Thursday, June 6, 2013

रेडिओ सिटी ब्लु-कार्पेट-प्रीमियर - झपाटलेला-२ in 3D !!

रेडिओ सिटी ९१.१ च्या एका स्पर्धेत जिंकल्यावर त्यांच्या ऑफिसमधून फोन आला, 'तुमचे 'झपाटलेला-२ 3D चे ब्लु-कार्पेट-प्रीमियर पासेस ठेवलेले आहेत, ते ऑफिसमधून घेऊन जा' !

फोन ठेवल्यावर माझ्या तोंडून पहिले शब्द बाहेर पडले ते म्हणजे - 'आँम फट्ट स्वाःहहा... " !

तात्या विंचू, कुबड्या खवीस, हवालदार १००, टकलू हैवान, कवट्या महाकाळ, हि सगळी कॅरॅक्टर्स आपल्याला परिचित करून देणारे इंस्पेक्टर महेश जाधव! सगळा कंपू मस्त जमून आला असणार, 'झपाटलेला' माझ्या लहानपणी आलेला चित्रपट आम्ही मित्रांनी अनेकदा पुन्हा पुन्हा पाहिला, त्याचा हिंदी डब 'खिलॉना बना खलनायक'ची देखील पारायणे झाली  पण प्रत्येक वेळी 'महेश कोठारेंचा चित्रपट' म्हटल्यावर मला नेहमीच थोडा 'ज्यादा' INTEREST असतो.

रेडिओ सिटीला अनेक धन्यवाद देऊन पासेस घेऊन आलो, संधाकाळचा शो होता, १ तास आधीच थेटरवर पोचलो - अक्षरशः तिकिट खिडकीपासूनच 'ब्लु कार्पेट' घातलेले होते, फुग्यांची आरास केलेली होती, ठिकठिकाणी वेलकम/रेडिओ सिटी/झपाटलेला२ चे बॅनर्स लावलेले होते.

 'सिनेमाच्या प्रीमियर' बद्दल बोलताना वपु काळे असं म्हणतात, की "वातावरण किती छान असतं सांगू, सगळीकडे फुगे सोडलेले असतात, माळा लावलेल्या असतात, कुंद-फुंद वातावरण झालेलं असतं - इतकं की समजा आपण कधी तिथे गेलो - पाहुणे म्हणून... तर आपण आपला 'बेसिक पे' विसरायचा असतो किंवा 'दोन खोल्यांचा संसार' ! पण हा प्रीमियर पाहताना ह्या दोन्हीपैकी एकही गोष्ट विसरायला न लावण्याबद्दल आम्ही रेडिओ सिटी ९१.१ FM चे आभारी आहोत  . आजकाल मोबाईल मुळे घरात, ऑफिस-कॅब मध्ये, सगळीकडे  बहुदा हेडफोन्सवर रेडिओ सिटी ऐकत असतोच, त्यात RJ'च्या  धमाल गप्पा गाणी आणि काँटेस्ट म्हटल्यावर तर अजून MOTIVATION मिळते !!

सिमेनागृहात गेल्या गेल्या एरवी येतो तसा रूम फ्रेशनर चा वास येण्याऐवजी गुलाबपाणी आणि अत्तराचा सुगंध आल्यावरच मला 'मराठी चित्रपटाच्या प्रीमियरचा' FEEL आला आणि ह्या सांस्कृतिक फरकामुळे विलक्षण आनंद झाला ! प्रीमियर म्हटलं की स्टारकास्ट आली, पाहुणे आले, धमाल धिंगाणा असतो सगळा.... संपूर्ण टीम प्रेक्षकांशी दिलखुलास बोलते
RJ लोक अत्यंत हुशारीने त्यांना बोलते देखिल करतात.  RJ शोनाली ने रेडिओ सिटीकडून पुढाकार घेऊन पात्रांचा परिचय करून दिला, त्यासोबतच 'MOST AWAITED FILM' चे ऍवॉर्ड मिळाल्याचे ANNOUNCE केल्याने सगळ्यांनी स्टेज वरच्या सगळ्या टीम चे टाळ्या-शिट्या वाजवून अभिनंदन केले. चित्रपट संपल्यावर देखिल STARs,RJ's ला भेटण्यासाठी झुंबड होती. सगळे लोक अतिशय आनंदाने फोटो,सह्या आणि प्रेक्षकांच्या अभिवादनाला मान देत होते.





सिनेमा एकदा पाहायला उत्तम आहे,

सुरुवातीलाच लक्षाला दिलेली श्रद्धांजली पाहून चटकन झपाटलेला-१ ची आठवण होते,
त्याचे 'महेश.. महेश.. ' ओरडणे आजही तेवढेच भारी वाटते !

बहुदा सगळी तीच पात्रे  परंतु नव्या ढंगाने दाखवून चित्रपटाची गोडी वाढवली आहे,  कुबड्या खवीस - बदलला आहे, हवालदार १०० ने रखवालदाराची भूमिका मस्त रंगवली आहे ...   बाबा चमत्कार,विजय चव्हाण अर्थात तुक्या हवालदार (आता इंस्पेक्टर झालाय),  ३D इफेक्टमुळे उडणारी वटवाघुळे, रक्ताचे थेंब, फुलपाखरे, बर्फाचा गोळा, ह्यांचे ऍनिमेशन मस्त जमले आहे ! आदिनाथ कोठारे लक्षाच्या मुलाचा रोल करत असल्याने Comparison तर होतेच परंतु त्याने त्याचा प्रयत्न चांगला केला आहे, बाकी  झपाटलेला १ च्या तुलनेत आवडी आणि गौरी च्या ऐवजी घेतलेल्या सोनाली कुलकर्णी  आणि सई ताम्हणकरला जास्त SCOPE नाही, प्रेमप्रकरणे नीटशी रंगवली गेली   नाहीत, गाणी ठीक-ठाक आहेत. लक्षात राहिली नाही तरी तेवढ्यापुरता ताल धरला जातोच. मकरंद अनासपुरे ने बोलक्या बाहुल्यांचा खेळ दाखवून धमाल केली आहे !


ह्या वेळी बाहुल्याच्या जास्त करामती नसल्या तरी तो रस्ता क्रॉस करताना, व्हॅनमध्ये,बॅगांमागून उडी मारताना मस्त वाटते ! चित्रपट संपताना पुन्हा एक ओपन लिंक ठेवलेली आहे - तात्याविंचू चे मुंडके महेश च्या गाडीखाली पडलेले असते आणि तिथे कोणाचे लक्ष जात नाही - त्यामुळे झपाटलेला३ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.... पण Compare  न करता एकदा पाहायला 'छान एंटरटेनमेंट आहे.

असो, ओव्हरऑल आमची संध्याकाळ एकदम 'सुखात' गेली  .


रेडिओ सिटीच्या घोषणेप्रमाणे ते इथून पुढे अनेक ब्लु-कार्पेट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत, आम्ही पुन्हा जिंकण्याचा कसोशीने प्रयत्न करू..   सोबत एवढेच म्हणेन की,   
LONG LIVE RADIO CITI 91.1 FM !!  
&  LONG LIVE BLUE CARPET !! ----> आँम फट्ट स्वाःहहा. !!

Friday, May 31, 2013

आमच्या वेळी असं नव्हतं.....(असे सुपर-हीरोज !)

'आमच्या वेळी असं नव्हतं ' हे वाक्य मी अत्यंत Positively उद्गारत आहे.....


माझ्या लहानपणी मी सूपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, इ. इ. सुपर हीरोज पाहत मोठा झालो...
तेव्हा सूपरहीरो ची व्याख्या ही ह्या 'मॅन' लोकांच्या वागणुकीएवढीच मर्यादित होती, आपला इंडियन सूपरहीरो - हनुमान (सोसायटीतली काही मुले हनुमॅन म्हणायची) होता पण हनुमानाला एवढे ग्लॅमर दिले गेले नाही, रामानंदसागर यांच्या रामायणात हनुमानाला बच्चेकंपनीला भुरळ पडेल असा त्याचा संपूर्ण रोल किंवा त्याची पूर्णं ताकद दाखवणे जमले नाही....

 किंबहुना त्याचा संदर्भ रामायणापलीकडे कधी वापरलाच गेला नाही, त्यामुळे हा पराक्रमी सूपरहीरो साईडट्रॅक ला गेला.. आता आताच्या काळात ऍनिमेटेड रामायण सिरीज किंवा बाल हनुमान ने मात्र हनुमानाला भरपूर प्रसिद्ध केले....

आणि अगदी अलीकडे आलेल्या भयपटांमधील (१९२०, फुंक वगैरे) मारुतीरायाच्या चमत्काराने तर भल्या भल्यांना त्याचा भक्त बनवले !!

सांगायचा मुद्दा काय, तर आमच्या लहानपणी सूपरहीरो होते ते म्हणजे पाश्चात्त्यांचे'च , आणि आठवतो तो म्हणजे पॉपॉय-द सेलर मॅन !!
- अंगकाठीने अगदी सामान्य असलेला हा माणूस डबाभर स्पिनीच (पालक) खाल्ल्यावर जो काही पैलवान व्हायचा की बास रे बास... दंडात ज्वालामुखी काय फुटायचे, छातीची लोखंडी तटबंदी काय, हाताचा हातोडा काय... म्हणजे एकंदरीत कमालच करायचा तो, त्या नादात आम्ही पण एक दोन वेळा स्पिनीच चा पाला खाऊन पाहिला... पण तसे काहीच झाले नाही !

गेल्या ५-६ वर्षात परिस्थिती एवढी बदलली आहे की, श्रीकृष्ण-बलराम, छोटा-भीम ह्या लोकांनी छोट्या पडद्यातून घरी प्रवेश कधी केला आणि ह्या पन्नाशी गाठलेल्या सुपरहिरोंना मागे कधी टाकले कळलेच नाही... आणि इंडियन-सूपरहीरो ह्या टायटल खाली त्यांना जबरदस्त प्रसिद्धी मिळाली.


श्रीकृष्ण आधीपासून लोकप्रिय होताच, त्यात त्याचे ऍनिमेटेड मोहक रूप, अगाध लीला हे सगळे मनाला एकदम भावले ! मध्यंतरी पांडवाज हि अनिमेटेड सिरिज सुद्धा छान काढली होती, त्यामध्ये असलेले श्रीकृष्णाचा अवतार तर खूपच छान होता,.

छोटा भीम ह्या कॅरेक्टरने तर बच्चेकंपनीत अक्षरशः: कमाल केली आहे ! माझी भाची, पुतण्या, आमच्या लेन मध्ये राहणारी चील्ली पिल्ली सगळेच फॅन आहेत ह्या छोटा भीम चे....
 
कपाळावर नाम(गंध) लावलेला, गळ्यात एक माळ, हाता पायांत वाळे, आणि केवळ केशरी रंगाची धोती घालणारा, लड्डू खाऊन असीम ताकद येणारा भीम आणि त्याचे सहकारी खूपच कमी वेळात भारताच्या कानाकोपऱ्यात पोचले....आधी फक्त इंग्रजी मध्ये येणारी सिरियल बहुदा आता सर्व भारतीय भाषांमध्ये प्रसारित होत आहे. पोगो वर बहुदा दिवसातले २४ पैकी १८ तास छोटा-भीम साठी राखीव असावेत. 'तेनाली रामा' ची फक्त पुस्तके किंवा एखादीच टीव्ही सीरियल(खरी खुरी माणसे असणारी) पेक्षा , 'Tales ऑफ TENALI RAMAN' ह्या कार्टून सिरिजने तेनालीची उपजत बुद्धी ही कधीकधी सूपरहीरोच्याही पुढे जाते हे सर्बषृत केले... !


परवाचीच गोष्ट, मी "छोटा-भीम - थोर्न ऑफ बाली " हा ऍनिमेटेड चित्रपट पाहिला, एकतर रेडिओ वन कडून मिळालेली तिकिटे १० तारखेच्या आत वापरणे भाग होते, आणि त्यासोबत दुसरे लागलेले चित्रपट म्हणजे डोक्याला शॉट होते ! म्हणून हाच नक्की करून पाहिला... :D त्यात त्यांनी बाली बेटांवरील कहाणी दाखवली आहे, रंगडा राक्षसिणीच्या जाळ्यात अडकलेली बाली बेटे, बराँड नावाचा सिंहरूपी देव सोडवतो, परंतु ती राक्षसीण पुन्हा जन्माला येऊन विनाशाच्या तयारीत असताना छोटाभीम आणि गँग बालीच्या राजकुमारासोबत तिचा वध करतात, माणसाच्या आतला आवाज, मन, चांगले काम करण्याची प्रेरणा म्हणजेच तो बराँड नावाचा सिंहरूपी देव हा साक्षात्कार करून सिनेमा संपतो.. अर्थात मोठे झाल्यावर हा सिनेमा पाहणे ही वेगळी बाब असू शकते कारण तोवर आपल्या विचारसरणीत जमीन अस्मानाचा फरक पडतो !!


ह्या चित्रपटात भीम लांडग्यांना मारताना, गुंडांशी लढताना, आणि राजपुत्राशी शर्यत करताना सिनेमा हॉल मधली मुले इतकी Cheer-up करत होती की सगळे सभागृह दणाणून गेले होते.


फिरंगी सूपरहीरो मध्ये पण थोडा बदल झालेला दिसतो, अलीकडच्या काळात आलेली चायनीज पोकेमॉन आणि डोरेमॉन पण बरेच प्रसिद्ध झालेत... बेन-टेन पण जोडीला आहेच... ! तरीही ह्या इंडियन सूपरहीरोज ला कॉम्पिटिशन देणे सोपे नाही, कारण ह्या लोकांनी अल्पावधीतच आपले स्थान बळकट केले आहे, आणि आता तर हे सगळे स्कूल-बॅग, कंपॉसपेटी,कपडे, टोप्या सगळ्यांवर दिसू लागले आहेत...अजून चितळे/काका हलवाई/जोशी/ देसाई वगैरे मंडळींनी आपल्याकडचे लाडू , काहीतरी ऍडिशन करून 'छोटा-भीम चे लड्डू; म्हणून विकायला काढले नाहीत हे नवल आहे !


मला ह्याचा खूप आनंद झाला की जे आपले म्हणता येतील असे सूपरहीरो माझ्यावेळी नव्हते, ते आत्ताच्या लहानग्यांना सहज उपलब्ध आहे, फक्त देशी-विदेशी चा वाद नाही, पण जे आपल्याकडे आहे ते सोडून उगीच कशाला ना पळत्यापाठी ?




-
आशुतोष दीक्षित