Tuesday, July 23, 2013

वेताळ पंचविशी..(तिसरे वर्ष सरले)


वेताळ पंचविशी...   हा शब्द मी २५ ते ५० ह्या वयोगटासाठी वापरणार आहे हे तेव्हाच ठरवले जेव्हा वयाची २५ ओलांडून त्याला गद्धेपंचविशी असे नाव दिले  होते... वेताळ हा केवळ पिशाच्याधिपती नसून तो शिवगण देखिल मानला जातो... त्यामुळे त्याच्या असीम ताकदीच्या प्रेरणेने पुढील आयुष्यात बेदम काम करायचे, PARTY HARD...WORK HARDER ह्या हिशेबाने पहिली २५ झक मारतील अशी आगेकूच करायची आणि वाटेत जे चांगले दिसेल ते घ्यायचे ह्या ओढीने  आणि वेताळाच्या प्रतीक्षेत मी तिसरे वर्ष सर केले आहे....

गेली २८ वर्षे (आधीची अजाणती वर्षे सोडली तरी निदान गेली २३ वर्षे) माझा वाढदिवस म्हणजे घरात भरपूर दंगा हे समीकरणच झाले आहे.
खूप लहान होतो तेव्हा सगळे आठवत असे नाही, पण फोटो पाहून लक्षात येते की आई-बाबांनी सगळ्यांना बोलवलेले असायचे माझ्या  वाढदिवसाला. थोडा मोठा झाल्यावर मीच आवर्जून सांगायला लागलो. तेव्हाचे कारण काही वेगळे होते, तेव्हा सदिच्छांपेक्षा गिफ्ट्स/भेटवस्तूच्या पिशव्यांवरून वाढदिवसाची गोडी मोजली जायची .... आणि खरी मजा तर ती मिळालेली गिफ्ट्स त्याच दिवशी रात्री उघडून बघण्यात असायची हे वेगळे सांगायला नकोच,  त्याच काळात शाळेत चॉकलेट्स ची पिशवी  घेऊन   वह्यांवर लावायचे स्टिकर्स किंवा पट्टी,मागे खोडरबर असलेली पेन्सिल आणि शार्पनर चा सेट, किंवा फार कशाला दोन्ही बाजूने उघडता येणारी  प्लॅस्टिकची कंपासपेटी असे काही ना काही पोरांना वाटायचे .
त्यामध्ये मोठी गंमत होती, आपल्या खास दोस्ताला आपल्या मागे चॉकलेट्स ची पिशवी धरून फिरवायचे आणि सगळ्यांना वाटून झाली की शेवट उरलेली आपण स्वतः आणि ते एक दोन खास दोस्त मिळून डबल-ट्रिपल संपवायची पण मग महाविद्यालयात आलो आणि त्या चॉकलेटच्या पिशवीचाही चार्म गेला, आणि वाढदिवसाच्या ट्रीट ची जागा घेतली ती 'अण्णा ' च्या वडापाव, फ्रायम्स पॅकेट आणि चहा ने   - खास दोस्त इथेही होते... फरक फक्त एवढाच होता की येथे फक्त आणि फक्त खास दोस्त'च होते. छोट्या शाळेतल्या सारखी सगळ्या वर्गाची  गर्दी  उरली नाही.

कॉलेजमध्ये मग ह्याच संस्कृतीने तग धरला... बदलली ती  फक्त 'ट्रीट' ची पद्धत, त्या वेळेपर्यंत मॅकडी(म्हणजे मॅकडोनाल्ड्स) आणि पिझ्झा हट, चैतन्य पराठा आदी मंडळी आमच्या त्यांच्या ऍड्व्हर्टाईझिंग स्टंटबाजीमुळे आमच्या आवाक्यात आली होती. त्यामुळे आमचा कंपू ह्या नवा विदेशी/इंग्रजी साज चढवलेल्या कट्ट्यांकडे वळू लागला...ह्या आणि ह्यासोबतच  'वीर दा ढाबा','पंजाबी ढाबा' आणि अजून अनेक नवीन कट्ट्यांनी  आमच्या खवैयेगीरीच्या ज्ञानात भर घातली.

कॉलेज संपून नोकऱ्या लागल्यावर देखील वरील ठिकाणांतील ५०% कट्ट्यांशी इमान राखून आहोत , बाकीचे काही काळाच्या पडद्याआड गेले तर काहींना आम्ही आमच्या चाकोरीबाहेर ढकलले.. पण आता मात्र दिवसाचे सगळे तास हातातल्या  मोबाईल, I-पॅड, इ. ला बांधले गेले असल्याने जमायला हवे तसे भेटायला जमत नाही, ऑफिसवाल्यांना पार्टी म्हटले की दारू व्यतिरिक्त आणखी काही दिसत नाही, त्यामुळे पार्टी रंगत जाण्याऐवजी झिंगत जाते... मग कसलं शेअरिंग आणि कसलं काय !
नाईलाज म्हणून मग आपण स्वतः पिणारे नसलो तरी असल्या पार्ट्यांना हजेरी लावून 'अटेंडस' मार्क  करून यावे लागते. (प्यायलाच पाहिजे असे काही नाही, पण अटेंडंस पाहिजे नाहीतर तुम्ही सोशल नाहीत म्हणे ! )

परंतु कॉलेजपासून ते आजपर्यंत माझ्या घरी  आवर्जून येणाऱ्या माझ्या ४-५ मित्रांना आणि आणि त्यांच्या 'कुटुंबांना' अनेक धन्यवाद..

 मित्रांनो तुम्ही येता ते तास दीड तास अगदी आनंदात जातात   असेच येत चला.... !

आज वयाची २८शी ओलांडल्यावर सरलेले सगळे वाढदिवस आठवले... प्रत्येक वाढदिवसाला काही ना काही स्पेशल होते, शाळेत असताना बाबांकडून मिळालेला व्हिडियोगेम असो किंवा कॉलेजमध्ये मित्र-मैत्रिणींकडून मिळालेली खास चीजवस्तू असो, नोकरीत बॉस आणि कलिग्स कडून मिळणारा पार्टी वेअर टीशर्ट असो, किंवा मग लाइफस्टाइल किंवा शॉपर्सस्टॉप वगैरेंची व्हाऊचर्स असो. हे सगळे दृश्यं स्वरूपातील 'GAINs' म्हणता येतील. पण त्या पलीकडेदेखील दरवर्षी होणारी भावनिक, वैचारिक वाढ -  सांस्कृतिक प्रगल्भता, दर २ महिन्यांतून घेतली/वाचली जाणारी पुस्तके जाणारी पुस्तके, कळत-नकळत  समोरच्याच्या चांगल्या गुणांमुळे ते शिकून घेण्याची जिद्द,  अडल्या माणसाला शक्य तेवढी मदत करण्याची प्रवृती, आणि आजवरच्या काळात माझ्या आर्थिक, नैतिक, सामाजिक, राजकीय, अश्या अनेक पैलूंनी  माझ्या शिक्षणात भर घालणाऱ्या प्रत्येकाचे चेहरे आजही मनाच्या पडद्यावर तरळून जातात.


सिग्नलला भर पावसात गाडी बंद पडलेल्या शेजारी बायको बसलेली आणि मागे असंख्य हॉर्न वाजवणारे, बोंबा मारणाऱ्या लोकांमुळे 'सॉरी सॉरी' म्हणत भांबावलेल्या माणसाला मी माझी बाइक साइडला लावून गाडीला धक्का मारून दिला. गाडी चालू झाल्यावर पावसात पूर्णं भिजत खाली उतरून त्याने कृतज्ञतेने म्हटलेल्या एका 'थँक्यु', व अशा एक ना अनेक क्षणांमुळेमला वेताळ पंचविशीतील एक वर्ष कारणी लागल्यासारखे वाटते.

आज सकाळी सकाळी बायकोने २८ उकडीच्या मोदकांचे तबक समोर ठेवले  (अत्यंत कलात्मक पद्धतीने बनवल्याबद्दल माझ्या मावशीचे आभार),
आईने औक्षण केले आणि एक सोनेरी कडांचे पाकीट हातात ठेवले,

आजीने देखील विचारले - मी काय देऊ बाबा तुला ? काहीतरी देणारच, पण त्यातल्या त्यात ज्याची गरज आहे आणि जे हवेसे वाटते ते द्यावे, निदान केक तरी देते मी.

  
मी म्हणालो - 'तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहेतच, ते तसेच राहू द्या, वेताळ भेटेलाच तर त्याच्याकडून आयुष्यातली ही वर्षे परत मागून घेताना कामी येतील" !!

1 comment: