Friday, July 4, 2014

" इज्जत की रोटी " (सकाळ -४ जुलै २०१४ - मुक्तपीठ मध्ये प्रकाशित !)


४. २० ला येणारी गाडी लेट होत होत शेवटी ४. ५ तास लेट ची घोषणा झाली आणि ७. ३० ला थंडगार बिसलरीबाटलीतील शेवटचे काही घोट डोक्यावर ओतून मी पुन्हा वेटिंग रूम मध्ये पाय पसरून बसलो !!

मान्सून पूर्व एक सुट्टी गोव्याला घालवण्याच्या मनसुब्याने आम्ही पुणे-गोवा एक्स्र्पेस्चे तिकिट बुक केले. केवळ ६५० रुपयांत झालेल्या ह्या गोवा प्रवासाने पुन्हा एकदा "महंगा रोए एक बार... " ची अनुभूती दिली !


पुणेरी शिस्तीप्रमाणे आम्ही ४. २० च्या गाडीसाठी स्टेशनवर ४ ला'च हजर होते, परंतु ४. १६ ला पहिली वेळ पडली ती ५. २० ची! (कोर्टात तारीख पडते तशी) ऍडव्हान्स बुकिंग केले असल्यामुळे मन दुसरे पर्याय शोधायला राजी नव्हते, एकाच तासाचा प्रश्न आहे असो, काढू थोडा वेळ म्हणून मंडळींसह आम्ही आमचा मोर्चा वेटिंग रूम कडे वळवला. अत्यंत बेशिस्त पद्धतीने सगळा बाकडा अडवून झोपलेले लोक, ५ पैकी फक्त २ चार्जिंग पॉइंट्स चालू आणि कोपऱ्यातला एकच वर्किंग फॅन पाहून डोके अजूनच गरम झाले होते. बॅग खाली ठेवून पुन्हा एक कोल्ड्रिंक घेण्यासाठी बाहेर गेलो.

तिथे वाचायला पेपर पण घेतला आणि पाकीट परत ठेवणार तेवढ्यात मांडीला हाताने पकडून एक लहान मुलगा भीक मागायला लागला. "चल भाग बे! " पेपर वाला वसकन त्यावर ओरडला. परत येताना अजून दोन मुले कटोऱ्यामध्ये लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो ठेवून त्यातले कुंकू लोकांना लावून पैसे घेत होते... मनात विचार आला ज्याने लक्ष्मीलाच कटोऱ्यात ठेवले आहे त्यावर लक्ष्मी कशी प्रसन्न होईल बरं?

दुपारी ४. २० ला येणारी गाडी हरएक तासाला नवीन आगमन वेळ दाखवत दाखवत साधारण ८ः०५ ला रुळावर आली!
गाडी फुल्ल होतीच, आम्ही सामान/बॅग लावून घेतल्या, तहानलाडू भूक लाडू जवळ काढून घेतले आणि गाडी हालण्याची वाट पाहत होतो... तेवढ्यात समोरच्या डब्यातून एक माणूस गुडघ्यावर रांगत येताना पाहिला, त्याचा वेष, दाढी आणि केस पाहून साधारण साठीच्या वयाच्या आसपास आलेला असावा. प्रत्येक सिटखाली वाकून तो हातातल्या तुटक्या केरसुणीने कचरा भरून घेत होता.. मग जमा केलेला कचरा एक शर्टाच्या कपड्याने पुढे ढकलत डब्याच्या दरवाज्यातून बाहेर टाकायचा.


आमच्या सिट जवळ २ लोक बसले होते ते कचरा काढू देण्यासही उत्सुक दिसले नाहीत.. स्वतःच्या गप्पा मारण्यात रंगले होते की कोणीतरी आपल्या सिट खाली जातोय आणि त्याला आपले पाय लागत आहेत हे ही त्या बेशिस्त लोकांना समजत नव्हते.. पण तो माणूस मुकाटपणे सगळा कचरा गोळा करून पुढील सिट कडे जाण्यासाठी निघाला. एकदा आपल्या डोक्यावरील घाम हाताने पुसत त्याने दोन्ही बाजूच्या लोकांपुढे हात पसरले...!


मगाशी खाली पाय टेकवेनासा झालेला रेल्वेचा कंपार्टमेंट ह्या माणसाने अगदी स्वच्छ केला होता, मी लगेच १० रु ची नोट काढून त्याच्या हातात ठेवली आणि म्हणालो - " बाबा, तुम्ही खूप चांगले काम करत आहात, मेहनत से मिला एक रुपया भी आपकी इज्जत की कमाई है ! थँक्यू !! " भाषा समजली असेल की नाही ते कळले नाही पण माझ्या वाक्याने आणि आविर्भावामुळे त्याच्या चेहऱ्यावर त्या परिस्थितीत देखीआनंदाची छटा जाणवली.

थोडा पुढे जाताच बायको म्हणाली त्याला आपला बिस्किटांचा पुडा देऊया का ? - मी म्हणालो लगेच दे!
तोपर्यंत त्याने सगळ्या बोगीतील कचरा उचलून दरवाज्यातून बाहेर टाकला होता, बायकोने २ सिट ओलांडून त्याला बिस्किट दिले आणि हाताने खूण करत म्हणाली थोडं खाउन घ्या बाबा! कृतज्ञता दाखवत त्याने ते बिस्किट कपाळाला लावून नमस्कार केला आणि बाकीच्या बोगी साफ करण्यासाठी तो पुढे निघाला...!

मी आणि बायको पुढचा तासभर विचार करत होतो... की फुकट भिका मागणारे लोकं (विकलांग सोडून) आणि मेहनत करून कमाई करणारे लोक हा फरक बहुदा देवानेच बुद्धी देताना निर्माकेला असावा .. नाहीतर हात-पाय धड असताना लोकांना भिका मागायचा ईझी मनी आवडणे काही पटत नाही! मुन्नाभाई म्हणतो तसा ह्यांच्या डोक्यात पण आयतेपणाचा केमिकल लोचा असावा. असो ते देवाचे देवाला ठाऊक!

पण ह्या दिवसानंतर माझा जगण्याकडे बघायचा दृष्टिकोन एकदम बदलून गेला... दत्तात्रेयांनी २४ गुरू केले होते... मला माझा पहिला गुरू इथे मिळाला !ह्या सफाईकरणाऱ्या माणसाकडे पाहून एक कळलं की,
थोडी जिद्द आणि कष्टाची तयारी असेल जगात कोणीही कधीही उपाशी मरणार नाही. भले घास असो पण जे आहे ते मेहनत करून.

ह्यालाच म्हणतात इज्जत की रोटी !!

No comments:

Post a Comment