Friday, November 19, 2010

ऑफिसमधले आयुष्य !!

'सकाळ' वृत्तपत्रसमुहाकडून सध्या 'रस्त्यावरचे आयुष्य' सदर खूप गाजत आहे, पेट्रोल पंपावरील मदतनीस, रुमाल,पायपुसणी, टोप्या, गॉगल्स विकणारे पथारीवाले, जांभूळ-पेरू-लिंबांचा व्यवसाय करणारे हातगाडीवाले ह्यांचे मनोगत मांडण्याचा प्रांजळ प्रयत्न केला जातो... त्यांच्या व्यथा-विवंचना अतिशय विशेष रूपके वापरून व्यतीत केल्या जातात... ते वाचता वाचता'च "ऑफिसमधील आयुष्य" लिहिण्याचा विचार मनात आला.... मग काय, विषय मिळाला म्हटल्यावर लगेच की-बोर्ड हाती घेऊन चालू झालो... बघा जमलंय का ते...!


'काल सुद्धा मीटिंग आणि एक्स्टेंडेड सपोर्ट असल्यामुळे घरी जायला उशीर झाला'... पहाटे घरी आलेला प्रशांत आमच्या रिपोर्टर ला सांगत होता... मगरपट्टा सिटी मधल्या टॉवर ६ मध्ये काम करणारा प्रशांत एका MNC मध्ये काम करतो. परदेशी क्लायंट आणि देशी मॅनेजर च्या कटकटींना रोज तोंड देता देता जीव थकून जातो, LEAN, CMM Levels, ISO, BSI इ. इ. मेथॉडॉलॉजीज इंप्लिमेंटेशन च्या रॅट रेस मध्ये स्वतःचीच कंपनी कशी उत्तम प्रॉडक्ट्स देते आणि वेगवेगळे क्लायंट मिळवण्यासाठी पी. आर. (पब्लिक रीलेशन)/मार्केटिंग/सर्वे/रिसोर्स & नॉलेज मॅनेजमेंट ह्या सगळ्या टीम मधल्या लोकांना गुरासारखे कधी कधी तर त्यापेक्षा ही जास्त डेडीकेटेडली काम करावे लागते...अनेकदा खाण्यापिण्याचे भान देखील राहत नाही. -- प्रशांत म्हणाला.

लोकांना आमची थाटामाटातली चकचकीत एअरकंडिशंड ऑफिसेस दिसतात, मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या प्रीमायसेस मध्ये होणाऱ्या पार्ट्या आणि त्यातली प्रमोशन, बिझनेस डिक्लेरेशन समरी, विविध टाय-अप्स ह्यांची माहिती वर्तमान पत्रातून कळत असते... परंतु साहेब ह्यामागची कुतरओढ जगासमोर कधीच येत नाही, लठ्ठ पगार आणि मठ्ठ बॉस हे गणित एकदा तरी मनात आणून पाहा म्हणावं.. मिळणाऱ्या पगारातले ६०% पैसे घराचे हफ्ते फेडण्यात जातात, उरलेले पैसे सगळे आपले असे कधी होत नाही, सर्विस टॅक्स,इनकम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, सोसायटी मेंटेंनन्स हे देता देता हाती उरणारे पैसे हे कायम कमीच पडतात...

प्रशांत भावनिक होत म्हणाला, "देणाऱ्याचे हात हजार दुबळी माझी झोळी रे" ह्या उक्तीचा पुरेपूर वापर आमच्या (IT/BPO/ITES/MARKETTING/MANAGEMENT) ह्या सगळ्या क्षेत्रात केला जातो तो फक्त "कामाच्याच" बाबतीत... लाइन मॅनेजर, प्रोसेस मॅनेजर, टीम मॅनेजर, ऑपरेशन्स/रीजनल अकाउंट मॅनेजर, आणि ह्या सगळ्यांच्या डोक्यावरून मिऱ्या वाटणारा "ऑनसाईट मॅनेजर" हे आपल्या सहस्र हातांनी एवढे काम देत असतात, की निवांतपणा हा शब्द केवळ अतिशयोक्ती वाटतो.

डेडलाइन, रिलीज, डिप्लॉयमेंट, SLA, कॉल कमीट,प्रॉडक्टिविटी, टार्गेट कंप्लिशन, युटिलायझेशन..... ह्या ट्रॅकिंग सिस्टिम्स च्या कर्मकहाण्या आहेत'च... आमचे सेंट्रलाइझ AC, आम्ही आजारी पडलो तर बंद करता येत नाहीत, तसेच खाली मान घालून मानेवर खडा ठेवून काम करत राहावे लागते...
अप्रेझल,रेटिंग च्या वेळी ५-१० % पगार वाढवण्याकरता वर्षभर केलेल्या चांगल्या कामांचा पाढा बाराखडीसारखा वाचून दाखवावा लागतो... तरीही आयत्या वेळी सराईत शिक्षक शुद्धलेखनात काढतो तश्या काहीतरी चुका दाखवतो आणि मग पगारवाढीची १० - ९ -८ - ७ % अशी उतरती भाजणी चालू होते... कधीकधी खूप टेन्शन येते... नवीन मॅनेजमेंट चे नवीन फंडे... त्याचीही काही खात्री नसते'च.

बरं आमच्या घरी धुण्या-भांड्याच्या बाई,पोस्टमन,गॅस सिलेंडर देणारा सांगकाम्या, कचरावाला,गुरखा,गणपती मंडळं... हे सगळे आवर्जून दिवाळी/दसरा आला की बोनस, पगारवाढ, दिवाळी मागतात'च ! ह्यांचे अप्रेझल कोण घेणार ? इथे काही आम्ही टक्केवारी कमी करायला गेलो की "एवढे कमावता तरी किती चिंगुसपना... " हे पालुपद !! आम्हाला रेशनकार्ड चा फायदा नाही...डोमेसाईल सरळ मार्गाने मिळत नाही इतकेच काय, जन्माने आणि कर्माने इथलेच असूनही आमचेच नाव मतदार यादीतून गहाळ होते... !!

ह्याहीउपर 'लॅपटॉप' नावाच्या खेळण्याची गळ्यात बांधलेली 'तात' आहेच... ती तर जणू आमच्यासोबत'च संपणार बहुदा, रात्री अपरात्री,सुट्टी,कधीही फोन आला की घरून लॉगीन करावे लागते... आणी मग आमचा "WORKING PROFESSIONAL ना घर का ना घाट का होतो" -- असे एक ना अनेक प्रश्न आहेत पण सांगणार कोणाला ? -- आमचं सगळं व्यवस्थित चाललंय ह्या गैरसमजात राहणाऱ्या लोकांपैकी कोणी आमचे हे मानसिक/सामाजिक प्रश्न जाणून घेण्यास पुढे येईल ?

प्रशांत रडकुंडीला येत म्हणाला. प्रशांतसारखे'च अनेक तरुण तरुणी आज पॉश ऑफिसेस मध्ये बसतात, वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये कामे करतात, रात्र रात्र जागून एखाद्या प्रोसेस, अकाउंट ला नवसंजीवनी देतात... हे खरे शिल्पकार कायम कंपनी किंवा ब्रँड च्या पडद्याआड काम करत असतात हे लक्षात घेतले पाहिजे. आणि फक्त पैसा मिळतो ही एकच बाजू लक्षात न घेता, तो कसा मिळतो, कसा खर्च होतो, आणि त्यामागची सखोल कारणे समजून घेतली तर आपण नक्कीच एक आदर्श समाजरचना घडवू शकू असा विश्वास प्रशांतने आमच्याजवळ व्यक्त केला..

--

आशुतोष दीक्षित.






1 comment:

  1. Hi,
    आशुतोष,

    I read out the blog.and u have given good approach towards life. i appriciate. ekhadya goshtiche marm samjalyawar manus atmiyatene kam karat asel tar yash milatech milate. ani mhatlyapramne नक्कीच एक आदर्श समाजरचना घडवू shakal.all d best :D

    ReplyDelete