Saturday, January 10, 2015

निळे पाणी, सेल्युलर जेल आणि अनेक अविस्मरणीय आठवणी !!


स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळावर गो-एअर च्या विमानातून उतरल्या उतरल्या पाय टेकायच्या आत मी त्या भूमीला नमस्कार केला. आजकाल सगळे 'मोदी'फाईड झाले आहेत... आणि चांगल्या गोष्टी कॉपी करायला आपण तर घाबरत नाही बुवा !!तिकडचे फ्लाईट-अटेंडंट/सिक्युरिटी गार्डस "हे काय भलतेच" असे माझ्याकडे पाहत होते....त्या बिचाऱ्यांना काय माहीत अंदमान बद्दल बाहेर जगात काय काय आठवणी आहेत.....पिकतं तिथे विकत नाही हा नियम सगळीकडेच लागू होतो.. अगदी त्यागासाठी सुद्धा !


अंदमान ला पोचलो तेव्हा थोडासा पाऊस पडून गेला होता, गाईड कडून समजले की इथे दिवसभरात तीनही ऋतू पाहायला मिळू शकतात एवढे चंचल हवामान आहे, आणि त्सुनामी नंतर तर हवामानाचा लहरीपणा जास्तच वाढलेला आहे. हॉटेल मध्ये फ्रेश होऊन जेवण करून आमचा ताफा अंदमानचे राजनैतिक माहात्म्य आणि आता सध्या राष्ट्रीय स्मारक असलेल्या "सेल्युलर जेल" कडे निघाला.

मराठी भाषा प्रचंड समृद्ध आहे, पण कधी कधी इंग्रजी शब्दच कदाचित आपल्या भावनांचे चपखल वर्णन करू शकतात! आणि आजकाल वापरात असलेल्या "बिझनेस लँग्वेज" मध्येच सांगायचं झालं तर तोंडातून एकच शब्द बाहेर पडला - "मार्वलस" !!

६९३ खोल्यांच्या भव्य जेल आणि त्याचा सर्वेसर्वा डेव्हिड बॅरी ह्याने स्वतःच्या राज्यकर्त्यांचे आदेश पाळण्यासाठी आणि इंगजी सत्ता वाचवण्यासाठी येथे क्रांतिकारकांवर अतोनात जुलूम केले, शासन-द्रोहाला जरब बसवणे म्हणजे काय ते इथे आल्यावर कळते !

एखाद्या ७ पाकळ्यांच्या सूर्यफुलाप्रमाणे ह्या जेल ची रचना एवढी जबरदस्त होती की कोणाही कैद्याला एकदा कोठडीत गेले की दुसरा कैदी ना दिसायचा न बोलता यायचे, कोठडीचा कडी कोयंडा २ फूट लांबवर अडकवलेला असायचा जेणेकरून समजा कैद्यांना किल्ल्या जरी मिळाल्या तरी दार उघडता येणे अशक्य व्हावे ! सावरकर आणि त्यांचे भाऊ इथे २ वर्ष एकत्र असून त्यांना एकमेकांबद्दल काहीही माहिती नव्हती ! जेलर डेव्हिड बॅरी म्हणायचा तुम्ही इथे पिकनिकला नाही आला आहात.. कैदी आहात, तोंड बंद करून शिक्षा भोगा नाहीतर अजून जबरी शिक्षांना तयार व्हा !! ह्या कैद्यांना रोजचे ४० पौंड तेल काढावे लागत असे, शालेय जीवनात कितीही वेळा वाक्प्रचार केला असला तरी खरोखरीच "घाण्याला जुंपणे" म्हणजे काय असते ते तिथे गेल्याशिवाय कळणार नाही... !

लोकं जेल मध्ये उभे राहून फोटो काढून घेतात... तेलाच्या घाण्याजवळ वेगवेगळ्या पोझ देऊन उभे राहतात...फाशीघराजवळ स्वतःच्या गळ्यात स्कार्फ अडकवून फोटो काढतात... डिजीटल फोटोग्राफीने थोडेसे तारतम्य कमीच झाले आहे... पण तरी हे सगळे बघताना देखील मला विचित्र वाटले!! ... !

सेल्युलर जेल चा नजारा दिमाखदार होता... ब्रिटिश शासनाची शानोशौकत आणि धाक ह्या दोन्हीचे प्रतीक उंचावणारा ! साउंड & लाइट्स शो चुकवू नका... जेल जागा ठेवण्याचा प्रयत्न अप्रतिम केला आहे त्या शो मध्ये !

सगळा जेल फिरल्यावर का कोणास ठाऊक मला थोडेसे वाईट वाटले पण जास्त राग आला नाही... उलट थोडीशी कीवच आली. आपल्यावर लादलेल्या शासनपद्धतीतल्या काही गोष्टी ह्या खरंच इंग्रजांनी टाळल्या असत्या तर ते लोक अजूनही अनेक वर्षे राज्य करू शकले असते... आणि आपण त्यामधल्या काही गोष्टी आत्ता अमलात आणल्या तर पुढची अनेक वर्षे आपण देखिल हे सुखैव स्वातंत्र्य अनुभवू शकू असे वाटले !! देशासाठी लढणाऱ्यांना ४० पौंड तेल काढावे लागायचे आणि बलात्कारी, आतंकवादी, नक्षली लोकांना मात्र आपल्याकडे वर्षोनुवर्षे सरकारी इतमाम मिळतात. ४० च्या जागी ४ पौंड तेल काढायला लावले ना तरी crime rate ८०% कमी होईल. आपल्याकडे लोक गुन्हे करतात कारण कोणाला कशाची भीतीच उरलेली नाही !! जर लोक स्वयंशिस्तीने नीट राहू शकत नसतील तर भीतीने नीट राहण्यास भाग पाडणारे शासन हवे !

कहर म्हणजे सावरकरांच्या कोठीमध्ये बेशरम पद्धतीने पाटी लावण्यात आली आहे की "जगतील एकमेव ऐतिहासिक सत्य - सावरकरांनी त्यांच्या बेड्या/साखळ्या/काटे वापरून तिथे जेल च्या भिंतीवर "कमला" हे काव्य लिहिले"
-- पण त्या कोठीमध्ये संपूर्ण व्हाईटवॉश दिलेला आहे... ती कोठी "जशी आहे तशी" जपण्याची जबाबदारी कोणाची होती ?? आणि समजा हा इतका नाकर्तेपणा स्वातंत्र्यापूर्वीच झाले होते तर मग तसे कोठेही लिहिलेले का नाही ? आज इतर देशांत त्यांचे सांस्कृतिक धरोहर आहेत तसे जपले जात असताना आपल्याकडेच ही उदासीनता का ?

असो, रागाच्या भरात येणारे सगळे विचार कागदावर उतरवता येत नाहीत, पण हा अनुभव पुन्हा डोकं सुन्न करतो - तो ह्याची देही ह्याची डोळा तेथे जाऊनच घेतला पाहिजे ! जेल नंतर त्या दिवशी काहीच पाहू नये असे वाटले !

परंतु ट्रीप मध्ये ठरल्याप्रमाणे "स्नेक आयलंड" जवळच्या बीच वर गेलो. शांत समुद्र रात्र झाली की अचानक उफाळू लागतो आणि चमकणाऱ्या विजा आपल्याला आपण एका चहुबाजूने पाण्याने वेढलेल्या असाहाय्य बेटावर आहोत ह्याची पदोपदी जाणीव करून देत राहतात !

द्विपसमुहातील हॅवलॉक - हे एक प्रसिद्ध बेट आहे, येथेच एलिफंट बीच वर सगळ्या प्रकारचे Water sports आहेत ! अंडर-सी-वॉक चुकवू नका... विलोभनीय अनुभव आहे जेव्हा आपण ३० फूट खोल समुद्रात नॉर्मल ब्रिदिंग करत विविध माशांना हाताने खाऊ भरवतो... कमाल !! असे इतर कुठेही भारतात होणे शक्य आहे किंवा नाही.... माहीत नाही !नील आयलंड, रॉस आयलंड देखिल न चुकता पाहावे... "काला पत्थर" बीच वर तर मॉरिशिअस ला आल्यासारखे वाटते ! निळेशार पाणी, सुंदर समुद्रकिनारे आणि जलचर संपदा ह्यामध्ये तुम्ही हरवून जाता !


बाराटांग बेट समूहाजवळ - "मड-वॉल्कॅनो आणि लाईमस्टोन केव्हज" ची बरीच बतावणी ऐकतो -हे छान आहे बघण्याजोगे आहे... पण माझे ऐकाल तर अजिबात जाऊ नका... पैसे आणि वेळ फुकट वाया जाईल, पोर्ट ब्लेअर पासून जाऊन येऊन साधारण १०-१२ तास लागतात ! एकतर "जारवा" ह्या आदिवासींच्या राखीव भागातून मिलिटरी कॉनवॉय शिवाय तुम्हाला जाता येत नाही - (म्हणजे त्यांचे टायमिंग चुकले तर बसा बारटांगलाच ! ) आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे बघण्यासारखे काहीच खास नाही !! "मड वॉल्केनो तर नुसता दिवाळीचा किल्ला आहे (तो बरा !)" आणि लाईमस्टोन केव्ह एवढी अरुंद, अंधारी आणि पाणथळ आहे की जा-जा आणि ये- ये मध्येच फुकट वेळ जातो ! त्यापेक्षा त्याचे यूट्यूब/ट्रिपऍडव्हायजर वर फोटो/व्हिडिओ पाहा !!

३ दिवस पोर्ट ब्लेअर आणि २ दिवस हॅवलॉक च्या ट्रीप चा शेवटचा दिवस संपला, आम्ही आपापल्या बॅग्स भरल्या - गाइडला त्याच्या सर्विस नुसार आमच्या ग्रुपतर्फे काही रक्कम देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो..  सोबत समुद्र, निळे पाणी, जेल, आमचा ग्रुप आणि अश्या अनेक अविस्मरणीय आठवणी घेऊन !

-
आशुतोष दीक्षित.

Tuesday, August 5, 2014

आम्ही आणि पोश्टर बॉइज.. !!

अनेक दिवसांनी ओव्हरऍक्टिंग नसलेला मराठी विनोदी चित्रपट पाहायला मिळालाय.....
एकदम रिलॅक्स, रेफ्रेश, आणि थोडासा  अंतर्मुख करणारा सिनेमा...म्हणजेच  पोश्टर बॉइज... !!


 पोश्टर बॉइज च्या प्रमोशन साठी जोरदार कँपेनिंग करणारी टीम रेडिओ सिटीच्या ऑफिस मध्ये येणार हे कळल्यावर त्यांना भेटण्याचे प्रयत्न चालू झाले...  SMS, कॉल्स, फेसबुकवरील प्रश्नोत्तरे... सगळे प्रकार केले, आणि अर्थातच त्या प्रयत्नांचे आणि आमच्या नशिबाचे फळ म्हणून आम्ही त्यांच्याशी आर जे शोनालीच्या स्टार कट्टा वर गप्पा मारायला पोहोचलो सुद्धा... !!





एकदम  DOWN TO EARTH टीम ला पाहून असे वाटले की अरे, हे तर आपल्यातलचे आहेत.

हरिहरन सोबत
 "ओ हो.. काय झालं ! " किंवा ...इथून धक्का तिथून धक्का" वर ठेका देणारे लेसली, किंवा श्रेयस/अनिकेत/पुजा  ह्यांच्यापैकी कोणीही  आपले बाउंसर्स घेऊन वर आले नव्हते... ते सगळे खाली गाडीजवळ उभे होते..... 
आलेल्या सगळ्या टीमने "स्टार"पणाचे कोणतेही दडपण येऊ न देता दिलखुलास आणिमोकळेपणाने गप्पा मारल्या, कथा कशी सुचली - सेट वर काय काय मजा झाल्या,
कोणा कोणाची मदत झाली हे सांगितल्यावर सगळ्यांचा एकच हशा पिकला....

मग सगळ्यांचे त्यांच्यासोबत फोटो काढायचा कार्यक्रम आणि मग  एका डान्स ग्रुप ने केलेला "पोष्टर बॉईज" च्या गाण्यावरील नाच पाहून आम्ही घरी परतलो !



ट्रेलर्स, टीम ला भेटल्यामुळे सिनेमाची उत्सुकता होतीच..... शनिवारी रात्री हाऊसफुल असल्याने हिरमोड होऊन परतलो, पण रविवार ची तिकिटे तेव्हाच काढली .... कारण पुन्हा त्याच तिकिटावर तिच निराशा नको  

एकाच गावातल्या ३ लोकांचे जत्रेत काढलेले फोटो  शासनाच्या नसबंदीच्या पोष्टरवर कसे येतात, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय वादळं येतं आणि त्यातून ते मार्ग कसा काढतात - This is the crux of the story ! विषय साधाच आहे... परंतु बऱ्यापैकी व्यापक ठरू शकणारा आहे.

पण ज्या पद्धतीने तो  दिग्दर्शित केला आहे, पटकथा आणि संवाद लिहिले गेले आहेत, अचूक वेध घेणारी गाणी आणि ठेका लक्षात राहतो... तिघांचेही "टायमिंग" अगदी म्हणजे अगदी पर्फेक्ट जमलेले आहे.... २-३ विनोदांच्यावेळी तर अक्षरशः पुन्हा एकदा अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे- सचिन'च समोर आहेत असे वाटले इतके टायमिंग जुळलेले आहे !!!

साधेच प्रसंग दाखवताना देखील खूप छान बांधणी केलेली आहे, उ. दा - तातडीने जावयाला भेटायला जाणारे देशमुख - दिलीप प्रभावळकर गाडीने कट मारल्यावर मास्तरांना खिडकीतून कारण देखील सांगतात की जरा गडबडीत आहे बरं का मास्तर ! त्यांची ऍक्टींग ही नेहमीच अफलातून असते, "आबा" मदत करा म्हणत अर्जुन त्यांच्याकडे येतो आणि ते मदत करतात तेंव्हा नेहमीच मला मदत करणारे माझे आजोबा पण आठवले !  

 ह्रुशिकेश जोशी ने कमाल केलेली आहे -- मास्तर च्या रोल ला त्याने मस्त न्याय दिला आहे. काच फोडणाऱ्या अर्जुन च्या मित्राला -देवाने तुला दोन्ही मेंदू काय छोटेच दिले आहेत का रे विचारताना.... एकदम माझ्या ज्युनिअर कॉलेजमधल्या मास्तरांची आठवण आली...ते मराठी शिकवायचे आणि रोज कॉलेजला  २-२ बस बदलून साधारणं ५०एक किलोमीटर वरून यायचे... 
मास्तरांच्या बायको - नेहा जोशीने द्विअर्थी वाक्यांचाभडिमार करत कथेचा वेग कायम ठेवला आहे...
कुठेही अति वल्गर न होणारी काही काही डबलमिनींग ऐकताना तर हसून हसून पुरेवाट होते...इतकी की एक हशा संपेस्तोवर दुसरा डायलॉगही निघून जातो..

अनिकेत विश्वासराव म्हणजेच अर्जुन हा सिनेमाचा हीरो आहे, आणि तो वागतोही तसाच... उ. दा. - मुलीला छेडणाऱ्याला बेदम मारणारा, मुक्या फोटोग्राफेर सोबत डंबशेराज करत माहिती काढून  घेताना मेमरी कार्ड हा शब्द ओळखतो आणि सगळे टाळ्या वाजवून हसत असतानाच एक कानाखाली ठेवून :"चल पुढे सांग" म्हणणारा किंवा वैतागलेला असताना वाचेचा कंट्रोल सुटून रागाच्या भरात काहीही बरळत "नागड्याने" उपोषणाची घोषणा आणि तेंव्हाचा संपूर्ण सीक्वेन्स पाहायलाच पाहिजे !!!

IN ALL, फॅंटॅस्टिक कॉमेडी !! 

तसे बरेच "सामाजिक विषय आणि तात्पर्य" मांडले गेलेले आहे.. पण "आपल्या जवळचे लोकांची साथ असेल तर माणूस कितीही मोठ्या संकटातून सहज मार्ग काढू शकतो" हाच संदेश पटकन उचलला जातो !  तसेच सिनेमा फ़ुकट फोटोसेशन करण्याच्या सुविधा असलेले कार्निव्हल्स वगैरे पासुन सावधान करतो !! गाणी तर घरी जाईस्तोवर गुणगुणत राहाल अशी बनली आहेत... !

तिन्ही पोष्टर बॉइज, श्रेयस तळपदे, रेडिओ सिटी,आर. जे. शो शो शोनाली आणि संपूर्ण टीम ला मनापासून धन्यवाद !!