क्रिकेट....म्हणजे आपल्यासाठी एकदम जिव्हाळ्याचा विषय 🙂
खेळलाच पाहिजे असं काही नाही, पु.ल. म्हणतात तसं, हा खरं तर बोलण्याचा विषय आहे..
तर , लहानपणापासुन ह्या खेळाबद्दल आपल्याकडे असलेले आकर्षण आणि त्यातुन व्यक्त होणारी अफ़ाट उर्जा मग ते अपिल असे किंवा सेलिब्रेशन, काही काही वेळा तर दिवाळीतल्या फ़टाक्यातले काही बॉम्ब पाकिटे खास राखुन ठेवायचो एखादि सिरिज किंवा मुख्यत: पाकिस्तान सोबतची मैच असेल तर 🙂
मैच जिंकल्यावर फ़र्ग्युसन कॉलेज रोड वर, जंगली महाराज रोड वर होणारी गर्दी ज्यांनी अनुभवली नाही असे खुप तुरळक पुणेकर दिसतील, मैच जिंकली की आईस्क्रिम/मस्तानी/डोसा पार्टी करणारेही पाहिलेत....
(कारण पुर्ण घरच मैच बघत असेल तर किचन बन्द करणेच योग्य)
जसे जसे मोठे झालो तसे तसे 'फ़ुकट' वेळ कमी पडायला लागला आणि WORK LIFE BALANCE च्या वाढलेल्या जबाबदाऱ्यांचे बाउंसर्स माराण्यात जास्त वेळ जायला लागला.... ह्या काळात मैच मधुन झाहिर, कुंबळे, द्रवीड. सेहवाग-गांगुली गेले, सचिन गेला(इथे आमची आणि इतर अनेकांची क्रिकेट साठीची इमोशन संपली) , मग नव्या स्टार्स मध्ये धोनी आला तो हि गेला आता कोहली आहे, पुढे शर्मा, बुम्रा, पन्ड्या, रहाणे ... झाले बहु होतिल बहु....असो,
मुद्दा हा कि क्रिकेट लहानपणापासुन चा सोबती होता आणि आता जेंव्हा grounds कमी झाली आहेत, मोकळी जागा (त्याला मैदानच म्हणायचे) बघायलाच मिळत नाही... त्यामुळे एक नविन बिझनेस उदयाला आला आहे तो म्हणजे TURF CRICKET...., मध्यवस्ति मध्ये एखाद्या सोसायटीची राखीव जागा किंवा, एखाद्या आउटहाउस ला लागुन असलेली जागा किंवा खास बिझनेस च्या दृष्टीने investment करुन घेतलेल्या जागेभोवती तारांचे कंपाउंड घालुन, अर्टिफ़िशिअल हिरवळीचे कार्पेट (TURF) पसरुन त्याचे क्रिकेट/फ़ुटबॉल/लहानमुलांचे ग्राऊंड ह्यासाठी भाडेतत्वावर मिळते... त्याचे भाडे तासाला १२००-१५०० रुपयांपर्यंत असु शकते - अर्थात मेंटेनन्स पहाता तेवढे पैसे लावणारच पण तरिही मनात येते की लहानपणी आपण मोकळ्या मैदानात खेळताना किती पैसे वाचवले असावे 🙂
आम्ही तर एकाच ग्राउंड मध्ये उभे आणि आडवे pitch आखुनही खेळलेलो आहोत - अगदिच जमले नाही तर दुसऱ्या टिम सोबत मैच घेण्याचा प्रयत्न करायचो पण खेळ थांबला नाही पाहिजे, टोप्या असल्या तर असल्या, पाणी असले तर असले नसले तर कोणाच्या तरी घराबाहेर कॉर्पोरेशन चा नळ असायचाच - (आजकाल तेही पहायला मिळत नाही)
मध्यांतरी फ़क्त WEEKEND ला फ़्री असल्याने आम्ही जुने दोस्त एकत्र येउन पुन्हा एकदा Contribution करत आम्ही हे ग्राउंड बुक करुन खेळत होतो १-२ तास, जेवढी लोकं जास्त तेवढे Contribution कमी 🙂 त्यामुळे आपले मित्र- मित्रांचे मित्र - मित्रांच्या मित्रांचे मित्र 🙂 जेवढे येतिल् तेवढे चांगले, त्यामुळे FRIEND-CIRCLE पण अचानकच मोठे झाले, मोबाईल मध्ये TURF_Cricket असे २-३ व्हाट्सऍप ग्रुप्स वाढले.
पण मग हे कोविड-१९ आले,
लॉकडाऊन चे वर्षभर असेच गेले, मग संचारबंदी, निर्बंध, कडक निर्बंध, शिथिल निर्बंध वगैरे वगैरे मध्ये त्या ग्रुप्स वर एकही पोस्ट पडेना, पोट आणि वजन दोन्ही सम-प्रमाणात वाढत होतेच पण आता त्यात अजुन एक भर पडली ती म्हणजे Less active time.. मग आम्ही आमचे जुने दिवस आठवले,
पार्किंग मध्ये, सोसायटी मध्ये, टेकडीवर आमचे cricket pitch......
सायकल चे मागचे चाक, एकावर एक ठेवलेल्या २-३ मोठ्ठ्या विटा किंवा प्रसंगी तेलाचे डबे/खेळण्यातले गाडे आमचा स्टंप......
टेनिस चा हलका ज्याने कोणाचीही काच फ़ुटणार नाही किंवा जरी जोरात अंगाला लागला तरि खुप दुखापत होणार नाही असा बॉल.... !
आणि कोणत्याही बाबतीत न्युनगंड न बाळगणारे आमचे पुणेरी सवंगडी अशी मस्त भट्टी जमली.
तसही हा खेळ सोशल डिस्टंसिंगचे सगळे नियम पाळुनच खेळला जातो(कोणीही २ गज कि दुरीपेक्षा जवळ येऊच शकत नाहीत), पण गल्ली क्रिकेट खेळताना काही महत्वाचे नियम पाळुन खेळावे लागते.
आमचे काही नियम खाली देत आहे 🙂 तुम्हाला काही अजुन सुचले तर पाठवा - अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करु 🙂
1) प्रत्येक ओव्हर मध्ये २ वेळाच अंगाला लागुन बॉल अडवला गेला तर चालेल तिसऱ्या वेळी असे केल्यास आउट देण्यात येईल.
2) 1 टप्पा ,एका हातात आऊट
3) काच जो फोडेल तो भरेल
4) बॉल हरवला तर मारणार्याने आणायचा
5) कोणत्याही घरात डायरेक्ट बॉल गेल्यास आऊट
6) शेवटच्या बॉल पर्यंत कधीही कोणी आऊट झाला तर ओव्हर रिफ्रेश 😊
7) स्टंप च्या पुढे फ़ुल्ल्टॉस आऊट (म्हणजे आपोआप ग्राउंडशॉट मारले जातात)
-
Ashutosh Dixit :)