Friday, December 30, 2011

अ "फेरी" टेल !!

लहानपणापासून आपण 'फेरी टेलस' ऐकत आलो आहोत!

एक दुष्ट चेटकीण किंवा राक्षस राजकुमारीला तिच्या राजवाड्याच्या बागेतून पळवून नेतो - राजा अर्धे राज्य- आणि राजकुमारीशी विवाह लावून देण्याची दवंडी पिटतो - एखादा गरीब घरातला पण शूर मुलगा प्रयत्न करायचे ठरवतो - त्याच्या प्रवासात भेटणारे प्राणी-पक्षी-साधू त्याच्या चांगल्या वागणुकीबद्दल त्याला वेगवेगळ्या जादूच्या गोष्टी देतात - त्या गोष्टींच्या साहाय्याने येणारे प्रत्येक संकट मोडीत काढून तो राजकन्येला सोडवून आणतो - मग थाटामाटात विवाह होतो आणि ते गुण्या गोविंदाने राज्य करू लागतात.

हेच सर्वसाधारण कथानक ऐकत लहानाचे मोठे झालो, (आणि मग मोठे होताना हळू हळू समजायला लागले - अर्धे राज्य मिळवणे वगैरे सोपी गोष्ट नाही.... )

पण आज सुचलेली फेरी टेल वेगळीच आहे, -- ही आहे सगळ्या फेरीवाल्यांबाबत...

आपल्या दारावर, सोसायटीत येणारे वेगवेगळे विक्रेते, फेरीवाले ह्यांच्या बाबत ऑब्सर्वेटिव असं बरंच काही असतं, कुणाचे कपडे... कुणाच्या वस्तू, कुणाकुणाच्या हातगाड्या/सॅक/बॅग्स.... पण, सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे त्यांचा 'आवाज'!

काहींचे आवाज अतिशय मंजुळ असतात... की आपण वैतागून म्हणतो ह्या असल्या आवाजाचा माणूस 'सेलस्मन' कसा झाला? तर काहीजण एकदम तारसप्तकांतच सुरू करतात... पण एकजात झाडून सगळे फेरीवाले जणू आपल्याला चॅलेंज करत असतात कि फक्त आमच्या आवाजावरून काय विकायला आलोय ते ओळखणे शक्य असेल तर बोला... निदान काय विकायला आलंय ते पाहायला तरी बाहेर यावंच लागतं... आणि महिलावर्ग एकदा बाहेर आला... की १० पैकी ४ ठिकाणी तरी विक्री पक्की!!

बरं ओरडणं तर काय असतं एकेकाचं! - रद्दीवाला आठवतोय का? सायकलला कॅरिअर वर तराजू आणि हँडल ला भगदे पिशवी लावून फिरणारा? तो तर कधीही 'रद्दी पेपर' असे नीट ओरडताना मी पाहिला नाहीये. आमच्या सोसायटीत साधारण ३-४ लोक येतात असे पण प्रत्येकाचे उच्चार वेगळे.... कधी ते दिपॉर दिपॉर असे ओरडतात, कधी पेपर आणि रद्दी एकत्र करून पेपॉSSर्दी असे ओरडतात. तर ह्याउलट गत बोहारणींची -> त्या फक्त भांडीयाँ..... भांडीईईई...... भांडीवालेंयाँ.... अश्या एकाच शब्दाचा फक्त शेवटचा स्वर काळी १ ते काळी ५ मध्ये फिरवत ठेवतात.

भाजीवाले तर अक्षरशः अक्खी मंडई वाहून आणल्यासारखे सगळ्या भाज्यांची नावे घेत ओरडत सुटतात... मग त्यात कोथिंबीर, चाकवत, पालक, मटकी, शेवगा, बीट, पडवळ, कांदापात, माठ, अळू, शेपू...... अरे रे... किती ह्या भाज्या! आणि भाजीवाले खूपच 'इनोव्हेटीव्ह' असतात बरं का...

टीव्ही वर नाही का एक मालिका संपून दुसरी सुरू होण्याआधीच्या काळाला "फीलर्स" म्हणतात.. त्यात जाहिराती किंवा नवीन मालिकांचे निवेदन किंवा गाण्याचे एखादे कडवे वगैरे दाखवतात... तसंच सोसायटी संपेस्तोवर त्यांच्या भाज्यांची नाव संपली तर पुन्हा पहिल्या भाजीपासून सुरू करायचे.. आणि समजा ते देखिल कमी पडले तर फीलर्स म्हणून ते अनेक भन्नाट वाक्य वापरतात....

"ताजी भाजी ताजी SSSSये... एकदा खानार तर परत बोलावणार....या मावशी स्वस्तात मस्त....डायरेक्ट मार्केटयार्ड मधून ........ किंवा सगळ्यात भारी म्हणजे - "शेतातून घरात... शेतातून घरात... "



आजकाल, म्हणजे गेल्या ७-८ वर्षांत फर्निश्ड फ्लॅट संस्कृतीमुळे रेडीमेड नक्षीदार कुंड्या, त्यामध्ये एक दोन फुले आलेली रोपे, (ही फुले फक्त आपण विकत घेईपर्यंत टिकतात, त्यानंतर ची फुले येण्यासाठी मान्सूनचीच वाट पाहावी लागते! ) शोभेची फुले विकणाऱ्यांच्या संख्येत पण वाढ झाली आहे, ते लोक पण फूलवाले, कुंडीवाले, झाडवाले... असं काहीतरी अस्पष्ट ओरडत असतात... आणि एखादी बाई "काय ओरडतं आहेत काही कळतं पण नाही... " म्हणत बाहेर आली की तिला ह्या फुलांची भुरळ पडलीच म्हणून समजा... त्याचाच भाग दुसरा म्हणून काय तर साड्यांचा गठ्ठा एका कापडात बांधून गल्लोगल्ली फिरणारे लोक जयपुरी, राजस्थानी, काश्मिरी, चेन्नई, अश्या जमतील तेवढ्या राज्यांची नावे घेतात - आता आपण कुठे प्रत्येक राज्यात फिरून बघतो की तिथला पॅटर्न कसा असतो ते!! त्याउपर सिल्क, कॉटन, रॉयल पॅटर्न, जरी बॉर्डर, इ. इ. 'व्हरायटी' पण फीलर्स म्हणून जोडतात..

पाय्पोस्वाले(पायपुसणी वाले), जाडूवाले (झाडूवाले), ह्यांच्या स्वरबद्ध हाळी मध्ये फक्त 'रिदम' समजतो... पण पाय्पोस्वाला म्हणजे पायपुसणी विकणारा हे समजण्यासाठी घराबाहेर यावेच लागते.!

ह्या सगळ्या निरीक्षणानंतर फेरीवाले हा काही एका लेखात मावणारा विषय नाही हे माझ्या ध्यानात आले, परंतु हे रोज अनुभवणाऱ्या, जगणाऱ्या आणि पाहणाऱ्यांसाठी एक वेगळा पर्स्पेक्टीव्ह देण्याचा प्रयत्न --- तुम्ही सुद्धा नीट निरीक्षण करा, आपल्या बालपणीच्या फेरीटेल्स पेक्षा ह्या फ़ेरी'वाल्यांच्या टेल् कितीतरी जास्त मजेदार वाटू शकतात .

टीप: कोणत्याही फेरीवाल्याने वाईट वाटून घेऊ नये, इथे उपहास नसून फक्त मजेदार वर्णन करण्यात आले आहे आनंद घ्या आणि आनंद द्या...


-
आशुतोष दीक्षित.

Wednesday, December 7, 2011

जो शादी वाले घर मे सेवा करता है, उसको बोहोत सुंदर बिवी मिलती है

~~~~
My OLD Article after getting engaged on 07 DEC 2011 :)- This was earlier published on MomentVille (WEDSITE)
~~~~~

"माझे लग्न ठरताना...." असा एक लेखच' लिहिणार होतो, पण म्हटलं उगीच एवढे मी'पण बरे नव्हे.
तर माझे लग्न कसे कधी कुठे आणि केव्हा ठरले ह्याबद्दल उत्सुकता असणाऱ्या सर्वांना त्यांच्या curiosity बद्दल धन्यवाद !

बहुतेक सगळ्या Arranged Marriages चा महत्त्वाचा दुवा म्हणजे "विवाह मंडळ" -  Mr.&Mrs. कानिटकरांचे 'अनुरूप' आमच्या मदतीला तत्पर राहिले.

लग्नासाठीची मानसिक,आर्थिक,नैतिक व  नावनोंदणीची तयारी -- त्यानंतर प्रत्यक्ष विवाहमंडळात नाव नोंदणी -- पसंती-नापसंती --- आणि मग लग्न  !  खूप भारी असतो बरं का हा सगळा प्रवास --- वाचताना वाटतो तेवढा साधा सरळ सोपा अजिबात नसतो !

अनेक लग्नाळलेल्या,In process, expecting bride, लोकांनी "लग्न आणि त्याबाबतच्या (भ्रामक)समजुती" ह्यावर कितीतरी मजेदार, किस्सेदार, खुमासदार (ज्यांनी स्वानुभव दिलेत त्यांच्या बाबतीत दिलदार देखिल) लेखन केले आहेच... आणि हाच साहित्यसाठा वाचत वाचत आम्ही लहानाचे मोठे झाले.... (येथे अर्थ वय २२ ते २७ )

कितीही पुढारलेले घराणे किंवा जमाना आला तरी योग्य वयात घरचे मोठे बहीण भाऊ, किंवा नातेवाईकांतील समंजस व्यक्ती आपल्याला एक कानमंत्र देतात'च    तो म्हणजे " मैत्रिणी कोणत्याही चालतील, पण बायको शक्यतो "आपल्यातलीच" बघा !"  आणि तो चुकीचा आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही, पण प्रत्येकाला स्वतःचे मत असते आणि त्याबाबत त्यानेच निर्णय घेणे योग्य.

असो, तर हा कानमंत्र तर पाचवीलाच पुजल्याने आम्ही प्रेमं बिमं करायच्या भानगडीत पडलोच नाही.... ! काही खट्याळ आणि खोड्याळ लोकं या वाक्यानंतर "जमलंच नसेल... " वगैरे बाष्कळ विनोद करू पाहतील पण त्यांना महत्त्व दिल्याने त्यांचा उपद्रव आणि आपल्याला त्यांची येणारी कीव दोन्ही वाढतं जात -  म्हणून IGNORE & Proceed पद्धत मी आचरणात आणतो.

लग्नाच्या योग्य वयात (अजून तरी २६ ते २९) आल्यावर आम्ही आणि घरचे मिळून एका गहन चर्चेला बसलो - लग्न करायचे का ? कुठे काही प्रकरणं नाहीये ना आधीच ? नाव नोंदवूयात का ? वगैरे प्रश्नांवर गहन  बोलणी होवून उद्या ठरवू ह्या स्वल्पविरामानंतर मग कॉफी किंवा डाळ तांदुळाच्या खिचडीने चर्चेची सांगता केली जाते.

एकदा नाव नोंदवले की मग फोन Enquiry सुरू होतात   --आणि मग मुलगा असो वा मुलगी.... दोघांनाही गरम मसाला पिक्चरमध्ये अक्षय कुमारच्या ओळींचा प्रत्यय येतो..."जो हमे चाहिये उसे हम नाही चाहिये, और जिसे हम चाहिये वो किसको चाहिये ??"

ह्यानंतर मग सुरू होतो तो कांदेपोहे (आत्त्ताच्या generationचा चहा-कॉफीचा) प्रोग्रॅम...  त्यातून समोरचा माणूस उलगडला तर ठीक नाहीतर मग - बोरींग,वाढीव,आगाऊ,मिजासखोर आणि अशी अनेक विशेषणं लावून Rejection चा ठप्पा लावून गुडबाय ! एवढं सगळं झाल्यानंतर मग मात्र एका ठिकाणी WaveLength जुळते ! मग घरच्यांचा बोलीचाली आणि मग शेवटी धूमधडाका - !

आमचं देखिल ALMOST सगळं असंच झालं -> अनुरूप मध्ये प्रोफाइल्स पाहिल्या, मग पहिली भेट, दुसरी भेट, Familly involvements, इंटरनेट वरून Chat connectivity आणि Final GO/NO-GO !!

शेवटी शाहरुख चे DDLJ मधले वाक्य खरे ठरले !! -"जो शादी वाले घर मे सेवा करता है, उसको बोहोत सुंदर बिवी मिलती है"-  आजवर अनेक लग्नांमध्ये पु.लं.चा  'नारायण' Character निभावल्याचे उत्तम फळ मिळाले आहे -
माझ्या UnMarried दोस्तांनो, हा Funda Try करा - तुम्हाला देखील नक्कीच प्रत्यय येईल..... 

ही आमची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण !!

Monday, December 5, 2011

आनंद वाटणारा देव !

देव-आनंद यांना एका चाहत्याचा मानाचा मुजरा,

नावातच आनंद असणारा माझा सर्वात आवडता कलाकार, काळाच्या पडद्याआड गेल्याचे समजले आणि मी मिनिटभरताच गाईड, जॉनी मेरा नाम, हम दोनो, बाझी, नौ-दो-ग्यारह,काला बाजार, तेरे घर के सामने -- अश्या कितीतरी सिनेमांची नावे डोळ्यासमोर तरळून गेली...

सध्या म्हणजे, १९९० नंतर=> नव्या जमान्यातली सिनेमा/गाणी/संगीताची खास चव उरलेली नाही, नुसता धांगडधिय्या आणि अंगप्रदर्शन ह्यामध्येच सगळे सिनेमा उरकतात. - अशी हमखास टिका होते ! आणि बहुतांशी ते खरे देखील आहे असे मला वाटते. अगदी बोटावर मोजण्याएवढे दर्जेदार अपवाद सोडले तर बाकी सगळेच 'गल्लाभरू' ह्या कॅटॅगरी मध्ये येतात. असो आजचा विषय तो नाही, आणि त्यावर जास्त बोलण्यात अर्थ देखिल नाही !

देव आनंद आणि माझी कधी समोरासमोर भेट झाली नाही, परंतु खूपं इच्छा होती भेटीची ( अगदी लक्ष्मीकांत बेर्डेसारखीच). मी लहानपणी चित्र-आकलन होऊ लागले तेव्हापासून देव आनंद ची गाणी पाहत ऐकत आलो आहे, घरी आई-बाबा जुन्या गाण्यांच्या व्हिडिओ कॅसेट लावायचे तेव्हा १० पैकी ५ गाणी देव साहेबांचीच होती तेव्हापासून कळत नकळत थोडी देव-आनंद स्टाइल कॉपी होऊ लागली.

शाळेत मॉनिटर रोज एक सुविचार लिहायचा, आणि आम्हाला तो वर्गवाणीच्या वहीत लिहावा लागायचा...ज्या दिवशी काही नवीन मिळणार नाही तेव्हा २ सुविचार ठरलेले असायचे,

१) दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही.!

२) केस वाढवून देव-आनंद (आणि इथे हमखास देवानंद असे लिहिले जायचे) होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा !

दुसरा सुविचार कायम डोक्यात जायचा, आणि मी ह्या वाक्याला कधीही मान्य करण्यास तयार नसायचो !- हा सुविचार म्हणून असायच्या त्या दिवशी मी जागा रिकामी ठेवून घरी जाऊन काहीतरी शोधून लिहायचो पण हे लिहिणे मला मान्यच नव्हते !! फक्त केस वाढले म्हणजे देव-आनंद होता येते काय? की फक्त ज्ञानाने तुम्हाला कोणी विवेकानंद म्हणणार? उगीच आपले ट-ला-ट जोडून काहीतरी यमक जुळवायचे आणि सुविचार म्हणायचं!

उत्तम संवादफ़ेक, नृत्य (उत्तम नसले तरी बीभत्स नक्कीच नाही), आणि जबरदस्त संवाद-कथानक मिळालेले सिनेमे. जेवढे बघितले तेवढेच पुन्हा पाहण्याजोगे !! आणि अगदी सगळा सिनेमा नाही, तरी देव-आनंद ची गाणी तर नक्कीच अजरामर आहेत ! ह्या माणसाच्या आयुष्याला कितीतरी पैलू आहेत ते विकिपीडिया/गूगल वर एका क्लिक मधून समजेलच.

मध्यंतरी "हम दोनो" हा सिनेमा इस्टमनकलर मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा मी मंगला टॉकीज ला तिकिट काढून गेलो होतो, मधलेच तिकिट मिळाले होते - माझ्या एका बाजूला एक आजी आजोबा बसले होते, आणि दुसरीकडे ३ साठीच्या आसपासची माणसे, - मी गॉगल, जॅकेट काढले, जागेवर बसलो, हँडग्लोव्हस काढले आणि मोबाईल सायलेंट केला, माझे आत्याधुनिक वागणे पाहुन त्यांचे तिकिट पुढे करत आजोबा मला म्हणाले - हम दोनो' इथेच लागणार आहे ना ? का आम्ही मल्टिप्लेक्स चा स्क्रीन चुकलोय ते सांगता का प्लीज ? !

मी आजोबांना म्हणालो, आजोबा हाच आहे हॉल आणि मी सुद्धा हम दोनो पाहायलाच आलोय, त्यांना एवढा आनंद झाला ह्या वाक्याचा - आजी म्हणाल्या देव आनंद लहान-थोर सर्वामध्ये प्रसिद्ध आहे म्हणजे ! सिनेमा संपेपर्यंत आजी-आजोबा माझ्याशी गप्पा मारत होते, इंटरवल मध्ये वडापाव खाताना त्यांच्या जुन्या आठवणी सांगत होते आणि मधून मधून ब्लॅक&व्हाईट च्या वेळी आणि ही नवीन निर्मिती अशी कंम्पॅरिझन पण करून सांगत होते !

सिनेमाच्या सुरवातीलाच अत्यंत नम्रपणे देव आनंद प्रस्तावना करून सिनेमाची सुरुवात होते. त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की हम दोनो च्या रंगीतीकरणानंतर बाकी सुद्धा प्रस्तावित सिनेमा रंगीत करण्याचा मानस होता, पण आता बहुदा आपण सगळेच त्या आनंदाला मुकणार आहोत, कदाचित सिनेमा रंगीत मिळेलसुद्धा पण त्याच्या सुरुवातीला प्रस्तावनेसाठी आता "आनंद" मिळणार नाही !

पुण्यात डेक्कन ला लकी नावाचे एक रेस्टॉरंट होते त्यामध्ये देव-आनंद ह्यांचा एक खूप मस्त फोटो होता, आम्ही जेव्हा जेव्हा तिथे चहा प्यायला जायचो तेव्हा तेव्हा कायम देव आनंदची गाणी आपसूक'च तोंडातून बाहेर पडायची. आणि संपूर्ण माहोल फ्रेश होऊन जायचा.

"मैं जिंदगी का साथ निभाता चला गया" म्हणत सगळी दुःखे विसरवणारा, "अपने पे भरोसा है तो एक दांव लगा ले" ह्या ओळींवर खोल विचार करणारा, "याद किया दिल ने कहॉं हो तुम", "चुडी नही ये मेरा दिल है","फुलों के रंग से", "रुक जाना ओ जाना", "अभी ना जाओ छोडकर" म्हणत नायिकेसाठी नाचत गात आपले प्रेम व्यक्त करणारा, "ये दिल ना होता बेचारा", "है अपना दिल तो आवारा", "जो भी प्यार से मिला" च्या तालावर गेला दिवस आपला म्हणणारा. एक जिंदादिल, चिरतरुण आणि रसिकप्रिय देव-आनंद आपला निरोप घेऊन "यहाँ कौन है तेरा" नियम सिद्ध करत पुढच्या सफरीवर गेला आहे.

एक देव - दुसऱ्या देवाच्या आत्म्याला शांती देवो !

--
आशुतोष दीक्षित.

Saturday, November 19, 2011

चकवा !!

नीलगिरीच्या पानांतून सळसळत काहीतरी वर चढल्याचे जाणवले.... किर्र काळोखात हिंमत करून झाडाजवळ जाऊन काय आहे ते पाहायचा प्रयत्न केला आणि....... पाय जमिनीत थिजले,....! झाडावरून दोन पांढरी बुबुळे माझ्याकडे रोखून पाहत होती....






रोखून पाहणाऱ्या बुबुळांकडून नजर फिरवून जमेल तेवढ्या जोरात पाय ओढत पळत रस्त्यावर गेलो... पण,.... गाडी नव्हतीच तिथे!! गाडी गायब झाली होती...! गाडी लावलेल्या ठिकाणी लाल रिंगण झाले होते...... मी पुरता भांबावलो होतो!! काय करावे सुचत नव्हते!!

त्या मंतरलेल्या वातावरणामुळे ते लाल रिंगण अजूनच भेसूर वाटत होते, गाडीशिवाय परतणे शक्यच नव्हते. मी टायर च्या खुणा पाहून त्यामागे जायचे ठरवले!! साधारण १-२ किलोमीटर चालताना सतत मागून कोणीतरी येत आहे असा भास होत होता. एका वळणावर पाण्याच्या साचलेल्या डबक्याजवळ माझी गाडी दिसली आणि डोकंच सुन्न झालं...

पाणवठ्यावर पिशाच्चांचा वावर असतो असे ऐकले होते... कसाबसा गाडीपर्यंत गेलो, दरवाजा उघडून आत बसलो. संपूर्ण गाडीत फिकटसर धूर साचलेला होता. किल्ली लावून गाडी सुरू केली आणि शक्य तितक्या वेगाने पुन्हा हायवेकडे निघालो.

टोल नाक्याजवळ पोलिसांचे बॅरिकेडस दिसले तेव्हा जिवात जीव आला. गाडी स्लो करून सीट बेल्ट लावायला बेल्ट ओढला तर एक जाडसर केसांची जटाच हातात आली.... शुद्ध हरपण्या आधी कोणा एकालातरी काय झाले हे माहीत असावे असे वाटले, आणि मग मात्र तडक टोल पोलिस चौकीत जाऊन सगळा प्रकार सांगितला!!

इन्स्पेक्टर चव्हाणांनी मला बसायला खुर्ची दिली, पाणी दिले. तिथल्या २ हवालदारांना गाडी चेक करायला आणि जरा आजूबाजूला पाहणी करून येण्यास सांगितले.... आणि मला म्हणाले जे झाले ते नीट सविस्तर सांगा....

मी आणि माझे २ मित्र गोव्याला अजून एका मित्राच्या लग्नासाठी गेलो होतो... तो मूळचा गोव्याचा म्हणून मग तिथेच लग्न करणार होता, गोवा हे खास हॉलिडे डेस्टिनेशन तर आहेच... पण तरीही ते जास्त प्रसिद्ध आहे ते मद्यार्क/आणि मद्यपींचा स्वर्ग म्हणून... काल रात्री रिसेप्शन झाले आम्हाला निघेपर्यंत ११ वाजले होते.. शेवटचे चिअर्स करून आम्ही तिघेही बाहेर पडलो....... --

एक मिनिट!! म्हणजे तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत होतात? -

इं. चव्हाणांच्या ह्या प्रश्नाने खरं तर मी बावरलो होतो पण जो घडला तो प्रकार अतिभयानक होता त्यामुळे खरे बोलण्यावाचून गत्यंतर नव्हते. मी म्हणालो " साहेब मी पार्ट्यांना जातो पण कधीच पीत नाही, म्हणजे अगदीच आग्रह केला तर एखादा स्मॉल, पण शक्यतो नाहीच - कारण बहुदा मीच माझ्या बाकी मित्रांना घरी सोडायला जातो.... मला मध्येच थांबवत चव्हाण उठले, खिडकीतून बाहेर रस्त्यांवर नजर फिरवत मला म्हणाले -माझ्या प्रश्नाचे साधे उत्तर द्या - हो किंवा नाही! मी हो म्हणालो.

लगेच त्यांचा पुढचा प्रश्न - मग तुमचे ते मित्र कुठे गेले आता? गाडीत आहेत की लुडकले कुठे येता येता?

मी पुन्हा उत्तर देऊ लागलो, -> प्रशांत आणि विकास चुलतं भाऊ, गोवा महामार्गावर एक गाव आहे पिंदळे - तिथे त्याचा एक वाडा आहे तो अर्धा ओनरशिप केलाय, त्या फ्लॅट वर त्यांना सोडले आणि परत येता येताच हे सगळे... -

तेवढ्यात हवालदार वानखेडे आत येत म्हणाले - साहेब आक्खी गाडी चेक केली - कसलातरी मास-मच्छी/सडलेले कांदे वगैरे सारखा घाण वास मारतोय, वडाची एक छोटी पारिंबी सिट बेल्ट वर अडकली होती कुठेतरी गाडी ठोकली वाटतं.. तेव्हा अडकली असावी - तिचा हातात घेऊन हे साहेब ओरडत चौकीत आले होते की हो...! -- चव्हाणांनी हातानेच हवालदारांना थांबवले.

इं. चव्हाण पुन्हा समोर येऊन बसले - ग्लास पाण्याने पाण्याने पुन्हा भरून मला म्हणाले - पुढे बोला,

"त्यांना फ्लॅट वर सोडले, आणि परत येता येता जाणवत होते की आज आपण जास्त प्यायलो, मित्राने, त्याच्या बायकोने आणि इतर गँग ने लग्नाच्या रिसेप्शनच्या कारणाने जवळ जवळ एक खंबा आम्हा तिघांमध्ये २ तासात रिकामा केला होता... एका वळणावर मला जबरदस्त प्रेशर आले (लघवी करणे भाग होते) - मी गाडीतून बाहेर उतरलो.

लोकलाजेखातर हाय-वेपासून फर्लांगभर लांब आडरानाच्या बाजूने गेलो, आणि लघुशंकेचे निरसन करताना समोर नीलगिरीच्या पानांतून सळसळत काहीतरी वर चढल्याचे जाणवले.... किर्र काळोखात हिंमत करून झाडाजवळ जाऊन काय आहे ते पाहायचा प्रयत्न केला आणि....... पाय जमिनीत थिजले,....! झाडावरून दोन पांढरी बुबुळे माझ्याकडे रोखून पाहत होती....

माझी चढलेली होती -नव्हती तेवढी सगळी दारू एका क्षणात उतरली.... तिथून मागे फिरलो तर गाडी गायब, २-३ किलोमीटर नक्की आठवत नाही किती चाललो - पण मग एका पाणवठ्यावर मला गाडी ह्या अवस्थेत दिसली...

पानाची पिंक बाहेर थुंकत वानखेडे हवालदार म्हणाले -" साहेब म्हणजे त्या गोवाड्याच्या तलावाजवळ, अहो काही वर्षांपूर्वी चांगला तलाव होता आता बिल्डर लोकांच्या अतिक्रमणाने पार डबकं झालंयसा... "

"साहेब.. साहेब... ह्यांचा गाडीला पुढे उजवीकडून सगळे रक्त लागले आहे, मी आताशीच गाडी नीटं पाहून आत आलो"- असे म्हणत दुसरे हवालदार कळसे यांनी येऊन जवळजवळ माझी बखोटीच धरली.

चव्हाण इतका वेळ शांत होते पण हे ऐकून ते ताडकन उठले, मला एक मुस्कटात लगावून म्हणाले - हरामखोरा खरं सांग काय झालंय नाहीतर लई मार खाशील...!

मी पुरता हवालदिल झालो होतो... हवालदारांच्या दांडगाईने शर्टाची दोन बटण पण तुटली होती - मी गयावया करत चव्हाणांच्या पाया पडलो - म्हणालो जे झाले ते सगळे सांगितले आहे, मी गुन्हेगार नाही, मी निर्दोष आहे... मी कोणालाही उडवले नाही, रक्त कसे आले मला माहीत नाही - परंतु माझे काही एक न ऐकता दोन्ही हवालदार मला पकडून बाहेर गाडीजवळ घेऊन आले.

चव्हाण गाडी पाहून म्हणाले, नक्की काहीतरी झाले आहे! कळसे-वानखेडे - टाका ह्याला गाडीत.. चला परत मागे जिथे हे सगळं घडलं अस ह्याच म्हणणं आहे.. आणि हो, मोठ्या चौकीत फोन करून अजून कुमक मागवा आणि अँब्युलन्स पण मागवा... चला!

पोलिसांच्या गाडीत बसून परत त्या रानच्या दिशेने निघालो पण १० फूट जातो न जातो तोच पोलिस व्हॅन चे पुढचे दिवे फ्यूज झाले आणि गाडी अचानक बंद पडली!

आता मात्र चव्हाणांना वेगळीच शंका येऊ लागली, ते मला म्हणाले - तुमच्या बोलण्यात तथ्य आहे किंवा नाही ते तिथे जाऊनच कळेल - तपास करावा लागेल - मग माझ्याच गाडीतून तिकडे परत जायचे ठरले, इं नि हवालदारांना डायरी, टॉर्च आणि दंडुके घेऊन मागे बसायला सांगितले, आणि मला म्हणाले "उतरली आहे का नक्की तुमची? चला शेजारी बसा - आमचा जीव जायचा तुमच्या मूर्खपणाने - मी चालवतो, चला ती जागा दाखवा!

मी निमूटपणे बसलो, त्या भयानक वातावरणात परत जाण्याची इच्छा नव्हती तरीही नाईलाजास्तव माझे खरेपण सिद्ध करण्यासाठी पुन्हा जावे लागत होते...

२०-२५ मिनिटे गाडी चालवल्यावर इं. म्हणाले किती लांब आहे अजून? - माझ्याकडे उत्तर नव्हते, कारण गाडीत बसल्यानंतर मी किलोमीटर वा घड्याळ काहीच न पाहता तसाच जीव वाचवायला बेफाम निघालो होतो...

१-२ मिनिटेच झाली असतील -- गाडीत पुन्हा धूर साचला... इं. चव्हाण ओरडले-- अरे ब्रेक का लागत नाही??

हवालदार कळसेंनी हँडब्रेक ओढला परंतु त्याची केबल तुटून ते मागच्या सिट वर जोरात फेकले गेले... गाडी भरकटली, हमरस्ता सोडून साईडलाईन चे बॅरिकेडस तोडून रानात घुसली... एका मोठा दगडावरून अगदी सपशेल फूटभर वर उडाली आणि तशीचं जमिनीवर आदळली - मागची काच फुटली आणि बेसावध फेकले गेलेले हवालदार कळसे मागच्या फुटक्या काचेतून बाहेर त्याच दगडावर निपचीत पडले.

माझ्याभोवतीचा सीटबेल्ट अधिकच घट्ट आवळला गेला, गाडीला वेग प्रचंड होता, गाडी हेलकावे खात थेट एका नीलगिरीच्या झाडावर जाऊन आदळली ति धडक इतकी भीषण होती की इन्स्पेक्टर चव्हाण पुढच्या काचेला फोडून नीलगिरीच्या खोडाला डोक्यावर धडकले... क्षणात मृत्यू कसा होतो ते तेव्हा मला समजले, गाडीचे बंपर आणि नीलगिरीचे खोड ह्यामध्ये सापडून चव्हाणांच्या डोक्याची शकले'च झाली होती.... फाटलेल्या बॉनेटवर त्यांची मलूल मान पडली आणि तोंडातून येणाऱ्या रक्ताच्या ओघळामुळे गाडीची संपूर्ण उजवी बाजू रक्ताने माखली!

सीटबेल्ट मुळे थोडेफार सावरलेला मी.. आजूबाजुची एकही गोष्ट स्पष्ट दिसत नव्हती, त्या ढवळाढवळीमुळे माझ्या डोळ्यात रक्त जमा झाले होते, चव्हाणांचा हा असा मृत्यू साक्षात समोर पाहून दातखीळ बसली, आणि बसल्या जागीच २ सणसणीत उलट्या झाल्या..

कसाबसा बेल्ट सोडवून बाहेर आलो -एक पाय सिट आणि अर्धवट निखळलेल्या दरवाज्यात सापडून पुरता जायबंदी झाला होता, कपडे म्हणजे तर लक्तरंच झाली होती -- बाहेर पाहतो तो दुसरीकडून उतरलेले हवालदार वानखेडे आपले डोके धरून चव्हाणांजवळ उभे होते, माझे लक्ष जाताच ते क्षणार्धात ४-५ फूट वर उंच हवेत उचलले गेले आणि तसेच तळ्याकडे भिरकावले गेले.... पोहता येत नसल्याने २-३ वेळा अस्पष्ट वाचवा.. वाचवा.. एवढेच ऐकू आले... आणि नंतर उरले ते फक्त पाण्यावर येणारे बुडबुडे...!

मी लंगडत- रांगत हमरस्त्यावर आलो - एका मिनिटात होत्याचे नव्हते झाले, पिशाच्चं, भुतं वगैरे बद्दल भ्रामक कल्पना आहेत असे ठामपणे सांगणारा मी ह्या ३ विचित्र मृतदेहांना पाहून पांढराफटक पडलो होतो... शुद्ध हरपणार असे वाटत होते पण तरीही पाय ओढत, फरफटत रस्त्यावरून टोल चौकीच्या दिशेने पळत सुटलो.... कितीतरी वेळ पळत होतो.... मध्ये मध्ये पडत होतो.. सरपटत होतो... एक सावली मागे येत आहे असा सारखा भास....

चव्हाणांचा मरणाआधीचा चेहरा, कळसेंचा दुर्दैवी दगडावर आपटून छिन्नविछिन्न झालेला देह, वानखेडेंची वाचवा ची हाळी.... सगळे सगळे आपला पाठलाग करत आहेत असे वाटत होते.... कपडे, बूट सर्वकाही फाटले, राहिला केवळ जीव वाचवण्याचा प्रयत्न....

बेशुद्ध होईपर्यंत पळत होतो... दूर गावच्या वेशीजवळ थोडा कंदिलाचा उजेड दिसला... आणि मी गलितगात्र होऊन तिथेच कोसळलो!!

-- आई-? बाबा? तुम्ही इथे कसे... आणि मी कुठे आहे? अहो काल रात्री काय भयानक प्रकार.... । आईने मला शांत केले, बाबा बाहेर जाऊन गावच्या सरपंचांना आत घेऊन आले, सरपंच, गावकरी आत आले -- सरपंचांनी मला पाणी दिले आणि आमच्या तिघांकडे पाहत म्हणाले - साहेब, हा मुलगा पहाटे गावच्या वेशीजवळ पडलेला आमच्या गावकऱ्यांना सापडला, अंगावर फाटके कपडे, एका पायांत चिंध्या झालेला बूट, फक्त जीन कापडाच्या पँट च्या खिशात मोबाईल सापडला आणि आम्ही तडक तुम्हाला फोन करून बोलावले.. लेकरू फार बिथरलेलं दिसतंय.. आता काय आहे नाही ते तुम्ही बघा...!

मग मी पुन्हा सगळी घडलेली गोष्ट गावकरी, सरपंचांसोबत आई-बाबांना सांगितली! - सरपंच गंभीर होत म्हणाले, "पोरा तू म्हणतोस ते अर्धवट सत्य आहे-- तुला "चकवा" लागला होता"!

अकरा-बारा वर्षांपूर्वी, हा हमरस्ता म्हणजे कच्चा रस्ता होता, गावचे पोलिस पाटील चव्हाण, हवालदार-कळसे आणि वानखेडे गस्तीला असताना एक ट्रक टोलनाक्याजवळ भरधाव वेगाने आला... थांबवण्यासाठी गेलेल्या चव्हाणांना फरफटतं काही कळायच्या आत ट्रक आणि रस्त्याजवळच्या झाडाची टक्कर झाली - चव्हाण नाहक चिरडले गेले, हवालदार कळसे साहेबांना वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडले, आणि पत्र्याच्या शेडवरून जाणारी विजेची तार वानखेडेंच्या अंगावर पडून जबरदस्त झटक्यामुळे गोवाड्याच्या तलावात फेकले गेले... आणि तिथेच ते बुडाले!

तिघांचा हा दुर्दैवी अंत पाहून साऱ्या गावाने सुतक पाळले, जुनी गस्तीची जागा रद्द केली गेली तिथे मोठा हमरस्ता बांधायच्या काँट्रँक्ट मध्ये गोवाड्याचा तलाव सुद्धा नाहीसा होत आला.... दुसऱ्या दिवशी पोलिस रिपोर्टात कळले की त्या ट्रकचा चालक दारूच्या नशेत धुंद होता, त्याच्या निष्काळजीपणाने ३ कुटुंबांची राख झाली!

तेव्हापासून ते आजतागायत...

तुमच्यासारखे अनेक लोक जे दारू पिऊन गाडी चालवतात त्यांना हा चव्हाण-कळसे-वानखेडेंचा "च-क-वा" लागतो!

पोलिसपाटील भली माणसं होती- त्यांनी कोणाला जिवानिशी मारले नाही, परंतु त्यांच्यासारखे अजून कोणी काळाच्या पडद्या-आड जाऊ नये म्हणून ते अश्या चालकांना जन्मभराची अद्दल घडवतात..!

सरपंच म्हणाले, - तुम्ही बोलता ते खोटे आहे असे मी म्हणणार नाही कारण मला हे सगळे माहीत होते, आणि एकंदर तुमची दशा पाहून हा अंदाज आला होता, पण फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो - तुम्ही काल मध्यरात्रीपासून वेशीवर येईस्तोवर ५०-५५ किलोमीटर पळत आला असाल -- जिथे ही घटना घडली होती त्याच्या आल्याड पल्याड ५०-६० किलोमीटरांपर्यंत कोणतीच चौकी नाही की टोल नाका नाही....! जे घडले तो च-क-वा होता. ! विसरून जा पण अनुभवातून शहाणे व्हा... तुमची गाडी बी ठीकं ठाक असलं तिथेच, फक्त बंद पडली असलं तेव्हा मॅकॅनिक घेऊन जा दिवसाउजेडीला.

आई बाबा आणि मी सुन्न झालो -- निरोप घेताना सरपंचांच्या देवघरात मी साष्टांग नमस्कार केला, म्हणालो - पुन्हा अशी चूक होणार नाही...! सरपंचांनी काळजी घ्यायला सांगून आम्हाला निरोप दिला - आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

मित्रांनो तात्पर्य एकच, DONT DRINK & DRIVE - तुम्ही कोण्या एका माणसाला नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला देशोधडीला लावण्यास कारण ठरू शकता!

मद्यपान करून चुकूनही गाडी चालवू नका - नाहीतर...... तुम्हालादेखील लागू शकतो हा च-क-वा!!

००
आशुतोष दीक्षित

Monday, August 1, 2011

वेताळ सव्व्हिशी !!

मागच्याच आठवड्यात वेताळ पंचविशीतील पहिले वर्ष सरले आणि अक्षरशः नावाला सार्थ करत.....

गेल्या वर्षीच लिहिल्याप्रमाणे माणसाचे बूट, त्याची लकाकी आणि ते ज्यावर उभे आहेत ती जमीन, ह्यांचा व्यक्तिमत्वावर खूप परिणाम होतो... आणि आनंद वाटतोय की हे सगळे जसे होते तसेच राहीले आहे किंबहुना जमीनीवरची पकड थोडी जास्तच घट्ट झाली आहे.

अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे ह्या वाक्याची प्रचिती आली, आणि मग ह्या गुरुच्या सहाय्याने समोरच्या प्रत्येक शत्रुला मान झुकवण्यासाठी भाग पाडून आज मी विजय पतका फ़डकवतोय... काहींना खुशाल म्हणू दे 'मी' ची बाधा ! पण जे आहे ते आहे.... आपल्यासाठी कोण दुसरा मदत करेल हा विचारच चूक आहे, आपण इतरांसाठी काही केलं... . तर कदाचित ते आपल्यासाठी करतील... ! आणि स्वतःला स्वतःपेक्षा जास्त मदत कोणीही करू शकत नाही.... !

असो, एकंदरीत वर्ष चांगले सरले, लपाछपी खेळत काही सुवार्ता येऊन धडकल्या... , वेताळाच्या प्रतीक्षेत १ वजा झाले...आता उरलेली २४ वर्षे बघू काय काय फळे देतात... !

Friday, April 8, 2011

"Good morning"

सकाळचा चहा, ब्रेकफास्ट गुडलक कॅफे मधले कॉर्नर चे संगमरवरी राउंड टेबल, आणि ४ मित्र..... !! वाह इसको बोलते है बोले तो "GOOOOOOD MMOOOOOORRRNINGGGGGG !!

' !! आज बरेच दिवसांनी असा अचानक भेटायचा योग आला, दर्शन आणि मी रात्री १२ च्या आसपास फेसबुकवर भेटलो, आणि सकाळी ८ ला गुडलक ला भेटायचे अचानक ठरले, मग निनाद,सारंग,आलोक ई. लोकांना फोन फिरवले....

निनाद झोपेच्या इतका आहारी गेला आहे की तो आजकाल म्हणे मोबाइल SILENT करून झोपतो !! असो, अनेक दिवसांनी खरं काम करायची वेळ आली माणसावर की होत अस कधी कधी :) !

सारंग सध्या'च चतुर्भुज झाला असल्याने त्याचे रात्री फोन न-उचलणे समजून घेतले जाउ शकते, परंतु आता २४ तास होउनही साधा एक रिप्लाय न देता येणे ही गोष्ट पुढील मीटींगचे बील त्याच्या माथी मारण्यासाठी चालून जाईल...

आलोक ने फोन उचलला आणि वेळेत पोहोचला देखील, निनाद पण थोडा उशीरा का होईना पण पोचला... आम्ही, ४ लोक, फाउंडर मेंबर्स of eX-Students Group (जो काही मुर्ख माणसांमुळे अपेक्षेनुसार पुढे चालवता आला नाही..) असे सहज भेटलो... गप्पांच्या ओघात तास-दिड तास कसा गेला कळलं नाही.... शाळेतल्या बेंच पासून ते शिपायांपर्यंतचे विषय हा हा म्हणता निघत गेले... आणि तासाभरात गुडलक मधला तो कॉर्नर - हास्य-कॉर्नर बनला !! आजकाल लोक फ़ेसबुकं, ऑर्कुट, ट्विटर, GTALK,AIM,YM ह्यावर पडिक असतात पण भेटायचे म्हटले की सर्वांत सोयीस्कर कारण "वेळ'च नाहीये सध्या" !!" आम्ही चौघांनी वेळ काढला... आणि तेवढा वेळ सत्कारणी लागला... एका महान लेखकानी सांगितलं आहे की हास्य-विनोदात आणि स्व-आनंदात घालवलेले क्षण म्हणजे आयुष्य डबल' करण्यासाठीचे अमृत आहे !! त्यामुळे ही असली चुटूर-पुटूर कारणे बाजुला ठेवा.... थोडे स्वतःला MOLD करा थोडे तुमच्या TIMETABLE ला.. आणि आपल्या जुन्या नव्या मित्रांना/मित्रगटांना(groups) भेटायला आवर्जून जा... बघा पुढचा सगळा दिवस कसा मस्त जातो ते....

आणि जर तुम्ही सुद्धा eX-abhinav वाले असाल् तर मग आमचा कंपू तुमच्यासाठी तसाही RED CARPET घालून OPEN आहे ....

असे हास्य-विनोदाचे क्षण अनुभवायचे असतील तर पुढच्या वेळी तुम्ही पण नक्की या "गुडलक" मध्ये Ex-Student's meeting sathi---- (NOTHIN RELATED TO ANY ACTIVITY OR ANY CAUSE, ITS JUST A FRIENDLY MEET !!)