सुद्धा एक डुक्करच बरं का ! फरक फक्त एवढाच की ते रानडुक्कर होत... ! पण ह्या रानडुकराने लहान थोरांचे एवढे छान मनोरंजन केले की बाबा सहगल आणि अनाय्डा यांनी मिळून ह्या गाण्याचे हिंदी व्हर्जनदेखील काढले-- त्यामध्ये तर डुकराचे जीवनगान'च आहे ==" हकुना मटाटा -- फिकर ना करो... हमेशा खूश रहो !!"

मध्यंतरी तर 'स्वाईन फ्लु' मुळे डुक्कर हा प्राणी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता....तोंडाला मास्क लावून फिरणाऱ्या माणसांनी मास्क विक्रेत्यांचा चांगला धंदा करून दिला...मी तर असेही ऐकले होते की एक मास्क विक्रेत्याने एका दिवसात २००० रुपयांची मास्क विक्री झाल्याच्या आनंदात कचराडेपोजवळ फिरणाऱ्या डुकरांना चितळ्यांचे अर्धा किलो श्रीखंडाचा डबा ठेवला होता म्हणे... (खी खी खी..)

डुक्कर पकडायला आलेल्या कॉर्पोरेशन च्या लोकांच्या टीम ला पाहिले आहे का ? नुसता दंगा असतो डुक्कर पकडताना, एरवी गप्प गार पडलेले डुक्कर ह्या वेळी भलतीच चपळाई दाखवते.. लाइव्ह एंटरटेनमेंट असते ह्या वेळी... जमल्यास बघा कधीतरी !!

लहानपणी च्युंइंग-गम डुकराच्या चरबीपासून बनवतात हे ऐकून च्युंइंग-गम खाणे सोडले होते, फिरंगी लोक तर डुकरे पाळतात म्हणे, पांढरीशुभ्र, गुलाबी, आणि करड्या रंगांची.... आणि पोर्क पोर्क म्हणत त्यांच्या मांसावर ताव पण मारतात...! तिकडे डुकरांची शेती(पालन) करणारा झटपट धनवान होतो म्हणतात.. सुदैवाने आपल्याकडे अजून तरी हे फॅड आलेले नाही...

डुक्कर हा काही कोणाचा आवडता प्राणी होऊ शकत नाही कबूल... पण ह्या प्राण्याइतके स्वच्छंदी आयुष्य दुसऱ्या कोणाप्राण्याच्या नशिबी आल्याचे दिसत नाही...रानडुकराची ताकद तर सर्वांना माहीत आहेच, त्यामुळे ह्या प्राण्याकडून थोडेफार काही घेण्यासारखे असेल तर तो मस्तवालपणा ! डुकराला कोणी घाण्याला जुंपत नाही, त्याच्यावरून ओझी वाहत नाहीत, डुकराचा रपेटीसाठी वापर शून्य...हे नुसते इथून तिथे भटकत असते, जोडीला आपला प्रपंचगाडा घेऊन दोनाचे चार चाराचे आठ ह्या दराने वाढवत बिचारे ओला कचरा, सुका कचरा - जिथे जाते तिथे खाते....

असो, कोणाच्या खाण्यावर बोलू नये, म्हणून लेख इथेच संपवतो...
(बराच वेळ जमिनीला पाठ टेकली नाही...त्यामुळे आता जरा लोळावे म्हणतो.. मस्त, स्वच्छंदी, बेफिकीर........अगदी डुकरासारखे :) )

-
आशुतोष दीक्षित.

Wednesday, February 29, 2012

रविवारची कहाणी !!

:)२४*७ कार्यप्रणाली मध्ये रविवारचा निवांतपणा नेहमी नशिबात नसतो, पण आज सुट्टी होती त्यामुळे संध्याकाळी डेक्कन आणि JM,FC वर टाईमपास करून आल्यावर घरी जाण्याआधी काट्यावर गेलो... निशांत आणि सौरभ ची नेहमीसारखीच एकमेकांवर शाब्दिक कुरघोडी सुरू होती... बाकीचे एन्जॉय करत होते, निशांत ने कसलातरी पण केला होत नवीन वर्षाचे निमित्त साधून, त्यावर सौरभ म्हणाला - अरे नळीत घातली तरी कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच! थोडासा हशा झाला...:)
मी त्यात सामील झालो.. तेवढ्यात विशाल मागून पुढे येत म्हणाला - अरे नवीन सुचलंय...!! -- जरी शेपूट सरळ झाली... तरी कुत्रा तो कुत्रा'चं!! :P :P त्यावर सौरभ निशांतसहीत आम्हा सगळ्यांचे तुफान हास्य! आणि हे ऐकून चटकन माझ्या तोंडून निघून गेले -- अरे वा विश्या, साल्या तू मला माझ्या फेसबुक चे पुढचे स्टेटस दिलेस :-) आता रात्रीच अपडेट करतो आणि उद्या शेकडो "लाइक्स" आणि "कमेंट्स" खेचतो!!
""
घरी आलो, आज रात्री भाकरीचा प्लॅन होता, अनेक दिवसांनी सगळ्या कुटुंबीयासोबत गरम गरम भाकरीचा आस्वाद घेतला - "वाह लाईफ हो तो ऐसी.... मनात आले आणि लगेच मोबाईल वरून हेच वाक्य फेसबुकवर टाकले. :) जेमतेम अर्धा तास झाला नसेल, तोवर १०-१२ लोकांच्या प्रतिसादाने माझी वॉल भरून गेली... का रे काय झालं? लॉटरी लागली का? काहीतरी फालतू असेल! कोण कोण? असे अनेक प्रतिसाद, आणि तेवढेच लाईक्स!
" "
कोणे एके काळी मी स्वतः फेसबुकच्या विरोधात होतो, फक्त ऑर्कुट ही सोशल नेटवर्किंग साईट वापरत होतो - मुख्य कारण म्हणजे कसे वापरावे ते माहीत नाही, आणि दुसरे म्हणजे "ऑर्क्युट च्या कंफर्ट झोन" मधून बाहेर पडावेसे वाटत नव्हते! आणि शिकण्यासाठी वेळ घालवणे -- सोडून बोला!!
(मी तर शैक्षणिक इयत्तांमध्येही एखादी गोष्ट खास वेळ देऊन शिकल्याचे आठवणीत नाही)

पण एकदा दिवसभर काहीच काम नव्हते, मग एका मित्राच्या नादाने अकाउंट उघडलं - दिवसभर वेगवेगळे फंडे शिकवले, आणि घरी जाईपर्यंत मी एक्स्पर्ट झालो होतो.... त्याने मला सांगितले की ह्या मायाजालाचा उपयोग - फक्त लक्षवेधी पणा करणे आणि जमलंच तर जुन्या मित्रांच्या संपर्कात राहणे! एवढाच....

फक्त माझ्याबाबत नाही! हीच कहाणी अनेकांच्या बाबतीत कदाचित खरी असेल, आपल्या सभोवताली वावरणाऱ्या अनेकांच्या बाबतीत आता मात्र अतिरेक झालाय, असे वाटायला लागले आहे - कशाला हा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू व्हायची चढाओढ? कशाला ते सारखे अपडेटस, लाइक्स?

सगळ्या गोष्टी तर आपण इथे 'अपडेट' म्हणून टाकून मोकळे होतो..... स्वतःची प्रायव्हेट लाईफ काही उरलीच नाहीये का? कबूल की काय टाकायचे आणि काय नाही ते आपल्या हातात असते, पण एखाद्या गोष्टीची सवय लागली की अनवधानाने त्या आपोआप घडतात -- परीस शोधायला निघालेला तो माणूस आठवतोय का? सगळे चिलखत सोन्याचे झाले तरी दगड उचलतो, अंगावर लावतो आणि यांत्रिकपणे पुढे जातो....

रोजच्या पेपर मध्ये येणारे सोशल-नेटवर्किंगच्या माध्यमांतून झालेले फसवणुकीचे, लोकांचे जॉब गेल्याचे, किंवा बदनामीचे लेख आपण चवीचवीने वाचतो, पण त्याचा काहीच परिणाम दिसत नाही. - परवाच पेपर मध्ये वाचले की एका अपलोड केलेल्या फोटोवरून सुद्धा सगळी माहिती मिळवता येते... (अर्थात हॅकर ला! )

खूप जुने जुने मित्र, जे शाळेत सोबत होते, परंतु ह्या उभ्या आयुष्यात त्यांना कधीही भेटणे किंवा त्यांच्याशी संवाद साधणे शक्य नव्हते असे लोक मला इथेच सोशल नेटवर्किंग साईट वर सापडले, रोज संगणक चालू केला की चॅट ला कोणीही असो, उत्तर ठरलेले -- अरे जरा फेसबुक चेक करतोय...!

संगणकासमोरचा ७०% वेळ ह्याच भानगडीत जातो! आणि मग कामं बाजूला राहतात काही काही जणांची... किंवा बऱ्याच जणांची... आता ते लोक वेळ कसे सांभाळून नेतात हे सुज्ञास सांगणे न लागे! -

"अज्ञानात सुख असते" हि टॅगलाईन आज पटली.... तीच माझा ह्या सोशल नेटवर्किंगवर शेवटचा अपडेट! -Good Bye FB -अगदीच काही साधन नसेल आणि जुन्या मित्रांची आठवण आली तर परत येईन -- परंतु रतीब मात्र विसरा आता.... आमचा सोशल नेटवर्किंगला - सन्मानाने जय महाराष्ट्र ! !

मी माझ्यापुरते तरी ठरवले आहे... की आता हे अती झाले आहे, आणि माती होण्याअगोदरच.... आपल्या आयुष्याला परत एकदा तेवढेच (प्रायव्हेट) खासगी बनवायचे!

रविवारची निम्मी रात्र हा लेख लिहिण्यात गेली.... पण मी सोमवारपासून बराच वेळ इतर कामांसाठी देऊ शकेन ह्याची खात्री आहे!

-

आशुतोष दीक्षित.