Friday, July 23, 2010

गद्धेपंचवीशी !!

कोणत्याही नव्या "अनुभवाला" समोर जाताना प्रत्येक मनात एकमेव ईच्छा असते. तो अनुभव चांगला असावा. अपेक्षापुर्ती करणारा असावा.....आज वयाची २५ वर्षे पुर्ण करताना असे अनेक अनुभव घेतले.....बरेचसे चांगले.... उरलेले चांगले मानून घेतले ..प्रत्येक अनुभव भरपूर गोष्टी शिकवून जातो...हे शिक्षण एकदा झाले की आयुष्यभरासाठीच...!

२५ हे काही मागे वळून पहायचं वय नाही कबूल आहे पण, नक्की कोणत्या वयात मागे वळून पहायचं हे ज्याचं त्यानेच ठरवायचं नाही का ? -- आज अनेक दिवसानी स्वतःलाच पाठमोरा पहायची वेळ.. आरश्यात फक्त प्रतिबिंब दिसत नाही....त्याहून जास्त त्या चेहर्यामागे, प्रतिमेमागे ती उभ्या करणाऱ्या लोकांचे चेहेरे दिसले पाहिजेत... लोकं बुटांवरून ओळखली जातात असं म्हणतात... पण ते बुट ज्या जमिनिवर घट्ट रोवले गेले आहेत ती जमीन पक्की करणाऱ्या अनुभवांची लकाकी त्या बुटांना आली तर पाहणाऱ्याला देखिल मजा येतो...

आज अनेक दिवसानी मागे वळून पाहताना कितितरी चेहेरे समोर येतात....प्रत्येक माणुस ज्याने काहीतरी शिकवले...आजच्या माझ्या वॉल/स्क्रॅप/मेसेज लिस्ट मध्ये असलेल्या सर्व शुभेच्छांमध्ये या सगळ्या चेहर्यांचा देखिल वाटा आहे... .
.त्यांच्या आशीर्वाद आणि प्रोत्साहनामुळे ही गद्धेपंचवीशी पुर्ण झाली ! सर्वांना मनापासून आभार.... !


आता पुढिल वेताळ-पंचवीशीकडे वाटचाल ... !!

Sunday, July 18, 2010

हो.. !

(My Old Article, published at manogat.com- on 15th July 2010)

हो.. !
(गुरु., १५/०७/२०१० - १५:४३)

"किती वाट पाहायची रे? नेहमीचंच झालंय तुझं आता... मी मूर्ख म्हणून वाट पाहते ना.. " -- नेहा वैतागून म्हणाली,

यश ला हे सगळं एक्स्पेक्टेड होतंच.. कारण मागच्या २ वेळा त्याला असाच उशीर झाला होता, एकदा घरी पाहुणे आले अचानक आणि दुसऱ्यांदा तर घरच्या चौकातला रस्ताच खोदून ठेवलेला होता... गाडी ला किक मारता मारता... तो तिचा राग कसा काढावा ह्या विचारात, बरं फोन करायची सोय नाही कारण नेहाचा मोबाईल बंद होता, लँडलाईन वर करायचा तर ती घरातून निघाली असणार... काय करावं हा विचार करतानाच पावसाचे २ थेंब यश च्या हातावर पडले... वर पाहिलं तर आकाश पूर्णं काळे झाले होते.. कधी कोसळेल पाऊस ते सांगता येणं कठीण होत... फायनली १/२ तासाने गाडी चालू झाली, मनोमन पावसाला थोडावेळ थांबवत आणि चालू झालेल्या सुझुकी चे आभार मानत त्याने ऍक्सलेटर पिळला... आणि ५-१० मिनिटातच समोरच्या गाड्या चुकवत, मागे टाकत, सिग्नल ला सगळ्यात आधी क्रॉस करत तो हातात कॅडबरी.. डोळ्यात प्लीज आणि ओठावर सॉरी घेऊन तिला भेटायला पोचला.

"नेहमी काय गं? खरंच आज गाडीच चालू होत नव्हती.. आत्ता १/२ तास किक मारून आलोय... प्लीज चिडू नकोस... & हो, नुसतं सॉरी नाही... ही घे कॅडबरी... प्लीज स्माईल नाउ..! "

- "वा छान.. कॅडबरी दिली की झालं.. तुला माहीतिये ना मी काही जास्त वेळ रागावू शकत नाही तुझ्यावर... तुझं गोड गोड बोलणं आणि उशीरा येणं... वरून.... " एवढं बोलून ती मागे बसेपर्यंत एक जोरदार वीज कडाडली आणि ते बोलणं अर्धवट टाकून नेहा ने यश च्या खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली "ओ गॉड... आज खूप पाऊस येणार असं दिसतंय.... यश मी रेनकोट पण नाही घेतलाय... "!
"मग भिजू की त्यात काय.. " -- यश ने गाडीला एक हलकेच वळण घेऊन गिरकी घेतली आणि आरसा नेहा च्या चेहऱ्याचा अँगल ला सेट करून म्हणाला.

"म्हणे भिजू की, मि. यश आपण विसरत आहात की रिमझिम पाऊस नसणारे हा... वर पाहा एकदा म्हणजे कळेल, त्यात तुमची प्रपोज करण्याची बोर पद्धत, म्हणे ३. ३० वाजता तयार राहा... मी तुला आज प्रपोज करणार आहे... -- किमान १० वेळा झालं हे, प्रपोज करत नाहीस... काइ नाहीस.. !! "

"अगं, वेगळं काय करतो असं प्रपोज म्हणजे? तुला काय अगदी हॉलिवूड स्टाइल पूल साईट टेबल वर, ब्लॅक अरमानी सुट मध्ये दातात गुलाबाच फुल घेऊन, शेजारी सेक्सोफोन/पियानो वाजवणाऱ्यांची टीम आणि कँडल लाइट डिनर मध्येच प्रपोज केलं पाहिजे का, की मला तू आवडतेस आणि माझ्याशी लग्न कर... आणि अजून असा कितीही रोमँटिक प्लॅन केला ना तरी तू म्हणशील... हे काय फिल्मी प्रेम! एवढं काही करायची गरज नव्हती! " -- यश ने असे सगळे एका दमात सांगितले, आणि रिमझिम पाऊस सुरू झाला...

-- " हीही... सगळं तूच बोल..! " - नेहा नि केस मोकळे केले.. नेहमी गॉगल, स्कार्फ बांधून मागे बसणारी नेहा रिमझिम पावसात एवढी सुंदर दिसते हे यश ला देखिल नवीन होतं...

" तो आरसा निट कर.. मागे पाहायला असतो तो -- "

मागेच पाहतोय की मग, त्याच आरशात नेहा ला डोळा मारून यश म्हणाला...!

"मागे म्हणजे मागची लोक, बाकीच्या गाड्या... मागून येणारे आणि मागे टाकलेले संभाव्य धोके.. पिलियन वरचा माणून पाहायचा नाही त्यात... "

"अग आता तुला मागे बसवलं ह्यांतच आलं की सगळं.. तुला मागे बसवायचा सर्वोच्य धोका पार केला आहे मी.. मग बाकीचे धोके काय मोठंसं....! "

"तू पण ना यश... मस्करी नेहमी..., आणि बाय द वे, आपण चाललोय कुठे? ६-७ किलोमीटर नुसते फिरतोय.. "

" गेस्स... "

"ओह.. नो... आर यु किडिंग... आर वी हेडिंग टू लोनावळा? - हायवे च्या आजू बाजूला पाहत नेहा जवळ जवळ ओरडलीच कारण तोपर्यंत पाऊस चांगल्यापैकी चालू झाला होता... केस/कपडे भिजले होते.. आणि ह्यात लोनावळा म्हणजे...!

" येस... मस्त राउंड मारून येऊ १००-१५० किलोमीटर..

"शहाण्या मी घरी सांगितलं नाहीये काहीच... म्हणालिये जाऊन येते फक्त.. उशीर होईल रे.. :("

"सांग की मग एखाद्या मैत्रिणीचं नाव, तिचा वाढदिवस कर आजचा दिवस.. लवकर येऊ आपण.. "

"हम्म्म.... तुझ्यामुळे किती खोटं बोलाव लागत... "

चिंब पावसात भिजून नेहा आणि यश बराच वेळ तसेच फिरत होते.. एका मस्त मोठ्या वळणावर जेव्हा टर्न घेत होता तेव्हा नेहा नि घाबरून यश ला जवळजवळ मिठीच मारली.. आणी ओरडत म्हणाली, असा चालवणार असशील तर मागे बसणं मुष्किल होईल... यश म्हणाला अशीच जर बसणार असशील मागे तर टर्नच घेणार नाही मी.. ही ही ही...!

अश्याच गप्पा मारत मारत बराच वेळ हिंडून ते परत पुण्यात आले... परत आले तर इथे पावसाचा टिपूस नाही, ७ वाजले होते पण, ओलेत्यानं घरी जायचं तर १० प्रश्न विचारले जातील... काय टाकीत अंघोळ केली का? एवढा पाऊस नक्कीच पडला नव्हता & All...!

मग पुन्हा एकदा CCD मध्ये जाऊन मस्त कॉफी ऑर्डर केली... तिथे कॉफी च्या कप वर हार्ट शेप फोम/चॉकलेट डिझाइन मध्ये स्ट्रॉ घालून यश ने तिच कॉफी नेहापुढे केली... "स्वीटहार्ट, धिस इस नॉट जस्ट कॉफी, इट रीप्रेसेंटस माय हार्ट.. सो प्युअर & डेडिकेटेड... "

नेहा त्याच्या हातात हात घेऊन म्हणाली - " खरंच तुला प्रपोज करता येत नाही बेबी... बट आय अंडरस्टॅंड... & दॅटस व्हाय आय लाइक यू सो मच...! यू आर सच अ स्वीटहार्ट... "

८:३० चा अलार्म वाजला आणि यश ने ओळखले, की ही नेहा ला घरी सोडायची तिसरी घंटा वाजली..; ) झटक्यात त्याने बिल ठेवले, आणि बाइक वरून तिला घराखाली सोडून म्हणाला... "बघ... ऑल इन टाइम... आणि कपडे पण वाळले... उद्या परत जाऊया? "

"ए.. जा आता इटस बीट लेट आणि मला ही जाऊदे.. गुड नाइट... "
"आय... हाय... आज तर झोपच नाही येणार... बिलिव्ह मी... टुडे इस & विल बी द "
"जा यश... स्वीट ड्रीम्स... बाय... " यश ला ढकलून ती गेट मध्ये तो दिसेनासा होईपर्यंत उभी होती...
बेड वर पडल्या पडल्या यश ने एकच मेसेज पाठवला " नेहा तुझ्या डोळ्यात स्वतःला लांब जाताना मला पाहता येत नाही गं.. इथून पुढे फक्त एकदाच बाय म्हणून लगेच पाठमोरी होत जा... आय रिअली लव्ह यू... डू यू? ! "

नेहा च्या रिप्लाय मध्ये होता फक्त "हो"... आणि एक स्माइली, विश्वासाने स्मितहास्य देणारा...!


--
आशुतोष दीक्षित

बेंच (भाग २)

(My Old Article, published at manogat.com- on 11th July 2010)
बेंच (भाग २)
(रवि., ११/०७/२०१० - १९:०७)
भाग १ वरून पुढे...

"हॅलो स्नेहा, कशी आहेस तू? मी अमेरिकेत येऊन ७ महिने झाले, मी खूपं वाट पाहिली तुझ्या फोन ची पण तुझ्याकडून काहीच कळले नाही... आय मीन.. खराच कसली आहेस गं तू ! बोलावलं असतंसं लग्नाला तर काय आलो नसतो लगेच मी...!" -- राहुल उदास होत म्हणाला, एअर पोर्ट वर बाय करायला स्नेहा आली नव्हती तिने फक्त फोन केला होता, त्यानंतर थेट आज... !

"अरे हो..,तुझा नवीन नंबर मी घेतला होता काका काकूंकडून पण त्यांनी सांगितलं की तू लवकर येणार आहेस म्हणून ?

"तो वेगळा विषय आहे,.. मी काहीतरी वेगळं बोलतोय... "

"अरे असं कसं वेगळा विषय ? -- तुला बोलावल्याशिवाय कस करीन मी लग्न ? म्हटलं, तू तसाही वर्षभरात परत येणारेस असं काका काकू म्हणाले.. "

" हो ना अगं, आता अख्खा प्रोजेक्ट चेंज केला माझा, ज्या प्रोजेक्ट साठी आलो होतो तो सोडून वेगळाच प्रोजेक्ट इथे दिला ऑनसाईट मॅनेजर नी, आणि हा प्रोजेक्ट यू. के. बेस आहे, पण माझा व्हिसा प्रॉब्लेम आहे सो परत भारतात येऊन मग २ वर्ष लंडनला जावं लागणार आहे ... एक्झॅक्टली व्हाट आय वॉज लुकिंग फॉर... आय एम सो हॅपी !! "

"गुड.. भारीच एकदम, ईव्हन आय एम इक्वली हॅपी फॉर यू... "

"तुझ्या लग्नाचं >?"

अरे सांगितलं ना तुला बोलावल्याशिवाय कसं करेन ?... तुझ्याशिवाय लग्न लागणं शक्य आहे का ?

म्हणजे ? -- परवा प्रसाद शी बोलत होतो कंपनीत, तो पण असच काहीतरी बरळत होता, सरप्राइज काय,मला डबल प्रमोशन चा चान्स काय..! तिकडे नक्की करताय काय तुम्ही लोक ?

-- "मी विशाल शी लग्न नाही केलं,! "

-- काय ? स्नेहा... काय बोलतीयेस तू ? "

खरं तेच, अरे साखरपुडा झाल्यावर आठवड्याभरातच त्याने मला सांगितले की त्याचे त्याच्या मैत्रिणीवर प्रेम होते, पण नाईलाजास्तव त्याला हे सगळं ऍरेंज केलेलं पार पाडाव लागलं.. त्याचे अजूनही प्रेम आहे तिच्यावर, आणि हे सगळं साखरपुड्याआधीच सांगणार होता.. पण त्याला जमलं नाही, आणि मग मीच घरी सांगून टाकलं... सगळ्या गोष्टी घरच्या घरीच असल्याने जास्त प्रॉब्लेम आला नाही, हो पण आई-बाबा नाराज झालेत, आणि आमची फॅमिली फ्रेंडशिप जरा ताणली गेली आहे.. असो... "

"काय सांगतेस? पण असं कस... ? म्हणजे आपल्याप्रमाणेच.. पण ..आय मीन... एवढ्या वेळ तो विशाल काय झोपला होता का गं ? त्याला तू काहीतरी बोलायचंस ना..

"लग्ना आधी सांगितलं हे काय कमी आहे राहुल ? नंतर आयुष्यभर पश्चात्ताप करण्यात काही अर्थ नाही... जेव्हा हिंमत होईत तेव्हा बोलून टाकावे... मी त्याला संपूर्ण दोष देत नाही, सर्वांची मनं आपल्याएवढी समजूतदार किंवा त्यागी नसतात ना...त्याची चूक आहेच थोडी पण त्याने घोडचूक करण्यापासून स्वतःला आणि मलाही वाचवले.. !"

.. मग आता ?

आता काय ? लग्न होईलच कधी ना कधी... शोध मोहीम चालू आहे... २ स्वप्नांपैकी १ पूर्णं झालं, माझे ग्रुप लीडर चे प्रमोशन, आता लग्न पेंडिंग...

.. वाईट वाटणार नसेल तर एक विचारू ?... मी गेले काही दिवस फोन करणार होतो तुला शेवटचे विचारणार होतो लग्नासाठी पण त्या दिवशी तू पेढा दिलास तो क्षण आठवत होता, त्यात तुझा साखरपुडा.. म्हटलं उगीच माझ्यामुळे पुन्हा गडबड/मनस्ताप नको.. आत्ता तू हे सांगितलंस म्हणून...

विचार...

माझ्याशी लग्न करशील ? माझं अजूनही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे...

मला माहीत आहे, म्हणून तर मी काही बोलले नाही तू येण्याची वाट पाहतीये..विशाल ला नाही म्हणताना एकच विचार मनात होता, तुझा....जास्त बोलत नाही.. एवढंच सांगते की आय एम ऑल्सो वेटिंग फॉर यू.. !

खरंच, ? स्नेहा... रिअली... ? प्लीज एकदा सांग मला.. आत्ता इथे व्हिडिओ कॉल वरून प्रपोज करू शकणार नाहीये पण मी गुडघ्यावर बसून फोन हातात धरला आहे.. अगदी इंग्रजी पिक्चर मध्ये हिरो प्रपोज करतो त्या स्टाइल नि (सध्या तर कपडे पण तसेच आहेत, ऑनसाईट वाले.. ) स्नेहा... बोल ना.. इथल्या गार हवेत एकटे फिरून मी थोडासा आजारी पण पडलोय, मला ह्या वेळी डॉ. कडे नेशील ?

.. येस आय विल.. राहुल...!

===!

" वेलकम बॅक राहुल ... " ! बोर्ड हातात घेऊन स्नेहा उभी होती, सोबत राहुल चे आई बाबा आणि कंपनीतले काही मित्र.. ! राहुले ने एअरपोर्ट वरून बाहेर येताक्षणी स्नेहाला पाहिले, आणि सर्वात आधी तिला मिठी मारली.. पण पुढच्या क्षणी अचानक सामाजिक परिस्थितीची जाणीव होऊन लगेच त्याने मिठी सोडवत आई-बाबांना नमस्कार केला, आणि मग आलेल्या मित्रांच्या गोटात देखिल जोरदार टाळ्या दिल्या... !

आज राहुल १३ महिन्यांनी भारतात परत आला... करिअर, प्रेम आणि जबाबदारी ह्यावर कसरत करत काढलेले १३ महीने, स्नेहाचे पारदर्शी आणि सच्चे मनोगत, त्यातच स्नेहा आणि त्याच्यातल्या जुन्या गप्पांच्या आठवणी...ऑनसाईट चा चान्स, कमावलेले/वाचवलेले पैसे,ज्या पद्धतीने ठरवले होते तसे सगळे घडून आले होते... आणि त्यात अति आनंदाच्या ह्या क्षणी स्नेहा चा होकार..!

समजा रामदासांनी आज विचारले असते की "जगी सर्वसुखी असा कोण आहे ? " तर त्याच एअर पोर्ट बाहेरच्या वेटिंग बेंच वर उभा राहुन आपले हात आकाशाकडे पसरवत राहुल नक्कीच मोठ्यांदा ओरडला असता.."मी... ह्या क्षणाला तरी मीच आहे!!"


--
आशुतोष दीक्षित

बेंच !

(My Old Article, published at manogat.com- on 5th July 2010)
बेंच !
(सोम., ०५/०७/२०१० - १४:३१)

"हॅलो...अरे सध्या खूप धावपळ चालू आहे रे, नाइट शिफ्ट चालू झाली परत आठवडाभर..." अर्धवट भिजलेल्या केसांना मागे टाकत स्नेहा म्हणाली. तिच्या नजरेला नजर देणे राहुल टाळू शकत नव्हता आणि पुरते सांभाळू ही शकत नव्हता....

"ठीक आहे.. माझी सुद्धा नाइट आहे, बघू भेटू वेळ मिळाला मध्ये तर... " त्याने प्रश्नार्थक मुद्रेने तिला विचारले.. आणि उत्तर येण्याअगोदरच तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आला, ती तशीच हाताने बाय करून पायऱ्या चढायला लागली... आणि राहुल त्याच पायऱ्यांवरून खाली यायला लागला...

राहुल आणि स्नेहा, एकाच बॅच मध्ये कंपनीत जॉईन झाले होते, परंतु काही कारणास्तव तिचे प्रोजेक्ट बदलले असल्याने त्यांची शिफ्ट बदलली होती, राहुल ला ऑनसाइट चा चान्स हवा होता तर स्नेहा ला प्रमोशन.. कदाचित ह्या महत्त्वाकांक्षाच त्यांच्या मैत्रीला सुरुवात करून देत होत्या... १७ जणांच्या ग्रुप मध्ये वेव्हलेंथ जुळणारे ४ लोकं, त्यातलेच हे दोघं !

पायऱ्या उतरत तो खाली आला, कंपनीच्या बाहेर मोकळ्या पॅसेज मध्ये.. गार वारा, किंचित पाऊस आणि मातीचा मंद सुगंध कोणालाही वेड लावेल असा...तो तिथल्या बेंच वर जाऊन बसला, आज कंपनीत मेंटेनन्स ऍक्टिविटीमुळे जास्त काम नव्हतं, आणि त्यात एवढ्या दिवसांनी स्नेहा भेटली... आता तर किमान १० मिनिटे शांत गार वाऱ्याच्या सोबत राहणे अनिवार्य होते.. !

"तुला अस गार वाऱ्यात फिरायला फार आवडतं ना रे? , आजारी पडशील कधीतरी...
तू आहेस ना मग डॉ. कडे न्यायला...
"मी नाही नेणार, आधी कुपथ्य करावं कशाला ? म्हणे मी आहे, मी काय कायम असणार आहे का" ?
तू गेलीस की मी कशाला फिरेन वाऱ्यामध्ये ?
"का ? बायकोसोबत फिरशीलच ना ? तसंही तिकडे ऑनसाईट गेलास की कोणी फिरंगी मिळेलच तुला, आणि तिकडे वादळं पण चालू असतात म्हणे, अशीच गार हवा ...."

'स्नेहा... !", आपलं बोलणं झालयं ना, मला ऑनसाईट जायचा चान्स आहे, आणि त्याआधी मला लग्न करायचं नाहीये, जबाबदारी पेलण्याची मुख्य ताकद पैसा देते... पैसा म्हणजे सर्वस्व नाहीच, पण पैसा नाही त्यामुळे काही काही आनंद उपभोगता येत नाहीत हे कुठेतरी खुपतंय..त्यावर मात करणे म्हणजे कष्ट करून पैसा कमावणे, हेच वय आहे त्यामध्येच मला स्वतःवरील जबाबदाऱ्या आणि पैसा दोन्हीवर अगदी बेदम कष्ट करून डाव लावायचा आहे... ! तुझ्याशी लग्न न करणे किंवा करणे हा खरं तर पर्याय असू शकत नाही, परंतु तू लग्नानंतर तिकडे येणार नाहीस, आणि मी परत येईपर्यंत तू थांबणार नाहियेस.. मग मी काय बोलू हे तूच सांग बरं.. !

"राहुल..." तिच्या हाकेने तो एकदम भानावर आला, ६ महिन्यांपूर्वी त्याच बेंच वर बसून मारलेल्या गप्पा वाऱ्याच्या संथ लयीत ओघवत आल्या होत्या, रिसेशन च्या काळात कंपनी जॉईन केल्याचा चटका होताच, परंतु कंपनीने काढून न टाकता फक्त महिनाभर बेंच वर ठेवले होते... त्या काळात हाच बेंच त्यांना सोबत करत होता...--- हाकेचा आवाजामुळे चटकन त्याने एक हात चेहऱ्यावर फिरवून मागे पाहिले, स्नेहा आली होती, तिच्या हातात एक पॅकेट आणि कसलीतरी पिशवी होती... राहुल बेंच वरून उठून तिच्याजवळ गेला.

" पेढे? म्हणजे काहीतरी बातमी आणलीयेस?

हो रे... फॅमिली फ़्रेंड आहे, काल घरच्या घरीच साखरपुडा झाला, अक्चुअली "विशाल" परवा बंगलोर ला जातोय आणि मग हैदराबाद ला २ महिने, नंतर परत पुण्यात येईल... आम्ही ६ महिन्यांनी लग्न करू अजून...

"गुड..!... होपफुली मी लग्नाला येऊ शकेन... "

"नाही तू नाही येऊ शकणार कदाचित, कारण आत्ताच वर बोलणी चालू होती मॅनेजर्स ची, आमच्या प्रोजेक्ट मधला अनिकेत आणि तुझ्या प्रोजेक्ट मधला कोणीतरी ऑनसाईट जात आहेत १८ महीने... आणि तुझ्या प्रोजेक्ट मधला तू सोडून कोण असणार ?"

"मी तिकडे गेल्यावर येऊ शकणार नाही असे कोणी सांगितले ? "

" हो ते ही आहेच म्हणा, असो.. ती नंतरची गोष्ट, हा पेढा घे... "

"तेवढा गोड नाहीये... "

" माझी वेळ आणि तुझी ऑनसाईट व्हिजिट एकदम जमत नाहीये ना.. नाहीतर नक्की गोड लागला असता... चल आता मला ऑल द बेस्ट म्हण आणि पुन्हा एकदा तुझे प्रोजेक्ट स्टॅटिस्टिक्स नजरेखालून घालून घे... "

" हो... ऑल द बेस्ट, ऍंड... थँक्स फॉर एव्हरीथींग... & सॉरी... कशासाठी ते विचारू नकोस.."

"नाही विचारणार, इनफॅक्ट, सेम टु यू .. टेक केअर, कीप इन टच.. "

पँटला लागलेली धूळ आणि हाताच्या तळव्यावर उरलेली साखर झटकत तो तिच्यासोबतच परत कंपनीत जायला पावले टाकायला लागला... उद्याच्या प्रतीक्षेत... ! प्रत्येक श्वासासोबत बाहेर पडणारा मूक संवाद....थंड वारा... हिरवेगार लॉन... आणि आठवणींचा साक्षीदार तो बेंच मागे सोडून...

रिसेशन च्या वेळी त्याच्या कंपनी सोडून जाणाऱ्या मॅनेजरने सांगितलेले वाक्य सारखे त्याच्या मनात घोळत होते...कदाचित आज त्याला त्याचा खरा अर्थ समजला असावा : -- "टाइम स्टॉप ऍट नथिंग... नॉट इव्हन ऑन बेंच.. !" !

--
आशुतोष दीक्षित

रंगकाम आणि रंगकर्मी::(क्ष कंपनीचे)

(My Old Article, published at manogat.com- on 27th March 2010)

रंगकाम आणि रंगकर्मी::(क्ष कंपनीचे)
(शनि., २७/०३/२०१० - १७:२५)

रंगकाम....

झाले एवढं नाव उच्चारल आणि आमच्या घरातील प्रत्येकाला उग्र वास, कपड्यांचा पसारा, खोलीतली आवरा-आवरी, भिंतींचे सुक्ष्म तडे, धुळ, अनोळखी माणसांचा घरात वावर- --ह्यापैकी एक तरी संकटाची जाणिव झाली असावी म्हणुनच माझ्या ह्या प्रपोसल चा तातडीने "करू की... दिवाळीला करू... " असा डायरेक्ट ६ महिने स्थगितीचा शिक्का मारून निकाल लावण्यात आला.

पण माझ्या डोक्यातून रंगकाम काही जात नव्हते, खरे तर तातडीने रंग लावलाच पाहिजे असेही काही नव्हते, परंतु मध्ये एकदा जराशी ओल आली होती ती काढून घेतली पण नंतर रंग लावला नव्हता... त्यातून आत्त्ता आहे तो रंग लावून किमान १० वर्ष झाली त्यामुळे ठिकठिकाणी सुक्ष्म तडे, आणि पोपडे दिसायला लागते होते... आणि सर्वात मुख्य म्हणजे दर दिवसा-आड सकाळी सकाळी पेपर वाचताना -"घर रंगवताय? - आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा ! "... ह्या टायटल खाली येणारी जाहीरात मला खुणावर होती... डिवचत होती... आणि सारखे सारखे पॉलिश्ड रुम ची स्वप्ने दाखवत होती.. !

घरच्यांच्या मनातले प्रश्न खरतंर मलाही पडले होते, कारण माझी'च खोली सर्वात विस्कटलेली/पसरलेली/अस्ताव्यस्त वगैरे वगैरे असते.. (असं आई म्हणते-पण मला तर हवी ती वस्तू जिथे टाकलेली असते तिथे व्यवस्थित सापडते ) आणि ती रंगवायला काढायची म्हणजे सामान हलवा हलवी आली... स्थावर सामान होते ते झाकावे लागणार, आणि बाकीचे सगळे ईकडच्या खोलीतून तिकडच्या खोलीत बदलावे (पसरावे) लागणार, दिवाणावरच्या गाद्या उश्या पण उचलाव्या लागणार, २ महिन्यापुर्वीच नवीन घातलेले कार्पेट पण उचलावे लागणार.... अरे देवा....!! पेस्ट कंट्रोल प्रमाणे रंगकामाची पण का ट्रिक निघत नाही अशी? सामान न हलवता वगैरे.. !

पण मागच्या शनिवारी मात्र पुन्हा ती जाहीरात पाहिली आणि तडक फोन फिरवला... कोटेशन, शेड सिलेक्शन वगैरे सगळे ठरवून तरी निदान हा शनिवार/रविवार तरी 'सत्कार्णी' लावायचा असा विचार केला..

एका गोड आवाजाने माझा फोन उचलला आणि हवी असलेली सगळी माहीती देऊ केली, पण त्यातही मला एकदाही किंमत कळू शकली नाही कारण तो आवाज "ऍक्चुअली खर्चाचा नक्की अंदाज आमचे फिल्ड एक्स्पर्टस'च देऊ शकतील" असे कळकळीने कळवत होता... मग मी रितसर पत्ता नोंदवला, आणि '२४ तासात व्हिजिट' ची हमी घेउन निवांतपणे पुढचा पेपर वाचायला लागलो...

झालं तो दिवस गेला, रविवार सकाळी ११ वाजता माझ्या मोबाईल वर एक फोन आला, मि. क्ष कंपनीकडून बोलतोय आपले रंगाचे काम आहे ना? मी आत्ता येऊ का प्री-बुकिंग व्हिजिट साठी ? -- या या... मी घरीच आहे!!

दार उघडलं-त्या क्ष कंपनीचा शर्ट घातलेला तरुण व्यावसायिक हसऱ्या चेहऱ्याने घरात आला... त्याने खोली पाहिली आणि मग मला माहीती द्यायला सुरुवात केली - सर, पेंटिंगसाठी आपल्याला टोटल ५ दिवस लागतात, सर्वात आधी आमचे एक्स्पर्टस येऊन आपल्या खोलीतील पंखा/टुब/कपाट हे झाकून घेतील कारण रंग उडून नये, मग हा जुना रंग घासून घेउन क्ष कंपनीची स्पेशल पुट्टी लावली जाईल मग लांबी/प्रायमर आणि त्यानंतर पेंट चे २ कोट दिले जातिल, ५व्या दिवशी खोली आपल्या ताब्यात... सध्या नवीन रंगाचा आपल्याच कंपनीचा टेफ्लॉन पॅटर्न आहे एक, त्यावर महिनाभर काही जास्तिचे चार्ज नाहीयेत त्यामुळे तो बूक करावात... त्याची लाईफ सुद्धा १०+ वर्ष आहे...

(माझ्या मनात प्रत्येक वेळी त्याने क्ष कंपनीचे स्पेशल असे उच्चारताना किमतीचा आकडा वाढत होता )- बरं खर्च किती येईल अंदाजे?

त्यासाठी पेंटेबल एरिया काढावा लागेल आमचा एक्स्पर्ट येईल आणि तो मेजरमेंटस(मोजमाप) करून आपल्याला क्ष कंपनीचे कोटेशन शीट पण भरून देईल लगेच, एकदा एरिया कळला की किंमत काढणे सोपे जाते आणि मग कमी-जास्त होण्याची शक्यता राहत नाही ना.. म्हणजे क्लाइंट पण खुष आणि आम्ही पण... ( त्याचे १०० रुपये होतील, क्ष कंपनीची पावती मिळेल तुम्हाला... )

(अरे वा... सगळेच बरे एक्स्पर्टस तुमच्याकडे? बाकीचे काय अकुशल-निमकुशल कामगारांवर कंपन्या चालवतात की काय? )

-- बरं मग आत्ताच येऊन जाईल का तो माणुस? कारण मला ह्या आठवड्यातच नक्की करायचे आहे, एकदा खर्च समजला की पुढिल १ तारखेला किंवा १० तारखेला काम चालू करू.. लगेच.

-- हो हो.. बोलावतो मी त्याला लगेच, किंवा मला तासभर द्या मीच घेऊन येतो त्याला... पण सर तुम्ही पुढिल महिन्यात बुक केलेत तर ही ऑफर मिळणार नाही ना... ही फक्त ह्याच महीन्यात आहे... तर बुकिंग आपण आधी केलत तर आपल्याला पण फायदा होईल..

(अरे हो... पण आधी किंमत तर कळू दे..? ) - ठिक आहे मी महिना अखेरीच्या आधीच निर्णय घेतो.. पण त्या माणसाला... (सॉरी एक्स्पर्ट ला) जरा लवकर बोलवा...

--मग थोड्यावेळाने तो एक्स्पर्ट आला, फक्त कपडे आणि केसरचना वेगळी जरा बरी होती... बाकीचे सगळे आमच्या जुन्या पेंटरप्रमाणेच होते.... त्याने सगळ्या खोलीची वेगवेगळ्या पद्धतीने मापे घेतली, स्थावर लाकडी फर्निचर चे (टॉप) समतल बाजू मोजल्या, काहितरी गणीती प्रमाण लावले आणि शेवटी त्या क्ष कंपनीचे मेजरमेंट शीट काढून त्यावर वॉल एरिया, सिलिंग, आणि विथ वूडन र्निचर असे ३ आकडे लिहून तो कागद पहिल्या माणसाकडे (सुपरवाईजर) दिला...

झालं, मेजरमेंटस पण आले आता खर्च कीती येईल...? -एवढ्यात आमचे संभाषण तोडून तो पेंटर म्हणाला,

साहेब ही पावती.... १०० रु द्यायचेत... म्हणजे मी निघतो, मला अजून २ ठिकाणी जायचे आहे... (हा उद्धटपणा देखील आमच्या जुन्याच पेंटरसारखा -) हे घे...!

हं आता बोला, किती खर्च होईल? --

साधारण १० हजारापर्यंत जाईल...! --

अहो साधारण? आता १०० रुपये देऊन आपण मापे घेतली ना? आता तरी पक्क सांगा?

हो साहेब, मी साधारण म्हणालो कारण समजा तुम्हाला वाटले एखादी भिंत टेक्शचर्ड करून घ्यावी तर त्याचा खर्च वेगळा येतो ना.. म्हणजे करालच अस नाही पण आजकाल लोकांन्ना बेडरुम मध्ये एक भिंत अशी सजवायला आवडते, तुम्हाला त्याचे पण डिझाईन्स दाखवू का?

अं. ऽ अत्ताच नको लागल्यास सांगतो मी... मग खर्च साधारण १० हजार ना? आणि ५ दिवसात काम पुर्ण?...

साहेब, गॅरेंटीच आहे तशी आपल्या क्ष कंपनीची! (ह्या 'आपल्या'मुळे मला एकदम क्ष कंपनीचा डायरेक्टर झाल्याची फीलींग हा हा)

--बर मी कळवतो.. असे सांगीतल्यावर त्या ऑफर ची पुन्हा आठवण करून देत तो गेला, आणि मी एका हातात १०० रुपयाने कमी झालेले पाकिट आणि दुसर्या हातात माझ्या रुम ची मेजरमेंटस चा कागद घेऊन रंगकामची स्वप्ने रंगवायला लागलो...

(संध्याकाळी सर्व कुटुंबीयांसोबत बसून निर्णय घ्यावा असा विचार आहे... आता तो निर्णय ह्या आठवड्यात होईल मग पुढचे पुढे लिहितो.. )

--
आशुतोष दीक्षित

काय करु ? (भाग ४ -- हा शेवट ?)

(My Old Article, published on manogat.com- on 22nd June 2010)

काय करु ? (भाग ४ -- हा शेवट ?)
(मंगळ., २२/०६/२०१० - १२:३१)

कॉफी शॉप मध्ये पाऊल पडता क्षणी "ती" दिसली.. . तिथेच बसलेली.. त्याच टेबल वर...!
भूतकाळ हा पार्शलीटी करतो... वाईट दिवस चटकन विसरायला लावतो आणि चांगले दिवस मात्र आठवणीच्या गाठोड्यात कायम टवटवीत असतात... ह्यातलेच एक गाठोडे आज सोबत घेऊन आलो होतो भेटायला...सगळे गाठोडे रिकामे करून जायचे असे ठरवून... :D


~"अरे वा अगदी वेळेवर आलास ? आज गुलाब वगैरे घेउन ? "

"मागच्या वेळेस देखील, पण आज तूच लवकर आलीयेस..हा गुलाब.. तुझ्यासाठी... अशीच स्माईल करत रहा... न जाणो पुन्हा देऊ शकेन की नाही.. ..."

~"हो म्हटंल मागील वेळीसारखा उशीर नको, कॉफी सांगू की काही अजून काही ?...

"थांब.. कॉफी पेक्षा कडू बोलणार की गोड ते सांग मग त्याप्रमाणे ऑर्डर देऊ -- मिश्किल विनोदाने तिला डोळा मारून टेबल वर तिच्यासमोर बसलो."
ते काही असो, पण आज बोलणार नक्की आहे... - "२ डेविल्झ ओन" !


ऑर्डर देताक्षणी मी म्हणालो -- "तुझ्या हिरोला बोललीयेस आपण भेटणार आहोत ते ? कदाचित त्याला आवडणार नाही.. "

"हो मी सांगून आलीये...
.. त्या दिवशी मी नंतर फोन केला नाही ह्याचे कारण म्हणजे तूच एकदा म्हणाला होतास की भावनेच्या भरातले निर्णय...त्या वेळी आपण दोघे एका वेगळ्या ट्रॅक वर चालत होतो ... कदाचित अनेक दिवस भेटायची जी ओढ होती त्यातून किंवा मग भेटल्यानंतर एकमेकांचे विचार/वागणे ओळखून....पण त्या क्षणी निर्णय घेणे अवघड होते...
-- मी तुला त्याक्षणी निर्णय विचारला नव्हता... मी तर..

-- एक मिनिट, प्लिज मला बोलू दे.. खूपं साठून राहिलंय.. ( तिच्या पाणीदार डोळ्यातल्या भावना ओळखून पुढे काही बोललो नाही... )

तू आधीपासून म्हणत होतास की प्रेमात पडू नको... मी नाही पडले.. 'आय केप्ट माय वर्ड' पण हा माझ्या आयुष्यात आला आणि नकळतच मी तुला त्याच्यात शोधत गेले... बहुदा काही साम्य होतं नव्हतं.. पण हो जेव्हा मी प्रेमात पडायचा विचार मनात आला तेव्हा तुझा कुठेतरी विचार झालेला होता.. पण..

असो, आपण भेटल्यावर मी त्याला भेटले.. आम्ही बोललो, खूप गप्पा मारल्या, आणि एकमेकांच्या प्रेमात देखील पडलो... अर्थात हे तुला डायरेक्ट सांगणे मला अवघड जात नाहीये कारण मला खात्री आहे तू समजून घेशील... (निदान मला इतर कोणाहून जास्त...!)

त्याला तुला फोन केलेला, भेटलेले आवडत नाही, त्याला थोडी इन-सिक्युअर फीलिंग असेल पण मी त्याला तसं कबूल केलं आहे...

" आज तुला भेटायला आले ते ह्याच साठी...

-- "ते मला त्याच दिवशी समजले जेव्हा तू परत फोन केला नाहीस... पण मग हे एवढं उशीरा का ?

" टाइम इस द बेस्ट सोल्युशन फॉर थिंग्स दोस आर डिफिकल्ट टू एक्प्रेस.. , मी स्वतः एवढी स्ट्राँग नव्हते की तुला नाही सांगू शकले असते, आणि हो तू समोर आलास की नकाराचे शब्द जिभेवरून कसे काय मागे फिरायचे माहीत नाही... तू माझा खूप छान मित्र होतास/आहेस म्हणजे, मी नेहमी तुझी कंपनी मिस करेन.. आणि हो तुझ्यासोबत राहून मला स्टेबल डिसीजन मेकिंग चा छोटासा कोर्स पण जमला बरं का !

" मग गुरुदक्षिणा म्हणून एकच कर -- लग्नाचं आमंत्रण नक्की दे... मी येईन असं नाही पण, निदान त्या तारखेला आणि तुझ्या वाढदिवसाला तरी वर्षभरातून फोन २ करू शकेन.. अर्थात आपण भेटलो तो दिवस देखिल... बाकी जसं तू तुझ्या हिरोला सांगितलसं-आय विल बी आऊट... ऑफ द पिक्चर ...!

अगदी आऊट नाही रे.. पण हो जेवढे क्लोज होते ते परत नाही जमणार कारण तुला माहीत आहे--

"नक्कीच... ऑल द बेस्ट टू यू.. अँड युवर फ्युचर.. "

एवढ्या गप्पांमध्ये कोल्ड कॉफी गरम झाली...आणि तशीही ह्या कॉफी ची चव लागत नव्हतीच... दोघांनी कॉफी एकमेकांच्या नजरेत पाहत संपवली, आणि अगदी पहिल्यांदा भेटल्याप्रमाणे एकमेकांना निरोप दिला, तो म्हणाला.. आयुष्यं खूप मोठं आहे कधी ना कधी कुठे ना कुठे नक्की भेटूच.. पण त्या आधी कधी गरज पडली तर कॉल कर...

तीः नक्की... !


आपण लहानपणी टेकडीवर किंवा सहलीला जाताना खूपं कुतूहलाने सुंदर दगड, वेगवेगळ्या आकाराचे शिंपले.. काही फुले, पाने घेऊन पुढे जायचो. पण परतीच्या प्रवासात मात्र हातात एवढं सामान व्हायचं की हे सगळं कुठे ठेवायचं हा प्रश्न पडायचा... मग येता येता दिसेल त्या सुंदर वळणावर एक एक शिंपला..फुल ठेवून, घरी फक्त त्यांचे रंग लागलेले रुमाल आणू शकायचो..

तसंच बहुदा... ह्या सुंदर वळणावर .. आजपर्यंत "त्याच्या" आयुष्यात आलेली सर्वांत सुंदर वस्तू त्याला सोडून पुढे जावं लागलं... तेही त्याच समाधानानं ! कदाचित पुढच्या टेकडीवर अजून सुंदर गोष्टी असतील.. आणि तोपर्यंत हे आठवणींचे गाठोडे रिकामे होईल आणि त्या गोष्टींसाठी जागा राहील ह्या अपेक्षेने...


परत येता येता त्याच्या बाइक चे फायरिंग थोडे बदलल्या सारखे वाटत होते..... पण वेग मात्र कायम होता... .. !!
(क्रमशः)

--
आशुतोष दीक्षित

काय करु ?(भाग ३) पुन्हा एकदा...

(My Old Article, published at manogat.com- on 21st June 2010)

काय करु ?(भाग ३) पुन्हा एकदा...
(सोम., २१/०६/२०१० - ०४:३४)

तो 'विविधभारती' ऐकत ऐकत गादीवर लोळत पडलेला.. अचानक फोन ची रिंग वाजली.. एक मिसकॉल होता, त्याने पाहिला.. नंबर नवीन होता, त्याने देखिल परत मिस कॉल दिला.. तर पुन्हा तेच ! तो कॉल करणार एवढ्यात एक मेसेज आला..

"गए दिन की तन्हा था मैं अंजुमन में.....यहाँ अब मेरे राज़दाँ और भी हैं !
अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं... सितारों से आगे जहाँ और भी हैं.... "

आईंशपथ...., आत्ता एका सेकंदापुर्वी विविधभारती वर हे ऐकले होते आणि लगेच त्याच ओळी मेसेज म्हणून... ? आता कॉल करून पाहायलाच हवे...

आजवर अनेक अश्या आशयाचे मेसेज झाले, कॉलेजमध्ये तर फुकट म्हणून मित्रांना देखिल चिकार असे प्रबोधनपर विचार पुरवले जायचे... पण आज इतक्या दिवसाने ? आणि हे देखील कधी... माझ्या मोबाईल वर असले काही यायची सवय मोडल्यानंतर ?

--"हॅलो... आपल्या मेसेज बद्दल धन्यवाद.. माझ्या मोबाईलला एकदम १२-१८ महिने मागे जाऊन आल्यासारखं वाटलं असेल..."
!~ 'आणि तुला ? सॉरी तुम्हाला ?'

हा गोड आवाज कुठेतरी ऐकला आहे, पण नक्की ध्यानात येतं नाही.. १स्ट इयर ला कॉलेजच्या गेट-टुगेदर मध्ये अँकरिंग करणारी सीमा ? नाही ती तर कधीच लग्न करून गेली पॅरिस ला.. मग कंपनीत नव्याने रुजू झालेली निशा ?... पण तिला तर नंबरही दिलेला नाही आणि हे असे काही ती कशाला पाठवेल ?.... मग कोण बरं...


--"हो, मला पण, माफ करा मी हा नंबर ओळखला नाही..."
!~ 'नवीनंच आहे, म्हटलं जुन्यावर कॉल करत नाही....नवीन घेऊन तरी बघू काही फरक पडतो का ?'
( ह्या वाक्यातल्या मिश्किल विनोदाने तिचे हास्य बाहेर पडले आणि त्यावरून चटकन ओळखले गेले-- "ती" बोलत होती )


--"तू.... ? आज इतक्या दिवसाने" ?
!~ 'का रे ? नको होता करायला फोन?'


--"तसं नाही, पण जेंव्हा वाट पाहत होतो तेंव्ह्या काहीच कळवले नाहीस... साधा एक मेसेज पण.... फक्त 'गुड-बाय' एवढं देखील नाही?"
!~ 'त्याने फरक पडला असता' ?
-- "नसता" ?
!~ 'असता कदाचित पण, मला तुझी मैत्री जास्त मोलाची होती...
-- "ही अशी ? मी तुझ्या उत्तरानंतर देखील मित्र म्हणून राहिलोच असतो तुझा..."


! ~ 'आज तरी भांडू नकोस ना प्लीज... आज खूपं छान मूड आहे माझा... माझा माझ्या ऐलर्जी वर कंट्रोल आला आहे,,, कॉफी ला भेटतोयस ?'
-- "मी सोडली".
!~'का' ?
--"कारण विचारू नकोस"..
!~ ' कारण द्यावंच लागेल, तुला भेटायचं म्हटलं की पहिले कॉफी शॉप आठवतं... किंवा उलट म्हण हवं तर... जरी मी प्यायले नव्हते तरी तुझ्यासोबत तिथे घालवलेले काही तास... हात हातात घेऊन तुला बोलताना असे वाटले होते की तुझा विचारांना कॉफीची एक मऊ मुलायम झालर आहे.. कॉफीचा कप असला की तू फक्त तुझा असतोस... गेलं वर्षभर मी ट्रिटमेंट घेतलीये.. म्हणजे आपण भेटलो तेव्हाही चालूच होती पण सांगितलं नव्हतं... आणि आज मी कॉफी ला चल म्हणतिये तर तुझे काय हे असे ?
--"जाऊदे दे स्वीटी.. आपण दुसरं काहीतरी बोलूया ना.."
!~ 'अरे पण...'
--"लग्नाची पत्रिका द्यायला भेटणार आहेस का ?"
!~'तुला मी फक्त तेव्हाच भेटायला हवी आहे का' ?


काही प्रश्न घातकच... त्यातही ते ज्या वेळेवर विचारले जातात त्यावर त्याचा रामबाण ठरतो.. ! वपुंचे वाक्य आठवले - "आयुष्यात एक क्षण भाळण्याचा बाकी सगळे सांभाळण्याचे.. " ह्या क्षणाला पुरता न्याय देऊनही सांभाळायचे क्षण बहुदा रितेच राहिले असे वाटले... त्याच रितेपणावर मात करायला पुन्हा एकदा भेट व्हावी आणि नक्की तिला काय म्हणायचे आहे हे तरी जाणून घ्यावे ?


तिचे लग्न ठरले असेल ? की झालेही असेल ? नवऱ्याला बरोबर घेऊन तर येणार नाही ना ? लग्न झालेच नसेल? एक ना अनेक विचार... मी नाही म्हणू शकलो नाही !


येतो म्हणून 'ती' ला ठिकाण आणि वेळ विचारून घेतली... घरातून निघताना डोक्यातली यंत्र अनाहुतपणे मागे फिरत होती -- काय करू ? ह्या एका प्रश्नामुळे ...जो सुखाचा काळ पाहायला मिळाला तोच ह्या प्रश्नाने हिरावून देखील नेला होता... अनेक दिवस ह्याच विचारांनी मनात वादळे उठवली होती, आणि काळ - मीच सर्वात मोठा डॉक्टर आहे हे पटवून देऊन अगदी इतरांना समजवण्याएवढा अनुभव गाठीशी बांधून गेला होता... उरला होता फक्त किशोर च्या गाण्यावर नाचणारा देव आनंद, नौ-दो-ग्यारह पाहून घेतलेली आणि शो केस ला लटकवलेली मोठी हॅट... आणि ताजमहालाचा फोटो. ~!

आज इतक्या दिवसांनी भेटतोय...नुसतेच विचारांच्या वादळावर स्वार होऊन चालणार थोडेच... सामाजिक शिष्टाचार म्हणून काही ना काही हाती न्यावंच लागेल... पण परिस्थिती कळल्याशिवाय काय न्यावे हे देखिल एक कोडेच..

पिवळा गुलाब सर्वांत उत्तम अगदी कॉलेज काळापासून ते आजपर्यंत... ही ट्रिक सर्वांत सोयीस्कर आणि श्रेयस्कर.... नक्की ठरले !

गाडीत पेट्रोल चेक केले, आणि अक्सेलेटर पिळला.... आज अनेक दिवसानंतर भेट होणार होती, अगदी तिच हुरहुर.. . तेच आकर्षण... नसले तरीही,
एका अनाकलनीय ओढीने तिथे पोहोचण्याचे वेध लागले होते... ...... ...बहुदा काही उत्तरांसाठी.. किंवा नव्याने प्रश्न पाडून घेण्यासाठी ?.... ...
.........................

--
आशुतोष दीक्षित

काय करू ? (भाग-२)

(My Old Article, published at manogat.com- on 17th june 2010)

काय करू ? (भाग-२)
(गुरु., १७/०६/२०१० - ०३:४५)

हॅलो स्वीटी...

नेहमीप्रमाणे त्याने कॉल ची सुरुवात केला, आज तो गेले काही दिवस मनात आलेले सगळे विचार तिच्यासमोर मोकळे करणार होता.. खूप इच्छा होती की समोरासमोर जाऊन एखाद्या कॉफी शॉप मध्ये बसून अगदी हिंदी सिनेमात दाखवतात तसेच... हातात हात घेऊन काहीतरी सीरियस/रोमँटिक बॅकग्राउंड म्युझिक वर एकदम संथ वाऱ्याच्या लयीवर तिच्या चेहऱ्यावर येणारे केस मागे सारून एखादं गाणं गावं... आणि त्या गाण्यातच तिला सगळं उमजावं... किंवा स्टिव-वंडेर च्याच चालीवर "आय जस्ट कॉलड... टू से... आय लव्ह यु... "म्हणत एकाच ओळीत मनातले भाव सांगावे... पण छे.. हे असले प्रकार फक्त सिनेमा/अल्बम्स मध्येच ठीक असतात.. (नाही का?)

"बोला सर.. " तिचे उत्तर...
"काय गं? ४-५ दिवसांनी कॉल करूनही एवढा थंड रिस्पॉन्स? ऑल वेल...? "
"नाही नथिंग इस वेल.. कटकट चालू आहे कॉलेज मध्ये, घरी सगळीकडेच... "
"ओह, कटकटीचा विषय ? "
"काही विषय लागत नाही... मिळेल त्या विषयावरून कटकट चालू होते....

"माझ्याबद्दल बोलतीयेस ? "
"हो... नाही म्हणजे... आय डोंट नो.. "

"मी जर, इ थिंक आय एम फॉलिंग इन लव्ह विथ यु... असे म्हणालो तर ?"
"म्हणतोय्स की म्हणणार आहेस ? "

म्हणतोय गं स्विटी...पण हो नक्की काहीच माहीत नाहीये, फक्त वाटत आहे असं....

त्यानंतर त्यांच्यात काय चर्चा झाली माहीत नाही, पण त्याच दिवशी संध्याकाळी 'तो' आपल्या त्या सखी कडे जाउन आला, तिने विचारल्यावर तो म्हणाला, "बहुदा ताजमहाल फोटोतच जास्त छान दिसतो नाही ? " तिला कळले... तिने त्याला बसायला सांगितले - अवांतर गप्पा मारायची वेळ नव्हती...

तिने विचारले - आर यू ओके ?...
तो:येस पर्फेक्टली... तुला तर माहीतच आहे... "जो भी प्यार सें मीला... हम उसी के हो लिये... "
--दॅटस द स्पिरिट.... चीअर अप.. मी कॉफी आणते,
तोः नको... कॉफी नको. मी सोडली!
-- का रे ? अचानक असे का म्हणालास ?

तोः नंतर सांगेन कधीतरी...

-- बरं, मग आता घरी जाणार ना ? काही वाटलं तर फोन कर.. आणि हो तुझ्या चेहऱ्याची ठेवण पाहता तो फक्त हसताना चांगला दिसतो बर का

तोः नक्कीच !

तो घरी गेला-- नंतर अनेक दिवस आम्ही गप्पा मारत होतो पण "ती" विषयीच्या नाहीच.. ही इस अ स्पोर्ट'- आता तो बाकिच्यांना 'ताजमहालाचे उदाहरण देतो " ... पण कॉफी मात्र आज देखील घेत नाही...कारण ?...... फक्त एकच... 'ती' ला कॉफी ची ऐलर्जी होती...

--
आशुतोष दीक्षित

काय करू?

(My Old Article, published at manogat.com- on 14th June 2010)
काय करू?
(सोम., १४/०६/२०१० - ०१:०८)

"हॅल्लो स्वीटी..! "
ह्याच शब्दाने चालू होणारा फोन घेण्यासाठी ती गेले काही महिने अगदी आतुर होती... म्हणजे थोडक्यात सकाळी हा फोन आला नाही तर दिवस चांगला जाईल का नाही? आणि हा फोन रात्री आला नाही तर रात्र छान जाईल का नाही? हे प्रश्न पडावे एवढी आतुर...

-- "प्रेमाची भानगड असेल".... अरे, लगेच असा निष्कर्ष काढून मोकळे काय होता? ऐका तरी काय सांगतोय ते..

तर, ही मुलगी... तशी सुंदर, सुस्वभावी आणि व्यवहारी... परंतु तेवढीच चूझी.... आपले मित्र निवडणे, कोणाला किती अंतरावर ठेवणे हे सगळे ज्ञान जणू तिला विधात्याने उपजतच अर्पण केले होते... अनेक दिवस घराबाहेर राहूनही असेल कदाचित... पण, स्वतःची जबाबदारी घेणं.. पेलणं तिच्या अंगवळणी पाडलेलं होत... शिक्षण चालूच होतं, आणि त्याचबरोबर 'वर' संशोधन देखील...

ठराविक वयानंतर स्वतःच्या तोला-मोलाचा मुलगा पाहणे, त्याला पसंत करणे किंवा नकार देणे हे खरे तर मुला/मुलींच्या नित्य नियमात असते.. काही दिवस मजा वाटते... पण मग नंतर नंतर त्याच तिकिटावर तोच खेळ बघायचा कंटाळा यायला लागतो... शिक्षण किती... वय किती... पगाराच्या अपेक्षा काय... मुख्य म्हणजे जात कोणती? पोट-जात काय? मंगळ आहे की नाही? घर.. पक्की नोकरी... गाडी... घरची माणसे इ. इ. सवयीचे प्रश्न विचारले जातात आणि इंटरव्यू ला आल्याप्रमाणे सर्व प्रश्नांची जशी तयारी केलेली असते तशी उत्तर दिली जातात... पण मग अनेकदा सगळे प्रश्न हवे तसे उत्तरले जातात/जात नाहीत... गोष्ट बाकी राहते ती एका 'क्लिक' ची!

अमर-अकबर-अँथनी मधला अमिताभ सांगतो तेच खरं, "दिमाग मे घंटी बजना चाहिये... " मग हिच घंटी कधी हो म्हणते तर कधी सगळ्या प्रश्नांची हवी तशी उत्तरे मिळून देखील हेरा-फेरी मधल्या सुनील शेट्टी सारखी "गोलमाल है भाई सब गोलमाल है" असे गाणे ऐकवते...

तर ही मुलगी देखील अशीच, उच्चशिक्षित, मध्यम उच्चभ्रू घराण्यात वाढलेली, थोडीशी हट्टी, रागीट, चिडखोर पण बिघडलेली मात्र नाही... आपल्या आयुष्याचा जोडीदार शोध चालू ठेवून उरलेले शिक्षण पूर्णं करत होती... लग्न तर करायचे आहेच, पण इतका आटा-पिटा का चालला आहे हे न कळून किंवा कळूनही ही गोष्ट अमान्य होती, त्याला कारणही तसंच - जो उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू मुलगा सांगून येतो तो ७-८ वर्षांनी मोठा ( आताच्या मुली अंकल कॅटॅगरी असे म्हणतात.. ) मग तो सुद्धा रीतसर एखादी बिझिनेस डील केल्यासारखे बघण्याचा कार्यक्रम करतो आणि तेच प्रश्न तीच उत्तरं..! ह्या सगळ्याला थोडी कंटाळली होती ती आणि त्याहूनही जास्त चालीरीती/जात-पात ह्यांच्या रिस्ट्रिक्शन्स ला वैतागली होती...

असेच एकदा काय कोण जाणे, सोशल नेटवर्किंग साईट्स ची ओळख झाली.. तिथे अकाउंट ओपन करून तिने आपल्या चिक्कार जुन्या मित्रमंडळींना शोधले... हो, कॉलेजमध्ये असताना नेहमी ज्याच्यासोबत नाव जोडले जायचे... मित्र-मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये कायम चिडवा चिडवी व्हायची... व्हॅलेंटाइन डे ला आवर्जून कॉलेजातल्या सगळ्यांचं लक्ष 'तो' आणि 'ही' काय बोलतात किंवा ह्यांच्यामध्ये काही होणार का नाही ह्याकडे असायचं... अगदी हिच्या घरच्यांशी पण त्याच वागणं चांगलं होत.. मिळून मिसळून, न जाणो तिच्या घरी पण हा आवडला असावा... पण तेव्हा सुद्धा पहिले काही दिवस निखळ मैत्री, मग छान मैत्री, मग अर्धवट प्रेम आहे की नाही हे कंफ्युजन आणि ह्यातून बाहेर पडण्या अगोदरच त्याने सांगितलेले वाक्य 'आपण मित्र आहोत ग.. लग्न वगैरे असा काही विचार पण केला नाहीये.. " आणि त्यानंतर हळू हळू दुरावलेली मैत्री....

तो देखिल भेटला ह्या मायाजालावर - एकमेकांची प्राथमिक चौकशी केल्यावर पुन्हा गाडी जुन्या रुळावर धावणार की काय? असे वाटायला लागले परंतु ह्या वेळी मात्र त्याने पुढाकार घेतला.. त्याने विचारायला सुरुवात केली - 'ती' तर थक्कच झाली की माणूस दोन वर्षात एवढा बदलतो? आज अचानक त्याला माझ्यात असे काय दिसले जे २ वर्षांपूर्वी नव्हते? आता तो परत जवळीक करायला लागला की हिच्या डोक्यात 'हेरा-फेरी' ची घंटी वाजते... मग ती तरी कसे काय ऍडजस्ट करणार..

! " --- नाही! उगीच जुन्या आठवणींना ओल देण्यात अर्थ नाही... तू दिसलास, आपण मित्र होतो म्हणून तुला ऍड केले.. बाकी आता मला काहीही रस उरला नाही... जे झालं ते झालं.. आता दोघही आपापल्या वाटेने पुढे जाण्यातच भलाई आहे... " -- --ह्या धारदार शब्दांनंतर मात्र त्याने ह्या गोष्टीला पुन्हा छेडले नाही... त्याने 'तीच्या घरच्यांशी अजूनही सलोखा ठेवला आहे. पण 'ती मात्र मैत्री ह्याच भावनेतून ह्या सगळ्याकडे पाहत आहे... आणि तसेच तिने घरच्यांना देखील कळवले की आता कृपया परत गळ घालू नका...

असो,

आतापर्यंतचं सगळं बॅकग्राउंड किंवा फ्लॅश बॅक म्हणा हवं तर... कारण खरी गोष्ट पुढेच आहे..

तिला काही दिवसांपूर्वी एक निनावी फ़्रेंड रीक्वेस्ट आली... त्या प्रोफाइल चा मालक कोण हे जाणून घ्यायला तिने म्युच्युअल फ़्रेंड्स लिस्ट पाहिली... तिची जुनी मैत्रीण जी अगदी हायऱ्हेल्लो कॅटॅगरीतली... तरी तिने ऍड केले...! आणि अनेक दिवस काहीच रिप्लाय नाही..... थोड्या महिन्यांनंतर तिला जनरल, डे टू डे लाईफ मध्ये आपण गप्पा मारतो तसे चॅट मेसेज यायला लागले... आणि मग हळू हळू ते चॅट कसे वाढत गेले कळलेच नाही... ना तिला... ना त्याला...!

चॅटिंग करता करता एकमेकांबद्दल ओळख करून घेतली गेली, आवडी-निवडी, दैनंदिन कार्यक्रम, घडामोडी, इ. इ. वर गप्पा होत गेल्या...फोटो पाठवले गेले....व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पण... तासन-तास गप्पा मारून पोट भरेना म्हणून की काय त्याने तिला फोन नं मागितला...

अर्थातच तो पहिल्या झटक्यात मिळाला नाहीच...अनेक दिवस तश्याच गप्पा चालू राहिल्या तो २-४ दिवसांनी आठवण करून द्यायचा की अजूनही फोन नं शेअर कर की गं....एक दिवशी असंच गप्पा मारता मारता तिला काय क्लिक झाले... तिने नंबर दिला.. आणि त्यानंतर...

(नाही --एसेमेस/एमेमेस/फोन करून त्रास देणे, वगैरे असले काही प्रकार घडले नाहीत... ) जवळ जवळ आठवडाभर "त्याने" तिला फोन केला देखील नाही... जणू नंबरच नव्हता... --- त्याला तिच्यामध्ये स्वतःविषयी आत्मविश्वास निर्माण करायचा होता कारण तिने देखील तो नंबर अतिशय विश्वासाने दिला होता... एके रात्री असेल बोलणे चालू असताना त्याने विचारले मी कॉल करणार होतो पण रात्र खूप झालीये, आता माझा नंबर देतो मिस कॉल..... आणि त्या रात्रीत इकडून तिकडे जवळ जवळ १० मिसकॉल्स शेअर झाले..

फोन केल्यावर काय बोलावे सुचेना, पण जे चॅट वर तेच फोन वर असे समजून त्याने रोजच्या प्रमाणे गप्पा मारायला सुरुवात केली.. आणि तिलाही कोणा फालतू माणसाला नंबर न दिल्याचा आनंद झाला.

दिवसांमागून दिवस जात होते... ओळख घट्ट होत होती, मैत्री फुलत होती आणि एक जवळची मैत्रीण/मित्र हा हुद्दा त्यांनी एकमेकांना बहाल केला देखील...

तो तिच्याशी नेहमी गोड बोलायचा, तिची सगळी गाऱ्हाणी ऐकायचा, जमल्यास ती आपल्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करायचा, जमले तर १००% नाहीच जमले तर ५०% तरी तिचा मूड जोवर कॉल चालू आहे तोवर टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न करायचा... अर्थात हेच कारण त्यालाही लागू होते.. कारण हा सुद्धा तिच्याशी बोलून एकदम रिलॅक्स व्हायचा... दिवसभर ऑफिसमध्ये कटकट करून घरी आल्यावर चहा घेताना किंवा उद्या ऑफिस ला पुन्हा तोच वैताग, चला निदान आतापुरता हा सकाळचा चहा तरी मस्त हुशारी आणून देईल... ह्या भावनेमागचे रिलॅक्सेशन तो अनुभवायचा..

एकमेकांना मनापासून पसंती होतीच, मैत्रीची... 'ती' एकदा बोलता बोलता म्हणाली 'तू एवढा का रे चांगला आहेस? मी प्रेमात पडेन बरं का... " ---- -- नको गं, प्रेमाबिमात नको पडूस.. मी एवढाही चांगला नाहीये.. -- हे त्याचे उत्तर..!

लाडिक शब्द हे दोन जिवांना एकत्र/जवळ आणण्यासाठी मोठे कारक ठरतात... आधी नुसते हेल्लो, मग हाय डिअर.. मग हेल्लो बेबी... मग स्वीटी... आणि शेवटी हे स्विटी... इथवर येऊन पोचले..

दोघांना माहीत होते की लग्न संस्थेच्या निकषात आपले हितसंबंध बसत नाहीत.. त्यातही 'तो' प्रेमात पडू नको म्हणतो आणि 'हि' तू कोण सांगणारा? मी प्रेमात पडली आहेच.. तुला पडायचं की नाही हा तुझा निर्णय असे म्हणणारी..
(अजब प्रेम की गजब कहानी शीर्षक असेच कसेतरी सुचले असणार... )

एकमेकांबद्दल वाटणारी ओढ-- फक्त शारीरिक किंवा मानसिकच नाही.. पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असे वाटून गेले की ह्या मुलीची/मुलाची ओळख पाळख नव्हती... तरी आपण इतके बोललो... भावनिक अर्थात सारासार विचार करूनच पण गुंतत गेलो.. तर ही व्यक्ती नक्की आहे तरी कशी? भेट कधी होणार? निदान एकदा तरी भेट झालीच पाहिजे... एकमेकांवर एवढा विश्वास ना त्याने आधी कोणावर ठेवला होता ना तिने... त्याला तर आश्चर्यच वाटत होते... स्वतःवर एवढा विश्वास कोणी ठेवू शकेल हे त्याच्या ध्यानी मनी देखील नव्हते....

परंतु भेट ठरवून देखील काही कारणास्तव ती पुढे ढकलली जात होती... ह्यामध्ये अनेकदा एकमेकांवर लटका राग-चिडचिड-प्रेमळ गप्पा.. हट्ट... समजूत काढणे.. आणि एकमेकांसाठी डोळ्याच्या कडांवरून पाण्याचे थेंब ओघळून टाकणे झाले..

"हाय स्विटी" मी पोचलो.. तू कुठे आहेस? असे म्हणत एकदा तो तिच्या घरी गेला सुद्धा... ती देखील त्याच विश्वासाने त्याला भेटली... काही तास एकत्र घालवून त्यांनी एकमेकांना अजून जाणून घेतले... गप्पा मारल्या... प्रेम-मजनुगिरी-लग्नसंस्था-एकमेकांच्या मित्र मैत्रिणींच्या नावाने चिडवा चिडवी इ. इ. खोड्या काढल्या.

आणि परत जाताना तिने त्याला सांगितले --> मी एका मुलामध्ये ईंटरेस्टेड आहे... त्यानेही मला प्रपोज केले आहे... आपल्याप्रमाणेच त्याची आणि माझी भेट झालीये.. प्रत्यक्षात अजून भेटले नाहीये... पण तो जवळपास ८ वर्षाने मोठा आहे... शिक्षण जेमतेम आहे... जात माहीत नाही.. आणि घरची परिस्थिती पण नॉर्मलच आहे... पण त्याने मला खूप स्वप्ने दाखवली आहेत... खूप Promising ahe तो.. काय करू?

--तो म्हणाला " तू सुज्ञ आहेस, स्वतःचा निर्णय घेऊ शकतेस, एकच सांगतो.. आई वडिलांना दुखवू नकोस.. अगदीच निर्णय ठरला असेल तर पुन्हा एकदा शांतपणे विचार कर... तू काय लगेच लग्न करत नाहियेस ना? मग जे काही ६-८ महीने तू ठरवले आहेस त्यामध्ये Think wisely... & accordingly take a call... प्रत्येक वेळी निर्णय क्षणात देता येत नाही. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय दीर्घायुष्यात डोळे ओलावतात... आणि योग्य निर्णय जर लांबवले तर आपण आयुष्यभर 'चुकलो' हे खडे फोडावे लागतात... त्यामुळे स्वतःच्या सदस्द्विवेकाला जागून आणि सारासार विचार करून निर्णय घे... --- > *विषय सीरियस होत गेलेला "त्याच्या ध्यानात आला आणि वातावरण मोकळे करायला तो म्हणाला...

-- "आणि अगदीच जर कोणी नाहीच सापडला तर २ वर्षांनी आपण लग्न करू.. :)" एवढा वेळ अगदी गप्प बसलेली ती मनापासून हसली... लटक्या रागाने तिने ह्याला चापटी मारली आणि परतीचे तिकिट त्याच्या खिशातून बाहेर काढून वेळ चेक करून घेतली..

-- तो परत निघाला... पण येताना त्याचे मन शांत नव्हते... तिला भेटून आल्यावर असे वाटले की खरंच ही खूप छान मुलगी आहे.. आणि न जाणो पुन्हा एवढी चांगली मुलगी आपल्याला मैत्रीण म्हणून तरी मिळेल की नाही? प्रेमात पडू नकोस असे आपणच बजावत होतो तिला पण आता आपल्या मनात देखील अशी चलबिचल का? केवळ ती दुसऱ्या कोणाची होणार/होऊ शकेल म्हणून? की खरंच असे काहीतरी मर्मबंध आहेत... रेशिमगाठी आहेत की ज्या एकमेकांना भेटून मोकळ्या झाल्या आणि अधिक स्पष्ट दिसू लागल्या...

ती कन्फ्यूज... तो वैचारिक पातळीवरून कधी तळ्यात तर कधी मळ्यात... बरं मनातले तिला सांगावे तर तिला काय वाटेल? न सांगावे तरी पंचाईत... घरी परतल्यावर त्याने त्याच्या सर्वांत जवळच्या मैत्रिणीला साद घातली... काय करू?

-- एकच प्रश्न, 'ती' ने त्याला विचारला... 'त्या'ने त्याच्या मैत्रिणीला विचारला...

तो म्हणाला:- मला कबूल आहे की तिला वाईट वाटू शकेल किंवा मी तिचा संभ्रम अजून वाढवेन पण मला हे सांगायचेच आहे आता... कारण ती कायम मला म्हणायची की ती ऑर्डिनरी आहे आणि मी खूप सुंदर... निदान ह्या एका वाक्याला पुसून टाकायला तरी मला तिला हे सांगायलाच पाहिजे... की तुझ्यात देखील जादू आहे... मी भले सुंदर असेन.. पण तू अंतर्बाह्य सुंदर आहेस आणि तेवढीच निर्मळ देखिल... त्यामुळे न्यूनगंड बाळगू नकोस... इव्हन यू कॅन बी डिमांडिंग ... :)

मैत्रीण ::-> खरं सांगू? - दोन पैलू आहेत एक म्हणजे तू तिच्या प्रेमात पडत आहेस, पण तुला कळत नाहीये किंवा अजून वेळ हवा आहे आणि तो तिने तो वेळ द्यायची तयारी दाखवली तर?... ही एक गोष्ट... आणि दुसरी म्हणजे तिने सपशेल नकार दिला... की तिला आता त्या दुसऱ्या मुलामध्ये इंटरेस्ट अश्या लेव्हल वर डेव्हलप झालाय की तुला त्या जागी पाहू शकत नाही ?

==> दोन्ही पैलू बरोबर आहेत, तिच्या भावनांना तिच्याशिवाय कोणीही समजू शकणार नाही... पण हा तिढा तू बोलल्याशिवाय सुटणार देखील नाही... त्यामुळे तू तिला सरळ सांग.. तुझ्या मनात काय चालले आहे.. भले ते काहीही असो.. इतके दिवसांच्या मैत्रीने तिने तुला एवढे नक्की ओळखले असेल.. नाहीच तर निदान आपण बोललो आहोत आणि आता तिचे उत्तर किंवा सामोपचाराने ह्या विषयावर गप्पा मारता येतील... एवढे तरी स्वतःचे मन मोकळे करून घे..

--> समजा ती नाही म्हणाली तर?

==> तर काय? तशीही ती तुझ्यासाठी एक पाहुणी होती... जीने तुझ्या आयुष्यात येऊन तुला प्रेमात पडणे शिकवले... अगदी प्रेमात पडणे नाही तर निदान एकमेकांबद्दल भावनिक ऍटॅचमेंट तरी तुला समजली हेच खूप आहे अरे मित्रा आता, अस बघ.. ताजमहाल अख्ख्या देशात प्रेमाचं प्रतीक आहे...आपण तिथे गेलो की भारावून जातो.. त्या वास्तूच्या, कलेच्या, अविश्रांत श्रमाच्या आणि तिथल्या वातावरणाच्या प्रेमात पडतो...पण म्हणून काय कोणी ताजमहाल घरी घेऊन येऊ शकतो का?
त्याच्यासमोर बसून फक्त फोटो काढून आणू शकतो.. एक आठवण म्हणून, आणि आयुष्यभर पुरेल अशी त्याची प्रतिमा डोळ्यात साठवून...असे समज की शहाजहांन च्या ताजमहालापेक्षाही काहीतरी सुंदर तुझ्या सहवासात होते... जे काही दिवस असो पण त्यामुळे तू तुझे काही तास फक्त स्वतःसाठी आणि आनंदी घालवलेस... १००% प्रेम नाही पण प्रेम ह्या भावनेला स्पर्शून जाणारा एक दुवा तुला अनुभवायला मिळाला... बस्स.. अजून काय पाहिजे? अरे ह्या आठवणींपुढे तर ताजमहालासमोर काढलेला फोटो देखिल फिका पडेल...

अरे असे कितीतरी लोक मी पाहते आजू बाजूला... विचार न करता येणारे, अती विचार करून संभ्रमात पडलेले... काही नुसतेच आनंद वेचायला आलेले तर काही नुसतेच वाटायला आलेले... व्यक्ती तितक्या प्रकृती... आयुष्यात काही प्रसंग असे असतात की जे आपल्याला मनस्वी आनंद किंवा दुःख देतात.... आपण काय कमावले ह्याची यादी बहुतेक जगजाहीर असते, पण आपण काय गमावले ह्याचे नोटबुक हे स्वतःजवळच असते... आणि ह्या नोटबुक मध्ये आपण "बोलून दाखवण्याचा मोका सुद्धा गमावला" हे यावे यापेक्षा मोठी ट्रॅजेडी दुसरी नाही... तेव्हा, मुक्त कंठाने तिला सांगून टाक... तू मोकळा हो आणि तिलाही मोकळा विचार करू दे.... ती तुला काही सांगेल/ऐकवेल... शांतपणे ऐकून घे... आणि काही झाले तरी तिला तुझ्या मैत्रीचा तसाच आधार दे... अर्थात तिला हवा असेल तर.. नाहीतर "चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो.. " म्हणत एक शेवटचा पिंग, किवा चॅट वर स्माइली पाठव...कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही;

ते म्हणतात ना " नथिंग इज कॉन्स्टंट इन धिस वर्ल्ड; बट द चेंज... " तसेच काही... लक्षात ठेव, "लाइफ इज टूऽ शॉर्ट टु कंप्लेन अबाऊट एनिथिंग ... "

आणि हो तुझे जुने गाणे गुणगुणत राहा -- > "हम है राही प्यार के... किंवा... प्यार बांटते चलो... :) "

काय होतंय ते मला कळव मात्र नक्की..

~~ ऑल द बेस्ट ~~

--
आशुतोष दीक्षित

रॉकेटसिंग => (कॅब चालक,सगळेच...)

(My Old Article, published at manogat.com- on 14th March 2010)

रॉकेटसिंग => (कॅब चालक,सगळेच...)
(रवि., १४/०३/२०१० - ०९:३०)

पॉकेट मे रॉकेट है... अस म्हणत मार्केटिंग करणारा रणबीर आठवतोय ना? पण मला मात्र हे गाणं लागलं, कि रणबीर कमी आणि आमचे कॅब चालक'च जास्त आठवतात... आणि मनातल्या मनात आपोआप ओळी बदलतात -> 'हाथ में रॉकेट है.. हाथ में..."

त्याच कारण देखिल तसचं आहे, अहो हे कॅबवाले म्हणजे सुसाट, भन्नाट, चिर्फ़ाड, म्हणजे काय एकदमच लै भारी गाडी चालवतात हो.. ( विशेषणांबद्दल सॉरीच.. पण अवधुत गुप्ते चे सततचे सारेगमप चे एपिसोड पाहून होत असं कधी कधी...) गाडी चालवत नाहीत तर उडवतात... मी तर त्यांना ड्रायव्हर म्हणतच नाही, पायलट म्हणतो पायलट !

एकदा मारुती शिकायला जात असताना माझे कोच म्हणाले होते 'ड्राईव्हिंग इस वेरी एझी... नॉट ऍट ऑल अ रॉकेट सायन्स'... हे वाक्य आणि आज स्वतः घेत असलेले अनुभव ह्यावरून असे वाटते की 'ड्राईव्हींग लाईक अ रॉकेट इस अ सायन्स/टॅक्ट :) ' & इटस नॉट ऍट ऑल एन ईझी टास्क...

शक्यतोवर मी पुढच्या सीट वर बसतो, (पहिले कारण जिवाची भीती, आणि दुसरे म्हणजे नो ऍडजस्टमेंट टेंन्शन..)त्याने काय ना समोरून/शेजारून येणारे संकट अथवा संधी ह्यावर चटकन नजर पडते... आणि मोटार ड्रायव्हिंग स्कुल मध्ये घेतलेले सो कॉल्ड ट्रेनिंगचे अनुभव आणि वास्तविकता ह्यातला फरक जाणवतो... आणि आपल्या अनुभवात/शिक्षणात भर'च पडते...

कधी कधी तर मला हे लोकं आधुनिक श्रीकृष्ण वाटतात...जणू आपल्या ईच्छित स्थळी पोहोचेपर्यंत ईतक्या यातना/श्रम/संकटे सोसलेला तो रथ, हे उतरताक्षणी भस्मसात होऊन जायचा..

स्टेअरिंग हातात आले, की ह्यांच्या रक्तात कोणत्या पेशी संचारतात काही कळत नाही.... अगदी कमी प्रमाणात वापरला जाणारा हॉर्न/ब्रेक आणि डावी बाजु, उजवी बाजु, ओव्हरटेक, मिनी रिव्हर्स, ९० डिग्री टर्न, ४५ डिग्री लॅप... हे सगळे आपसुकच होत राहते... मागे बसणारा माणुस सवयीचा असेल तर ठीक, नसेल तर दर १० मिनिटाने, "भाउ, सावकाश जाऊदे बरंका, घाई नाहीये" हे वाक्य... !

आणि मराठी मध्ये भाउ, बाकी ठिकाणी भैया, आमच्या एका ड्राईव्हर ने तर माझ्या एका मराठी मैत्रीणीला सरळ तोंडावर सांगितले " मॅडम, मी पवार आहे,पुण्याचाच आहे, भैया नका म्हणू प्लिज.. ते बाहेरगावहून आल्यासराख वाटतंःD ! आता हे असे बोलल्यावर मी शेजारी बसून नुसते कसे ऐकणार...? मी त्याला मग उगीचच पकवायला लागलो.. -मस्त रे कांबळे (सॉरी पवार.. ) :D, पुण्यात कधीपासुन, कुठे राहतो वगैरे वगैरे...

गाडी अधून मधून थोडे थोडे गचके खात चालली होती, तेवढ्यात एक काकू मध्ये आल्या... विजेच्या वेगानी आमची गाडी थोडी डावीकडे अन मग क्षणार्धात उजवीकडे नेत त्या काकुंन्ना कट मारण्याचे प्रात्यक्षिक दाखवल्यामुळे आजू बाजुच्या दुचाकीस्वारांन्नी पवारांन्ना शंकास्पद/निषेधार्थक नजरा दिल्या - "हे कॅबवाले... कॉल सेंटर/ बीपीओ वाले, वाट लावतात गाड्यांची आणि चालवणार्यांची" हा मुक संदेश देत... :D

# तो बोलत होता आणि मी थक्क झालो, औरंगाबाद मधून काँप्युटरची डिग्री घेतली होती त्याने, पण तिथे नोकरी नाही म्हणून ४ वर्षांपुर्वी पुण्यात आला, नोकरीसाठी प्रयत्न केला पण इंग्रजी आणि डेअरिंग ह्या दोन गोष्टी जमल्या नाहीत..म्हणून मग मास्टर डिग्री साठी येथे ऍडमिशन घेतली... आता नुसतेच कसे शिक्षण जमेल? त्यामुळे जमेल तो जॉब करत आहे...पैसे मिळतात , काही घरी पाठवतो, काही मी वापरतो, परत कुठे जवळपास जायच झाल तर गाडी असते'च ....

तुम्हाला लेट झाल की ओरडा बसत असेल, तसाच आमची गाडी लेट झाली की आम्हाला फाईन भरावा लागतो, म्हणून मग शक्यतो आरामात चालवता येत नाही हो, आमची खुप ईच्छा असते, पण पुण्याचं ट्रॅफिक बिनभरवशी आहे ना... त्यामुळे पिक-अप झाला कि आम्हाला वेध लागतात ते वेळेत गाडी ईन करायचे... म्हणून कधिकधी थोडी जोरात जातो, पण लोकांन्ना वाटतं आम्ही उगिच गाड्या पळावतोय, शाईनींग मारतोय...इंडीका गाडी पाहिली की कॉल सेंटरवाले..हे जणू त्यांन्नी ग्रुहीतच धरलेले असते.. ! जाउद्या आपण आपलं काम अन टाईम पहायचा बाकी जाउदे काही कुठेही.. एकंदरीत बर चालुए.. बघू आता डिग्री पूर्ण झाली की बघतो नवीन जॉब, तुमच्या ओळखीत असेल तर सांगाल का.. ?!#

अरे वा ! भारी आहेस रे, सांगेन मी नक्की... एवढं बोलून होईपर्यंत स्वारगेट सोडलं आम्ही, बी-आर-टी मुळे वाट लागलेल्या रस्त्यावरून भाई- नि एक वळणदार टर्न शिताफिने घेतला, आणि मागून वाक्य आले "प्लिज जरा हळू चालवा ना... खुप जोरात चालवताय तुम्ही..." -- इतीः स्मिता.

मी: - अगं स्मिता चील... मी आहे, काही झाल तर मी हॅंडब्रेक ओढेन...

पवारः हॅंडब्रेक चा काही तसा फायदा होत नाही सर, ते आपलं कंपनी देऊन ठेवते.. काई फार फरक पडत नाही...

मीः (घाबरुन) हो म्हणा...पण चालवणारा उत्तम असला म्हणजे झालं.. (मस्का पॉलिश).. जाउ द्या निवांतपणे..(सुचना/विनंती)

पवारः टेंशन नका घेऊ साहेब, आजपर्यंत ऍक्सिडेंट सोडा, साधा डेंट पण नाहिये गाडिवर.. :D

त्या आत्मविश्वासाचे कौतुक करून आम्ही प्रवासाच्या शेवटाला आलो, गाडी थांबली - उतरताना मी आणि स्मिता एकदमच 'थॅंक्यू म्हणालो" पण स्मिता ने सवयीप्रमाणे "थॅंक्यू भैया" म्हणून मग परत... "सॉरी थॅंक्यू मी.पवार/की पवार भाउ म्हणु?" असे म्हणत उतरली आणि आम्ही कंपनीच्या पायऱ्या चढायला लागलो...

मनात एक विचार आला, काय गरज होती एवढं बोलायची ? त्याला आणि मलाही ? असं बोलायलाच पाहिजे असा काही नियम नाही, तो काम करतोय त्याचं आणि पगार घेतोय... आपली आणि त्याची संगत केवळ एक तासाभर प्रवासाची.. पण तरीही... तरीही आपण बोलतो, थोडे हसले, हसवले, आणि नाहीच तर किमान संभाषण होत आहे हा आनंद, आणि त्यातही आपण भाड्याच्या टैक्सीत बसून चाललोय ही भावना नसते म्हणुन, किंवा अनेक माहीती/नव्या गोष्टींची देवाण घेवाण होते... कोणाला हसवणे आपल्याला जमत नसेल तरी आपल्याशी बोलताना/वागताना समोरच्याला क्षणभर का होईना प्रसन्न वाटावे, आणि वैताग येऊ नये ही माफक अपेक्षा.. :D~

असे हे कॅबवाले, काधी सुखद तर कधी मख्ख प्रतिसाद देणारे, पण कामच्या बाबतीत सगळे सारखेच... कोठेही जायचे असो, सगळे शॉर्टकटस तोंडपाठ, आपल्या घराचा रस्ता सांगावा लागत नाही, एकदा एखाद्या माणसाचा पिक-अप किंवा ड्रॉप केला, कि ह्यांच्या मेमरी मध्ये एकदम फिट्ट !

ट्रॅव्हलिंग/ट्रान्स्पोर्ट सर्विस म्हणजे काय असते ते चांगल्या कॅब ड्राईव्हरला भेटून कळते...फ़क्त अंतरंग आणि बाह्यरंगातला वेगळेपणा... सततच्या वापराची ईंडीका आणि बरिच वर्ष उन्हात ठेवलेली न चालवलेली मर्सिडिज.. ह्यात भले कीतीही फरक असे परंतु, जोपर्यंट ऍक्सलेटर,ब्रेक,क्लच... आणि ड्राईव्हिंग सीट अबाधीत आहे तोपर्यंत पसेंजर आणि ड्राईव्हर ह्यांना जोडणारा दुवा म्हणजे त्या अर्ध्या तासातले संभाषण, एकमेकांच्या कामाबद्दल ठेवला गेलेला आदर.. आणि गाडीतल्या एफ. एम सोबत आपल्याला गुणगुणायला ऊस्फुर्त करणारी गाणी.. " ए भाय.. जरा देख के चलो...आगे ही नही पिछे भी, दाएं भी नही बाएं भी..." !

--
आशुतोष दीक्षित

दंत-कथा (आधुनिक) भाग-२

(My Old Article, published at manogat.com- on 3rd March 2010)

दंत-कथा (आधुनिक) भाग-२
(बुध., ०३/०३/२०१० - ०२:१४)

भाग १ वरून पुढे चालु...

"हां... ओठ, तोंड जड झाल्यासारखं वाटतयं का?" - ह्या डॉ.च्या प्रश्नामुळे मी डोळे उघडून मुकपणे हो म्हणालो, कारण जिभ उचलली जात नव्हती... बहुदा भुलीमुळे ओठ एवढा जड झाला होता की जिभ आपोआप गप्प पडली होती ....

"रोहीणी ते २०-२१ नंबर घे इकडे, नितीन - अरे सक्शन ला कोण येतयं ?त्या ग्लास मधलं पाणी बदलून टाक आणि X-Ray ची तयारी करून ठेव... " अश्या अनेक सुचना करत डॉ.नि ती अक्टोपस सारखी खुर्चीचे २ हात स्वतःकडे ओढून घेतले... डोक्यावरचा लाईट लावला.. आणि माझ्या दंत चिकित्सेला सुरुवात झाली... ५-१० मिनिटे तोंडात अनेक वेळा ड्रिल मशिन, व्हॅक्युम क्लिनर, आणि हातोडे मारल्याचा भास झाला... गेल्या वर्षी आमच्या घरात रीनोव्हेशन करत होते तेंव्हा आमच्या घराला काय वाटले असेल ते समजले.. !

साफ-सफाई झाली, पण जडत्वाचा गुणधर्म कायम'च होता.. त्यामुळेच थोडासा त्रास कमी होत होता परंतु जाणिवा पुर्णपणे रद्द करणे कोणाला जमले आहे ?... (बाळंतपणाच्या वेदनांनंतर दुसर्या क्रमांकाच्या वेदना दाताने होतात म्हणे... मी मनोमन देवाचे आभार मानले, की आयुश्यात हा त्रास बहुदा एकदाच होणार...)

डॉः "आ SSSS.... मोठ्ठा आ कर बर..." झालं आता थोडचं राहिलयं..

मीः ब्यरं, (आता तोंडात २-३ कापसाचे बोळे, जिभ खाली ढकललेली पट्टी, १ छोटा आरसा लावलेला हातोडा, २-३ सुया, आणि त्या आक्टोपस च्या पायातल्या स्प्रिंगचे ईंजेक्टर एवढे सगळे घातल्यावर किती जागा राहणार ह्यांना काम करायला... ?)

डॉः हे रुट साफ केलय आपण आता,आता केमिकल सोडतोय,आणि तात्पुरते कॅपिंग करुयात... पुढच्या आठवड्यात येऊन क्राऊन बसवून जा... कोणता हवा ते सांग, ( म्हणजे त्याप्रमाणे तुझा खिसा फाडायला... :D)

मीः जो चांगला असेल तो, म्हणजे फार महागडा नको, पण उगिच शो करण्यापेक्षा काम करता आले बीनबोभाट म्हणजे झालं तर..

डॉः ठिक आहे, मग सेमी-मेटल/सिरॅमिक करु. बस बाहेर... १५ मिनिटांत बोलावतो, एक XRay काढून पाहू मग गेलास तरी चालेल..

-- बाहेर येऊन सोफ्यावर बसलो.. ( नशिबाने एक'च जागा तरी शिल्लक होती... ) आणि अजून एक माझ्यासारखाच मुलगा आत गेला...३-४ मिनिटे मी आरामात पंख्याची हवा खाऊन देखील बुट न घालताना पाहुन रीसेप्शनिस्ट म्हणाली-"थांबायला सांगितल आहे का ? "

मीः (मग मी काय मुर्ख आहे का ? का हा पिकनिक स्पॉट आहे? आह...दुखतयं) हो ना.. !

रिसेः तुम्ही जरा तिकडे खुर्चीवर बसता का? म्हणजे बाहेर उभ्या असणाऱ्या पेशंटला मी आत बोलावते..

मीः (शहाणे, ही अजिजी माझ्यावेळेस कुठे गेली होती ग ?) हे पहा, माझा भयंकर दात दुखत आहे, मी उठायच्या/बोलायच्या मनस्थितीत नाहिये हो.. प्लिज...

टींग टींग़... बेल् वाजली आणि रिसेप्शनिस्ट आत पळाली... (वाचली बिचारी.. नाहितर ऐकवलंच असत मी तिच्या त्या "ईंटिरिअर ला सुट होत नाही" वाक्यावरुन....)

आणि मिनिटभरातच मला X-Ray साठी बोलावलं, ते झाल्यावर औषधांची लिस्ट हातात ठेवली गेली--५ गोळ्या सकाळ-संध्याकाळ, आणि मग बाहेर आल्यावर बिलाचा आकडा विचारला - तो अंदाजे खर्च ऐकून माझे डोळे दातापेक्षा जास्त पांढरे झाले..!

क्षणात'च शिताफिने दुखऱ्या दातावर हात ठेवून मी निघालो.. घरी आल्यावर सगळा वृतांत सांगीतला, आणि लहानपणापासून निट दात घासले असते, किंवा चॉकलेटस, गोळ्या कमी खाल्ले असते तर... आणि देवाने दिलेल्या लाखमोलाच्या इंद्रियांची कशी किंमत नसते.. आपण कसे दुर्लक्ष करतो... रात्रीची जागरणे, पार्ट्या, नॉनव्हेज...ई. ई. विषयांवरुन घरातच एक (परिसंवाद) वाद-संवाद रंगला...! ह्यात संवाद कमी आणि वाद'च जास्त... अर्थात वादाचे मुळ कारण शोधण्याच्या खटपटीत माझ्यावर मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या जात होत्या...! पण मला आता ह्या चर्चेला 'चावत' बसणे शक्य नव्हते व जमेलसे पण वाटले नाही !

सर्व आरोप मी कानावर घेऊन न घेतल्यासारखे केले, भूल उतरत असल्यामुळे पुन्हा सगळे घर भोवती फिरत असल्याचा भास झाला आणि डोक्यावर उशी दाबुन मी झोपून गेलो...

------ खणणणण.... खणनणण....

पहाटे ६ वाजता एवढा गजर ऐकून जाग येणारच होती, हातात काल रात्रीच्या पेपर मधल्या "दात आणि त्यांची निगा" विषयीच्या लेखाचे पान होते... आणि,

दाताला हात लावून पाहिला तर मला धक्काच बसला.. माझे दात जसेच्या तसे होते.. काहिच झाले नव्हते... मग ईंजेक्शन टोचल्याच्या खुणा पाहील्या तर त्या ही गायब.. नक्की भानगड काय म्हणून आरश्यात आ वासून पाहिले, जोरजोराने दंतमंजन घासून पाहिले पण कुठेही दु:ख्ख नव्हते, जखम नव्हती.

लेखातले काहीतरी वाचुन,प्रचंड मोठी कल्पनाशक्ती वापरून आपण एक आठवड्याचे स्वप्न पाहिले आहे हे लक्षात आल्यावर ताबडतोब त्या लेखातल्या डेंटिस्ट ला फोन केला.... " दात उत्तम आहेत परंतु फक्त रुटीन चेक करून घ्यावा म्हणतोय... काय आहे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर... " संध्याकाळी घरी येताना, विको वज्रदंती, कोलगेट टोटल, आणि झिग-झॅग ब्रिसल्स वाला ब्रश घेउन आलो... स्वप्नातल्या यातना खरचं भोगाव्या लागल्या असत्या तर ? नक्को रे देवा... म्हणत देवाला हात जोडले... !

आणि बॉस चा फोन आला... "अरे उद्या जरा लवकर ये ऑफिस ला... काम आहे"-- "ओके बॉस... डन !!"

फोन ठेवला, दात घासले आणि बिछाना गाठला-- "आजपासून रात्री काहीही वाचणे बंद असे ठरवुनच.." !

--
आशुतोश दीक्षित.

दंत-कथा (आधुनिक)

(My Old Article, published at manogat.com- on 16th FEB 2010)

दंत-कथा (आधुनिक)
(मंगळ., १६/०२/२०१० - ००:४७)

"रूट कॅनल करावं लागेल.... " असे डॉक्टरांन्नी म्हणताक्षणी----लाख्खो मुंग्यान्नी वारुळातून बाहेर पडून कडकडून चावा घ्यावा... किंवा १००-२०० कि. मी. चालवलेली गाडीच्या गरम गरम सायलेंसर चा चटका पोटरीला बसावा... किंवा फार कशाला... साखर १०० रु, डाळी ३०० रु, दुध-५० रु झाले तर तुमच्या हृदयाला आणि मेंदुला कश्या वेदना होतील? तश्या अनेक वेदनांच्या भीतीने मी अस्पषटपणे... "आई ग... " म्हणूनत्या आडव्या (लक्झुरीअस वोल्वो मध्ये बसायला आणि झोपायला एकच सिट असते तश्या) खुरचीतून उठलो... !!

(~~फ्लॅशबॅक~~)

गेला आठवडाभर, एक हात की बोर्ड वर आणि एक गालावर ठेवून काम करत होतो... प्रत्येक मित्र म्हणत होता अरे.. जा जाउन तर ये डॉ. कडे? पुढचं पुढे बघू... साल्या तुझ रडकं तोंड पाहून आमचा कामाचा ( कि कामच्या नावाखाली गुगल चैट, ऑर्कुटिंग, आणि फुकटची कॉफीपिण्याचा... ).. मुड जातो बघ...!!

खरं तर ह्याच मित्रांचा आगाऊपणा म्हणा किंवा सहिष्णुता म्हणा... माझ्या तोंडून "आई गं! " बाहेर पडले होते - कारण मंगळवारी मी दातदुखतोय असे सांगितल्यावर जो तो (आपल्या परिने इंटरनेट चा वापर करून) माझ्या दुखण्याचे डिसेक्शन करत होता..! बुधवारी संध्याकाळ पर्यंतत्यांच्या प्रयतनांन्ना यश आले, आणि टिम मधल्या २ मुली आणि ४ मुले त्यांच्या "शोधनिबंधांच्या" लिंक्स मला पाठवून माझ्या डेस्क वर येऊन बसले... !

अरे ती लिंक ओपन कर - "हा बघ हा दात आहे ना.. ह्यामध्ये असलेली पल्प टिस्शू आणि नर्व ( दुखऱ्या नसेला कितीही सोज्वळ नाव दिलं तरी काय फरक पडतो हो? )

आता ते काय करणार, हा तुझा दात - फोडणार वरून, मग ही नर्व ओढून काढणार आणि मग फिलींग केल कि झालं.... ( अरे लेका, ते ठिक आहे पण, फोडणार ह्या शब्दवर शंका येत आहे--हा काय नारळ वाटला की काय? ).... एवढ्यात या ग्रुप मधली प्रीती किंचाळत(एरंडेल ची अख्खी बाटली प्यायल्यावर करतात तसे तोंड करून) म्हणाली - ईई...SS, खुप खुप दुखतं बरं का... बाकीचं ठिक आहे सगळं पण, ते इंजेक्शन देताना जी काय आग आग होते... काही विचारू नकोस... माझ्या बहिणीचे केले होते लास्टईयर...! ~! -------हो ना खरचं... मी पण ऐकलयं(इतिः श्वेता)! ( आता इथे काही गरज नव्हती पण अतिशयोक्तिच्या बाबतीत एक मुलगी दुसरीला दुजोरा देणार नाही हे कसं शक्य आहे? )

काम कसबसं संपवून जड पावलाने, (आणि त्याहुनही जड जबड्याने) घरी आलो, फोन बुक काढून डेंटिस्ट ला कॉल लावला... आणि अपॉंटमेंट घेतली... दुसर्या दिवशी सहाजिकच ऑफिस ला दांडी मारून जाव लागणार होत, तसचं केल... ( सकाळीच बॉस ला फोन... बरं वाटत नाहिये, अपॉंटमेंट घेतलीये..Etc Etc Etc.... आणि १/२ तास कारण समजावून सांगितल्यावर - ब्रम्हदेवाने तथास्तू म्हणाव त्या स्टाईलने बॉस म्हणाला-- ओ. के, डन! एक काम कर ना मग... तसेही तुझे अपरेझल बाकी आहे, मी रवीवारी काम करणार'च आहे, तु पण ये, म्हणजे तुझी सुट्टी पण वाया जाणार नाहीआणी अप्रेझल सुद्धा पुर्ण करू...) हा बॉस नावाचा प्राणी कधीकधी सावकाराच्या वरताण हिशोबी होतो बरं का..!!

दवाखान्यात गेलो तो समोर १ आजजी अजोबा बसले होते.. उजवीकडे एक लहान मुलगी ८-१० वर्षाची रडकुंडिला आली होती(बापाचा जीव खातहोती) आणि डावीकडे एक ड्रायव्हर टाईप ईसम बसला होता... म्हणजे दवाखान्यात येताना देखिल त्याने तंबाखू सोडली नव्हती...!!

मी रिसेप्शनिस्ट ला सांगितल... ती बसा (जिथे जागा असेल तिथे !) म्हणाल्यावर - जागा शोधत होतो... वास्तविक तिथे एखादी अजून खुर्ची मावली असती पण ते म्हणे "इंटीरीअरला सूट होत नाही"! शेवटी दरवज्याजवळचा कॉर्नर बरा म्हणून तसाच टेकून उभा होतो... आतून एक पेशंट बाहेर आला आणि आजोब-अज्ज्जी आत गेले...

त्या माणसाला विचारले - "अरे भाऊ, कस काय? दात काढला की रुट कैनल'? "

तर त्या माणसाने आधी डोक गच्च दाबून धरलं (स्वता:च) मग कसाबसा आवाज काढत म्हणाला... डॉ.च काय घेउन बसला राव... दातदुख्याला लागले कि कोन डॉ. न कोण देव!! सगळं गप्प्प पणे सहन कराव लागतं" ---?? ( म्हणजे काय? सरळ उत्तर द्या की... अस बोलताय जस की माझ्यामुळेच दात दुखतोय तुमचा... )

माझी धडधड वाढली... तेवढ्यात आज्जी अजोबा बाहेर आले, आणि मला त्या ब्रदर'ने (सिस्टर नव्हती इथे.. ) आत बोलावले... ( बोकडाला खाटिकखान्यात नेताना खाटिकाच्या तोंडावर कसे अविर्भाव असतात ते खाटिकखान्यात न जाताही मला ह्यामाणसामुळे समजले...!XX! ) आत गेलो... डॉक्टरांनी छान स्माईल दिली... पण ते हास्य असे वाटत होते की "गब्बरसिंग कालियाला गोळी घालायच्या आधी हसत होता.. "!!

त्या (आराम) खुर्चीत आडवा झालो, डॉ. नि ३-४ वेळा टोकाला आरसा लावलेल्या चमच्याने निरिक्षण करून झाले... मग एक छोटी हातोडीसारखी काहीतरी वस्तुने दातावर सहन होणेबल- म्हणजे मी ओरडेपर्यंत.. दातावर आदळ-आपट केली...(आणि म्हणाले - "रूट कॅनल करावं लागेल"... (फ्लॅशबॅक समाप्त)

"रूट कॅनल..X-RAY.. फीलींग मटेरिअल.. क्राऊन सगळे करावे लागेल... ह्या गोळ्या घे आणि ५ दिवसानंतरची अपाँटमेंट देतो....! "

-- बरं, मग तसाच घरी आलो... बॉस ला कॉल केला... (ह्या गोष्टीत पण त्याला अपडेट द्यावे लागतात... ) तो आठवडाभर "अब गोली खा... " वाला डायलॉग कानात घुमत होता... पाचव्या दिवसापर्यंत ठणका कमी झाला होता... पण बाळंतपण बाकीच होतं.. म्हणूनच ११ वाजता पुन्हा क्लिनिक ला गेलो... तिथे प्रीतीच्या म्हणण्यानुसार... डॉ. नि "ओठ हलका सोड" म्हणत एक स्टील चे इंजेक्शन शक्य तेवढ्या आत खुपसून भुलीचे औषध आतपर्यंत घातले... एक क्षण असे वाटले कि आता जबड्याच्या खालून इंजेक्शन बाहेर येते की काय?!

झाल... थांब एक ५-१० मिनिटं... भुल चढेस्तोवर... तोपर्यंत मी दुसरा पेशंट पाहतो...

डोळे बंद... हाताने गच्च खुर्ची पकडलेली... तोंडात देवाचे नाव... (खरे तर तोंडाचे फंक्शन होत आहे का नाही ते कळेनासे झाले होते.. त्यामुळे मनात देवाचे नाव... ) आणि येणाऱ्या संकटाची चाहुल घेत पडलो होतो तेवढ्यात तो ड्राईव्हर (अगदी २ सेकंदापुर्वी पर्यंत तंबाखू खाणारा... तोच तो... ओरडला.. )!

ड्राईव्हरः "आ SS SS... तोच तोच डॉ... तोच दात दुखतोय खुप... २-३ दिवस काय सुचेना झालयं काहीही करा, पण सुटका करा... काढुनच टाका बेस्ट वे... डोक्याला (की तोंडाला) तापच नको परत...! "

डॉः " बरं, आपण शक्यतो दात वाचवायचा प्रयत्न करू (*काढून टाकला तर नेक्स्ट विझिट ची फी बुडेल ना! ) कारण तुमचा ओरिजिनल दात तो ओरिजिनल... बघुया... ३ दिवसाच्या गोळ्या देतो... सुज उतरेल... मग आपण X-ray काढून ठरवू काय करायचं ते... "

ड्राईव्हरः बरं... ठिके आता तुम्ही म्हणाल तसं.. पण मला वाटतयं... काढुनच टाकावा...

डॉ. : बघुया ना.... या तुम्ही ३ दिवसांनी... (मनातल्या मनात खर्चाचा आकडा imagine करत ड्राईव्हर गेला.. )

आणि त्यांनी माझ्याकडे मोर्चा वळवला... आह!.. लिहिताना त्या क्षणाची आठवण झाली तरी त्रास होतोय... पुढची दंतकहाणी थोडा ब्रेक घेऊन लिहितो..... (पार्ट-२ मध्ये.... )

--
आशुतोष दीक्षित

माझा सायकल प्रवास.... एक चित्तथरारक पर्वणी.. भाग २

(My Old Article, published 1st at manogat.com- on 7th FEB 2010)
माझा सायकल प्रवास.... एक चित्तथरारक पर्वणी.. भाग २
(रवि., ०७/०२/२०१० - ०१:३५)

भाग एक वरून पुढे चालू -

हुश्श... ! सुदैवाने... मित्रमंडळींपैकी कोणीही सायकल (चोरुन) घेउन गेले नाही... आणी हा आठवडयात देखिल मलाच लेखन भाग्य लाभले..
तर मागे उल्लेखल्याप्रमाणे, आठवडाभर व्यवस्थित सायकल चालवली गेली... आमच्या वरून इन्स्पिरेशन घेउन आमचे तिर्थरुप देखिल सायकल दुरुस्त करून आले आणि रोज दुध आणायला सायकल वरून जात आहेत गेले २ दिवस. ( हो तीच ती मरणोन्मुख सायकल... खरं तर ईन्स्पिरेशन वगैरे विसरा पण, "जुनी सायकल छान'च होती, दुरुस्ती खर्च केवळ ७०० रु. पण युवराजांना सगळं नवीन हवं" हे पटवून द्यायचे होते..पुणेरी शालजोडीतून ह्यालाचं म्हणतातं बर कां !)

गेले २ दिवस लोक आमच्याकडे असे काही पाहू लागले आहेत की,
१) आम्ही आणि आमची आधीची पिढि मिळून सायकलींचे दुकान काढणार आहोत,
२) किंवा पुणे सायकल प्रतिष्ठान च्या अध्यक्षपदी वडिलांची किंवा आमची निवडणुक झाली आहे...
३) किंवा मग आमची आर्थिक परिस्थिती अचानक प्रचंड खालावली आहे...(नजरा सांगत असल्या तरी त्यात संशय असतो कारण हे थोडस पचायला जड आहे कारण,मी लीवाईस जीन्स, ID चे बुट अजुनही सोडलेले नाहित.. आणि बाबा तर सफारी सोडून काही वापरतच नाहीत...)

शेजारी तर खुष झाले होते की आता रात्री बेरात्री हे कार्ट हॉर्न तर वाजवत घरी येणार नाही... (तसाही लेन मध्ये अंधार असल्याने मी हॉर्न टाकतो)पण त्यांना मी मोटार-सायकलही वापरात ठेवणार आहे हे त्याच रात्री समजलं...हा हा हा त्याचं काय आहे ना माणसाने आशा ठेवावी, अपेक्षा नाही( सध्या एका मैत्रीणीकडून ऐकलय हे वाक्य.. हे हे हे !)


सकाळी सायकल-संध्याकाळी मोटार-सायकल असे करत आठवडा गेला... संमिश्र प्रतिक्रिया आणि काही ठिकाणी सत्कार समारंभ(कट्यावरझाला तसाच..) देखिल पार पडला.... आता सायकल ला देखिल वेग आला आहे, आणि जे अंतर पार करायला ४० मिनीटे लागायची ते३० मिनिटात पुर्ण होत... (आता काही प्रमाणात सिग्नल,वन वे, चार चाकी फक्त, चे नियम लागू होत नाहीत, आणि "मामा" सुद्धाक्वचितच "समज" देऊन सोडून देतो..पण नेहमीच नाही बरं का) तर, अश्या वेगवान वेळी, मी शुक्रवारी पहाटॅ NDA Road ला गेलोहोतो...तेथे नेहमीप्रमाणेच अपमान आणि अवहेलना करणारे लोकांचे 'लुक्स' पाहून मी कर्ण भक्त झालो आहे, आणि त्यांच्या त्या"मूक" कॉमेंटस ऐकू येऊ नयेत म्हणून माझी कुंडल (हेडफोन) कानात अडकवुन गाणी थोडी उंच आवाजातच ठेवतो...


तिथे जरा पुढे गेल्यावर मला एक ग्रुप भेटला, ५ मुले,२ मुली होत्या, आणि मुख्य म्हणजे सगळेच सायकल्स्वार,(माझी भारी सायकल देखिलमला भिकार वाटली त्यांच्यापुढे, बहुदा रेस वगैरे खेळत असावेत...किंवा पुण्यातले "लाईफ सायकल्स" दुकानाचे मालक ह्यांचे देणेकरी असावेत)


ओळख झाल्यावर समजले, कि हे सगळे सायकलीस्ट आहेत... आणि त्यांच्या प्रैक्टिस सेशन च्या टाईमसेट मध्ये त्यांनी बहुमुल्य वेळ वायाघालवून माझ्याशी हस्तांदोलन वगैरे करून घेतले आहे, (हे असल आपल्याला नाही जमणार बुवा, ३ सेकंडात ५ पायडल मारणे वगैरे...हीअशी मती भ्रष्ट होण्यापेक्षा आपण बरं आपली गती बरी...!)


रोजचा पल्ला गाठून जरा उशीराच घरी आलो... इथे स्वागत समीती तयार - "नुकताच कॉलेजकुमार झालेला मावसभाऊ, मावशी आणि काका."

सायकलची जम'के तारिफ केल्यावर मयुरेशने बाँब टाकला... "अरे दादा सायकलचं काम झक्कास झालयं... तसाही तु जाड होतआहेस (ही आजकालची कार्टी ईतकी आगाउ आणि निर्लज्ज आहेत की तोडावर बोलतात- आम्ही म्हणायचो "सध्या लोकं काय जाड होत आहेत नै") आणि ऐक ना रे,मी बाईक चालवायला शिकलोय...मला आठवडाभर देशील का क्लास ला ? म्हणजे मग त्यानंतर मला नवीन घेतील... "(अरे वा रे शहाण्या...म्हणजे तुझा खाटिकखाना उघडण्यासाठी माझ्या बकरीला बळी देणार... )
आमचे तिर्थरुप म्हणाले--- अरे बाबा त्याची गाडी तो खुप जपतो... मला सुद्धा देत नाही कधी कधी... (एवढं बोलून थांबाव ना! ) पण तुम्ही तसेएकाच वयोगटात आहात.. तुला देईलही सहज... जा एक राईड मारून दाखव नीट... -- (बाबा, का हो एवढे उदार मतवादी होता (मीसोडून ईतरांच्या बाबतीत)?)


तो आला, त्याने पाहिलं,त्याने चालवली...तो घेउन गेला ( झालं १ आठवड्यासाठी... शेजारी पुन्हा खुष ! )- ह्या उक्तीचा खरा अर्थ आज'चसमजला.... आज सुट्टी घेतली होती त्यामुळे निवांत झोपण्याचा प्लैन करून थोडी डुलकी मारली देखिल, पण शाळकरी जनांचा फोन आला,त्वरीत डेक्कन वर, गुडलक मध्ये भेटणे,आणि मी गाडी नाही असे सांगितल्यावर अर्वाचिन-प्राचीन शब्द सुनावण्यात आले, वरून "सायकलघेतलीयेस ना ? ये की मग टांग मारुन... " हे देखील ऐकवले..!
मी कसाबसा बेड मधून उठलो, आणि निघालो... जाता जाता शेकडो खड्डे माज्या मोटारसायकल च्या शॉक-अब्सॉर्बर्स ची आठवण करून देतहोते..(इथून पुढे जेंव्हा जेंव्हा रस्त्यांबाबत आंदोलन होईल तेंव्हा मी नक्की भाग घेईन... किंबहुना सायकलस्वारांसाठी तरी रस्ते ही गोष्ट मुलभुत/पायाभूत सुविधांमध्ये सामविष्ट करावी असे पीटीशन द्यावे की काय हा विचार करतोय मी.)त्यात भर चॉकातून स्टाईल मारण्याच्या नादात, पाण्याची बाटलीदेखिल खाली पडून गळायला लागली ! हे सायकल प्रकरण एकंदरितट्रैफिक मध्ये अवघड'च आहे-- म्हणजे सरळ सोट रस्ता असेल तर ठिक आहे पण, पुण्यातल्या सायकल ट्रैक वरून बाईकर्स जास्त जातात... (मीसुद्धा त्यातलाच)...
सायकल वरून जाणे म्हणजे केवळ दिव्य नसुन, अवहेलना, चिडचिड,अपमान, आणि रस्ता सायकलींसाठी नसतोच असे उग्र रुप घेतलेल्यादिव्य-दृष्टीदात्यांचे मायाजाल पार करण्याची कसरत आहे हे पटले.


ईच्छितस्थळी पोचल्यावर तिथेच मित्रांच्या समोर आणि चहाच्या कपच्या साक्षीने मी, माझ्यासोबतच समस्त मित्रमंडळाला एक प्रतीज्ञा घ्यायला लावली...!

"सायकल माझी (चाकेरी वाहनांच्या बाबतीत) आद्य गुरू आहे... सर्व सायकलस्वार माझे बांधव आहेत,मला त्यांच्याबद्दल अपार आदर आहे... जरी मी आज गाडीवर असलो तरी मी सायकल चे दुखः जाणतो..त्यामुळे कोणाही सायकलस्वाराला त्रास होईल असे वर्तन मी करणार नाही... त्यांन्ना सायकल ट्रैक वर प्राधान्य देईन..सायकलस्वार आणि त्यांचे चालक-बांधव ह्यांचा मान राखण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन व इतरांना करण्यास प्रवृत्त करेन !!"


जाताना घेतलेले सारे अनुभवांचे रीपिट एक्स्पिरियंस घेत घरी पोचलो.... निदान पुढिल आठवड्यात असे आयत्या वेळी जायला गाडी परत घरी येईल ह्या आशेवर सायकल जागेवर लावली आणि, मोठा श्वास घेऊन हा भाग दोन लिहायलाबसलो होतो... झाले... ! दिवसभराचा थकवा आणि त्यानंतरचे सायकलस्वारांबद्दलचे हे रिअलायझेशन घेऊन आता झोपायला जाणार ... !


ता. क: - वाचन हलके फुलके असले तरी..प्रसिद्धीसाठी काहीतरी मेसेज असणे आवश्यक म्हणून हा उतारा.

लाईफ सायकल्स: - टिळक रोड,पुण्यातील सर्वात मोठ्ठे आणि तितकेच महागडे सायकलींचे दालन.
वाचन आणि प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद...

--
आशुतोश दीक्षित.

माझा सायकल प्रवास.... एक चित्तथरारक पर्वणी... भाग १

(My Old Article, published 1st at manogat.com- on 4th FEB 2010)

माझा सायकल प्रवास.... एक चित्तथरारक पर्वणी...
(गुरु., ०४/०२/२०१० - ००:१७)

यांत्रिक युगातील सर्वप्रथम... म्हणजे वाहनांच्या उत्पत्तीमध्ये सायकल हीच अग्रस्थानी आहे! कोणताही माणूस हे नाकारूच शकत नाही की त्याने सायकल हे पहिले वाहन चालवले आहे... (किमान पुण्यातला... किंवा भारतातला... )

जन्माला आल्या आल्या... बाबागाडी... मग पहिल्या वाढदिवसाला वॉकर.... दुसऱ्या वेळी छोटी पुढे हॉर्न आणि पायडल असलेली सायकल... पाचव्या वेळी एका पायावरून चालवायची सायकल (पाय सायकल).. मग शाळेत जायला लागल्यावर स्ट्रिटकैट/बीसए/हिरो.. वगैरे चे त्यातले त्यात भारी मॉडेल शॉक ऍब्सॉर्बर्स वगैरे असलेले... त्यातून हायस्कूल मध्ये तर त्याला गिअर्स पण लावून घ्यायचे... उंच सिट (त्यासाठी सिट चा रॉड बदलायचा)... ८-१० गिअर्स... मस्त सीट... हैंडल वर शिंगे... असा सगळा रुबाब करून सायकल वरून निघायचे.... तसेच पुढे कॉलेजला... (आत्ता च्या मुलांना शाळेतच गाडी मिळते कदाचित... ) गाडी मिळाली तर ठीक.. पण किमान ११वी १२वी तरी बहुतेकवेळा सायकल झिंदाबाद'च असायची... मग तेव्हा ही जुनी जपलेली सायकल विकायला काढून नवीन/सेकंड हैंड रेसर सायकल... तिच ती... पातळ टायर्स... वजनाने हलकी... पुढील बार ला पाण्याची बाटली अडकवता येणारी आणि वाकडं हैंडल असलेली... रेसर सायकल.. कुठूनतरी मिळवायची. ं आणि आमीर खानच्या थाटात... भर चौकातून "यहां के हम सिकंदर"... म्हणत सायकल हाणत वाट्टेल तेवढं लांब जायची तयारी ठेवून घराबाहेर पडायचं...!!

कित्ती छान दिवस होते ना... आणि आज BPO/IT/ITES मध्ये काम करून करून साधं गल्लीत चालणं होत नाही... "वेळ नाही" हे सर्वात सोयीस्कर कारण...

माझ पण असच होत अगदी... परंतु गेले काही दिवस NIGHT SHIFT असल्यामुळे घरी जायला पहाट होते... आणि पोहोचल्यावर लगेच झोप येणे शक्यच नाही... म्हणून TV लावतो... तर तिथे सगळे... फिटनेस मंत्रा... फूड & डाएट... योगा... ऐब्स... मेडिटेशन हे असले प्रोग्रॅम्स चालू असतात... आधी आधी मजा म्हणून बघायचो पण आता खरंच वाटायला लागलं होत की ह्यातली किमान एक गोष्ट तरी केली पाहिजे...

१) योगा - जमत नाही.. कारण इकडून तिकडे हात पाय लांब करून परत जवळ आणताच येत नाहीत..

२) मेडिटेशन - अहो एवढं चित्त स्थिर असतं... तर अजून काय पाहिजे?

३) फूड & डाएट - जिभेवर ताबा नाहीये हो...

त्यामुळे सर्वात सोपा वाटणारा उपाय तर तो सायकलींग... झालं ठरलं... उद्यापासून सकाळी सायकलींग ला जायच... पण त्यासाठी सायकल तर हवी... जुनी माळ्यावर पडलेली सायकल पाहिली तर ती एवढी मृतावस्थेत होती की तिचा जिर्णोद्धार नवीन सायकल च्या तोडिस तोड झाला असता...

त्यामुळे नवीन सायकल घेतली... हीरो हॉक नावाची रेसर सायकल... (अजुनही आमिर खानचं "जो जीता" भुत डोक्यात आहेच बरं का... ) १० वर्षापूर्वी पुण्यातच माझ्या सायकल प्रवासाचा शेवट झाला होता... तेव्हा वाटलं होत की आता आपण कुठले परत ह्या दुचाकी वर बसतोय..!

पण नव्या जोमाने सायकल हाणायला घेतली.... दुकानापासून घरापर्यंत सायकल चालवत आणली... (येईपर्यंत जिव तोंडात न दात घशात गेले... ) रोज सायकल म्हणजे कठिणच काम वाटायला लागलं पण पहिल्याच दिवशी कच खाउन चालणार नव्हती... (कारण, घरचे म्हणत होते तुला जमणार नाही... रोज चालत जा हव तरं... उगिच "वायफळ" खर्च... नव्याचे नऊ दिवस.. Etc etc etc... )

पण.... ठरवलं... किमान रोज ५ की. मी सायकल चालवायची... नाहिच तर निदान वीकएंडस तरी सायकल्वरून घालवायचे...

झाल.. शनीवार पहाट ( NDA road ला सायकलवरून जाऊन आलो... जिव थकला अगदी परंतु तेथे येणार्या लोकांन्न काहीच वाटले नसेल.. "तू काय शो करतोय्स...? असे शेकडो लोक येतात आजकाल फैड'च आहे... वगैरे आविर्भाव सहन करत तिथून सटकलो...

मग घरी जाउन १० च्या आसपास डेक्कन वर निघलो.. जाताना सिग्नल वर आजोबा लोक (जे गाड्यांवर होते) ते असे पाहत होते की जणू त्यांह्या तरुणपणात ते सायकल डोक्यावर घेउन रस्त्यावरून पळत जात असत...! पुन्हा तीच नजर... मग ते झेलत झेलत पुढे गेलो... डेक्कन च्या चौकातून खाली जाणार होतो पण एका रिक्षावाल्याने अत्यंत हिडिसपणे सांगितले.. "अरे काय रे.. जा की पटापट पुढे... मध्ये मध्ये काय कर्तो.. जा की सरळ संभाजी पुलावरून... सायकल च काय करत न्हाईत हे बगळे... सायकल ला काय फाईन मारणार न काय जप्त करणार... चल निघ पटकन... "! आता तेन्व्हांच मनात आले होते.. की आज मी माझी बाईक ओफ द ईयर सुझुकी GS150 घरी थेवून आलोय... नाहितर किती पटकन निघून जाता येत ते दाखवल असतं... (अगदी ठिणग्या घासत... )

मग तसाच पुढे गेलो... मित्रांच्या मंडळात पोचलो तेंव्हा त्यांन्नी अक्शरशः अख्खा चॉक डोक्यावर घेतला.. कोणी म्हणाले.. शनीवारवाड्यावर सत्कार करा,.. कोण ओरडले शाल-श्री फळ आणा... कोणी कोणी तर साष्टांग नमस्कार घालण्याचे प्रात्यक्षिक केले... सर्कसमध्ये जोकर ची एंट्री झाली की जे होत ना... तेच थोडक्यांत...! खरं तर नवीन सायकल लगेच सर्वांन्नी चालवून पाहिली... पण एक लेकाचा टिंगल करणे थांबवेल तर शप्पथ...

मग तिथून आमचा मोर्चा निघाला नदिकाठून... सगळे गाड्यांवर आणि मी त्याच्यामध्ये सायकलवर... राहुल गांधी-राज ठाकरे-बाळासाहेब-ए. पी. जे. ह्यांच्या ताफ्त्याप्रमाणेच माझ्या भोवती गाड्यांचा ताफा करून चालले होते... मला एकदम VIP झाल्याची Feeling... आली... :) तेवढ्यातच मला दिवसभराचा मानापमान विसरून आपण खुप खास काम केल्याचा आनंद झाला... मग तिथून थोडावेळ भटकंती करून घरी यायला निघालो... वाटेत परत सिग्नल लागला.. ह्या वेळी ३-४ शाळकरी मुले माझ्या सायकल कडे कुतुहलाने पाहत होते... (त्यांच्या सायकलींपेक्शा थोडी भारी वाटली माझी सायकल)... शेजारीच एक म्हातारे गृहस्थ उभे होते.. त्यांची काळी (जुनी आजोबा ट्रेंडसेटर) सायकल हातात घेउन... बहुदा दमल्यामुळे त्यांना सायकल हातात घेउन चालावे लागले... (सिग्नल वर येतानाच ते सायकल हातात घेउन आले... ) त्यांनी माझ्याकडे पाहत विचारले -" कितीला पडली रे मुला हि नवीन सायकल? " - ३. ५ हजार.

"देवा रे.... आमच्या वेळी मी हीच सायकल ३०० रुपयांना घेतली होती... आमच्या साहेबांनी दिले होते ५० रुपये आगाऊ म्हणून.... पण छान दिसतिये... रोज चालवतोस का? " -- हो आजोबा.. म्हणजे ठरवलं आहे.. बघू कसे जमते ते.

"उत्तम आहे... ते पर्यावरण, पेट्रोल ची बचत वगैरे सगळं ठिक आहे पण.. स्वतःच्या तब्येतीला सायकल चांगली असते. सर्वांगसुंदर व्यायाम आहे बर हा... तुमच्या जिम/बिम पेक्षा भारी... " - हो ना... नक्किच (कपाळावरचा घाम पुसत.. आणि लांब श्वास घेत)!

"-- माझी गाडी आज बंद पडलीये.. तशी मि सायकल चालवतोच रोज एकदा.. पण आत्त खरं एका स्नेहींकडे जायच होत म्हटलं पटकन जाउन यावं तर गाडीने बंद पुकारला.. आता मुलगा येईल संध्याकाळी तो करून आणेल नीट... "-- तुमच कॉतुक आहे आजोबा.. खरं तर सायकल म्हणजे...

पींग्ग.. पिंग्ग... पी.. पीई.... " मागचे हॉर्न वाजले आणि आम्ही आमच्या त्या कालबाह्य दुचाक्या पुढे दामटल्या...! आमचे संभाषण खुंटण्यास कारणीभुत टेंपोकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून मी सायकल कडेला घेतली... न तसाच आजोबांचा निरोप घेण्यासाठी हात वर केला... त्यांनीदेखिल आत्मियतेने नीट चालवा (लोकांच्या अंगावर घालू नका.. ) असे सांगून निरोप कबुल केला...

घराकडे येता येता गल्लीत आलो तर २-३ शाळेतल्या मित्रांची वाहने दिसली... (ऑर्कुट्वर फोटो पाहिले वाटत ह्यांनी सायकल चे)... जरा दबकतच घरात गेलो (सायकल घेउन- नवीन आहे ना.. आणि वजन १० किलो सुद्धा नाही... म्हणून घरातच ठेवतो... ) तर हे सगळे सायकल ची चॉकशी करायला आले होते... "व्वा... भारी आहे रे... मस्त'च एक्दम... साल्या फुकट पेट्रोल वाया घालवायचास ते तरी कमी होईल... अरे बुटकी वाटतिये पण, तुज्यासाठी ऊंटच आहे ही... सामान आहे एकदम, उद्या सकाळी घरी घेऊन ये रे... बास्स राव... नेक्स्ट वीक मला पाहिजे एक दिवस... "

असे एक ना अनेक उद्गार एकदमच बाहेर निघाले... आणि मग त्याच उद्गारांचे संदर्भासहीत स्पष्टिकरण करत करत, चहा... क्रिमरोल.. बाबांनी आणलेले सामोसे ह्यावर ताव मारत माझा वीकेंड संपला...

आता पाहू पुढे काय होते....!! (समजा ह्यातला एखादा अति-उत्साही मित्र सायकल खरचं घेउन गेला एक दिवस तर त्याला लिहायला सांगेन.. नाहीतर पुढचे अनुभव मीच लिहेन.. अर्थात ह्या लेखाचे प्रतिसाद संख्या पाहुनच बर का! )

--
आशुतोष दीक्षित