Tuesday, July 17, 2012

यु कॅनडू (इट)!! (भाग-३)

ट्रिंग.....ट्रिंग....ट्रिंग.... कोणास ठाऊक कसा... पण सिनेमात गेला ससा..."


गाण्याने माझी झोप चाळवली, गेली अनेक वर्षे पुण्यात असताना पहाटे ६ च्या गजराची रिंगटोन म्हणजे हेच गाणे आहे , मोबाईल मधला टाईमझोन अजूनही पुणेच दाखवत होता त्यामुळे कॅनडाचे घड्याळ पाहिले तर संध्याकाळचे साडे आठ वाजले होते.....!! तब्बल ७ तास झोप कशी लागली ते कळले देखील नाही...खिडकीचे पडदे सरकवून पाहिले तर असे वाटले की सकाळच आहे.... भरपूर लाइट्स होते रस्त्यावर... आकाशात पाहिले तर... चम चम करत अनेक रंगी दिवे जवळ जवळ येत होते...मी नकळतच गुणगुणलो..."लख लख चंदेरी... ताऱ्यांची सारी दुनिया... " आणि तेवढ्यात ते रंगीत दिवे लावलेले विमान हॉटेलच्या डोक्यावरून लँडिंगसाठी विमानतळावर गेले.... विमानतळ ह्या हॉटेलपासून सरळ रेषेत अवघे ५-६ किलोमीटर असावे...

विमान हे माझ्या लहानपणापासून आकर्षणाचा विषय ठरलेले होते, कागदी विमानाचे पंख डोक्याला घासून, नाहीतर मग शेपटीला शंख फुंकतात तशी हवा फुंकून, किंवा मग अगदी २ऱ्या मजल्यावरच्या गॅलरीत जाऊन तिथून ते विमान खाली सोडायचे.....कोणाचे विमान जास्तीत जास्त वेळ हवेत तरंगते, आणि किती गिरक्या घेऊन जमिनीवर येते ह्यामध्ये असलेली शर्यत आठवली....

विमानाचा आवाज ऐकून धावत पळत बाहेर येणारी पावले, प्रखर सूर्यालादेखील आव्हान देऊन आकाशात विमानाच्या दिशेने रोखले जाणारे डोळे, विमान दिसल्यावर ते मित्रांना कसे पटकन दिसेल ह्यासाठी दिल्या गेलेल्या टिप्स ! .....सगळं.. ‌ सगळं आठवलं.....

वाढत्या वयानुसार माणसाची प्रतिसाद देण्याची पद्धत बदलते असे म्हणतात... पण शेवटी दिल तो बच्चा है जी ! इथे दर ४ मिनिटांतून एक विमान जाताना पाहिले...आणि पुढचे ३ तास फक्त विमाने पाहत, मोजत खिडकीत बसलो होतो.... व्वा ! काय मजा आली.... आत्ता इथे माझे लहानपणीचे मित्र पाहिजे होते....किती धमाल केली असती !!
रात्रीच्या जेवणात घरून आणलेले रेडीमेड खाणे होतेच.. खव्याच्या पोळीसोबत चितळ्यांचे तूप.. वाह लाईफ हो तो ऐसी.... !! रात्रभर खिडकीचा पडदा मी लोटलाच नाही....आपोआप गुंगी येऊन डोळे मिटेपर्यंत आकाशात पाहत पडून राहिलो

सकाळी उठून ऑफिसला जाताना मस्त हॉटेलचा दमदार ब्रेकफास्ट, त्यांचे सगळे ब्रेड चे पदार्थ, सूप, सॅलड, सगळे ट्राय करून झाले... शटल सर्विस मुळे येणे जाणे सुकर होणार होते....
गाडी निघाली आणि चकाचक रस्ते, काचांच्या बिल्डिंग्स, हिरवेगार लॉन पाहून मन प्रसन्न होत होते, कॅनडाला पिण्याच्या पाण्याची कमी नाही, एक तर जगातील २ नंबरची सर्वात मोठी जमीन, आणि तेवढेच पाणी.. (गोड पाण्याच्या नद्या) आणि बर्फ !! इथल्या सोयी सुविधा पाहून वाटले --- सोयी जास्त आणि माणसे कमी !!
ऑफिस पण एकदम चकाचक -भारतात असते तसेच... इथे सर्वजण आपापल्या कामात असतात, एरवी खूप खूप प्रेमाने बोलले असते देखील पण साधारणतः ७-८ वर्षापूर्वी भारताचा एक प्रगतिपथावारी विकसनशील देश असल्याचा प्रत्यय जगाला आला आणि सगळे उद्योग त्यांचे भारतातील एकत्रीकरण वाढवण्याचा प्रयत्न करू लागले... त्यांच्या मनाने स्वस्त कामगार, आणि त्या हिशेबात मिळणारी चांगल्या दर्जाची सेवा, भारताची USP झाली.....आणि त्यामुळे आपल्याकडे रोजगार वाढले आणि त्यांचे कमी होऊ लागले... ह्याचा सल त्यांच्या बोलण्यात कुठेतरी खोलवर जाणवतोच... अर्थात सगळेच लोक असे उघड उघड बोलत नाहीत पण तरी ते बोलण्याच्या ओघात कधीतरी व्यक्त होऊन जाते.... अर्थात त्यांना त्याचे जास्त काही वाटत नाही कारण आज भारत आहे, उद्या चीन असेल, परवा जपान असेल... जोपर्यंत ग्लोबल लँग्वेज इंग्लिश आहे तोपर्यंत तरी सर्व उद्योग Cheap Labour आणि Fair Quality च्या ऍडजस्ट्मेंट्स करत राहणार.... आज ते म्हणत आहेत, उद्या कदाचित आपण म्हणू... !

विकसित देशांतला दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे इथे टॅक्स मजबूत असतो, कायदा संपूर्ण सर्वलोकी सर्वमान्य असून सगळीकडे सारखा दिसून येतो, देशाची तिजोरी भरलेली राहते कारण त्यांचे सरकार त्या हिशेबात सगळी वसुली चालू ठेवतात.. आपल्याकडे धान्यापासून दारू बनवत आहेत, देशी दारूपासून सरकारी कमाई करत आहेत -- इथे हे लोक कॅसिनो चालवतात... ! अमाप पैसा सरकारी खात्यात जातो....जिंकणाऱ्या एखादं दोघांना ५००० पैकी ५०० वाटायला सरकारलाही काही तकतक नसते !

आम्ही ऑफिसमध्ये गप्पा मारत मारत सगळे एकत्र जेवायला जाताना, माझ्या बॉसने (कॅनडियन आहे) ऐकले... तो म्हणाला GUYS...तुम्ही इंग्रजीत का बोलत आहात ? तुम्ही सगळे भारतीय आहात ना... मग १२-१५ लोक एकत्र बसून इंग्लिश मध्ये का बोलताय ? भारताची नॅशनल लँग्वेज हिंदी आहे ना ? मग हिंदीत का नाही बोलत ? I'm surprised....!!


मग त्याला जेव्हा सांगितले की मी मराठी आहे, काही लोक दिल्ली आणि काश्मिरी आहेत, आणि बाकीचे साऊथ इंडियन आहेत त्यांना हिंदी कळत नाही... ते फक्त तमिळ, तेलगू, कानडी, आणि इंग्रजीत बोलतात.. !! माझा बॉस चक्रावून माझ्याकडे म-भ च्या शिव्या देत असल्याप्रमाणे पाहत होता.. तो म्हणाला ---> "यू गाईस आर क्रेझी, यू शुड नो युवर नॅशनल लँग्वेज...ऑर एल्स डू नॉट डिक्लेर इट ऍस नॅशनल लँग्वेज !!" आणि एक POOR INDIAN CHAPS असा लुक देऊन निघून गेला... !


राज ठाकरे मराठीसाठी गळा सुकवताना पाहून मलाही चेव चढतो, पण वस्तुस्थिती अशी आहे मित्रांनो की माझ्या ह्या बॉस ने एका वाक्यात सगळ्या भारतीयांच्या तोंडात शेण घातले आहे ! विविधतेत एकता म्हणतो ते कसे का असेना, पण सर्वांना देशातील निदान एक कॉमन भाषा यायलाच पाहिजे - बोलता, ऐकता, आणि लिहितासुद्धा !! देशव्यापी चळवळ करून निदान काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत एकच भाषा कंपल्सरी केली गेली पाहिजे... कोणतीही करा, सद्य स्थितीत हिंदी ला तसे करणे सर्वात सोपे आहे कारण हिंदी बऱ्याचं ठिकाणी चालते, पण दक्षिण भारताला पाठीवर हंटर मारून सुधारायची वेळ आली आहे असे मला वाटले, त्या त्या भागात ती ती भाषा बोलाच.... त्याला मनाई नाही, पण एक भाषा सर्वमान्य ठेवून त्यामध्ये बोलता येऊ नये ? ही सरकारसाठी शरमेची बाब आहे !

भारताचा जगाबाहेरचा चेहरा न्याहाळत महिनाभर हे असे अनेक अनुभव घेतले,....बॉस म्हणत होता तुमच्याकडे माणसाला दवाखान्यात जायचे पैसे नसतील तर ? त्याने मरावे का तसेच ? हेल्थकेअर हे सरकारच्या अगेंडा वर पाहिजे ! मी त्याला म्हणालो "तुमच्या अख्ख्या कॅनडाची लोकसंख्या आणि आमची फक्त मुख्य शहरांतील लोकसंख्या पहा, आणि मग बोला...४ महिने पावसावर चालणारी शेती, इंग्रजांनी लुटून नेलेली संपत्ती आणि सुबत्तता, तेल आणि आंतरराष्ट्रीय करारासाठी आमच्यावर लादलेले व्याज, त्यातून सोमालीया, जपान,इंडोनेशिया वगैरे ला घरात दाणा कमी असून कर्ज काढून मदत पोचवणारे आमचे मूर्ख सरकार, भ्रष्टाचारात माखलेले नेते, आमच्या टॅक्सचे पैसे जनहितासाठी सोडून अतिरेक्यांना पोसण्यासाठी वापरणाऱ्या बेअक्कल कायदाऱ्यंत्रणा.. ..हे सगळे पाहता आम्ही तरीही चांगले मॅनेज करतो आहोत... .... आमच्याकडे काही गोष्टींत नाईलाज आहे, निदान तुमच्या देशासारख्या पाण्याच्या बाटल्या विकत किंवा घरून घेऊन तरी निघावे लागत नाही आम्हाला.... सरकार निदान पिण्याचे पाणी तरी देते आम्हाला सार्वजनिक नळांवर.... (तुम्ही एवढा पाणीसाठा असून जे करू शकत नाही... टेक्निकल प्रॉब्लेम वगळता देखिल बरेच काही करता आले असते ) पण समजा तुमच्या देशासारखी जल आणि स्थल संपदा लाभली असती तर कदाचित परिस्थिती अजून चांगली असती..."

ह्या २९ दिवसात किमान २९ नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या...वपुंच्या ओळी खऱ्या ठरल्या "घरटं सोडून गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ समजतं नाही" ! मी तिथे काय आणि इथे काय ह्या परिस्थितीच्या आरशात स्वतःला चांगले २९ दिवस न्याहाळले, आणि चांगले ते घ्यावे, वाईट ते टाकोनी द्यावे... ह्या हिशेबाने खूप काही शिकलोय....आणि घरट्याची उब समजल्यामुळे ते सर्व आचरणात आणेनच, शंका नसावी....


आपली आई-बायको-आजी-काकू-ताई-वहिनी-मामी-मावशी-आत्या सगळा स्त्रीसमाज किती काम करतो ते नव्याने समोर आले, घरातील एवढी कामं करून बाहेर नोकरीदेखील सांभाळणाऱ्या आणि संसाराला सर्वतोपरी हातभार लावणाऱ्या सर्व स्त्री समाजाला माझा साष्टांग नमस्कार... ! खरंच खूप करता तुम्ही... !


मी आईला ह्या आधीदेखील मदत करायचोच, आता बायकोलाही करतो -- माझे एवढेच मतं होते, की स्त्रिया जर पैसा कमावून तुम्हाला अर्थार्जनात मदत करत असतील तर तुम्हीदेखील त्यांना संसारातील बाकी कामांना तेवढीच साथ देणे आवश्यक आहे.... इथे पैशाची किंमत समजते, प्रत्येक छोट्या गोष्टीला जेव्हा डॉलर्स द्यावे लागतात आणि त्या विकत घेतल्यानंतर ह्या नवीन खरेदीपेक्षा चांगली पर्यायी व्यवस्था फक्त थोड्या उलटा-पालटीने आपल्याकडे आधीच उपलभ्द होती असे जाणवते तेव्हा "आपण पैसा खर्च करून शहाणपण विकत घेतो"  ही म्हण पटते... !!

सकाळी ६.०० ला उठून देखील माझे मला आवरायला वेळ लागायचा, त्यात डब्याला पोळी करायची घाई, मग ती पोळी कधी कधी जळायची...कधी अर्धी कच्चीच...कपडे इस्त्री करायला वेळ पुरायचा नाही... दाढी कधी केली..तर कधी नाही.... इथे एक बरं आहे - तुमचे काम जोपर्यंत उत्तम चालू आहे तोपर्यंत तुमच्या बाह्यरूपाला इथे जास्त किंमत कोणीही देत नाही, आपल्यासारखं...तू टाय का लावून आला नाही, फॉर्मल्स का घातले नाही, बूट पॉलिश का नाही, चप्पल का ? बूट का नाही... बरं हे सगळं मुलांनाच लागू... मुलींचे आजकालचे ऑफिसला घालायचे कपडे पाहिले तर आम्हालाच लाज वाटते कधी कधी..... !


हे असले बाष्कळ प्रश्न विचारायला परदेशात लोकांना वेळच नसतो.... त्यांचे प्रश्न वेगळेच -- ! काम झाले का ? उशीर तर होत नाहीये ना ? माझी काही मदत लागणार आहे की तुम्हाला जमेल ? -मी आहे तोपर्यंत काहीही काम द्या... एकदा घरी गेलो की फोन करायचा नाही... ! प्रत्येकाची प्रायव्हसी महत्त्वाची आहे... काम चालूच राहते... पण वर्क-लाईफ बॅलन्स महत्त्वाचा आहे हे खुद्द डायरेक्टर सांगतो... आणी ह्या ओव्हरऑल दृष्टिकोनामुळे तर कमालीचा खूश झालो मी.... आणि इथे मला पहिल्यांदा वाटले की आपल्याकडे काय फालतूपणा असतो ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा...

असो,

चांगले वाईट शिकवणारे अनुभव घेत, आज २९ दिवस झाले -- हॉटेलचे बिल भरून सगळी डॉक्युमेंट्स रीतसर फाइल केली...रिटर्न तिकिटाची प्रिंटाऊट काढली, विमानतळावर नेण्यासाठी येणाऱ्या शटल ला फोन केला आणि घराची ओढ अजूनच तीव्र झाली -- माझी आई, माझे बाबा, माझी बायको, माझी आजी, माझी ताई, माझी भाची.... सगळे लोक जे मला माझे वाटतात...गेले २९ दिवस माझी वाट पाहत होते... त्यांना भेटायचा दिवस आला.... !

त्या चमचमणाऱ्या दिव्यांच्या सोबत मला भारतात, महाराष्ट्रात, पुण्यात परत नेणाऱ्या विमानाचे पंखे फिरू लागले, सिट बेल्ट आवळण्याची सूचना खाली, समोरच्या टीव्हीवर परतीच्या प्रवासाचा नकाशा दिसू लागला... वेगाने पुढे जात जात.... विमान आकाशात झेपावले... जमीन खोल खोल जाताना पाहून आणि माझ्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले --- "गणपती बाप्पा मोरया !! --- कॅनडा वासियांनो, आम्ही जातो आमुच्या गावा.... आमचा राम राम घ्यावा" !!




--
आशुतोष दीक्षित.

Saturday, July 14, 2012

यु कॅनडू (इट)!! (भाग-२)

१२० रु समोसा आणि १४० रु ब्रेड सँडविच.... ! ?? जवळ जवळ बेशुद्ध होण्याची वेळ आली होती माझ्यावर.... !!


विमानाची वाट पाहत त्या आलिशान लाउंजमधल्या चकचकीत फरश्या, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जर्स, स्वच्छतागृह,टापटीप कपड्यातले अटेंडंटस, फुकट इंटरनेट सेवा, ह्या सगळ्याचा खर्च कसा कमावतात ते चटकन ध्यानी आले..... आणि माझ्या सदाशिवपेठी मनाने आतून ओरडून सांगितले - विमानप्रवास महाग म्हणून हे सगळे महाग... असे नव्हे, तर हे सगळे महाग म्हणून विमान प्रवास मध्यमवर्गाच्या आवाक्याबाहेरचा !!
सुचेता कडेठाणकर ताई एका लेखात म्हणाल्या होत्या, -> "आय ऍम द चोझन वन. " आज आपण घातलेल्या "तंत्रा" च्या टी-शर्टवरची कॅच लाईन एकदम मान वर काढून आपल्याकडे वाकुल्या दाखवत बघू लागल्यासारखं वाटलं ! - अगदी त्याचा प्रत्यय आला, आणि एवढ्या पॅसेंजर्स मध्ये बसून सुद्धा माझे मला अगदी निरागस आणि प्रतिक्षिप्त म्हणतात तसे हसू आले...

आणि मग त्यामागोमाग ह्या गर्दीत जरी मिसळलेला असलो तरी, "ह्यांच्यासारखा मी होणार नाही.... वाण नाही... आणि गुण तर नकोच.. . भले लोक कंजूस म्हणोत, की मुर्ख म्हणोत... बावळट म्हणोत की Boaring म्हणोत... पण उगीच हे असलं मोठेपणाचं आणि टेंभा मिरवण्याचं ओझं खांद्यावर वागवण्याच्या नादात दोन दोनशे रुपयांच्या चकचकीत उभट ग्लासमधील कॉफी पिता पिता अगदी पातळ प्लॅस्टिक लावलेले आणि सजवलेले सँडविच खाऊन आपल्या खिशाचे वजन कमी करून घेणे जमायचे नाही !!
आणि तसेही अश्या माणसाला शुद्ध मराठीत "माजोरडा" किंवा "अंमळ आगाऊच" म्हणतात...
माझ्या अंतर्मनातला प्रभाकर पणशीकर जागा होऊन ओरडला.... "वर वर कितीही कपडे, भाषा, काम, वागणूक जरी तुम्हाला तशी दिसत असल्याचा तुमचा समज असला.... तरी... तो मी नव्हेच !! !!"

विमान लागल्याची घोषणा झाली आणि मी टर्मिनल २ए पासून पुढे निघालो, विमानात बसताना आधी लहान मुले आणि फॅमिली, मग वयोवृद्ध आणि मग बाकीचे ह्या कार्यप्रणालीचे कौतुक वाटले... आणि क्षणभरात गरवारे कॉलेजमध्ये असताना डेक्कन वरून कर्वेनगर ला चिंचा बोरे विकायला जाणाऱ्या म्हातारीची आठवण आली..एकदा मी बस मधून जात असताना ति आणि ड्रायव्हर दात ओठ खाऊन सभ्य शिव्या देत होते एकमेकांना.....ड्रायव्हरने गाडी पुढे दामटली होती आणि म्हातारी गर्दीत चढू शकली नाही पण तिची टोपली मात्र आत गेली होती... असो,

इथे विमानातल्या अडचणीच्या सिट, अगदीच मुंबईय्या स्टाइलने (इंच इंच लढवू... ) बांधलेले बाथरूम्स, पाहिल्यावर मला आपण रेल्वे, बस, रिक्षाच्यामध्ये राजेशाही थाटांत राहतो असे वाटू लागले....इतके दिवस ते देखिल कंजस्टेड वाटायचे


विमानात पाहिजे तेवढी चॉकलेट्स घेता येतात वगैरे जुन्या सिनेमा मध्ये दाखवलेले किंवा ऐकलेले अगदी खोटे असते... अस कोणी चॉकलेट्स चा वगैरे घेऊन फिरत नाही.. ! (किंवा मग माझं नशीब आणि मी )

विमानात प्रत्येकाला लिमिटेड स्नॅक्स, वाइन, ज्यूस, वगैरे मिळते, मुंबई ते पॅरिस हा प्रवास पटकन संपल्यासारखा वाटला, इथून जाताना बरेच आपले देशी चेहरे दिसत होते, पॅरिस वरून कॅनडाला जाताना मात्र अनेकविध लोक दिसले.... वेगळ्या रंगात...वेगळ्या ढंगात....!
टॅटू वगैरे पद्धतीने काहींनी मुद्दाम रंगरंगोटी केली होती, तर काहींना निसर्गानेच 'रंग पक्का आहे' ही पाटी अडकवून पाठवले होते... पॅरिस चे भलेमोठे विमानतळ पाहण्यासाठी दिवस कमी पडेल... मला तर फक्त तासभर होता त्यामुळे जास्त उडाणटप्पूपणा न करता माझे टर्मिनस गाठले आणि फुकट च्या सिमकार्डावरून घरी सुखरूप असल्याची पोच दिली,

फ्रेंच भाषेचा प्रचंड अंमल जाणवला, स्वाभिमान आणि काही अंशी कडवेपणादेखील, आपल्याकडे दक्षिणेकडे गेलो की काहिस तसच जाणवतं..

पॅरिसहून कॅनडा ला येतानाचे विमान जरा आधी पेक्षा बरे होते, त्या विमानात अनेक फ्रेंच दिसले, भेटले, आणि आमचे सांकेतिक संभाषण सुरू झाले... (त्या सगळ्यांना इंग्रजी येते अस नाही, आणि त्यांना त्याची गरजही वाटत नाही... ) विमान कॅनडाच्या धावपट्टीवर उतरले.. आणि सर्वांनी टाळ्या वाजवून वैमानिकाचे आभार आणि अभिनंदन प्रकट केले....

"त्यात काय" !! --- "त्यासाठीच तर तो पगार घेतोय" !! किंवा रिक्षांत बसल्यावर फक्त मीटरकडे पाहणारे लोक असतात तसे विमांप्रवास संपेस्तोवर पाकिटातले पैसे मोजण्याच्या मी आपल्या पुणेरी म्हणा ....इंडियन म्हणा.... जे असेल, त्या मेंटॅलीटीचा क्षणात त्याग करून ताबडतोब टाळ्या वाजवणाऱ्यांत सामील झालो....!!

खूप छान वाटले, कारण विमान कैक हजार फुटांवरून जाताना समजा काही कमी जास्त झाले तर ती इजा कोणाकडे किती पैसे आहेत किंवा बँकबॅलन्स आहे त्यावर अवलंबून नसतेच... तिथे अधांतरी असताना 'सब प्यादे एक जात' !! आणि त्या परिस्थितीतून पुन्हा अतिशय सुखरूपपणे वस्तुस्थितीत आणणाऱ्या वैमानिकाचे असे कौतुक झाले तर तो देखील नक्कीच अधिक जोमाने आणि जबाबदारीने काम करेल.... ह्या वेळी विमानातून बाहेर पडताना गुड बाय...बॉन जुने(गुड डे) म्हणणारा सगळा केबिन-कृ मला जास्तच अदबशीर वाटला... Cheers to the policy of ==> Give Respect - Take Respect !!


विमानतळावरून इमिग्रेशन साठी गेलो, शक्य तेवढे मनमोकळे, साधे राहण्याचा प्रयत्न करा, फुकट मिजास कवडीची देखील नको... हे तत्त्व पाळल्यामुळे अजिबात त्रास न होता फक्त २ प्रश्नांची उत्तरे देऊन मी लगेच सटकलो त्यातून दुसऱ्या प्रश्नात मी स्वतः शाकाहारी आहे हे सांगितल्यावर तर त्या ऑफिसर ला विचारण्यासारखे काही राहिलेच नाही असे तिने दर्शवले... बॅगेज सेक्शन मधून बॅग उचलली.. पाहतो तर ह्या बदमाशांनी दुसऱ्या बाजूचे बॅग चे हँडल पण तोडून टाकले होते.... घ्या... आता पुढचा संपूर्ण प्रवास फक्त बॅग ओढण्यासाठीच्या दांडीच्या आधारे करावा लागणार......विचार करत बाहेरचा रस्ता गाठू लागलो...

इथे विमानतळावरून निघताना तुम्हाला शहराची माहिती देणारी पुस्तके मिळतात (फुकट) -( कारण, महाबळेश्वर दर्शन, लोणार ची कथा, कोंकण कसे पाहाल, मध्यप्रदेश ची सहल वगैरे अशी पुस्तके आपण विकत घेतो नेहमी कुठे गेलो की... !!)

तर, ती CITY GUIDEs घेऊन बाहेर पडलो, हॉटेलची शटल आलेली होतीच, त्यामध्ये बसलो आणि आलिशान हॉटेल मध्ये दाखल झालो... चकचकीत दिवाणखाने आणि फायरप्लेस पाहून पुन्हा आठवणी जाग्या झाल्या...( मालाडचा म्हातारा.. म्हाताऱ्याची बायको.. शेकोटीला आले...!!) - रूम ची किल्ली घेतली, सामान आत ठेवून बाथटब मध्ये गरम पाणी भरून तासभर डुंबलो त्यामुळे १८ तास प्रवासाचा शारीरिक आखड थोडा कमी झाला, घरून सोबत आणलेले दाण्याच्या कुटाचे लाडू, पुरणपोळी,बाकरवडी आणि हॉटेल च्या वेलकम किट मधले हॉट चॉकलेट पिऊन आता मी मस्त झोपणार आहे,

अरे हो -- दाराजवळ "Recharging - do not distrub" अशी पाटी पाहिली होती, ति बाहेरून अडकवून येतो म्हणजे माझा थकवा घालवण्याचा रामबाण उपाय करता येईल -> ....खाल्ल्यावर झोपणे आणी भूक लागल्यावर उठणे  !!


-आता महिनाभर आमच्या चॅनलवर एकच पिक्चर --- "परदेस" !


--
आशुतोष दीक्षित