Wednesday, February 29, 2012

रविवारची कहाणी !!

:)२४*७ कार्यप्रणाली मध्ये रविवारचा निवांतपणा नेहमी नशिबात नसतो, पण आज सुट्टी होती त्यामुळे संध्याकाळी डेक्कन आणि JM,FC वर टाईमपास करून आल्यावर घरी जाण्याआधी काट्यावर गेलो... निशांत आणि सौरभ ची नेहमीसारखीच एकमेकांवर शाब्दिक कुरघोडी सुरू होती... बाकीचे एन्जॉय करत होते, निशांत ने कसलातरी पण केला होत नवीन वर्षाचे निमित्त साधून, त्यावर सौरभ म्हणाला - अरे नळीत घातली तरी कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच! थोडासा हशा झाला...:)
मी त्यात सामील झालो.. तेवढ्यात विशाल मागून पुढे येत म्हणाला - अरे नवीन सुचलंय...!! -- जरी शेपूट सरळ झाली... तरी कुत्रा तो कुत्रा'चं!! :P :P त्यावर सौरभ निशांतसहीत आम्हा सगळ्यांचे तुफान हास्य! आणि हे ऐकून चटकन माझ्या तोंडून निघून गेले -- अरे वा विश्या, साल्या तू मला माझ्या फेसबुक चे पुढचे स्टेटस दिलेस :-) आता रात्रीच अपडेट करतो आणि उद्या शेकडो "लाइक्स" आणि "कमेंट्स" खेचतो!!
""
घरी आलो, आज रात्री भाकरीचा प्लॅन होता, अनेक दिवसांनी सगळ्या कुटुंबीयासोबत गरम गरम भाकरीचा आस्वाद घेतला - "वाह लाईफ हो तो ऐसी.... मनात आले आणि लगेच मोबाईल वरून हेच वाक्य फेसबुकवर टाकले. :) जेमतेम अर्धा तास झाला नसेल, तोवर १०-१२ लोकांच्या प्रतिसादाने माझी वॉल भरून गेली... का रे काय झालं? लॉटरी लागली का? काहीतरी फालतू असेल! कोण कोण? असे अनेक प्रतिसाद, आणि तेवढेच लाईक्स!
" "
कोणे एके काळी मी स्वतः फेसबुकच्या विरोधात होतो, फक्त ऑर्कुट ही सोशल नेटवर्किंग साईट वापरत होतो - मुख्य कारण म्हणजे कसे वापरावे ते माहीत नाही, आणि दुसरे म्हणजे "ऑर्क्युट च्या कंफर्ट झोन" मधून बाहेर पडावेसे वाटत नव्हते! आणि शिकण्यासाठी वेळ घालवणे -- सोडून बोला!!
(मी तर शैक्षणिक इयत्तांमध्येही एखादी गोष्ट खास वेळ देऊन शिकल्याचे आठवणीत नाही)

पण एकदा दिवसभर काहीच काम नव्हते, मग एका मित्राच्या नादाने अकाउंट उघडलं - दिवसभर वेगवेगळे फंडे शिकवले, आणि घरी जाईपर्यंत मी एक्स्पर्ट झालो होतो.... त्याने मला सांगितले की ह्या मायाजालाचा उपयोग - फक्त लक्षवेधी पणा करणे आणि जमलंच तर जुन्या मित्रांच्या संपर्कात राहणे! एवढाच....

फक्त माझ्याबाबत नाही! हीच कहाणी अनेकांच्या बाबतीत कदाचित खरी असेल, आपल्या सभोवताली वावरणाऱ्या अनेकांच्या बाबतीत आता मात्र अतिरेक झालाय, असे वाटायला लागले आहे - कशाला हा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू व्हायची चढाओढ? कशाला ते सारखे अपडेटस, लाइक्स?

सगळ्या गोष्टी तर आपण इथे 'अपडेट' म्हणून टाकून मोकळे होतो..... स्वतःची प्रायव्हेट लाईफ काही उरलीच नाहीये का? कबूल की काय टाकायचे आणि काय नाही ते आपल्या हातात असते, पण एखाद्या गोष्टीची सवय लागली की अनवधानाने त्या आपोआप घडतात -- परीस शोधायला निघालेला तो माणूस आठवतोय का? सगळे चिलखत सोन्याचे झाले तरी दगड उचलतो, अंगावर लावतो आणि यांत्रिकपणे पुढे जातो....

रोजच्या पेपर मध्ये येणारे सोशल-नेटवर्किंगच्या माध्यमांतून झालेले फसवणुकीचे, लोकांचे जॉब गेल्याचे, किंवा बदनामीचे लेख आपण चवीचवीने वाचतो, पण त्याचा काहीच परिणाम दिसत नाही. - परवाच पेपर मध्ये वाचले की एका अपलोड केलेल्या फोटोवरून सुद्धा सगळी माहिती मिळवता येते... (अर्थात हॅकर ला! )

खूप जुने जुने मित्र, जे शाळेत सोबत होते, परंतु ह्या उभ्या आयुष्यात त्यांना कधीही भेटणे किंवा त्यांच्याशी संवाद साधणे शक्य नव्हते असे लोक मला इथेच सोशल नेटवर्किंग साईट वर सापडले, रोज संगणक चालू केला की चॅट ला कोणीही असो, उत्तर ठरलेले -- अरे जरा फेसबुक चेक करतोय...!

संगणकासमोरचा ७०% वेळ ह्याच भानगडीत जातो! आणि मग कामं बाजूला राहतात काही काही जणांची... किंवा बऱ्याच जणांची... आता ते लोक वेळ कसे सांभाळून नेतात हे सुज्ञास सांगणे न लागे! -

"अज्ञानात सुख असते" हि टॅगलाईन आज पटली.... तीच माझा ह्या सोशल नेटवर्किंगवर शेवटचा अपडेट! -Good Bye FB -अगदीच काही साधन नसेल आणि जुन्या मित्रांची आठवण आली तर परत येईन -- परंतु रतीब मात्र विसरा आता.... आमचा सोशल नेटवर्किंगला - सन्मानाने जय महाराष्ट्र ! !

मी माझ्यापुरते तरी ठरवले आहे... की आता हे अती झाले आहे, आणि माती होण्याअगोदरच.... आपल्या आयुष्याला परत एकदा तेवढेच (प्रायव्हेट) खासगी बनवायचे!

रविवारची निम्मी रात्र हा लेख लिहिण्यात गेली.... पण मी सोमवारपासून बराच वेळ इतर कामांसाठी देऊ शकेन ह्याची खात्री आहे!

-

आशुतोष दीक्षित.