स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळावर गो-एअर च्या विमानातून उतरल्या उतरल्या पाय टेकायच्या आत मी त्या भूमीला नमस्कार केला. आजकाल सगळे 'मोदी'फाईड झाले आहेत... आणि चांगल्या गोष्टी कॉपी करायला आपण तर घाबरत नाही बुवा !!तिकडचे फ्लाईट-अटेंडंट/सिक्युरिटी गार्डस "हे काय भलतेच" असे माझ्याकडे पाहत होते....त्या बिचाऱ्यांना काय माहीत अंदमान बद्दल बाहेर जगात काय काय आठवणी आहेत.....पिकतं तिथे विकत नाही हा नियम सगळीकडेच लागू होतो.. अगदी त्यागासाठी सुद्धा !
अंदमान ला पोचलो तेव्हा थोडासा पाऊस पडून गेला होता, गाईड कडून समजले की इथे दिवसभरात तीनही ऋतू पाहायला मिळू शकतात एवढे चंचल हवामान आहे, आणि त्सुनामी नंतर तर हवामानाचा लहरीपणा जास्तच वाढलेला आहे. हॉटेल मध्ये फ्रेश होऊन जेवण करून आमचा ताफा अंदमानचे राजनैतिक माहात्म्य आणि आता सध्या राष्ट्रीय स्मारक असलेल्या "सेल्युलर जेल" कडे निघाला.
मराठी भाषा प्रचंड समृद्ध आहे, पण कधी कधी इंग्रजी शब्दच कदाचित आपल्या भावनांचे चपखल वर्णन करू शकतात! आणि आजकाल वापरात असलेल्या "बिझनेस लँग्वेज" मध्येच सांगायचं झालं तर तोंडातून एकच शब्द बाहेर पडला - "मार्वलस" !!
६९३ खोल्यांच्या भव्य जेल आणि त्याचा सर्वेसर्वा डेव्हिड बॅरी ह्याने स्वतःच्या राज्यकर्त्यांचे आदेश पाळण्यासाठी आणि इंगजी सत्ता वाचवण्यासाठी येथे क्रांतिकारकांवर अतोनात जुलूम केले, शासन-द्रोहाला जरब बसवणे म्हणजे काय ते इथे आल्यावर कळते !
एखाद्या ७ पाकळ्यांच्या सूर्यफुलाप्रमाणे ह्या जेल ची रचना एवढी जबरदस्त होती की कोणाही कैद्याला एकदा कोठडीत गेले की दुसरा कैदी ना दिसायचा न बोलता यायचे, कोठडीचा कडी कोयंडा २ फूट लांबवर अडकवलेला असायचा जेणेकरून समजा कैद्यांना किल्ल्या जरी मिळाल्या तरी दार उघडता येणे अशक्य व्हावे ! सावरकर आणि त्यांचे भाऊ इथे २ वर्ष एकत्र असून त्यांना एकमेकांबद्दल काहीही माहिती नव्हती ! जेलर डेव्हिड बॅरी म्हणायचा तुम्ही इथे पिकनिकला नाही आला आहात.. कैदी आहात, तोंड बंद करून शिक्षा भोगा नाहीतर अजून जबरी शिक्षांना तयार व्हा !! ह्या कैद्यांना रोजचे ४० पौंड तेल काढावे लागत असे, शालेय जीवनात कितीही वेळा वाक्प्रचार केला असला तरी खरोखरीच "घाण्याला जुंपणे" म्हणजे काय असते ते तिथे गेल्याशिवाय कळणार नाही... !
लोकं जेल मध्ये उभे राहून फोटो काढून घेतात... तेलाच्या घाण्याजवळ वेगवेगळ्या पोझ देऊन उभे राहतात...फाशीघराजवळ स्वतःच्या गळ्यात स्कार्फ अडकवून फोटो काढतात... डिजीटल फोटोग्राफीने थोडेसे तारतम्य कमीच झाले आहे... पण तरी हे सगळे बघताना देखील मला विचित्र वाटले!! ... !
सेल्युलर जेल चा नजारा दिमाखदार होता... ब्रिटिश शासनाची शानोशौकत आणि धाक ह्या दोन्हीचे प्रतीक उंचावणारा ! साउंड & लाइट्स शो चुकवू नका... जेल जागा ठेवण्याचा प्रयत्न अप्रतिम केला आहे त्या शो मध्ये !
सगळा जेल फिरल्यावर का कोणास ठाऊक मला थोडेसे वाईट वाटले पण जास्त राग आला नाही... उलट थोडीशी कीवच आली. आपल्यावर लादलेल्या शासनपद्धतीतल्या काही गोष्टी ह्या खरंच इंग्रजांनी टाळल्या असत्या तर ते लोक अजूनही अनेक वर्षे राज्य करू शकले असते... आणि आपण त्यामधल्या काही गोष्टी आत्ता अमलात आणल्या तर पुढची अनेक वर्षे आपण देखिल हे सुखैव स्वातंत्र्य अनुभवू शकू असे वाटले !! देशासाठी लढणाऱ्यांना ४० पौंड तेल काढावे लागायचे आणि बलात्कारी, आतंकवादी, नक्षली लोकांना मात्र आपल्याकडे वर्षोनुवर्षे सरकारी इतमाम मिळतात. ४० च्या जागी ४ पौंड तेल काढायला लावले ना तरी crime rate ८०% कमी होईल. आपल्याकडे लोक गुन्हे करतात कारण कोणाला कशाची भीतीच उरलेली नाही !! जर लोक स्वयंशिस्तीने नीट राहू शकत नसतील तर भीतीने नीट राहण्यास भाग पाडणारे शासन हवे !
कहर म्हणजे सावरकरांच्या कोठीमध्ये बेशरम पद्धतीने पाटी लावण्यात आली आहे की "जगतील एकमेव ऐतिहासिक सत्य - सावरकरांनी त्यांच्या बेड्या/साखळ्या/काटे वापरून तिथे जेल च्या भिंतीवर "कमला" हे काव्य लिहिले"
असो, रागाच्या भरात येणारे सगळे विचार कागदावर उतरवता येत नाहीत, पण हा अनुभव पुन्हा डोकं सुन्न करतो - तो ह्याची देही ह्याची डोळा तेथे जाऊनच घेतला पाहिजे ! जेल नंतर त्या दिवशी काहीच पाहू नये असे वाटले !
परंतु ट्रीप मध्ये ठरल्याप्रमाणे "स्नेक आयलंड" जवळच्या बीच वर गेलो. शांत समुद्र रात्र झाली की अचानक उफाळू लागतो आणि चमकणाऱ्या विजा आपल्याला आपण एका चहुबाजूने पाण्याने वेढलेल्या असाहाय्य बेटावर आहोत ह्याची पदोपदी जाणीव करून देत राहतात !
द्विपसमुहातील हॅवलॉक - हे एक प्रसिद्ध बेट आहे, येथेच एलिफंट बीच वर सगळ्या प्रकारचे Water sports आहेत ! अंडर-सी-वॉक चुकवू नका... विलोभनीय अनुभव आहे जेव्हा आपण ३० फूट खोल समुद्रात नॉर्मल ब्रिदिंग करत विविध माशांना हाताने खाऊ भरवतो... कमाल !! असे इतर कुठेही भारतात होणे शक्य आहे किंवा नाही.... माहीत नाही !नील आयलंड, रॉस आयलंड देखिल न चुकता पाहावे... "काला पत्थर" बीच वर तर मॉरिशिअस ला आल्यासारखे वाटते ! निळेशार पाणी, सुंदर समुद्रकिनारे आणि जलचर संपदा ह्यामध्ये तुम्ही हरवून जाता !
बाराटांग बेट समूहाजवळ - "मड-वॉल्कॅनो आणि लाईमस्टोन केव्हज" ची बरीच बतावणी ऐकतो -हे छान आहे बघण्याजोगे आहे... पण माझे ऐकाल तर अजिबात जाऊ नका... पैसे आणि वेळ फुकट वाया जाईल, पोर्ट ब्लेअर पासून जाऊन येऊन साधारण १०-१२ तास लागतात ! एकतर "जारवा" ह्या आदिवासींच्या राखीव भागातून मिलिटरी कॉनवॉय शिवाय तुम्हाला जाता येत नाही - (म्हणजे त्यांचे टायमिंग चुकले तर बसा बारटांगलाच ! ) आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे बघण्यासारखे काहीच खास नाही !! "मड वॉल्केनो तर नुसता दिवाळीचा किल्ला आहे (तो बरा !)" आणि लाईमस्टोन केव्ह एवढी अरुंद, अंधारी आणि पाणथळ आहे की जा-जा आणि ये- ये मध्येच फुकट वेळ जातो ! त्यापेक्षा त्याचे यूट्यूब/ट्रिपऍडव्हायजर वर फोटो/व्हिडिओ पाहा !!
३ दिवस पोर्ट ब्लेअर आणि २ दिवस हॅवलॉक च्या ट्रीप चा शेवटचा दिवस संपला, आम्ही आपापल्या बॅग्स भरल्या - गाइडला त्याच्या सर्विस नुसार आमच्या ग्रुपतर्फे काही रक्कम देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.. सोबत समुद्र, निळे पाणी, जेल, आमचा ग्रुप आणि अश्या अनेक अविस्मरणीय आठवणी घेऊन !
-
आशुतोष दीक्षित.