Friday, March 29, 2013

चित्रपट परीक्षण :: "मेरे डॅड कि मारुती"

रेडीओ वन कडून फुकट मिळालेल्या पासेसचा वापरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने 'आत्मा' आणि 'मेरे डॅड की मारुती' ह्या दोन्ही चित्रपटांपैकी एक पहायचा नक्की केले होते ! आत्मा मधील भूत खुपच रटाळ आहे असे तिकिट काउंटरवरच्या मुलाने सांगून मला ते तिकिट घेण्यापासून वाचवले, मग अस्मादिकांनी BLIND FOLDED म्हणतात तसा - मेरे डॅड की मारुती ह्या नवोदित कलाकारांच्या अभिनयावर बेतलेल्या चित्रपटावर सट्टा लावला.... ! ( म्हणजे तिकिट घेतले)
टिव्ही वर 'बडे अच्छे लगते है' फेम राम कपूर आणि त्याच्या वात्रट पोराचे ट्रेलर्स पाहून थोडी कल्पना आली होती, परंतु प्रत्यक्षात चित्रपट पाहिल्यावर मात्र 'आत्मा' च्या ऐवजी हा चित्रपट निवडल्याबद्दल माझे मलाच बरे वाटले,


राम कपुर उर्फ 'तेज' हा एक व्यावसायिक आपल्या पोरावर कायम उखडून असतो, आपली सगळी पुण्याई पोरगं कॉलेजमध्ये टाईमपास करून उधळणार असे त्याला वाटत असते, मारूती ८०० पासून सुरुवात करून , मग स्विफ्ट घेऊन मारुतीच्या प्रेमात पडलेला राम कपूर स्वतःच्या मुलीला लग्नात नवीन मारुती इर्टिगा गाडी गिफ्ट देण्याचे ठरवून ४-५ दिवस आधी गाडी घरी आणतो - घरात लग्नाची तयारी चालूच असते - त्याचा पोरगा समीर हा कॉलेजमधल्या अत्यंत हॉट अश्या जॅझलीन नावाच्या पोरीला इंप्रेस करण्यासाठी ती नवीन आलेली गाडी कशीबशी बाहेर काढून पार्टीला जातो, तिथे एक गाणे गाउन हिरॉइनला परत घरी सोडून पुन्हा पब मध्ये पिण्यासाठी जातो, तिथे निम्म्या टाईट अवस्थेत वॅले च्या ऐवजी एका दुसऱ्यालाच गाडीची किल्ली देतो ! तो मनुष्य अगदी लॉलिपॉप सारखी हातात आलेल्या गाडीतून तिथल्याच पब बाहेर फिरणाऱ्या एका पोरीला ड्राइव्ह वर फिरवण्यासाठी जातो परंतु मध्येच पोलिस दिसल्याने तो गाडीतून पलायन करतो.. गाडी तशीच सोडुन, पोलिसही पोरीला स्टेशनवर नेतो परंतु ती गाडी हलवून नेण्याची तसदी घेत नाही !


इकडे समीर पब मधून बाहेर आल्यावर गाडी नाही पाहून शॉक होतो, तिथे थोडी बाचाबाची होउन कसाबसा गाडी शोधायला बाहेर पडतो, मग गाडी हरवल्यामुळे आणि 'बा' ची भीती बाळगून थोडी बनवाबनवी करतो - म्हणजे सेम टु सेम चोरीची गाडी विकत घेण्याचा प्रयत्न, शो-रुम मध्ये जाउन टेस्ट ड्राईव्ह ची गाडी तासभर आपल्या घरी लावणे, त्याच मॉडेलची गाडी भाड्याने घेणे वगैरे... त्यामध्ये कशी मजा होते, कोण कोण कॅरेक्टरस समोर येतात, समीर कसा अडचणीत सापडतो, त्याची ती हॉट मैत्रीण आणि जिवलग मित्र त्याची मदत कशी करते, आणि ह्या गाडी च्या प्रॉब्लेम पायी पोलिस, लग्नमंडप, बाप-पोरगा, जिजु-साला, बहीण-भाऊ, प्रेमीका-प्रेमी, मित्र-बित्र ह्या सगळ्या नात्यांचा आढावा घेत गोड शेवट करत चित्रपट संपतो.

संपुर्ण चित्रपटात त्याचा खास मित्र म्हणून वावरणारा गट्टू चांगलाच लक्षात राहतो ! रवी-किशनचा छोटासा रोल चांगला आहे ! राम कपूर कॉमेडी रोलमध्ये छान वावरला आहे, त्याचे आणि समीरचे चुरचुरीत संवाद आणि खास पंजाबी टच आपल्याला हसवतो, संपुर्ण चित्रपटात थोड्या थोड्या कालावधीनंतर 'पंजाबीयाँदी बॅटरी चार्जड रेहती है' ह्या गाण्याचा बॅकग्राउंड व्हॉइस चित्रपटाचा वेग कायम ठेवण्यात मदत करतो. 'हॉट इज हॅपनिंग', किंवा "दिखता है वोह बिकता है" ह्या उक्तीला स्मरून नायिकेने पेहरावाच्या बाबतीत दिपिका पदुकोण शी संपुर्ण स्पर्धा नव्हे तर तिला ऑलमोस्ट मागे टाकले आहे.


अर्थात 'आत्म्या'शी एकरुप न होता 'मेरे डॅड की मारुती' शी समरस होऊन मी २ तासांचा विरंगुळा पदरी पाडून घेतला - सहज जमल्यास पहा आग्रह नाही, पाहिला नाही तरी चालेल (मी देखिल फुकट पासावरच पाहिलाय)!





--

आशुतोष दीक्षित.



Wednesday, March 6, 2013

३ वाजले का?



"मश्कार,
  आदाब, देवीयों और सज्जनों कौन बनेगा करोडपती के इस भाग मे आपका बोहोत बोहोत स्वागत है !" - असे म्हणणारा अमिताभ बच्चन आठवतोय का ? -- आता तुम्ही म्हणाल तो कोणाला आठवणार नाही, पण खरी गंमत अमिताभची नाहिचे, त्याच्या जाहिरातीत नाही का शंभरी गाठलेली कोणीतरी आजी, हॉस्पिटलमधले पेशंट, शाळेतले शिपाई, मंत्री-संत्री, कॉलेजकुमार/कुमारी सगळे एकमेकांना विचारत असतात - ९ बज गये क्या ? !
तसाच, अगदी तसाच प्रश्न सध्या अवतीभवती ऐकायला मिळतोय, फक्त वेळ बदलली आहे- ९ च्या ऐवजी ३ बज गये क्या ? असे झाले आहे. - का ? असे विचारणाऱ्यांना एक Hint देतो - 'पासपोर्ट' ! (हं... आता कसे ओळखलेत, सुज्ञास सांगणे न लागे !)

तर, जेवढ्या आतुरतेने लोक अमिताभच्या कौन बनेगा ची वाट पाहायचे तसेच, किंबहुना एखादा टक्का जास्तच वाट दुपारी ३ ची पाहत असतात. बरोबर ३ वाजता पासपोर्ट सेवा केंद्राची ऑनलाईन खिडकी उघडते, आपापल्या संगणकाचा, लॅपटॉपचा, इंटरनेटचा स्पीड शक्य तेवढा हाय ठेवून लोक धडाधड क्लिक करत सुटतात, पहिल्या ६३० (सुमारे - हा आकडा खरा असेल ह्याची खात्री नाही) लोकांच्या नशिबी अपाँटमेंट ची लॉटरी लागते, बाकीचे आपले बसतात वाऱ्या करत... !
आमच्या मंडळींचा पासपोर्ट काढण्याची सुरुवात अशीच झाल्याने मी ह्या प्रक्रियेचा फार जवळून अनुभव घेतला आहे, अस्मादिकांचा पासपोर्ट हा शिस्तीत काढलेला (म्हणजे लाच न देता असल्याने, एजंटबाजीला आपला विरोध .. अर्थात नको तिथे विरोध नसतो, पण जे काम आपण सहज करू शकतो त्यात फुकट लाल नोटा कशाला घालवायच्या ?) त्यामुळे आम्हीच ती जबाबदारी घेतली होती.

ऑनलाईन फॉर्म भरणे हे खूप सोपे आहे, परंतु अपाँटमेंट मिळवणे हा महत्कष्टाच विषय ! ती वेळ काही मिळता मिळत नाही, लोकं २.४५ पासून लॉगिन करून असतात, आणि मग सुरू होते ती क्षणा क्षणाची प्रतीक्षा.... ०२-५९-५८ आणि क्लिक !

समोर फक्त १ दिवसाचे ७-८ स्लॉट्स दिसतात, त्यावरील एकावर क्षणात क्लिक करावे लागते आणि त्यातही तुमच्या संगणक आणि मायाजालाच्या वेग चांगला नसेल तर तुमच्या नशिबी येते ती म्हणजे एक बोल्ड लाल रंगातली सूचना - "हि अपाँटमेंट कोण्या दुसऱ्याने बुक करून घेतली आहे, कृपया दुसरी वेळ घ्यावी" ! - इंटरनेट ला शिव्या हासडत तुम्ही पुन्हा लॉगिन करता, आणि बुक अपाँटमेंट वर क्लिक केल्यावर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाते, कारण तोपर्यंत घड्याळात ०३-०२-०१ देखील झालेले असतात, आणि आपल्यासमोर येते ती म्हणजे अत्यंत नम्र पाटी -> "आजच्या दिवसाच्या वेळा संपल्या आहेत, कृपया उद्या दुपारी ३ नंतर प्रयत्न करा" !

अशावेळी पाट्यांचे शहर ह्या बिरुदाचा अत्यंत राग येतो परंतु जागीच चरफडत बसणे आणि वाचकांच्या पत्रव्यवहारात त्रागा करून घेणे ह्याव्यतिरिक्त आपण काही करूही शकत नाही ! समदु:खी माणसे जमवून निषेध वगैरे नोंदवणे जरा अवघड मामला आहे, त्यातही समजा सगळे लोक एकत्र येऊन सुवर्णमध्याच्या तोडग्यादाखल एखादे चर्चासत्र घ्यायचे झाले तर नेमके "ते" अधिकारी अनुपस्थित राहतात !

बरं ही अपाँटमेंट घेतलेली असली आणि एखादे डॉक्युमेंट नसेल/हजर नसाल तर ती रद्द होते, आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न - अर्थातच पहिल्यापासून फॉर्म भरून त्याच तिकिटावर तोच खेळ !!
अनेकदा तर तुम्ही एका संगणकावरून वेळ घेताना "कॉमन IP ADDRESS" अशी ERROR येते, त्यामुळे काही नेट-कॅफे वाल्यांनी आपल्या संगणकाचा IP बदलत ठेवण्याची करामत करतानाही मी पाहिले आहे. ( केवळ माहीत असावे म्हणून -> एजंट लोक किमान १००० रुपये घेतात फक्त अपाँटमेंट मिळवण्याचे बाकीचे उद्योग तुमचे तुम्हीच करायचे)
२ महिन्यांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आम्ही पुन्हा एकदा रात्रपाळीवर रुजू झालो आणि त्यामुळे आम्हाला दुपारी २.५८ ला संगणकासमोर बूड टेकून बसायची संधी मिळाली, पहिली अपाँटमेंट मंडळींचा रहिवासी पुरावा ( गवर्नमेंट गॅझेट, तुमच्या आजी आजोबांचे वीजबील, तुमचा पासपोर्ट (मंडळींचा उल्लेख नसलेला) चालत नाही ! ) नव्हता त्यामुळे ती रद्द झाली होती. आणि आज अनेक दिवसांनी पुन्हा तो सुवर्णक्षण आला... !
अगदी वेळेत क्लिक केले आणि एका नाही तर २ दिवसांचे स्लॉट दिसू लागले, माणूस अनुभवातून शहाणा होतो असे म्हणतात - त्यामुळे मी सर्वात शेवटचा स्लॉट वर क्लिक करून चित्रविचित्र आकडे/अक्षरांचे व्हेरिफिकेशन करून एंटर केले !



आमच्या मंडळींना अपाँटमेंट मिळाली आता परवा आम्ही अर्ज भरून पुढील ट्रीप च्या विचारांत मग्न होऊन जाऊ, अर्थात - "एकमेकां साहाय्यं करू... अवघे धरू सुपंथ.." ह्या न्यायाने मी लागलीच माझे फेसबुक स्टेटस अपडेट केले !

"पासपोर्ट अपाँटमेंट मिळत नसल्यास sharp २.५५ ला लॉगिन करून प्रयत्न करावा, एकदा न झाल्यास थकून न जाता IP चेंज करून पाहावा किंवा एखाद्या कॅफे मधल्या दुसऱ्या संगणकावर प्रयत्न करावा...अपाँटमेंट नक्कीच मिळेल, आणि आपल्या कष्टातून एजंटचे पैसे वाचवल्याचे समाधान देखील, अगदीच नाही जमले तर मला सांगा - मी आता एक्स्पर्ट झालो आहे ह्या कामात. रात्रपाळी असेपर्यंत मी दुपारी लॉगिन करून वेळ मिळवून देऊ शकतो" (अर्थात ही सूचना जनहित में जारी, म्हणजेच पुणेरी मराठीत - फुकटात !)"


--


आशुतोष दीक्षित



थोडीशी आणखी मदत,

१) पासपोर्ट प्रक्रिया सोपी आहे, एजंटबाजी शक्यतो टाळावी (ज्यांना सहज जमेल त्यांनी तरी) - वेबसाइटवर , फॉर्म भरणे, डॉक्युमेंटस ऍड्व्हायसरी म्हणजेच कोणती कागदपत्रे लागतात त्याविषयीची सविस्तर आणि निटनेटकी माहीती दिलेली आहे.

2) पासपोर्ट सेवा केंद्रात अपाँटमेंटच्या केवळ १५-२० मिनिटे आधी जावे, लवकर जाऊन फायदा होत नाही !

३) आत गेल्यावर ४ काउंटर्स वर डॉक्युमेंट वेरिफिकेशन होते, मग तुम्हाला एक फाइल दिली जाते (Online फॉर्म भरल्याचा हा फायदा, तिथे सिस्टिम मध्ये सगळी माहीती अगोदरच आलेली असते)

४) ती फाइल घेऊन पुन्हा A B C काउंटर्स वर जायचे, तिथे फोटो काढतात, हाताचे ठसे घेतात, ओरिजनल डॉक्युमेंट सेट चेकिंग होते, तोंडी व्हेरिफिकेशन होते, ( C काउंटर सकाळी १० शिवाय उघडत नाही बरं का, तिथे फाइल पुन्हा जमा करून घेतात) आणि मग तुम्हाला पैसे भरल्याची पावती मिळते. ती घेऊन घरी जाणे आणि पोलिस व्हेरीफिकेशन ची वाट पाहणे

:-)    :-)   :-)










Friday, March 1, 2013

"ए छोटू, अजून एक कटिंग.........."

"ए छोटू, अजून एक कटिंग.........."



"एक दिन दुनिया बदल कर... रास्ते पर आयेगी.. आज ठुकराती है हमको....कल...." असे अर्धवट गुणगुणत एक १७-१८ वयाचा मुलगा माझ्या टेबल शेजारून फडके फिरवत गेला...

मी मागे वळून पाहिले, अर्धवट शर्ट इन केलेला, फुल जीन्स ची कापून हाफ केलेली पँट घालून मागच्या खिशांत टिशू पेपर चे बंडल आणि कमरेला २ फडकी लटकवत तो सगळ्या हॉटेलवजा टपरीत फिरत होता....  तो माझ्या जवळून गेला आणि नकळत मी ते उरलेले गाणे पूर्ण केले..

". आज ठुकराती है हमको....कल...... मगर शरमायेगी... हाल ए दिलं हमारा... जाने ना बेवफा ये जमाना...!"

मी हात वर करून हाक मारली "दोस्ता, जरा एक मिनिट... " !
गाणे म्हणत जाणारा तो पोरगा लगेच पुढे हजर झाला..."बोला साहेब".

"ऑर्डर द्यायचीये ती घे पण तुझे नाव काय आहे बाबा... " मी मोबाईल वर SMS टाईप करता करता विचारले...माझ्या शेजारी FB वर पडीक विशालच्या आयपॅड मध्ये हळूच डोकावत तो म्हणाला... "सब छोटू बुलाते, तुम्ही पन छोटूच बोलवा... "
तेवढ्यात सँडी बाइकवरून उतरून टेबल जवळ आला... ३ हाफ फ्राय, १ गोल्डफ़्लेक -- जल्दी ला... ! - सँडीने ऑर्डर सोडली, म्हणाला "स्टेटस कॉल" कॅन्सल झाला रे... बसा निवांत आता... ! ठीकं म्हणत तो मुलगा पुढे गेला, आणि आमच्या गप्पा चालू झाल्या,

- च्यायला, ह्यांना कंटाळा आला की कॉल कॅन्सल, आमची गोची फुकट, चांगला ६-७ ला घरी जाणार होतो, पण ह्या कॉल साठी तासभर थांबलो तर कॉल कॅन्सल... वैताग नुसता, विशाल ने एक उसासा टाकत त्याचे वाक्य पूर्ण केले ,"सोड रे... एक तास लवकर जाऊन करणार काय ? पाऊस पडतोय -गप्प नाश्ता कर, मग जा निवांत आणि आता आधी बडबड बंद कर" !!

हो तुम्ही काय लेकांनो.. सेटल झाला आहात घरी बायको आहे, गेल्या गेल्या गिळायला मिळेल - आम्हाला आधी रूम मध्ये पाय टाकायला जागा करावी लागते, मग बाकी सस्गळं....! -

मी सटकलोच, अरे तू कर लग्न मग, आणि बायका म्हणजे स्वयंपाकी नाहीत,त्या सुद्धा काम करून घरी येतात, आम्ही त्यांना स्वयंपाकघरात मदत करतो आणि एकत्र जेवायला बसतो,
उगीच बकवास नको करूस...जुना काळ संपला आता, If both needs to work... Both needs to Cook&Clean as well.... !!


माझ्या ह्या चोख उत्तरावर त्याने फक्त एक मोठ्ठे धुराचे रिंगण सोडले आणि विषय थांबवल्याची घोषणा केली !!


बिल देताना काउंटरवरच्या अशोकरावांना म्हणालो, रावसाहेब - हा नवीन पोरगा कोण ? भारी बिलंदर दिसतोय ....

अशोकराव म्हणाले, माझाच २ नंबरचा पोरगा आहे, अभ्यासात रस नाही त्याला त्यामुळे म्हणालोय की फक्त ग्रॅज्युएट हो, नोकरी नको तर धंदा सांभाळ पण डिग्री पाहिजे... आम्ही ४थी शिकून एवढे उभारले, तेव्हाच जास्त शिकता आले असते तर आज ४ हॉटेल काढली असती, पोरगा हुशार आहे, पण गल्ल्यावर बसण्याआधी फडक्याची सवय असेल तरच डोक्यात हवा न जाता नीट धंदा सांभाळू शकेल, मी म्हणालो मी सांगेन तसे वागावे लागेल - तर म्हणाला चालेल तुम्ही शिकवाल ते करतो पण अभ्यास नको ! म्हटलं हॉटेल चे ट्रेनिंग सुद्धा सुरू केलं पण ग्रॅज्युएट व्हायचंच...
मी म्हटलं - उत्तम ! ऑल द बेस्ट रावसाहेब, आवडलं आपल्याला तुमचं धोरणं, लगे रहो !
घरी येता येता मनात अनेक विचार घोळत होते, अशिक्षित अज्ञानी लोक म्हणवणारे बौद्धिक दृष्या असा विचार देखिल करू शकतात ? आणि तो छोटू ? एवढ्या तन्मयतेने काम करत होता, सगळी टपरी सांभाळत होता, आणि थोड्या दिवसांतच तो त्याच हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेला असेल. थोडक्यात काय परफॉर्मन्स बेस्ड प्रमोशनच म्हणायचे की !

आपल्या सगळ्यांमध्ये हा असा एक छोटू लपलेला असतो, नवीन काहीही शिकायचे असेल की तो छोटू आपसूक जागा होतो.. अर्थातच, ते नवीन शिक्षण आवडत असलेला छोटू फडके घेऊन कामाला लागतो आणि काम आवडत नसणारा छोटू फक्त अभ्यास नको, अभ्यास नको असे म्हणत बसतो !

शाळेत असताना घरचा अभ्यास घरी न करता शाळेतच मित्राच्या वहीतून पाहून आपला नंबर येण्याआधी पूर्ण करणारा छोटू, कॉलेजच्या सबमिशन्स मध्ये हमखास GT किंवा COPYCODE मुळे फाइल भिरकावली गेलेला छोटू, पहिल्या वहिल्या नोकरीत मिळालेला पगार अत्यंत काळजीपूर्वक घरी नेणारा छोटू (आता सगळे अकाउंट ट्रान्स्फरच असते), घरात लाख भांडणे झाली तरी शेजारी/बाहेरची माणसे भांडायला आल्यावर अंतर्गत बाबी विसरून एकदम "मोठू" होणारा छोटू, मित्रांसोबत पार्टी करूनही घरी समजले तर प्रॉब्लेम होईल ह्या भीतीने कायम 'लिमिटेड' राहणारा छोटू, घरातील भाजी/दळण/बिल भरणा इ. कामे बिनबोभाट पार पाडणारा छोटू, भावा/बहिणींच्या लग्नात 'नारायण' काय करेल, असे 'हाती घेऊ ते तडीस नेऊ' म्हणत धावपळ करणारा छोटू, आप्तेष्टांच्या आजारपणात काय बोलायचे ते न कळल्याने फक्त पायाशी बसून राहिलेला छोटू,


 
असे कितीतरी रोल पार पाडणाऱ्या आपल्या सगळ्यांमध्ये दडलेल्या ह्या छोटूला माझा मनापासून सलाम.

एक पटले की, छोटू हे केवळ नाव नाही....तर वृत्ती आहे, आनंदी वृत्ती  ! :)




--
आशुतोष दीक्षित.
९८२३३५४४७८