Friday, June 8, 2012

तो मी नव्हेच !!

तो मी नव्हेच !!


 "काय दुष्टपणा आहे हा ? माझ्यासमोरून आत्ताच्या आत्ता ४ गाडीवाले सिग्नल तोडून गेले, मलाच बरे पकडता आणि सिग्नल पिवळा होत होत लाल होईपर्यंत मी आले पण होते पुढे.... माझी चूक की तुमच्या अंगावर गाडी घालून पुढे न जाता तुम्हाला सहकार्य करून गाडी बाजूला घेतली.. एवढ्या लोकांमधून मीच का......" ??
"...मीच का ??"...सिग्नलला बस थांबलेली असताना मला हे उद्गार ऐकू आले. एक बाई तावातावाने बोलत होत्या,


आधीच दुपारचे ऊन भाजून काढत होते, त्यात हे लुटारू उगीच लायसन्स दाखवा, पियुसी दाखवा करत संध्याकाळच्या पार्टीची सोय करताना पाहून मी बसमध्ये होतो तो खाली उतरलो, माझ्याकडे कायम एक रुलबुक आणि कंपाउंडींग फी ची प्रिंट आऊट असते, ती त्या बाईंच्या हातात शांतपणे ठेवली आणि म्हणालो, " मॅडम - ह्यानुसार तुम्हाला दंडाची योग्य रक्कम कळेल, तुमची चूक होती की नव्हती ते मी सांगत नाही पण १०० रु दंड असूनही ४००-५०० काहीही मागितले जातात... आणी मग आपण गयावया केली की त्याचे २०० होतात... म्हणजे खाया पिया कुछ नही आणि लाचारी दिखाया सौ आना ! मला फक्त ती परिस्थिती येऊ नये असे वाटते... तुम्ही काय... मी काय....कोणावरही...!" -


ह्या एका वाक्यामुळे त्या बाई एकदम शांत झाल्या, प्रिंट आऊट उघडली आणि ती पाहत त्यांनी पर्स ला हात घातला, आणि माझ्याकडे त्रासिक नजरेने पाहणाऱ्या टोळभैरवाकडे पावतीची विचारणा केली -- त्याची चरफड पाहून मला वाटले तो देखिल नक्की मनात म्हणाला असेल ".... माझ्यासोबतच का ? " !!


बाकी वेगळ्या लाख गोष्टी असोत, पण ह्या एक प्रश्न मला अत्यंत जवळचा वाटतो....हा शब्द कदाचित माझ्याबाबतीत अतिपरिचित आहे, आणि म्हणूनच मला त्याचे महत्त्व पण जास्त वाटते.... अनेकदा असे होते की आपल्यासोबतची एखादी वाईट घटना घडते --की एवढं सगळं करून सुद्धा माझ्या वाट्याला चिंचोके... किंवा दुसऱ्यासाठीची चांगली बातमी कुठेतरी मनाला बोच लावून जाते...अर्थात पॉझिटिवली.. की मी सुद्धा हे सगळे करतो... तरी मला हे का मिळत नाही ? !


ह्याला जळफळाट मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही, नक्कीच नाही ! माझे इंग्रजीतले एक आवडते वाक्य आहे -Everybody needs affection & attention -- ! हां आता सारखेच बोटे मोडणाऱ्यांच्या बाबतीत "स्वभावाला औषध नाही" हेच खरं.. पण बहुतांश लोक संधीच्या शोधार्थ असतात... जे जे चांगले त्यासी करावेसे आपुले, ह्या हिशेबाने प्रत्येकजण जीव तोडून मेहनत घेत असतो.... पण काहींना फळे लवकर मिळतात तर काहींना गीतासार वाचल्याचा अनुभव मिळतो... (कर्म करते रहो.. )


मी का नाही ? - ह्या प्रश्नाला अंत नाहीच.... पगारवाढ असो, प्रमोशन असो, लकी ड्रॉ असो, सगळीकडे हाच प्रश्न उभा राहतो -- ह्यावर माझा एक कायमचा उपाय म्हणजे 'भगवान के घर देर है अंधेर नही' ह्या उक्तीवर विश्वास ठेवणे !


प्रत्येकाची वेळ येते, इंग्रजी म्हणीप्रमाणे "Every dog has his day"... त्यामुळे प्रत्येकाला कधी ना कधी हा प्रश्न विचारावासा वाटतो, आणि कधी कधी आपल्यामुळे लोकांना हा प्रश्न पडतो. "आतले आणि बाहेरचे" कधी आपण आत तर कधी बाहेर... पण त्याशिवाय मजा नाही...


थोडक्यात काय, तर मेहनतीची जोड दिली तरी परिस्थिती आणि नशीब जेव्हा बदलायचे तेव्हाच बदलते, तोपर्यंत आम्ही राज कपूर चे गाणे गुणगुणत राहू -"या गर्दिश मे हूं आसमान का तारा हूं....".... !!



--



आशुतोष दीक्षित.



Thursday, May 3, 2012

आपण रांगेत आहात, कृपया प्रतीक्षा करा

"लिमिटेड ऑफर... लिमिटेड ऑफर... " ह्या कर्कश आरोळीमुळे माझ्यासारखेच माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या मनातले भाव मला त्यांच्या त्रासिक चेहऱ्यावर लगेच टिपता आले...! कपाळावरच्या आठ्या उलगडवताना एकच गोष्ट प्रकर्षाने लक्षात येत होती ती म्हणजे ह्या रंगीत भिंती, स्वच्छ पुसलेल्या टाइल्स, मंद एअर फ्रेशनर आणि सोबतीला एअरकंडीशनर च्या थंडगार वातावरणाचा फरक सोडल्यास आजकालच्या मॉल मध्ये आणि मंडई किंवा मार्केटयार्ड मध्ये बहुतेक सारेच साम्य आहे.

लहानपणापासून स्वस्त आणि मस्त गोष्टी हव्या असतील तर मंडई/मार्केटयार्ड किंवा मग रविवारात... हे समीकरणं पक्कं मनात बसलं होतं... हळू हळू जनरेशन बदलत गेली... आणि आम्ही मोठे होईपर्यंत आमच्या डोक्यातल्या मंडईची जागा स्पेन्सर्स/मोअर अश्या मॉल्सने घेतली, रविवाराची जागा बिग-बझार आणि डीमार्ट नामक कंपन्यांनी आधीच बळकावलेली होती, आणि ह्या सर्व उपलब्ध पर्यायांमध्ये भर पडली ते रिलायंस, वॉलमार्ट असल्या मोठ्या उद्योगांच्या उडी मुळे...!!

स्वतःहून मॉल ची पायरी कधी चढलो मला नक्की आठवत नाही की.. परंतु त्या भव्य दिव्य इमारतीत घुसण्याची हिंमत होण्यासाठी खिशात किमान १००० रुपये तरी असले पाहिजेत असं तो लवाजमा पाहिल्यावर खूपं आधीपासून वाटत होत... कॉलेजमध्ये गेल्यावर त्यातल्या त्यात उच्चभ्रू मित्र-मंडळींनी आम्हाला एकदा सोबत येण्याचे आमंत्रण दिले होते आणि आम्ही ती संधी साधली....

मित्रांसोबत फिरताना जाणवले की ह्या एका इमारतीतच सगळे काही असते, पाश्चात्त्य संस्कृतीचा चांगला भाग घ्यावा, त्यातले हे सुपरमार्केट असे मित्रांनी ज्ञानवर्धन केले.. आणि खरंच की - खालच्या मजल्यावर सगळे खाद्यपदार्थ, पहिल्या मजल्यावर कपडे, दुसऱ्या मजल्यावर गृहोपयोगी वस्तू, आणि तिसऱ्या मजल्यावर गिफ्ट आर्टिकल्स आणि बाकी बरेच काही...

गेल्या ४-५ वर्षांत 'मॉल' संस्कृतीत खूपच मोठा बदल घडून आला आहे... आधी मॉल मध्ये मदतीला लोक पुढे येऊन सहकार्य करायचे, मग हळू हळू -- "तुम्ही तुमचे पहा... आवडेल ते घ्या... जेवढे दिसते तेवढेच असते! तुम्ही सुज्ञ आहात आणि आम्ही बिझी आहोत" -- अश्या वागणुकीतून लोकं आपापली खरेदी करताना दिसू लागले, अजून काही दिवस गेले आणि पुन्हा जुने दिवस आले पण, थोड्याश्या फरकाने... आता मॉल अटेंडंट फ्री असायचे पण ते एकत्र टोळक्याने गप्पा मारत असायचे... "तुम्हाला काही अडलं तर विचारा, सांगतो... " ही मुजोरी आजकाल तर सर्वोच्च पातळीवर गेली आहे, - आजकाल हे सगळं तर चालूच आहे पण जोडीला मार्केटिंगचे प्रभावी हत्यार जोरदार उगारले जाते.

तुम्हाला अमुक पाहिजे ना? आमच्याकडून घ्या... आम्ही तमुक फ्री देतो! आमच्या मॉल ची वैशिष्ट्ये म्हणजे, आम्ही सगळी कार्डस स्वीकारतो - संपूर्ण इमारत एअरकंडिशनड - लिफ्ट - एक्सचेंज ऑफर - १० बिल काउंटर्स - वगैरे वगैरे....

आजकाल तर काही काही मॉल मध्ये लक्ष्मीरोडवर पथारीवाले बसून ओरडतात तसेच पण युनिफॉर्मवाले अटेंडंट इथे हातात माइक, गळ्यात कर्णा बांधून जोरजोरात ओरडतात... कधी रिन-सर्फ-टाईड विकतात, तर कधी बासमती तांदूळ, तेल, आटा'ची घोषणा करतात..

इथली अजून एक मजा म्हणजे ह्या ऑफर्स इतक्या आकर्षक वेष्टनात असतात की आपण एक घ्यायला जातो आणि ४ घेऊन परत येतो... अख्खी इमारत फिरणे आणि मग आपल्याला हवे ते घेणे, जे नको पण कधीतरी लागू शकेल आणि स्वस्त आहे म्हणून घेऊन ठेवणे.. आणि जे लगेच नाही पण पुढच्या आठवड्यात लागणारच आहे, मग ऑफर नसेल त्यामुळे आत्ताच घ्यावे असे सर्वसाधारण लोकांचे ताळेबंद चालतात!

आता ह्या असल्या आमिषांना आम्ही बळी पडतो खरे, नेहमीच चांगल्या ऑफर असतात असे नाही, पण कधीतरी एखादी 'डिल' चांगली मिळूनही जाते... परंतु सर्वात कंटाळवाणा भाग म्हणजे बिलींग काउंटर वर आपले बिल होईपर्यंत १० लोकांच्या मागे रांगेत उभे राहणे...!!

आपण कोणाला फोन केला आणि तो दुसऱ्या कॉल वर बिझी असेल तर - "आपण रांगेत आहात, कृपया प्रतीक्षा करा" अशी टेप यायची -तसलाच फील येतो.. म्हणजे ह्या मॉल मध्ये खरेदी करायला २ तास आणि बिलिंग साठी १. ५ तास अश्या हिशोबानेच येथे जावे :)

सार्वजनिक टॉयलेट्स, दवाखान्यातला आपला येणारा नंबर, पाण्याच्या टँकरची लाइन , ATM Transaction आणि कोणतीही बिले भरतानाच्या वेळी कायम मनात येणारा प्रश्न "आपल्या पुढचा माणूस एवढा काय वेळ खातोय? " ह्या वेळी देखील अंतर्मनातून बाहेर डोकावतोच...!!

तुम्ही कितीही प्रेमाने वागलात, आणि हसून पुढे आलात तरीही बिलिंग काउंटरवरचा माणूस मख्ख चेहऱ्याने तुमच्याकडे पाहत राहतो... बिलं चे पैसे सांगून, - " २, ५ रु. सुट्टे असतील तर बघा, कॅरीबॅग पायजे का? -२ रु एक्ष्ट्रा पडतील" हि स्टॅंडर्ड पाठ केलेली ओळ म्हणतो... आणि उरलेल्या सुट्ट्या पैशांच्या ऐवजी एक्लेअर्स, मेलोडी अशी चॉकलेट्स आपल्या हातावर ठेवते.... कहर म्हणजे आपण ती चॉकलेट्स स्वीकारली आहेत का नाही ह्याची दखलही न घेता तो तुम्हाला दुर्लक्षित समाजाच्या यादीत टाकून पुन्हा त्याच वैतागाने समोरच्या भाऊगर्दीला हाळी देतो... "सामान वर काढून ठेवा... मेंबरशिप कार्ड असलं तर आधी सांगा... इ. इ.

हे असे सगळे अनुभव घेऊन रांगत रांगत का होईना आणि अखेरीस त्या 'रांगेतून आपण बाहेर पडतो'..... हातातले वजन वाढवून आणि पाकिटाचे कमी करून!!

शाळा संपली, कॉलेज संपलं, नोकरी चालू झाली... पण रांग काही सुटत नाही !! -- इथे वपुंच्या 'एकबोटेंची पोरं/बदली' गोष्टीतल्या वाक्याचा प्रत्यय आला... " गाव बदललं तरी नशीब बदलतं नाही "!! आणि ह्याबरोबरच बिलाचा आकडा, बदलती परिस्थिती, आणि एकंदरीत सगळीकडचे बदलते वातावरण पाहून चंद्रशेखर गोखल्यांची चारोळी एकदम अंतर्मुख करते -->

घर शोधताना गाव हरवावं
तसं झालंय माझं
मी अधांतरी, आणि माझ्यावर
  या अंतराळाचं ओझं....



--
आशुतोष दीक्षित.