Friday, November 19, 2010

ऑफिसमधले आयुष्य !!

'सकाळ' वृत्तपत्रसमुहाकडून सध्या 'रस्त्यावरचे आयुष्य' सदर खूप गाजत आहे, पेट्रोल पंपावरील मदतनीस, रुमाल,पायपुसणी, टोप्या, गॉगल्स विकणारे पथारीवाले, जांभूळ-पेरू-लिंबांचा व्यवसाय करणारे हातगाडीवाले ह्यांचे मनोगत मांडण्याचा प्रांजळ प्रयत्न केला जातो... त्यांच्या व्यथा-विवंचना अतिशय विशेष रूपके वापरून व्यतीत केल्या जातात... ते वाचता वाचता'च "ऑफिसमधील आयुष्य" लिहिण्याचा विचार मनात आला.... मग काय, विषय मिळाला म्हटल्यावर लगेच की-बोर्ड हाती घेऊन चालू झालो... बघा जमलंय का ते...!


'काल सुद्धा मीटिंग आणि एक्स्टेंडेड सपोर्ट असल्यामुळे घरी जायला उशीर झाला'... पहाटे घरी आलेला प्रशांत आमच्या रिपोर्टर ला सांगत होता... मगरपट्टा सिटी मधल्या टॉवर ६ मध्ये काम करणारा प्रशांत एका MNC मध्ये काम करतो. परदेशी क्लायंट आणि देशी मॅनेजर च्या कटकटींना रोज तोंड देता देता जीव थकून जातो, LEAN, CMM Levels, ISO, BSI इ. इ. मेथॉडॉलॉजीज इंप्लिमेंटेशन च्या रॅट रेस मध्ये स्वतःचीच कंपनी कशी उत्तम प्रॉडक्ट्स देते आणि वेगवेगळे क्लायंट मिळवण्यासाठी पी. आर. (पब्लिक रीलेशन)/मार्केटिंग/सर्वे/रिसोर्स & नॉलेज मॅनेजमेंट ह्या सगळ्या टीम मधल्या लोकांना गुरासारखे कधी कधी तर त्यापेक्षा ही जास्त डेडीकेटेडली काम करावे लागते...अनेकदा खाण्यापिण्याचे भान देखील राहत नाही. -- प्रशांत म्हणाला.

लोकांना आमची थाटामाटातली चकचकीत एअरकंडिशंड ऑफिसेस दिसतात, मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या प्रीमायसेस मध्ये होणाऱ्या पार्ट्या आणि त्यातली प्रमोशन, बिझनेस डिक्लेरेशन समरी, विविध टाय-अप्स ह्यांची माहिती वर्तमान पत्रातून कळत असते... परंतु साहेब ह्यामागची कुतरओढ जगासमोर कधीच येत नाही, लठ्ठ पगार आणि मठ्ठ बॉस हे गणित एकदा तरी मनात आणून पाहा म्हणावं.. मिळणाऱ्या पगारातले ६०% पैसे घराचे हफ्ते फेडण्यात जातात, उरलेले पैसे सगळे आपले असे कधी होत नाही, सर्विस टॅक्स,इनकम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, सोसायटी मेंटेंनन्स हे देता देता हाती उरणारे पैसे हे कायम कमीच पडतात...

प्रशांत भावनिक होत म्हणाला, "देणाऱ्याचे हात हजार दुबळी माझी झोळी रे" ह्या उक्तीचा पुरेपूर वापर आमच्या (IT/BPO/ITES/MARKETTING/MANAGEMENT) ह्या सगळ्या क्षेत्रात केला जातो तो फक्त "कामाच्याच" बाबतीत... लाइन मॅनेजर, प्रोसेस मॅनेजर, टीम मॅनेजर, ऑपरेशन्स/रीजनल अकाउंट मॅनेजर, आणि ह्या सगळ्यांच्या डोक्यावरून मिऱ्या वाटणारा "ऑनसाईट मॅनेजर" हे आपल्या सहस्र हातांनी एवढे काम देत असतात, की निवांतपणा हा शब्द केवळ अतिशयोक्ती वाटतो.

डेडलाइन, रिलीज, डिप्लॉयमेंट, SLA, कॉल कमीट,प्रॉडक्टिविटी, टार्गेट कंप्लिशन, युटिलायझेशन..... ह्या ट्रॅकिंग सिस्टिम्स च्या कर्मकहाण्या आहेत'च... आमचे सेंट्रलाइझ AC, आम्ही आजारी पडलो तर बंद करता येत नाहीत, तसेच खाली मान घालून मानेवर खडा ठेवून काम करत राहावे लागते...
अप्रेझल,रेटिंग च्या वेळी ५-१० % पगार वाढवण्याकरता वर्षभर केलेल्या चांगल्या कामांचा पाढा बाराखडीसारखा वाचून दाखवावा लागतो... तरीही आयत्या वेळी सराईत शिक्षक शुद्धलेखनात काढतो तश्या काहीतरी चुका दाखवतो आणि मग पगारवाढीची १० - ९ -८ - ७ % अशी उतरती भाजणी चालू होते... कधीकधी खूप टेन्शन येते... नवीन मॅनेजमेंट चे नवीन फंडे... त्याचीही काही खात्री नसते'च.

बरं आमच्या घरी धुण्या-भांड्याच्या बाई,पोस्टमन,गॅस सिलेंडर देणारा सांगकाम्या, कचरावाला,गुरखा,गणपती मंडळं... हे सगळे आवर्जून दिवाळी/दसरा आला की बोनस, पगारवाढ, दिवाळी मागतात'च ! ह्यांचे अप्रेझल कोण घेणार ? इथे काही आम्ही टक्केवारी कमी करायला गेलो की "एवढे कमावता तरी किती चिंगुसपना... " हे पालुपद !! आम्हाला रेशनकार्ड चा फायदा नाही...डोमेसाईल सरळ मार्गाने मिळत नाही इतकेच काय, जन्माने आणि कर्माने इथलेच असूनही आमचेच नाव मतदार यादीतून गहाळ होते... !!

ह्याहीउपर 'लॅपटॉप' नावाच्या खेळण्याची गळ्यात बांधलेली 'तात' आहेच... ती तर जणू आमच्यासोबत'च संपणार बहुदा, रात्री अपरात्री,सुट्टी,कधीही फोन आला की घरून लॉगीन करावे लागते... आणी मग आमचा "WORKING PROFESSIONAL ना घर का ना घाट का होतो" -- असे एक ना अनेक प्रश्न आहेत पण सांगणार कोणाला ? -- आमचं सगळं व्यवस्थित चाललंय ह्या गैरसमजात राहणाऱ्या लोकांपैकी कोणी आमचे हे मानसिक/सामाजिक प्रश्न जाणून घेण्यास पुढे येईल ?

प्रशांत रडकुंडीला येत म्हणाला. प्रशांतसारखे'च अनेक तरुण तरुणी आज पॉश ऑफिसेस मध्ये बसतात, वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये कामे करतात, रात्र रात्र जागून एखाद्या प्रोसेस, अकाउंट ला नवसंजीवनी देतात... हे खरे शिल्पकार कायम कंपनी किंवा ब्रँड च्या पडद्याआड काम करत असतात हे लक्षात घेतले पाहिजे. आणि फक्त पैसा मिळतो ही एकच बाजू लक्षात न घेता, तो कसा मिळतो, कसा खर्च होतो, आणि त्यामागची सखोल कारणे समजून घेतली तर आपण नक्कीच एक आदर्श समाजरचना घडवू शकू असा विश्वास प्रशांतने आमच्याजवळ व्यक्त केला..

--

आशुतोष दीक्षित.






Wednesday, November 10, 2010

"त्या त्या वेळी ते ते"...

"त्या त्या वेळी ते ते"...

ह्या ओळींचा प्रत्यय काल आला, जेंव्हा आम्ही सगळे चिन्मय कडे जमलो होतो 'नाईट आउट' साठी ! शब्दशः आउट नाही हो.. पण तसेच काहीसे... गोव्याहून सौरभ चा मित्र आला होता त्यामुळे त्याने पोर्ट वाईन आणलेली होतीच, निशांतला कोल्ड ड्रिंक आणि अंडी आणायला सांगितली होती, मी ब्रेड घेउन डायरेक्ट चिन्मय कडे गेलो होतो..

बेल वाजवताक्षणी दार उघडेल तो चिन्मय कुठला... २ मिनिट बाहेर ताटकळत उभा राहून शेवटी फोन केला, तर समजले बेल बंद होती आणि तो काँप्युटर वर गाणी ऐकत होता... झालं.. आमचीच हजेरी पहिले लागली, वक्तशीरपणाचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमचे कौतुक करायला कोणीच उपलब्ध नसतं... !

आत गेल्या गेल्या अंधाऱ्या खोलीवजा कोठाडीत गेल्यासारखे वाटले.... चिन्मय च्या रूम मध्ये उडणारे २ किडे होते, गॅलरिचे दार उघडे, पंखा बंद, एकच सी. एफ. एल. दिवा चालू आणि समोर काँप्युटर वर लावलेली गाणी... काही वॅट विज वाचवण्यासाठी लोकं संध्याकाळला रात्र आणि रात्रीच्या वेळेला अपरात्र बनवतात... !! अर्जंट गॅलरीचे दार लावले, मोठी ट्युबलाईट आणि पंखा चालू करून गप्पा मारत बसलो तोच निशांत आला, पाठोपाठ सौरभ पण ! आणि त्यांच्याहातातल्या कोल्डड्रिंक्स आणि वाईन च्या बाटल्या पाहून आमच्या डोळ्यांच्या बाहुल्या थोड्या अजुनच मोठ्या झाल्या... !!

बाटल्या फ्रिज मध्ये, काही अंडी उकडायला ठेवून आम्ही गप्पा मारत मारत आमचे ग्लास भरले, एकच बाटली होती त्यामुळे जेमतेम २ राउंड झाले पण असो, सेलीब्रेशन ची मजा घेणे हा एवढाच हेतू असल्यामुळे आम्ही कधीच वैतागत नाही... किंबहुना थोडक्यात गोडी ह्या उक्तीचा मतलब आम्ही पुरेपुर जाणतो म्हणा ना...

टि. व्ही वर भारत पाकिस्तान वन-डे दाखवत होते (रिटेलीकास्ट) सचिन चे ९८ पाहता पाहता सौरभ ने कांदे चिरले, निशांतने भडंग+चिवडा ह्यामध्ये चिरलेल्यापैकी थोडा कांदा मिसळून कोरडी भेळ तयार केली, मी गॅस चा ताबा घेउन अंडा-भुर्जी करायच्या तयारीत... आणि चिन्मय ने उकडलेली अंडी सोलायला घेतली.... !!

'तरकीब' नावाचा नाना चा सिनेमा पाहता पाहता - लीड शेफ -आशुतोष भुर्जी बनवू लागले... निशांत,चिन्मय पाव तुप लावुन भाजायला लागले... सौरभ उकडलेली अंडी कापून प्लेट मध्ये सजवण्यात मग्न होता... २०-२५ मि. नंतर मस्त भुर्जी तयार झाली, एक फायनल टच म्हणून आम्ही पाण्याचा शिडकावा करून भुर्जी वाफवून घेतली आणि मोहरम प्रमाणे एकाच मोठा ताटात भुर्जी घेउन टि. व्ही. समोर बसलो....
** स्पायकी उर्फ़ स्वप्निल नावाच्या आमच्यातल्या 'सुगरण' मित्राची आज खुप आठवण झाली...पण तो बिचारा अमेरीकेत रोज स्वतःचे ब्रेड & बटर करत असेल.. जर भारतात असता तर तेच काम त्याला आज इथेसुद्धा करायला लागले असते**



आम्हाला अचानक सुचलेली हि नाईट-आउट ची तरकिब, त्या झी सिनेमा वरच्या 'तरकीब' च्या साक्षीने चांगली रंगली.... सगळे आवरून झोपेस्तोवर ३ वाजले...

सकाळी बरोबर ७ ला उठून आम्ही आपापल्या घरी निघालो... सोमवारी रात्री अचानक झालेल्या पार्टीमुळे मंगळवारच्या दिवसाची छान सुरुवात झाली होती...

आता ४ दिवस काम... मग पुन्हा पुढच्य शनिवारी कोणाकडे तरी असेलच... !!

Friday, November 5, 2010

गतीज उर्जेचा नियम,कटिंग चहा,आणि जुने मित्र!!

"हे काय नाटक चालू आहे... साला काम करतोय का चेष्टा... :( नो जॉब सॅटिस्फॅक्शन... वरून ह्यांचे दर सहा महिन्याला पर्फॉर्मन्स रिव्हु... त्यात GOALs कॉलम मध्ये वेगळं नाहीच.. फक्त एंप्लॉयी कमेंटस बदलत्या पाहिजेत... प्रमोशन साठी विचारलं तर साले १० कारणं देतात.. त्यात पुन्हा ऑनसाईट चे ठरलेले गाजर आहेच की... !! @#$@$@$@# यार... डोक्याला ताप झालाय नुसता ! -- ए छोटू अजून एक कटिंग आण...." !! सनी वैतागून म्हणाला आणि पुन्हा परफॉर्मन्स रिव्हयु चे डॉक्युमेंटस वाचायला लागला.... अजितने सनी च्या संपलेल्या कपाचा ऍश ट्रे करत उरलेली सिगरेट टाकून देत, ऑर्डर कंटिन्यू केली... एक कटिंग सोबत एक लाईटस आणि १ टोस्ट बटर पण आण रे SSS.. !

अरे छोड यार सनी, किती दिवसानी भेटलोय, भरशील तो फॉर्म नंतर... साल्या बाकी कसं चालु आहे ते बोल...

(अजित आणि सनी, २ वर्षांपुर्वी एकाच कंपनीत एकाच डिपार्टमेंट मध्ये काम करत होते.. तिथे गळचेपी सुरू झाली आणि गोष्टी असह्य झाल्यावर सनी ने नोकरी बदलली... पण अजित ला लगेच बदल करणे शक्य नव्हते कारण अजित च्या घरी 'छोकरी' चे विषय सुरू होते... लग्न ठरणार होते वर्षभरात त्याचे...त्यामुळे काही काळ अपमान गिळून काम करणे त्याने पसंत केले... )

बाकीचं काय यार... आपले जुने दिवस आठवतात नेहमी... तासन-तास खुर्चीवर बसून रीपोर्टस बनवत दुपार जायची... दिवसभरात ५मी. चहाला, जेवायला २० मी. आणि संध्याकाळी सगळी कामं झाली, शिफ्ट संपली की तासभर आण्णाच्या टपरीवर चहा.. !! बारा बारा तास आपण ऑफिस मध्ये काढायचो.... एक एक रिपोर्ट वर ऍनालिसीस करून करून समाधान/डोकं आउट होईपर्यंत टिम लिडर आणि मॅनेजर शी भांडायचो... अरे एवढं असून सुद्धा तिथे एक satisfaction असायचं, आला दिवस नुसताच पुढे गेला नाही... उलट सार्थकी लागला... काहितरी नवीन शिकायला मिळालं.. अन नाहीच तर निदन जुनी कामं तरी पुर्ण झाली... समाधानानी घरी जायचो... !!

साला इथे आलो तर पहिले "टीम" स्टेबल नाही, त्यात पॉलिटिक्स तर सगळीकडेच असतं पण हेल्दी पॉलिटिक्स असेल तर काम करायला हुरुप न चेव तरी येतो.. इथे राजकारण म्हणजे इतक्या खालच्या थराला असतं.. एकमेकांना KT -ज्ञान वाटून वाढतं हा मुद्दाच डोक्यात नाहीये ह्यांच्या.... तुझं काम तु दुसर्याला शिकवलं म्हणजे तुझी गरज संपली = तुझी नोकरीवर गदा ! ही घाणेरडी मेंटॅलीटी आहे इथे... !!

आपण म्हणायचो.. माझ काम तु शिक.. मग मी पुढे जायला मोकळा... इथे माझं काम मीच करणार आणि शिकवायला सांगितलं तरी साला सगळं नाही शिकवणार.. म्हणजे परत पाय धरायला कोणितरी आलं पाहिजे ना आपले... !! बकवास--बुल्शीट--- @##$@$ !!

-- अरे सनी, माझ काय वेगळं आहे, तु निदान नवीन लोकांसोबत आहेस म्हणून हे बोलतोय्स तरी.. मला तर ते बोलुनही वैताग आलाय... काय करायचं सांग !!

- काम आहे..करायचं अन जायचं....जास्त मनाला लाउन घ्यायचं नाही... अगदीच सहनशीलतेच्या बाहेर गेलं तर राजिनामा !! अरे आज किमान २०० कंपन्या आहेत... कुठे ना कुठे नक्की काम मिळेल... टॅलेंटेड माणुस कुठेही चालून जातो... जुन्या कंपनीने आपल्याला टॅलेंट दिलय.. ते आता वापरायचं.. हे असले लोक, आणि त्यांची थेरं सगळीकडे मिळतातच !!

आपल्या मॅनेजरनी सोडून जाताना सांगितलेलं लक्षात आहे ना ? -- pain is unavoidable -- but suffering is !!

--अरे अज्या मला माहीत आहे रे, पण हे कुठेतरी बोललो ना कि, मग सोमवारी कामावर जाताना मुड ठिक तरी असतो.. नाहितर तेच तेच डोक्यात राहून डोकं आउट होत !! आज ४ वर्षांच्या नोकरीत काय कमावलं असा विचार मनात आला कि लिस्ट मध्ये सर्वांत टॉप ला नावं येतात ती तुझ्यासारख्या मित्रांची - जे चांगल्या-वाईट सर्व प्रसंगात समान साथ देतात... आपले जुने मॅनेजर ज्यांनी शिक्षणासोबत कॉर्पोरेट मध्ये रहायचे कसे वागायचे कसे त्याची ओळख करून दिली... मग पॅकेज,अनुभव,सोयी बाकिच्या गोष्टी सगळ्या दुय्यम वाटतात. ! वैताग आला, डोकं उठलं की तुम्हाला फोन करतो.. आपण भेटून गप्पा गोष्टी / शिविगाळ / सिस्टिम चे उणे दुणे/ आपल्या कमजोरी / नवीन उपाय-योजना... इ. इ. वर चहा-नाष्टा करत गहन चर्चा करतो... आणि मग भेटायला येताना मनात जी उदासी,वैताग,फ्रस्ट्रेशन ई. ओझ असतं ते घरी जाताना एकदम हलकं होउन जातं.. !! पुढचा आठवडा/महीना ह्या टॉनिक वर सहज जातो...

आणि अति झालं कि पुन्हा आहेच -- गुडलक मधले राउंड टेबल, कटिंग चहा, तुझी सिगरेट, तीचा धुर माझ्या तोंडावर आला की तुला एक शीवी आणि मग त्या अनुशंघाने आपल्या डोक्यात जाणाऱ्या बाकिच्या तमान गोष्टींवर टिकास्त्र !! पुन्हा सोमवारी ऑफिस ला जायला गडी- जैसे थे !

"अजित आणि सनी सारखे आज अनेक लोक आहेत... जे वेगवेगळ्या कट्ट्यांवर बसतात... वेगवेगळ्या वेळी भेटतात...त्यांच्या चर्चा वेगळ्या, मांडणीची स्टाईल वेगळी, डोकेदुखीचे मुद्दे वेगळे.. पण एक दुवा COMMON (सारखेपणा) असतो तो म्हणजे.. . त्यांना मिळणारी एनर्जी !! एकमेकांना भेटून सुख:दुखाःच्या गोष्टी शेअर करण्यातला आनंद हा सर्वात मोठा दुवा आहे... आणी ह्यातलीच जी स्थितिज उर्जा आहे ती पुढील भेट होईपर्यंत गतीज उर्जेच्या रुपाने त्यांना साथ देते... !!"

चवथी-पाचवीतील पुस्तकातील स्थितिज उर्चा आणि गतिज उर्जेचा खरा संबंध आज कळला... !!

-

आशुतोष दीक्षित