Friday, July 4, 2014

" इज्जत की रोटी " (सकाळ -४ जुलै २०१४ - मुक्तपीठ मध्ये प्रकाशित !)


४. २० ला येणारी गाडी लेट होत होत शेवटी ४. ५ तास लेट ची घोषणा झाली आणि ७. ३० ला थंडगार बिसलरीबाटलीतील शेवटचे काही घोट डोक्यावर ओतून मी पुन्हा वेटिंग रूम मध्ये पाय पसरून बसलो !!

मान्सून पूर्व एक सुट्टी गोव्याला घालवण्याच्या मनसुब्याने आम्ही पुणे-गोवा एक्स्र्पेस्चे तिकिट बुक केले. केवळ ६५० रुपयांत झालेल्या ह्या गोवा प्रवासाने पुन्हा एकदा "महंगा रोए एक बार... " ची अनुभूती दिली !


पुणेरी शिस्तीप्रमाणे आम्ही ४. २० च्या गाडीसाठी स्टेशनवर ४ ला'च हजर होते, परंतु ४. १६ ला पहिली वेळ पडली ती ५. २० ची! (कोर्टात तारीख पडते तशी) ऍडव्हान्स बुकिंग केले असल्यामुळे मन दुसरे पर्याय शोधायला राजी नव्हते, एकाच तासाचा प्रश्न आहे असो, काढू थोडा वेळ म्हणून मंडळींसह आम्ही आमचा मोर्चा वेटिंग रूम कडे वळवला. अत्यंत बेशिस्त पद्धतीने सगळा बाकडा अडवून झोपलेले लोक, ५ पैकी फक्त २ चार्जिंग पॉइंट्स चालू आणि कोपऱ्यातला एकच वर्किंग फॅन पाहून डोके अजूनच गरम झाले होते. बॅग खाली ठेवून पुन्हा एक कोल्ड्रिंक घेण्यासाठी बाहेर गेलो.

तिथे वाचायला पेपर पण घेतला आणि पाकीट परत ठेवणार तेवढ्यात मांडीला हाताने पकडून एक लहान मुलगा भीक मागायला लागला. "चल भाग बे! " पेपर वाला वसकन त्यावर ओरडला. परत येताना अजून दोन मुले कटोऱ्यामध्ये लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो ठेवून त्यातले कुंकू लोकांना लावून पैसे घेत होते... मनात विचार आला ज्याने लक्ष्मीलाच कटोऱ्यात ठेवले आहे त्यावर लक्ष्मी कशी प्रसन्न होईल बरं?

दुपारी ४. २० ला येणारी गाडी हरएक तासाला नवीन आगमन वेळ दाखवत दाखवत साधारण ८ः०५ ला रुळावर आली!
गाडी फुल्ल होतीच, आम्ही सामान/बॅग लावून घेतल्या, तहानलाडू भूक लाडू जवळ काढून घेतले आणि गाडी हालण्याची वाट पाहत होतो... तेवढ्यात समोरच्या डब्यातून एक माणूस गुडघ्यावर रांगत येताना पाहिला, त्याचा वेष, दाढी आणि केस पाहून साधारण साठीच्या वयाच्या आसपास आलेला असावा. प्रत्येक सिटखाली वाकून तो हातातल्या तुटक्या केरसुणीने कचरा भरून घेत होता.. मग जमा केलेला कचरा एक शर्टाच्या कपड्याने पुढे ढकलत डब्याच्या दरवाज्यातून बाहेर टाकायचा.


आमच्या सिट जवळ २ लोक बसले होते ते कचरा काढू देण्यासही उत्सुक दिसले नाहीत.. स्वतःच्या गप्पा मारण्यात रंगले होते की कोणीतरी आपल्या सिट खाली जातोय आणि त्याला आपले पाय लागत आहेत हे ही त्या बेशिस्त लोकांना समजत नव्हते.. पण तो माणूस मुकाटपणे सगळा कचरा गोळा करून पुढील सिट कडे जाण्यासाठी निघाला. एकदा आपल्या डोक्यावरील घाम हाताने पुसत त्याने दोन्ही बाजूच्या लोकांपुढे हात पसरले...!


मगाशी खाली पाय टेकवेनासा झालेला रेल्वेचा कंपार्टमेंट ह्या माणसाने अगदी स्वच्छ केला होता, मी लगेच १० रु ची नोट काढून त्याच्या हातात ठेवली आणि म्हणालो - " बाबा, तुम्ही खूप चांगले काम करत आहात, मेहनत से मिला एक रुपया भी आपकी इज्जत की कमाई है ! थँक्यू !! " भाषा समजली असेल की नाही ते कळले नाही पण माझ्या वाक्याने आणि आविर्भावामुळे त्याच्या चेहऱ्यावर त्या परिस्थितीत देखीआनंदाची छटा जाणवली.

थोडा पुढे जाताच बायको म्हणाली त्याला आपला बिस्किटांचा पुडा देऊया का ? - मी म्हणालो लगेच दे!
तोपर्यंत त्याने सगळ्या बोगीतील कचरा उचलून दरवाज्यातून बाहेर टाकला होता, बायकोने २ सिट ओलांडून त्याला बिस्किट दिले आणि हाताने खूण करत म्हणाली थोडं खाउन घ्या बाबा! कृतज्ञता दाखवत त्याने ते बिस्किट कपाळाला लावून नमस्कार केला आणि बाकीच्या बोगी साफ करण्यासाठी तो पुढे निघाला...!

मी आणि बायको पुढचा तासभर विचार करत होतो... की फुकट भिका मागणारे लोकं (विकलांग सोडून) आणि मेहनत करून कमाई करणारे लोक हा फरक बहुदा देवानेच बुद्धी देताना निर्माकेला असावा .. नाहीतर हात-पाय धड असताना लोकांना भिका मागायचा ईझी मनी आवडणे काही पटत नाही! मुन्नाभाई म्हणतो तसा ह्यांच्या डोक्यात पण आयतेपणाचा केमिकल लोचा असावा. असो ते देवाचे देवाला ठाऊक!

पण ह्या दिवसानंतर माझा जगण्याकडे बघायचा दृष्टिकोन एकदम बदलून गेला... दत्तात्रेयांनी २४ गुरू केले होते... मला माझा पहिला गुरू इथे मिळाला !ह्या सफाईकरणाऱ्या माणसाकडे पाहून एक कळलं की,
थोडी जिद्द आणि कष्टाची तयारी असेल जगात कोणीही कधीही उपाशी मरणार नाही. भले घास असो पण जे आहे ते मेहनत करून.

ह्यालाच म्हणतात इज्जत की रोटी !!

Wednesday, August 21, 2013

आमची Chennai Expressची सवारी !!

 ३०० करोडची जागतिक कमाई, बहुतांश सगळे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स ब्रेक..... ह्या बातम्या येत होत्याच, परंतु शाहरुख एवढ्या दिवसानी पुन्हा ऍक्शन मध्ये आणि रोहित शेट्टीचे दिग्दर्शन यामुळे चेन्नई एक्स्प्रेस पहायचा होताच, अनेकांनी सुचना केल्या रिव्युज सांगितले, अर्थात ते सगळे मिक्स होते, काही लोक म्हणत होते अगदी बकवास काही एकदा पाहण्याजोगा आणि काही मस्त !

काही म्हणा, पण २० तारखेला राखीपौर्णिमेनिमित्य २ तिकिटांवर १ तिकिट फ्री देण्याचा प्रमोशन फंडा आपल्याला फार आवडला... चला आजवर कोणत्यातरी सिनेमावाल्याने असे केले होते का सांगा बरं ? पब्लिक ला तर बरच आहे ना... ३ऱ्या  आठवड्यातला एखादा दिवस टाका ना असा पब्लिक च्या नावने करुन, सिनेमा पण चालेल आणि लोकं पण खुश !

तर मी ई-स्क्वेअर मध्ये हा सिनेमा पहायला गेलो, आज मातोश्रींसोबत जवळ जवळ १५-१६ वर्षांनी सिनेमा पाहण्याचा योग आला..इतर वेळी आई-बाबा वेगळे आणि आम्ही आमचे मित्रमंडळी असेच सिनेमे पाहत आलोय :)  !! तर सिनेमागृहात गेलो परंतु ई-स्व्केअर ने भलतीच निराशा केली हो, २ वेळा लाईट गेले, आणि सिनेमा रिळ ट्रिप झाले, आमचे २५ मिनिटे वाया....त्या मॅनेजर आणि त्याच्या सिनिअर मॅनेजरने माझी आणि बाकी लोक जमल्यावर आमची बरिच बोलणी खाल्ली !

सिनेमाची सुरुवातच हातात फावडे घेतलेल्या राहुल च्या एंट्रीने होते, आणि मग थेट सिनेमाच्या शेवटी तो सीन येतो.. मध्ये सगळा फ्लॅशबॅक आहे :) :)  दादाजींच्या मृत्युनंतर गोव्याला गंमत करायला जाणारा राहुलला आजी अस्थी विसर्जनासाठीची गळ घालते, आजीला फसवण्यासाठी ट्रेन मध्ये बसून पुढिल स्टेशनवर उतरून गोवा गाठायचा प्लॅन, पण उतरताना दिपिकाला दिलेला हात, ट्रेन उतरण्यापुर्वीच सुटणे त्यातून चेन्नईजवळच्या गावत पोचणे, तिथे दिपिकाच्या होणाऱ्या नवऱ्याशी फाईट ठरणे, मग तिथून पळून जाणे आणि इतर गमती जमती, मध्यंतरीच्या लपालपित दिपिकावर प्रेम उत्पन्न होणे आणि मग शेवटी दिपिकाच्या घरी जाउन तिच्या वडिलांसमोर त्या लग्न ठरवलेल्या माणसाशी मारामारी करून दिपिकाचे स्वयंवर  जिंकणे- हा सिनेमाचा गाभा.

मला तर DDLJ Returns पाहिल्यासारखा वाटला, अमरिशपुरीची जागा साउथ च्या डॉन ने घेतली होती, कुलजीत च्या ऐवजी ३ कुलजीत मिळून एक होतील असा रांगडा मनुष्य आहे आणि इथे शाहरुख चा गुरुर ललकारायला अनुपन खेर नसून त्याचे दिपिकावरील प्रेम आहे एवढाच काय तो बेसिक फरक...चित्रपट एकदा फुकट किंवा सिडीवर बघण्याच्या लायकिचा आहे, पण उणीवा खुप आहेत...आधी चांगल्या गोष्टी सांगतो मग उणीवा...

जमेची बाजू:
१) रोहीत शेट्टी स्टाईल गाड्यांच्या आणि आगीच्या करामती ठिक आहेत... उदा. गॅसस्टोव फेकल्यावर तो शाहरुखने चुकवणे पण मागिल टेबलावर तो पडून बॅकग्राउंडला प्रचंड आगिचे लोळ दाखवणे वगैरे. .. पण गाडिच्या चाकावर कोयता मारून गाडी पलटवणारा सीन म्हणजे XMen-Origins Wolverine ची कॉपी करण्याचा निष्फळ प्रयत्न वाटतो.
२) गाणी चांगली आहेत, निदान गुणगुणता येण्यासारखी तरी आहेत.
३) शाहरुखला काही काही वाक्यांत विनोदनिर्मीतीची चांगली संधी मिळाली आहे.
४) सिन सिनरी मस्त पिक्चराईझ केली आहे. कॅमेरा अँगल्स चा वापर प्रभावीपणे केलेला आहे.

आता उणीवा आणि चुका -->
१) साउथवरून पळून आलेली दिपिका गुंड मागे लागलेत म्हणून 'चेन्नई एक्स्प्रेस्' मागे कशी पळेल बरं >>?
२) त्या कोणत्याश्या गावात फक्त दिपिका, तिचा होणारा नवरा आणि एक शीख पोलिस इंस्पेक्टर ह्यांनाच हिंदी कळत असते... ??  हे पचवणे केवळ अशक्य आहे  !!
३) दिपिकाचा होणारा नवरा एवढा आडदांड घेतला आहे की शाहरुखने जादुटोणा केला तरी तो त्याला मारू शकणार नाही हे पाहताक्षाणी एखादे पोरं देखील ओळखेल... त्यामुळे ही कास्टिंग टोटल फेल !!


 ह्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन चालू होते, रेडिओ मिरची वर तर डायरेक्ट शाहरुख खानच्या घरी नेण्याची स्पर्धा आयोजित केली होती, त्यासाठी चेन्नई स्टाइल मध्ये सजून जाणे आवश्यक होते, आम्ही प्रयत्न केला पण बहुदा कमी पडला....असो पण ते २-३ तास रेडिओ मिर्ची च्या ऑफिसमध्ये धमाल केली, स्टुडिओ पाहिला -वाढिव एक्स्पेक्टेशन्स मध्ये ओव्हरऑल दिवस चांगला गेला...
 आज नाही तर पुन्हा कधितरी... उम्मीद पे तो दुनिया कायम है  !!


--
आशुतोष दीक्षित.